अग्निदेवा! ने सुपथी आम्हां...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2020
Total Views |
fire_1  H x W:



अग्नीमध्ये सर्वांच्या कार्यांना जाणण्याचे सामर्थ्य आहे. जसा भौतिक अग्नी किंवा तिची दिवा, पणती, ज्योती अशी छोटी-छोटी प्रतीकेहीदेखील सर्व वस्तूसमूहांचे ज्ञान करून देतात. त्याप्रमाणे अग्निस्वरुप, परमेश्वर हा सर्व ज्ञान-विज्ञानाला जाणणारा ‘सर्वज्ञ’ देव आहे...



अग्नेनय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम ॥
(ऋग्वेद १/१८९/२, यजु. ५/३६)

अन्वयार्थ
(अग्ने) हे सर्वाग्रणी, नायक, पथदर्शका! (देव) दिव्यगुणयुक्त परमेश्वरा! आपण (विश्वानि) सर्व प्रकारच्या (वयुनानि) ज्ञान-विज्ञानांना (विद्वान) जाणणारे आहात. म्हणूनच आम्ही सर्वजण (ते) आपली (भूयिष्ठाम्) मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा (नम) नमस्कारांची (उक्तिम्) स्तुतिरुप उक्ती-वचने (विधेम) प्रस्तुत करतो. हे देवा! (राये) धनैश्वर्याच्या प्राप्तीकरिता (अस्मान्) आम्हा सर्वांना (सुपथा) सन्मानाने सुपंथावर (नय) ने आणि (अस्मन्) आम्हांपासून (जुहुराणम्) कुटिल कारस्थानरुपी (एनम्) पापाला (युयोधि) दूर कर!

विवेचन
या जगात आम्हा सर्व प्राणिमात्रांचे आत्यधिक जवळचे व अत्यंत उपयुक्त कोणते तत्त्व असेल तर ते म्हणजे अग्नितत्त्व! अग्नी म्हणजे आग! ती प्रकाश, आरोग्य, जगण्याचे बळ तर देतेच देते, पण उत्साहही वाढविते. पंचमहाभूतांपैकी एक मोलाचे घटक असलेला अग्नी छोटा असो की मोठा तो दिशादर्शक, पथप्रदर्शक आणि भीतीनिवारक आहे. गडद अंधारात चालताना वाट चुकल्या अगदी छोटासा काजवादेखील चमकला किंवा विजदेखील चमकून गेली तर हायसे वाटते व पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. त्यातच दूर अंतरावर असलेला मिणमिणता दिवाही आपल्याला चैतन्याचा किरण ठरतो. आम्हा सर्वांना तो दिशा दाखवितो. म्हणूनच तो नेता आहे. अग्र+णी अग्रभागी आहे आणि पुढे नेता! पण, हा नेता राजकारणी पुढार्‍यांप्रमाणे वाट चुकलेला (पथभ्रष्ट) नाही. अगदी प्रामाणिक व वाटसरूंना योग्य तीच (सुयोग्य) दिशा देणारा आहे. ‘अग्-आग’ या गत्यर्थक संस्कृत धातूपासून ‘अग्नी’ हा शब्द तयार होतो. ज्याचे की गती व पूजन असे दोन अर्थ होतात. गतीचेही ज्ञान, गमन व प्राप्ती असे तीन अर्थ बनतात, तर पूजा म्हणजे सत्कार होय. म्हणजेच जो ज्ञानस्वरूप, सर्वज्ञ, जाणण्यायोग्य आणि सत्कारण्यायोग्य आहे, तो अग्नीदेव होय.


जगातील मानवजातीच्या साहित्यात वेद हे सर्वात प्राचीनतम ग्रंथ, त्यातही ‘ऋग्वेद’ हा चार ग्रंथात प्रथम वेद! याच वेदात पुढील पहिला मंत्र आहे-



अग्निम्मिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् ।
होतारं रत्नधातमम् ॥



यात पहिला शब्द आहे- ‘अग्नी!’ परमेश्वराने या जगात इतरही अनेक जड व चेतन समूहांना निर्मिले आहे. पण, त्यांचा जगण्याचा उपयोग काय? निसर्गात उत्पन्न केलेल्या सर्वच सूक्ष्म व स्थूल तत्वांमुळे माणसाला दिशा मिळेल काय? हे आमचे मार्गदर्शक होऊ शकत नाहीत. पण, ‘अग्नी’ हा मात्र खर्‍या अर्थाने नेतृत्व करू शकतो. स्वप्रकाशाचे व इतरांना प्रकाशित करण्याचे बलसामर्थ्य अग्नीतच आहे. अग्नीच्या साहाय्याने माणूस ज्ञान-विज्ञानक्षेत्रात प्रगती साधू शकतो. म्हणून जगाचे नेतृत्व करणारा आमचा अग्नी देव हाच श्रेष्ठ आहे. संत ज्ञानेश्वरही म्हणतात-



जैसी दीपकळिका धाकुटी ।
परि तेजांसि बहु प्रकटी ॥



अग्नीमध्ये सर्वांच्या कार्यांना जाणण्याचे सामर्थ्य आहे. जसा भौतिक अग्नी किंवा तिची दिवा, पणती, ज्योती अशी छोटी-छोटी प्रतीकेहीदेखील सर्व वस्तूसमूहांचे ज्ञान करून देतात. त्याप्रमाणे अग्निस्वरुप, परमेश्वर हा सर्व ज्ञान-विज्ञानाला जाणणारा ‘सर्वज्ञ’ देव आहे... ‘विश्वनि वयुयानि विद्वान्।’ वयुनम् म्हणजेच बुद्धी, प्रज्ञा, ज्ञान होय. ईश्वर सर्व प्रकारच्या ज्ञानाचे केंद्रस्थान आहे. तो सर्व विद्यांचा सागर आहे. इतर नातीगोती किंवा भौतिक साधने माणसाला धोका देऊ शकतात. पण, अग्निस्वरुप परमात्मा मात्र कधीच लेशमात्रदेखील धोका नाही. त्याच्याजवळ काहीच भ्रम, अज्ञान, भय किंवा संशय नाही... तो देव अग्नी हा योग्य तोच सत्य मार्ग दाखवतो. स्वतः जो सत्यधर्म जाणतो, तोच इतरांनाही सन्मार्ग दाखवू शकतो. ज्याला काही माहीतच नाही, जो की अज्ञानी आहे, तोच इतरांना काय सांगेल? किंवा ज्याला माहीत आहे, पण तो स्वार्थी, मतलबी आहे... असे तर अन्य लोकांना फसवितातच, तो सुपंथ नव्हे, तर कुपंथ दाखवितात. परमेश्वर सुपंथदर्शी आहे. त्याकडे मानवाने प्रार्थना केली आहे. ती म्हणजे कुटिल व वेड्यावाकड्या वाईट पापांपासून दूर ठेवण्याची! ‘जुहुराणम् एनः युयोधि।’ पाप उत्पन्न होते, ते अनिष्ठ (विपरीत) मार्गाने गेल्यामुळे! म्हणूनच आमच्यातील वाईट वृत्ती आणि तिच्याद्वारे उत्पन्न होणारी सर्व पापे दूर झाली पाहिजेत. कुटिलमार्ग म्हणजेच सरळ नसलेला रस्ता...! विषारी साप वेडावाकडा चालतो. दुष्ट माणसेही अशीच असतात. ते सरळमार्गी नसतात. ते दगाफटका समोरून करत नाहीत, मागून करतात. म्हणूनच अग्निदेव म्हणजेच सर्वाग्रभागी असलेल्या ईश्वराकडे भक्त हा अशा कुटिल वृत्तीमुळे निर्माण होणार्‍या पापांपासून वाचण्याकरिता प्रार्थना करतो. हे पाप आपलेही असू शकते आणि इतरांचेही! म्हणूनच इथे ‘अस्मान् व अस्मत्’ हे बहुवचनी शब्द आले आहेत. आम्हां सर्वांची पापकर्मे ही समग्र जगाकरिता त्रासदायक ठरू शकतात.


याकरिता याउलट ‘राये सुपथा नय।’ ज्ञान-विज्ञानाच्या ऐश्वर्याच्या प्राप्तीकरिता सुपथावर, सन्मार्गावर नेण्याची प्रार्थना केली आहे आणि शेवटी ‘भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम।’ असे म्हटले आहे. हे ईश्वरा! आम्ही तुला पुन्हा पुन्हा मोठ्या प्रमाणावर नमस्काराची, वंदनेची स्तुतिसुमने अर्पित करतो. केवळ मुखाने ‘नमस्ते, नमस्ते’ म्हटल्याने नव्हे, तर पुन्हा पुन्हा कृतीतून सत्य स्वीकारत त्याच परमेश्वराची स्तुती अपेक्षित आहे... मुखाने मंत्र, श्लोक, भक्तिगीते, आरत्या गात राहिलो आणि कृतिशून्य राहिलो, तर आमचे अभिवादन, वंदन व नमन व्यर्थच ठरते. म्हणूनच नम उक्तीला ‘नम’ कृतीची जोड हवी. तरच आम्ही सुपथगामी बनू!


सांप्रतयुगी प्रस्तुत मंत्रातील आशय अतिशय प्रासंगिक आहे. आज प्रत्येक मानवाला हेच समजत नाही की नेमक्या कोणत्या मार्गाने जावे? पथप्रदर्शन करणारे दीपस्तंभवत संत व समाजसेवकांची आज मोठ्या प्रमाणात वाणगी आहे. ज्यांच्याकडे ‘आदर्श’ म्हणून पाहण्याकरिता सामान्य नागरिकांचे डोळे आसुसलेले असतात, अशा मंडळीवरचा विश्वासही आज पूर्णांशाने उडत चालला आहे. म्हणूनच इथे त्या तेजःस्वरुपी अग्निदेवाकडे सुपथाने नेण्याची आणि या मार्गावर जाण्याकरिता जे खाचखळगे व काटेकुटे आहेत, त्यांना नाहीसे करण्याची उत्कट विनवणी केली आहे. कारण, तो ईश्वर सर्वज्ञ आहे. त्याला प्रत्येकाचे सुशील व कुटील वागणे हे त्वरित समजते. आम्ही इतरांपासून लपवू शकतो. पण, त्या महान व लख्ख प्रकाशपुंज भगवंतापासून काहीच लपवून ठेवू शकणार नाही. अशा या जगात पुढे जाण्याचे व धन मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत, पण सर्व ‘सुपंथ’ नाहीत... अगदी सोप्पा, सहज व सरळ अशा मार्गाने जाऊन लवकरात लवकर धनैश्वर्य कसे मिळवता येईल? असे आज सर्वांनाच वाटते... कष्ट नको की परिश्रम नको...! म्हणूनच आज दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या सर्वांमध्येच मोठ्या प्रमाणात स्वार्थ, भ्रष्टाचार, फसवणूक, लबाडी, चोरी असे दोष आढळतात. यालाच तर वेदमंत्रात कुटीलतेचा पापिष्ट मार्ग म्हणून संबोधले आहे आणि यापासून दूर राहण्याकरिता पुन्हा पुन्हा अगदी शतदा नमन करीत प्रार्थना केली आहे. या हृदयस्थ श्रद्धावनत प्रार्थनेत समग्र विश्वाचे सर्वकल्याण सामावलेले आहे. चला, मग बिकट अशी कुपंथांची वहिवाट सोडून सुपंथांचा थोपट मार्ग अंगीकारू या!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@