‘मोहन वीणे’चा निर्माता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020   
Total Views |
Pt. Vishwa Mohan Bhatt_1&

 
 
‘मोहन वीणे’ची निर्मिती करून तिला भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणणार्‍या पं. विश्व मोहन भट्ट यांच्याविषयी...
 
 
 
जागतिक संगीत पटलावर भारतीय शास्त्रीय संगीत, वादक आणि संगीतकारांचे नाव उंचावणार्‍या दिग्गजांच्या यादीत या व्यक्तीच्या नावाचा समावेश होतो. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची साधना तर केलीच, पण एका वाद्याच्या निर्मितीने संगीत जगतामध्ये नवाविष्कार केला. ‘स्पॅनिश गिटार’ला भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जोड देऊन त्यांनी ‘मोहन वीणा’ या वाद्याची निर्मिती केली. त्याचा प्रचार केला. या वाद्याच्या मूळ, शुद्ध, नाजूक पण अग्निमय संगीताने जगाला मंत्रमुग्ध केले. या वाद्याला त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणले. या वाद्याच्या बळावरच त्यांना भारत सरकारच्या ‘पद्मभूषण’पासून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ग्रॅमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मोहन वीणे’चा हा निर्माता म्हणजे ज्येष्ठ वादक आणि संगीतकार पं. विश्व मोहन भट्ट.
 
 
 
राजस्थानातील जयपूरमध्ये २७ जुलै, १९५२ मध्ये पं. भट्ट यांचा जन्म झाला. संगीताची ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या घरात जन्मल्यामुळे ‘बाळाचे पाय पाळण्यात’ दिसलेच. त्यांचे वडील मनमोहन भट्ट हे शास्त्रीय गायक होते. त्यामुळे संगीताचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण वडिलांनी त्यांना दिले. गायन, त्यातील रचना, राग, तालांची ओळख करून दिली. वडिलांकडील शिक्षणानंतर त्यांना वादनात रस असल्यामुळे प्रसिद्ध ज्येष्ठ सतारवादक ‘भारतरत्न’ पं. रवि शंकर यांच्याकडे त्यांनी सतार वादनाच्या शिक्षणास सुरुवात केली. सोबत व्हायोलिन वादनाचे शिक्षण घेतले. मात्र, मुळातच भट्ट यांना संगीतामध्ये करिअर करण्यात रस नव्हता. सतार आणि व्हायोलिनचा अभ्यास करताना त्यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षांची तयारी सुरू केली होती. मात्र, या दरम्यान एक सांगेतिक अपघात घडला आणि भट्ट संगीताकडे आकर्षित झाले.
 
 
 
१९६७ सालची एक घटना. जयपूर येथील भट्ट यांच्या वडिलांच्या संगीत शाळेत एक जर्मन विद्यार्थी स्पॅनिश गिटार सोडून गेला होता. त्या गिटारचे काही भाग ठिकठिकाणाहून मोडकळीस आले होते. भट्ट यांनी स्वत:हून यावर दावा केला आणि ते पुन्हा तयार करण्याचे ठरवले. सत्तरच्या दशकात ज्यावेळी संगीतामध्ये रूची असलेल्या भारतीय तरुण मंडळींचा गिटार वादनाकडे कल होता, त्यावेळी भट्ट यांनी याच गिटारपासून नववाद्य निर्मितीचा मेळ घातला. स्लाईड ध्वनी आणि तारांच्या निर्मितीसाठी इन्स्ट्रुमेंटची रचना, डाव्या आणि उजव्या हाताची तंत्रे, वेगवेगळ्या वस्तूंचा प्रयोग करून त्यांनी या स्पॅनिश गिटारमध्ये बदल केले. अनेक ड्रोन तारांची जोडणी केली. या वाद्याला ‘हवाईयन स्लाईड गिटार’सारखे वाजविण्याची पद्धत अवलंबली. भारतीय शास्त्रीय संगीतामधील बोलक्या ‘स्लाईडिंग नोट्स’चा त्यामध्ये समावेश केला. या सर्व प्रयोगानंतर ‘मोहन वीणे’चा जन्म झाला. या वाद्याला त्यांनी स्वतःचे नाव आणि ‘वीणा’ हे संस्कृत नाव कायम ठेवले. हे वाद्य स्पॅनिश गिटार आणि सतार यांचे संकर असल्याचे दिसते. ‘मोहन वीणे’चा ध्वनी हा ‘वेस्टर्न स्लाईड गिटार’सारखा वाटतो आणि ‘सतार मिझ्राब’ (वायर पिक्स), अंगठा आणि ‘पॉलिश स्टील रॉड’सह हे वाद्य वाजविले जाते.
 
 
 
१९७०च्या सुरुवातीच्या काळात भट्ट यांनी स्वत:ला रेकॉर्डिंग कलाकार म्हणजेच रेकॉर्डिंगमधील वादक कलाकार म्हणून प्रस्थापित केले. याच दरम्यान आपले गुरू पं. रवि शंकर यांच्यासोबत त्यांचे परदेशातील दौरे सुरू झाले. त्यांच्या संगीत कारकिर्दीसाठी ‘ए मीटिंग बाय द रिव्हर’ हा अल्बम मैलाचा दगड ठरला. अमेरिकन स्लाइड गिटारवादक राय कोडर यांच्यासोबत केलेल्या या अल्बमसाठी १९९४ साली त्यांना ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला. या अल्बमनंतर ताजमहल, बेला फ्लेक आणि जेरी डग्लससारख्या पाश्चात्य कलाकारांसोबत केलेल्या संगीत सहकार्यामुळे ते नावारूपास आले. मात्र, २००४ साली एरिक क्लेप्टनने आयोजित केलेल्या ‘क्रॉसरोड्स गिटार’ महोत्सवातील त्यांच्या ‘मोहन वीणे’च्या प्रदर्शनामुळे त्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्ध मिळाली. या महोत्सवामुळे त्यांचा एक श्रोतावर्ग निर्माण झाला आणि श्रोत्यांमुळे त्यांना मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
 
 
 
भट्ट यांचे ‘तंत्रकारी अंग’ वाजवण्याची आणि ‘मोहन वीणे’वर ‘गायकी अंग’ समाविष्ट करण्याची शैली ही उत्कृष्ट आहे. ‘मोहन वीणे’वर हवाईयन गिटार वादन पद्धतीला सतार, सरोद आणि वीणेच्या तंत्राची जोड त्यांनी दिली आणि त्यांचे भारतीयकरण केले. सोबतच ‘मोहन वीणे’ला १४ तारांची जोड देऊन त्यामध्ये उत्क्रांती आणली. त्यांनी अमेरिका, रशिया, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली, नेदरलॅण्ड्स, बेल्जियम, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, त्यानंतर दुबई, अल-शारजाह, बहारीन, मस्कत, अबू धाबी वगैरे आणि संपूर्ण भारतभर सादरीकरण केले. भट्ट आपली पत्नी आणि दोन मुले यांच्यासह राजस्थानच्या जयपूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा मुलगा सलील भट्ट ‘मोहन वीणा’वादक आहे.
 
 
 
पंडित विश्व मोहन भट्ट यांना ‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’, ‘ग्रॅमी’, ‘संगीत नाटक अकादमी’, ‘संगीत वैज्ञानिक’, ‘राष्ट्रीय तानसेन’ पुरस्कार, ‘तांत्रिक सम्राट’, ‘राजस्थान रत्न’ आणि ‘ग्लोबल म्युझिक अ‍ॅवॉर्ड’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिष्ठित ‘सेंट पीटरबर्ग विद्यापीठा’ने त्यांना ‘मानद’ पदवी दिली आहे. संगीतातील नवनिर्मात्याच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@