Crude Oil in Andaman Sea: अंदमान समुद्रातील तेलाचा शोध लागला तर अर्थव्यवस्था २० ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे संकेत

    16-Jun-2025
Total Views |


नवी दिल्ली :
भारत सरकार पेट्रोलियम क्षेत्रात वेगाने काम करत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून संभाव्य विविध ठिकाणी तेलाचे साठे शोधण्याचे काम सुरू आहे, यातूनच अंदमानच्या समुद्रातही कच्च्या तेलाचे साठे शोधण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. अंदमानच्या समुद्रात जर तेलसाठा सापडला तर भारताला इतर देशांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे संकेत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले. द न्यू इंडियन या वेबसाइटला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

भारतात  ८५ ते ९० टक्के कच्चे तेल इतर देशांतून आयात केले जाते. भारत हा कच्च्या तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे. यात पहिल्या स्थानावर अमेरिका तर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. अशातच, अंदमानच्या समुद्रात कच्च्या तेलाचा साठा सापडणे हे भारतासाठी परिर्वतन घडवणारे ठरू शकते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी अंदमान येथील कच्च्या तेलाच्या साठ्याबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, “भारत अंदमानच्या समुद्रात तेलसाठ्याच्या शोधाच्या उंबरठ्यावर आहे. जर भारत अंदमानच्या  समुद्रात गयानाएवढा तेलसाठा शोधण्यात यशस्वी ठरला तर भारतासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. भारताचे इतर देशांवर अवलंबून राहणे हे कमी होईल. भारत आपल्या गरजेनुसार कच्चे तेल स्वतःच उत्पन्न करू शकतो”, असे मंत्री पुरी म्हणाले.

ते म्हणाले "मला वाटते की, अंदमान समुद्रात आपल्याला गुयानाएवढा मोठा शोध लागणे ही केवळ वेळेची बाब आहे. आमचा शोध सुरू आहे. अन्य शोधांव्यतिरिक्त जर भारताने अंदमानमध्ये गुयानाएवढा तेलाचा साठा शोधला, तर भारताची ३.७ ट्रिलियन डॉलर असलेली अर्थव्यवस्था ही थेट २० ट्रिलियन डॉलर एवढी बनेल.

भारतासाठी ही परीर्वतनाची नांदी


भारतात कच्च्या तेलाचे साठे हे प्रामुख्याने गुजरात,राजस्थान, आसामच्या खोऱ्यात आहेत. यातील नवीन साठे हे राजस्थान आणि ओडिशात प्रस्तावित आहेत. अंदमानच्या समुद्रात तेलाचा शोध हा अंतिम टप्यात आहे. ‘ओएनजीसी’ व ‘ऑइल इंडिया’ यांसारख्या कंपन्याच्या माध्यमातून अंदमानच्या समुद्रात ड्रिलिंग आणि सर्वेक्षण सुरू आहे. जर अंदमानमच्या समुद्रात भारताला तेलसाठा सापडला, तर तो भारतीय  अर्थव्यवस्थेसाठी परीर्वतनाची नांदी ठरू शकतो. सध्या भारतात सौदी अरेबिया, इराक, रशिया यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात केले जाते. तर कृष्णा-गोदावरी खोरे आणि संभाव्य अंदमान साठ्यामुळे भारताचे आयातीवर अवलंबून राहणे कमी होऊ शकते.