अटलांटिक महासागराच्या पूर्व तटाकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


Morocco_1  H x



मोरोक्कोमध्ये घटनात्मक राजेशाही आहे. याचा अर्थ पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद हेच देश चालवतात. पण, देशाचा प्रमुख राजा असतो, असं अपेक्षित आहे. पण, मोरोक्कोत प्रत्यक्षात तसं नाही. म्हणजे प्रत्यक्ष कारभार मंत्रिमंडळ चालवत असलं तरी कुणीही राजाच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही.



कौरव आणि पांडवांमधला कलह फार वाढायला लागला तेव्हा राजा धृतराष्ट्राने पांडवांना काही दिवस हस्तिनापूर सोडून गंगेच्या काठी वारणावत या नगरीत जाऊन राहण्याची आज्ञा केली. पांडव सगळ्यांचा निरोप घेऊन निघत असताना महामंत्री विदुराने युवराज युद्धिष्ठिराला ‘बर्बर’ भाषेत काही सूचना दिल्या, असं महाभारतात म्हटलं आहे.


ही कोणती ‘बर्बर’ भाषा? महाभारतकारांना नेमकी कोणती ‘बर्बर’ भाषा अपेक्षित होती, हे आज आपल्याला कळायला मार्ग नाही. पण, आधुनिक जग ज्यांना ‘बर्बर भाषिक’, ‘बर्बर जमातीचे लोक’ म्हणतात, ते लोक म्हणजे उत्तर आफ्रिकेचे मूळ रहिवासी. काळ्या किंवा त्यापेक्षा किंचित उजळ वर्णाचे, चमकदार तपकिरी केसांचे, मध्यम आणि दणकट बांध्याचे हे लोक मोठे उत्साही असतात. ते शेती करतात, शेळ्यामेंढ्यांचे कळप पाळतात. उंटसुद्धा पाळतात.


उत्तर आफ्रिकेच्या पुढे भूमध्य समुद्र आणि त्याच्यापलीकडे ग्रीस देश. प्राचीन काळातला युरोपातला सर्वात सुधारलेला देश म्हणजे ग्रीक. प्राचीन ग्रीक लोकांचा या ‘बर्बर’ लोकांशी साहजिकच सारखाच संबंध यायचा. त्यामुळे ग्रीक त्यांना ‘बार्बेरियन्स’ असं म्हणत असत. सुरुवातीला या शब्दाला कोणताही गौण अर्थ चिकटलेला नव्हता. पण, काळाच्या ओघात ग्रीक स्वतःला श्रेष्ठ आणि इतर सर्वांनाच तुच्छ समजू लागले. त्यामुळे ते उत्तर आफ्रिकेतल्या ‘बर्बर’ लोकांना ‘बार्बेरियन्स’ म्हणजे तुच्छ, अडाणी, फालतू अशा अर्थाने संबोधू लागलेच. पण, विशेष म्हणजे ते रोमन लोकांनादेखील ‘बार्बेरियन्स’ म्हणू लागले. आधुनिक इंग्रजी भाषेतही तो शब्द त्याच अर्थाने रूढ आहे.


पुढे ग्रीकांची सद्दी संपली आणि रोमनांची सुरू झाली. रोमनांनी आपलं साम्राज्य तिन्ही दिशांना वाढवायला सुरुवात केली. उत्तरेकडे युरोप, पूर्वेकडे आशिया आणि दक्षिणेकडे आफ्रिका. इसवी सन 43 या वर्षी त्यांनी उत्तर आफ्रिकेची बरीचशी किनारपट्टी जिंकून आपल्या साम्राज्याला जोडली.


आज मोरोक्को या नावाने ओळखला जाणारा आफ्रिका खंडाच्या पश्चिम टोकावरचा देशही त्याचवेळी रोमन साम्राज्याचा भाग बनला. अ‍ॅटलास पर्वताच्या रांगांनी या देशाची बरीच भूमी व्यापलेली आहे. पुढे रोमन साम्राज्यही दुर्बल झालं. इसवी सनाच्या सातव्या शतकात आशिया खंडातल्या अरबस्तानात इस्लामचा चाँदतारा नव्यानेच चमकू लागला. पूर्वी आपसात भांडणार्‍या अरबी टोळ्या इस्लामच्या नावाखाली एकवटल्या. त्यांनाही रोमनांप्रमाणे साम्राज्याची स्वप्नं पडू लागली आणि खरोखरच पाहता पाहता त्यांनी उत्तर आफ्रिकेचा सगळा किनारा व्यापून थेट अटलांटिक महासागर गाठला.


रोमनांनी उत्तर आफ्रिका जिंकली. पण, बाटवाबाटवी केली नाही. किंबहुना, आपला वंश आणि धर्म ते सर्वश्रेष्ठ समजत असल्यामुळे त्यांच्या धर्मात इतरांना प्रवेश नव्हताच. रोमनांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर त्या ख्रिश्चन पाद्य्रांनी बाटवाबाटवी सुरू केली. पण, तिची झळ आफ्रिकेला अजून तितकीशी जाणवली नव्हती. तोवर इस्लामी अरब येऊन धडकले. त्यांनी मनसोक्त बाटवाबाटवी केली. ‘मिस्र’ ऊर्फ ‘इजिप्त’ हा प्राचीन देश पूर्णपणे इस्लामी झाला. तिथले मूळ वंशाचे लोक एकतर अरबांच्या तलवारीखाली कत्तल झाले वा मुसलमान होऊन अरबांमध्ये मिसळून गेले.


लीबिया, अल्जेरिया, मोरोक्को यांचंही हेच झालं. मूळ ‘बर्बर’ वंशाचे लोक साफ नष्ट झाले नाहीत एवढंच, मात्र अरबांशी त्यांचा भरपूर संकर झाला. अरब भूमध्य समुद्रमार्गे युरोपातही घुसले होते. सतत ७००-७५० वर्षे अरब आणि युरोपियन ख्रिश्चन यांचा झगडा चालूच होता. यात फार होरपळून निघाला तो स्पेन देश.


एखादा सुलतान स्पेन जिंकायचा नि तिथल्या सगळ्या चर्चेसच्या मशिदी बनवायचा. मग एखादा राजा, सेनापती वा अरबांचा पराभव करायचा नि पुन्हा सगळ्या मशिदी पाडून त्यांची चर्चेस बनवायचा. असं स्पेनमध्ये वारंवार घडलं आहे. स्पॅनिश बायका आणि अरब पुरुष यांच्या संबंधातून स्पेनमध्ये मुसलमानांची एक नवीनच जात उदयाला आली. त्यांना म्हणत ‘मूर.’ हे मूर लोक पक्के दर्यावर्दी असत. भूमध्य समुद्राच्या काठाने वस्ती करून ते मासेमारी, व्यापार आणि चाचेगिरीसुद्धा करत.


इसवी सन १४९२ साली स्पेनने मुसलमानांचा निर्णायक पराभव केला. विजेत्या ख्रिश्चनांनी जित मुसलमानांसमोर तीन पर्याय ठेवले- एक तर ख्रिश्चॅनिटीचा स्वीकार करून देशाच्या मुख्य प्रवाहात मिसळून जा किंवा स्पेनमधून जगाच्या पाठीवर कुठेही चालते व्हा किंवा हे दोन्ही पर्याय अमान्य असतील, तर कत्तल होऊन मरा!


शहाण्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. थोडे मूर्ख स्पॅनिशांच्या तलवारींखाली कटून गेले. बरेच जण भूमध्य समुद्र ओलांडून उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आले. विशेषतः ‘मूर’ लोक मोरोक्कोत स्थिरावले. मूळच्या ‘बर्बर’ लोकांची आणि अरबांची सरमिसळ होऊन मोरोक्कोत वेगवेगळ्या चार सुलतानांच्या सल्तनती बनलेल्या होत्याच. त्यात आणखी या स्पेनमधल्या मुसलमानांची भर पडली. ‘बर्बर’ टोळ्यांचे मूळ धंदे म्हणजेच शेती, पशुपालन इत्यादी होतेच. तेच हेही करू लागले.


काही काळाने मोरोक्को देश उत्तम कमावलेल्या विशेष प्रकारच्या चामड्याखाली प्रसिद्ध झाला. मोरोक्कोच्या उत्तर भागात अ‍ॅटलास पर्वताच्या वायव्य उतारावर पाळल्या जाणार्‍या बकर्‍यांचं चामडं फार चमकदार असतं, असं आढळून आलं. मग ते विशेष टिकाऊ बनवण्याची एक प्रक्रिया शोधली गेली आणि लवकरच मोरोक्कोचं सुंदर चमकदार चामडं किंवा चामड्याच्या वस्तू युरोपातल्या श्रीमंतांच्या दिवाणखान्यातून झळकू लागल्या. फॅशनेबल बाया आपल्या हातातली पर्स, अंगावरचं जाकीट किंवा पायातले जोडे मोरोक्कन चामड्याचे आहेत, असं प्रौढीने सांगण्यात धन्यता मानू लागल्या.


जगाच्या पाठीवर कुठेही व्यापाराची संधी दिसली की तिथे घुसायचं. प्रथम तेथील बाजारपेठ काबीज करायची. मग हळूहळू तो अख्खा देशच आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करायचा, हे सगळ्याच युरोपीय देशांचं लाडकं तत्त्व. मोरोक्कोच्या शेजारचा अल्जेरिया फ्रान्सने घशात घातलाच होता. सन १९१२ मध्ये मोरोक्कोचा नंबर लागला.


फ्रेंचांनी मोरोक्कोतल्या चारही सल्तनती म्हणजे चार सुलतानांची राज्ये एकवटून त्यांचं एकच राज्य बनवलं. म्हणजे सुलतान नावापुरताच. खरा कारभार राबात या अटलांटिक महासागरावरच्या बंदरगावी ठाण मांडून बसलेला फ्रेंच रेसिडेंटच चालवायचा. फ्रेंच अमदानीच्या या कालखंडातच फ्रेंचांना कॅझाब्लांका या ठिकाणाचा शोध लागला. अंगणात अफाट पसरलेला अटलांटिक महासागर नि पाठीशी अ‍ॅटलास पर्वताच्या चित्रमय रांगा असलेल्या कॅझाब्लांका नावाच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याने फ्रेंच लोक वेडे झाले. फ्रेंचांसकट सगळ्या युरोपियनांना एक नवीन पर्यटनस्थळ सापडलं- कॅझाब्लांका.


१९५६ साली मोरोक्को फ्रेंचांच्या तावडीतून सुटून स्वतंत्र बनला. सुलतान हसन दुसरे हे त्याचे राजे बनले. १९९९ साली हसन मरण पावले आणि त्यांचा मुलगा मुहम्मद हा सुलतान मुहम्मद सहावा या नावाने गादीवर बसला. फ्रेंचांच्या कालखंडात मोरोक्कोच्या भूमीत फॉस्फेटचे प्रचंड साठे मिळाले. आज मोरोक्को हा जगातला प्रथम क्रमांकाचा फॉस्फेट निर्यातदार देश आहे. मोरोक्कोमध्ये घटनात्मक राजेशाही आहे. याचा अर्थ पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद हेच देश चालवतात. पण, देशाचा प्रमुख राजा असतो, असं अपेक्षित आहे. पण, मोरोक्कोत प्रत्यक्षात तसं नाही. म्हणजे प्रत्यक्ष कारभार मंत्रिमंडळ चालवत असलं तरी कुणीही राजाच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही. राजा मुहम्मद सहावा हे काय प्रकरण आहे, हे कुणालाच कळत नाही. कुणी म्हणतात तो एखाद्या फकिरासारखा विरक्त आहे, तर कुणी म्हणतात तो विलासी आहे. पण, तो महिनेच्या महिने राजधानी राबातमधूनच नव्हे, तर देशातूनच बेपत्ता असतो. त्याच्या गैरहजेरीत मंत्रिमंडळ महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाही. कामं अडून राहतात. मग केव्हातरी हा राजा उगवतो. आपण बराच काळ देशाबाहेर राहिल्यामुळे आपली जनता आपल्या दर्शनाला आसुसलेली आहे, असं म्हणून तो देशव्यापी दौर्‍यावर निघतो. गावात, शहरात हिंडतो. लोकांसाठी सार्वजनिक उपयोगाच्या वास्तू निर्माण करतो. त्यांची उद्घाटनं करतो. मुक्तहस्ताने दानधर्म करतो आणि पंतप्रधानांसह सगळं मंत्रिमंडळ निर्णयासाठी अडलेल्या फाईल्स घेऊन त्याच्यामागे फरफटत जात असतं. गेली २० वर्षे हा असाच क्रम चालू आहे.


मोरोक्कोचं ब्रीदवाक्य आहे- ‘अल्ला, अल् वतन, अल् मालिक.’ (आपलं जसं ‘सत्यमेव जयते’ आहे, तसं.) त्याचा अर्थ परमेश्वर, देश आणि राजा. अर्थातच त्यामुळे राजावर टीका केलेली अजिबात खपवून घेतली जात नाही. अलीकडेच मुहम्मद इराणी नावाच्या पत्रकाराने राजाच्या दानधर्मावर टीका केली. खरंतर त्याच्या टीकेत तथ्य होतं. त्याने लिहिले होतं की, “राजाकडून दान घेणारे लोक आळशी नि ऐतखाऊ बनतात.” या ‘अपराधा’बद्दल त्याला दोन वर्षे सक्तमजुरी नि रोख दंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. मोरोक्कोत लोक फुटबॉलचे वेडे आहेत. सध्या सगळ्या जगभरच्या फुटबॉल शौकिनांना बार्सिलोना या सुप्रसिद्ध फुटबॉल संघाने वेड लावलं आहे. बार्सिलोनाचं लघुरूप होतं ‘बार्सा.’ यासीन बेलासल या फुटबॉलवेड्या तरुणाने आपल्या घरासमोरच्या भिंतीवर लिहिलं- ‘अल्ला, देश आणि बार्सा.’ ही राजाची बेअदबी झाली. त्याबद्दल यासीनला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

या दोघांना नंतर माफी देण्यात आली. पण, रशीद नीनी किंवा अबुबकर जमाई हे पत्रकार असे सुदैवी ठरले नाहीत. राबातमधल्या ‘अल्-मसाई’ या प्रचंड खपाच्या दैनिकाचा संपादक रशीद नीनी याला राजाची बेअदबी केल्याबद्दल एकंदर ६६ लाख दिरहाम एवढा जबर दंड ठोठावण्यात आला. ९.११ दिरहाम म्हणजे एक डॉलर. आता करा हिशोब! रशीद हवालदिल झाला आहे, तर दुसरा पत्रकार अबुबकर जमाई अशाच स्वरुपाचा जबर दंड चुकवण्यासाठी फरारी झाला आहे. अशा प्रकारे मोरोक्को हा मुसलमानी देश अजून मध्ययुगीन सुलतानांच्या कालखंडातच वावरत असला तरी इतर इस्लामी देशांप्रमाणे तिथे आपसात ‘जिहाद’च्या नावाने कत्तलबाजी चालू नाही. हेही नसे थोडके!

@@AUTHORINFO_V1@@