जगाला सर्वप्रकारचे ज्ञान आणि सुख देण्यासाठी कदंब वनात विचरण करणारी श्री ललिता महात्रिपुरसुंदरी, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. तिच्या आशीर्वादाने भक्ताला अलौकिक सुखाची अनुभूती होते, अशा जगदंबेचे हे स्वरुप अत्यंत मोहक असून, संपूर्ण विश्वालाच तिच्या या रुपड्याची मोहिनी पडली आहे. ललिता महात्रिपुरसुंदरीच्या रुपाचे आणि स्वरुपाचे यथार्थ वर्णन श्री त्रिपुरसुन्दरी अष्टकम् या स्तोत्रात आदि शंकराचार्यांनी केले आहे.त्या स्तोत्राचा हा भावार्थ...
दि शंकराचार्य विरचित श्री त्रिपुरसुन्दरी अष्टकम् हे देवी श्री ललिता महात्रिपुरसुंदरीच्या स्वरूपाचे स्तवन करणारे स्तोत्र आहे. हे स्तोत्र देवीच्या दिव्य सौंदर्याचे, तिच्या कृपेचे व तिच्या अलौकिक शक्तींचे वर्णन करते. देवी ललिता ही आदिशक्ती असून ती संपूर्ण सृष्टीची अधिष्ठात्री आहे. हे अष्टक केवळ देवीच्या सौंदर्याचे वर्णन करत नाही, तर तिच्या आध्यात्मिक स्वरूपाचाही उद्घोष करते.
श्लोक 1:
कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं
नितम्बजित भूधरां सुरनितम्बिनीसेविताम्।
नवाम्बुरुहलोचनामभिनवाम्बुदश्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये॥
कदंब वृक्षांच्या वनात निवास करणारी, जिचे अनेक भक्त ऋषी तिच्या उपासनेत लीन आहेत, जिला कदंब वृक्षांच्या वनात विहार करणे आणि कादंबिनी हे कदंब वृक्षाच्या ढोलीत तयार होणारे मद्य अत्यंत प्रिय आहे, अशा श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या चरणी मी नतमस्तक आहे. जी कदंब वृक्षांच्या वनात विहार करते आणि जिच्या सभोवताली अनेक ऋषी तिचे भक्त म्हणून वावरत असतात, जिचे नितंब पर्वतांनाही लाजवतील, असे सुंदर आहेत. स्वर्गातील अप्सरा जिची सेवा करतात. तिचे नेत्र ताज्या कमळासारखे शोभतात, तिचे शरीर नवीन मेघासारखे श्यामवर्ण आहे, ती भगवान शंकराची पत्नी आहे आणि संपूर्ण सृष्टीची माता आहे, अशा श्री ललिता देवीच्या सान्निध्यात मी आश्रय घेतला आहे.
श्लोक 2:
कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीम्।
दयाविभवकारिणीं विशदलोचनीं चारिणीं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये॥
जी कदंब वनात निवास करते आणि जिने आपल्या हातांत सुवर्ण वीणा धारण केली आहे, जी अत्यंत मौल्यवान माणिक्य हारांनी अलंकृत आहे. जिच्या मुखातून अमृतासमान मधुर वाणी प्रकट होते, जिची कृपा अपरंपार आहे, जिचे नेत्र निर्मळ आणि मोहक आहेत आणि जी सर्वत्र विहार करणारी आहे, अशा भक्तवत्सला सरस्वतीस्वरूप श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या सान्निध्यात मी आश्रय घेतला आहे.
श्लोक 3:
कदम्बवनशालया कुचभरोल्लसन्मालया
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया।
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया
कयाऽपि घननीलया कवचिता वयं लीलया॥
श्री ललितादेवी कदंब वनात रममाण आहे, तिचे स्तन हत्तीच्या भालप्रदेशाप्रमाणे पुष्ट असून, तिने कंठात धारण केलेले हार त्या स्तनद्वयांची शोभा वृद्धिंगत करत आहेत. तिचे स्तनद्वय पुष्ट असून, कुचांची उंची पर्वतासारखी आहे. पुष्ट, उन्नत आणि पयोधर स्तन हे स्त्री सौंदर्याचे मानक तर आहेच, पण त्याचवेळी ते तिच्या जगन्माता स्वरूपाकडे निर्देश करतात. श्री ललिता देवी परमकृपामयी आहे. सागराच्या लाटा जशा अव्याहत प्रवाही असतात, तसाच तिचा कृपाकटाक्ष भक्तांना तृप्त करत असतो. श्री ललिता देवी ही अनुपम आणि मादक सौंदर्याची स्वामिनी आहे. तिचे गाल रक्तवर्णी आहेत आणि तिची वाणी सुमधुर आहे. तिच्या लीला आणि त्यांचा प्रभाव हा अमर्याद असून, तिला कोणत्याच स्वरुपात बांधणे शक्य नाही. जगतकल्याण क्रीडेत ती निमग्न असून तिचा वर्ण नीलसर आहे.
श्लोक 4:
कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां
षडम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम्।
विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये॥
श्री त्रिपुरसुंदरी देवी ही कदंबवनाच्या मध्यभागी विराजमान आहे आणि तिने आपल्या हातात सुवर्णकलश धारण केला आहे. मानवी देहाला व्यापणार्या षड्चक्रांमध्ये स्थित आहे, ती या षड्चक्रांची स्वामिनी आहे. तिचे ध्यान करून तिच्या या स्वरूपाला जाणून घेणे शक्य आहे. त्याचप्रमाणे योगमार्गाने षट्चक्रसाधना करूनही तिच्या स्वरूपाला जाणून घेत येते. तिने भाळी चंद्र धारण केला, हे तिच्या चक्रजागृतीचे आणि त्यावरील स्वामित्वाचे निदर्शक असून, तिच्या तेजाची तुलना जपपुष्पांच्या तेजाशीच केली जाऊ शकते. अर्थात, तिचा देह जपपुष्पाप्रमाणे कोमल आहे. अनेक सिद्ध पुरुष, संन्यासी, ज्ञानीजन तिच्या सेवेत रत आहेत. तिचे तेज जपफुलांच्या रंगासारखे आहे आणि तिच्या मस्तकावर चंद्र आहे.
श्लोक 5:
कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालंकृतां
कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम्।
मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं
मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये॥
हा श्लोक श्री ललिता देवीच्या मातंगी स्वरूपाचे वर्णन करतो. मातंग ऋषींची कन्या मातंगी देवी हे नील सरस्वती स्वरूप आहे. शक्तिउपासनेतील सर्वांत लवकर फलिभूत होणारी साधना म्हणजे मातंगी साधना. ही देवी संगीत आणि ज्ञान यांची अधिष्ठात्री देवता आहे. देवीच्या स्वरूपाचे वर्णन करताना, तिच्या पुष्ट आणि उन्नत स्तनांचा उल्लेख आला आहे. स्तंनांच्या ओझ्याने देवी थोडीशी समोरच्या बाजूला झुकली आहे आणि तिने हातात धारण केलेली वीणा स्तनांना आधारस्वरूप वापरली आहे. तिचे कुरळे केस अत्यंत मनोहर असून, तिने केशसंभारावर अनेक अलंकार धारण केले आहेत. ती कमलपुष्पावर आसनस्थ असून ती कपटी आणि दुष्ट जनांचा तिरस्कार करते. देवीचे नेत्र हे मदालसा स्वरूपाचे आहेत, अर्थात आरक्त आहेत. तिचे हे स्वरूप कामदेवाचा नाश करणार्या शिवालासुद्धा मोहित करणारे आहे. देवीच्या या मंगल स्वरुपाचा मी आश्रय घेतला आहे.
श्लोक 6:
स्मरप्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलाम्बरां
गृहीतमधुपात्रिकां मदविघूर्णनेत्राञ्चलाम्।
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये॥
या श्लोकात देवीच्या अत्यंत मोहक, गूढ आणि अनुपम सौंदर्याचे हे वर्णन आहे. कामदेव हा सृष्टीचक्र अव्याहत ठेवण्यासाठी कार्यरत असतो. समस्त जीवांमध्ये कामभावना जागृत करणे, हे त्याला श्री ललिता देवीने दिलेले कार्य आहे. हे कार्य करण्यासाठी तो पाच पुष्पबाण वापरतो. त्यांपैकी प्रथम पुष्पबाण म्हणजे अशोक, आम्र आणि माधवी या पुष्पांचा बाण. श्री देवीने या पुष्पांना आपल्या केसांत माळले आहे. मग या पुष्पबाणांनी जसे सामान्य जीव विद्ध होतात, त्याचप्रमाणे देवीच्या केशसंभारातील या पुष्पांनी साधक विद्ध होत आहेत. देवीने धारण केलेले नीलवस्त्र हे रक्त बिंदूंनी भिजलेले आहे. (हे काही गूढ तांत्रिक क्रियांकडे निर्देश करते आहे.) त्रिपुरसुंदरी ही दश महाविद्यांपैकी एक असून ती शृंगार, विद्या, योग, माया आणि मुक्ती यांचे प्रतीक आहे. देवीचे सौंदर्य वर्णन करताना तांत्रिक सौंदर्य म्हणजेच, काम, मद, भाव, सौंदर्य आणि ज्ञान यांचा संयोग दर्शवण्यात आला आहे. देवीने हातात मधाने भरलेले पानपात्र धारण केले आहे. देवीचे स्तन पुष्ट, उन्नत, पयोधर आहेत. तिचा केशसंभार उन्मुक्त असून, वार्यावर ते इतस्ततः उडत आहेत. देवी नीलवर्णा आहे आणि तिच्या कुटुंबातील सर्वच त्रिलोचन आहे. शिव हा त्रिलोचन म्हणूनही उल्लेखला जातो. त्रिलोचन शिवाची पत्नी या अर्थाने देवीचा उल्लेख ‘त्रिलोचन कुटुंबिनी’ असा केला आहे. सर्वार्थाने परिपूर्ण सौंदर्याची स्वामिनी असलेल्या श्री ललिता देवीच्या चरणी मी शरण आलो आहे.
श्लोक 7:
सकुङ्कुमविलेपनामलकचुंबिकस्तूरिकां
समन्दहसितेक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम्।
अशेषजनमोहिनीमरुणमाल्य भूषाम्बरां
जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम्॥
मी जगत्जननी श्री ललितादेवीचे ध्यान करत आहे. जिने आपल्या कपाळी कस्तुरी आणि कुंकू विलेपन केलेले आहे. जी मंदस्मित करत आहे, तिचे हे लोभस हास्य साधकाच्या सगळ्या क्लेशांचे हरण करत आहे. जिच्या हातात पाश, अंकुश, पौंड्र उसाचे धनुष्य आणि पुष्पबाण आहेत. जिचा संपूर्ण देह रक्तवर्णी आभेने लिप्त आहे, कारण तिने माणिक रत्नांचे दागिने धारण केले आहेत. जिची त्वचा उगवत्या सूर्याप्रमाणे आरक्त आहे. अशी वरदायिनी मुद्रेतील भक्तवत्सला आपल्या साधकांना आशीर्वचन देत आहे. जगत्जननीच्या या अम्बस्वरूपाचे मी ध्यान करत आहे, तिच्या या स्वरूपाचा जप करत आहे.
श्लोक 8:
पुरन्दरपुरन्ध्रिका चिकुरबन्धसैरंध्रिकां
पितामहपतिव्रता पुटपटीरचर्चारताम्।
मुकुन्दरमणीमणीलसदलङ्क्रियाकारिणीं
भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम्॥
श्री ललिता देवी ही भुवनांबिका अर्थात समस्त जगताची स्वामिनी आहे. तिचे सौंदर्य अतुल्य असून, इंद्रपत्नी शचीचे सौंदर्यसुद्धा देवीच्या सौंदर्यासमोर फिके आहे. सैरंध्री अर्थात केशसंरचना आणि सौंदर्य खुलवणार्या स्त्री सेविकेप्रमाणे, देवी मर्यादित स्वरुपात तिच्या साधक स्त्रियांना सुंदर बनवत नसून ती समस्त जगतातील स्त्रियांना गुण आणि ज्ञान या दोन्ही प्रकारांनी सजवते आणि परिपूर्ण बनवते. पतीपरायण स्त्रियांमध्ये ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती ही अग्रगण्य आहे. श्री ललितांबिका सरस्वतीप्रमाणेच आपल्या साधिकांना पतीपरायण बनवते. श्री ललिता देवीची उपासना साधकांना औषधी, अत्तर, सुगंधी द्रव्यांचे लेपन करणे या क्रियांमध्ये निपुण बनवते. श्री ललिता देवी ही अनेक विशेष अलंकार धारण केल्याने अनुपम दिसत आहे आणि आपल्या साधक स्त्रिया आणि पुरुषांना, सर्वार्थाने सर्वोत्कृष्टतेच्या मार्गावर नेणार्या आणि संपूर्ण जगताची स्वामिनी असणार्या श्री ललिता देवीच्या चरणी मी नतमस्तक आहे.
- सुजीत भोगले