श्रावण म्हणजे ऊन-पाऊस, श्रावण म्हणजे व्रते, श्रावण म्हणजे संस्कृतीची पूजा आणि श्रावण म्हणजे झाडाला बांधलेला झुला!
असा हा मनाला भावणारा श्रावण महिना. हिंदू धर्म आणि संस्कृतीत या श्रावण महिन्याला विशेष असे स्थान आहे. आपल्याकडे चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत वेगवेगळ्या सणांची, व्रतांची विशेष दिवसांची रेलचेल पाहायला मिळते. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतच वर्षभर आनंद सोहळ्यांमध्ये रमलेला असतो. असं असलं तरीही, मग श्रावणाचं विशेष महत्त्व का?
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला ’श्रवण’ नक्षत्र असते. त्यावरूनच या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. ‘स्कंद पुराणा’त या महिन्याला ‘नभा’ असेही नाव आहे कारण, आकाश जसे निर्मळ असते, तसेच हा महिना निर्मळ राहण्यासाठी योजला गेला आहे.
स्वच्छत्त्वाच्च नभस्तुल्यो नभा इति ततः स्मृतः। (स्कंद पुराण 1.19)
श्रावण महिन्यातील व्रते समाजातील सर्व समाजगटांतील सर्वांनी करावी, असेही सांगितले गेले आहे. ‘स्कंद पुराण’ या ग्रंथामध्ये 30 अध्याय आलेले आहेत, ज्यांना ‘श्रावण महात्म्य’ असे म्हटले जाते. यामधे भगवान शंकर स्वतः सांगतात,
द्वाद्श्वमपि मासेषु श्रावणः मे अति वल्लभः।
श्रावणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मतः॥
(स्कंद पुराण 1.7)
किं बहुक्तेन विप्रर्षे श्रावणे विहितं तु यत्।
तस्य चैकस्य कर्ताऽपि मम प्रियतरो भवेत्॥ (स्कंद पुराण श्रा. मा. 30. 36)
सनत्कुमार यांनी प्रत्यक्ष शिवाला विचारले त्यावेळी शिवाने सांगितले की, ”श्रावण महिना मला अत्यंत प्रिय आहे. या काळात जे करणे योग्य आहे असे सांगितले आहे, त्याचे आचरण जो मनापासून करेल, तो मला प्रिय होईल.” त्यामुळेच भारतीय समाजमनात श्रावण महिन्याचे विशेष धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व मानले गेले आहे.
श्रावण महिन्यातच नाही, तर चातुर्मासाचे चार महिने विविध व्रते करण्यासाठी सांगितले गेले आहेत. भक्तांच्या मनातील आस्था सांभाळत त्यातूनच त्या व्यक्तीचा विकास होईल, समाजाचे कल्याण होईल, असेही पाहिले गेले आहे. श्रावण महिन्यात खासकरून नियम करून दररोज शंकराला अभिषेक करणे, फुले, फळे, धान्य यांचा लक्ष वाहणे, नक्त उपवास करणे, बिछान्यावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपणे, आपल्याला आवडीच्या वस्तूंचा त्याग करणे, दान देणे, खरे बोलणे अशी विविध व्रते सांगितली गेली आहेत.
श्रावणातील सोमवारी शिवपूजन, मंगळवारी शिव मंगळागौरी पूजा, बुधवारी बुधाची पूजा, गुरुवारी बृहस्पती आणि विष्णुपूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा, शनिवारी हनुमान आणि रविवारी सूर्याची पूजा अशी व्रते सांगितली आहेत. त्याच्याशी संबंधित कथाही आहेत. याखेरीज गौरीव्रत, श्रीधर पूजा, सूपौदन व्रत, श्रावणी कर्म अशी विविध व्रतेही सांगितली गेली आहेत. या सर्वांमुळे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी एका व्रताचे पालन केल्याने आपल्या आचरणाला शिस्त लागते, नेमस्त होण्याची सवय अंगी बाणवली जाते, हे महत्त्वाचे!
श्रावण जसा व्रतांचा राजा तसाच तो सणांचा राजाही आहेच. नागपंचमी, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी हे सारेच सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरे होतात.
हरियाली तीज
श्रावण तृतीयेला पंजाब, राजस्थान येथे हा सण महिला साजरा करतात. तीयन, शिंगार तीज अशीही हिची वेगवेगळी नावे आहेत. नवविवाहित मुलीला तिच्या सासरच्या कुटुंबाकडून नवे कपडे, बांगड्या, सिंदूर, मेहेंदी आणि गोड पदार्थ भेट म्हणून दिले जातात. तीज माँ म्हणजेच देवी पार्वतीला उद्देशून स्त्रिया निर्जळी उपवास करतात. आपल्या पतीच्या सुखी आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. आपल्या माहेरी जाऊनही हे व्रत स्त्रिया करतात. 16 शृंगार केल्याने पतीचे कल्याण होते, अशी भावना यामागे आहे.
नागपंचमी
महाराष्ट्रात शेणामातीचा नागोबा करतात. या नागोबाची पूजा करून, पंचमी साजरी केली जाते. मुली आणि महिला वारुळावर जाऊन त्याची पूजा करतात. झाडाला झोके बांधून आनंद घेतात. मराठी मातीतल्या ओव्याही या सणाचे महत्त्व गातात,
आखाडा मासी एकादसी, नागार पंचीम कोण्या दिसी।
पंचमी आली बुधवारी पुस नक्षत्रावरी॥
कर्नाटकात महिला वारुळापाशी जाऊन निरांजन लावतात आणि दुधाचा नैवेद्य दाखवितात. केरळ आणि तामिळनाडू येथे या दिवसाला ‘आदिपंचमी’ म्हटले जाते. दारात आणि अंगणात या दिवशी कुंकवाने किंवा हळदीने नाग काढले जातात. नागमंदिरात जाऊन अभिषेक केला जातो. या दिवशी शेतीची कामे बंद ठेवली जातात.
आसाम, झारखंड आणि बंगाल प्रांतात विशेषतः कुमारतुली येथे, या दिवशी सर्प देवता मनसादेवी हिचे पूजन होते. श्रावण, भाद्रपद या महिन्यांमध्ये हे पूजन करतात. सर्पदंशापासून रक्षण होण्यासाठी मनसादेवीला प्रार्थना केली जाते. शिवाचे विषापासून (हलाहल) तिनेच रक्षण केले, अशीही लोक परंपरा येथे मानली जाते.
राखी पौर्णिमा
महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा आणि कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय, यांमुळे नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. कोळी बांधवांच्या सुरक्षेसाठी सागराला विनंती केली जाते. याचदिवशी बहीण भावाला राखी बांधते. पूर्वी या दिवशी प्रजेचे रक्षण करणार्या राजाला रक्षासूत्र बांधले जात असे.
राजस्थान भागात बहिणी फक्त भावाला राखी बांधत नाहीत, तर वहिनीलासुद्धा धागा बांधतात. हिला ‘लुम्बा राखी’ असे म्हणतात. ही राखी वहिनीच्या बांगडीला बांधली जाईल, अशी असते. गुजरातमध्ये या दिवशी रक्षाबंधन होतेच, पण त्याच जोडीने शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध, दही, तूप याने स्नान घातले जाते. आपण केलेल्या चुकांची कबुली दिली जाते आणि देवाचे आशीर्वाद घेतले जातात. दक्षिण भारतात श्रावण पौर्णिमेला ’अवनी अवित्तम’ म्हटले जाते. विशेषतः ब्राह्मण समाजातील लोक यादिवशी उपकर्म म्हणजे श्रावणी संस्कार करतात. या दिवशी जुने जानवे बदलून, नवे जानवे परिधान केले जाते. ही एक वैदिक परंपरा आहे, जी शतकानुशतके सांभाळली गेली आहे. ओडिशा, बंगाल या राज्यांत या दिवशी ’झुलन पूर्णिमा’ साजरी होते. राधा आणि कृष्णाला झोपाळ्यात बसवून, हा दोलोत्सव मंदिरात साजरा केला जातो. ‘हरिभक्तिविलास’ या ग्रंथात या उत्सवाचा उल्लेख सापडतो. भागवत पुराणातील गोपी आणि कृष्ण यांच्या प्रेमावर आधारित गीते या दिवशी गायली जातात, नृत्य केले जाते.
जन्माष्टमी
जन्माष्टमी म्हणजे कृष्णभक्तीने भारलेली पवित्र रात्र. कृष्णजन्म वृंदावन येथील मंदिरात भक्तिभावाने संपन्न होतो. जगभरातून भाविक या उत्सवासाठी येतात. नंदगाव येथे या दिवशी नंदोत्सव होतो, ज्यामध्ये श्रीकृष्णच्या मूर्तीला दूध, दही, तूप यांचा अभिषेक करतात. चंदन, केशर, हळद यांचे लेपन मूर्तीला केले जाते. नंद या गवळ्यांचा राजा असल्याने, नंदगावात या उत्सवाचे महत्त्व विशेष आहे. आपल्या बासरीने गायींनाही मोहवून टाकणारा कृष्ण आणि त्याचा हा जन्मोत्सव! असा हा आपल्या संपूर्ण देशाला आनंदाच्या, प्रेमाच्या सूत्राने बांधून ठेवणारा, भक्तिभावाने ओथंबलेला मनभावन श्रावण! येत्या श्रावणात एखादा छानसा संकल्प करूया आणि तो कृतीतही आणूया!
डॉ. आर्या जोशी