मागील लेखात बिहारमधील मुजफ्फरपूरच्या वृद्धाच्या मृत्यूचे कारण आपण पाहिले. अनेकांनी अशी उदाहरणे ऐकली असतील वा प्रत्यक्ष पाहिली असतील. वर्तमानपत्रांतून येणार्या गोष्टीच सत्य मानल्याने, वर्तमानपत्रांतून न येणार्या गोष्टींमधील ज्ञानाच्या महान कक्षांकडे आम्ही तोंड फिरवून बसतो.
मानसिक धक्क्यामुळे मृत्यू
अतिशय प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची वार्ता ऐकून वा एखादी भयानक घटना डोळ्यांनी पाहून वा ऐकून काही लोक मृत होतात. अशा प्रकरणात मृत्यूचे कारण मानसिक अवस्थेत आहे. काही साधक तर मृत्यूचा निर्णय अगोदरच घेतात.
कृष्णभक्ताचा देहत्याग
एक भक्त होते. भगवान श्रीकृष्णांच्या एका सुंदर संगमरवरी मूर्तीची ते रोज पूजा करीत असत. एके दिवशी त्यांच्या लहान मुलीद्वारे खेळताना त्या मूर्तीचा हात भंग पावला. तिने आईला सांगितल्यावर तिने हारासोबत मूर्तीचा हात बांधून ठेवला. ते गृहस्थ पूजेला बसल्यावर मूर्तीचा हात वेगळा होऊनच खाली पडला. त्यांच्यासाठी हा एक जबरदस्त मानसिक धक्का होता. आपल्या पत्नीला बोलावून त्यांनी रडतच शेवटचा नैवेद्य करायला सांगितला. झालाप्रकार पतीला समजल्याचे पत्नीच्या लक्षात आले. “अहो, लहान मुलांकडून असल्या गोष्टी अजाणतेपणी घडतातच; नवीन दुसरी मूर्ती घेऊ,” असे तिने समजावलेही. घरच्या सर्वांनीच त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या मनावर झालेला परिणाम कोणाला पुसता आला नाही. त्यांनी भगवंताला नित्याप्रमाणे नैवेद्य दाखविला आणि धाय मोकलून ते रडायला लागले. “भगवंता, तुझे हाल आता माझ्याने पाहवत नाही. तू भग्न झालास, मग मी तुझ्याशिवाय कसा जिवंत राहू? मीही भग्न होऊन तुझ्याजवळ येतो,” असे म्हणत त्यांनी देवासमोर जे डोके टेकले, ते कायमचेच! ॥तुका म्हणे न ये परते, तुझ्या दर्शने मागुते॥
आमच्या आजोळी एक कोळी होता, त्याची आमच्या आजोबांवर विलक्षण भक्ती. आमचे आजोबा वारल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी, तो बराच रडला आणि जड अंतःकरणाने घरी परतला. तो कोळी बरेच दिवस बेचैन होता. त्याचे मालक गेले, म्हणजे त्याचा प्राणच गेल्यासारखा होता. तो वेटाळातील प्रमुख लोकांकडे गेला आणि त्याने यापूर्वी काही चूक केली असल्यास क्षमा मागू लागला. एवढेच नव्हे, तर तो आता आपल्या मालकाकडे जात आहे, तेव्हा सर्वांनी आशीर्वाद द्यावा, असेही सांगू लागला. वयस्कर माणसांनी त्याची समजूत घातली. पण मालक गेले, आता आपल्याला राहणे अशक्य असल्याचे तो सर्वांना सांगत असे. सर्वांचा निरोप घेऊन तो आपल्या घरी गेला आणि एक कांबळे अंथरून मालकाचे नाव घेऊन त्यावर झोपला, तो कायमचाच! योगवसिष्ठात वसिष्ठ रामाला सांगतात, ‘मनसैवकृतं राम न शरीर कृतम्।’ रामा सर्व मनाचेच व्यापार आहेत, शरीराचे नाहीत!
वर्धा जिल्ह्यातील एका गावात एक 85 वर्षांच्या वृद्धाच्या 80 वर्षाच्या पत्नीचे कालचक्राच्या गतीनुसार निधन झाले. सर्वांनीच त्या वृद्ध माणसाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानापर्यंत येण्यास सांगितले, पण ते वृद्ध म्हणाले, “मला स्मशानात नेऊ नका.” याचे कारण कोणाच्याच लक्षात येईना. स्मशानात गेल्यावर परत यायचे कशाला? लोकांचा आग्रह वृद्धाला टाळता येईनासा झाला. शेवटी ते तयार झाले. त्यांनी एक कांबळे मागविले आणि कांबळ्यावर आपला देह टाकला, तो कायमचाच! ‘जातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा।’
ही दिव्य शक्ती सद्विचार आणि ध्यानाने येऊ शकते. योगसाधना एक कठीण मार्ग आहे, अशी साधारणांची कल्पना असते. भक्तिमार्गात नामस्मरण आणि पूजापाठ याशिवाय काही नसते, अशीही कल्पना दिसते. भक्तिमार्गात उन्नत असणार्या साधकाचे अनुभव व योगमार्गातील साधकाच्या अनुभवांसारखेच असतात, असा अनेककांचा अनुभव आहे. विदर्भातील एक महान साधक ज्ञानेश्वर कन्यका गुलाबराव महाराज यांचे लिखाण याबाबतीत वाचनीय आहे. भक्तिमार्गाचे खर्या अर्थाने अनुसरण करणारा भक्त श्रेष्ठ योगी बनतो, हे सत्य लक्षात घेणे आवश्यक आहे. भक्त कबीर, संत जनाबाई, संत तुकाराम आदींचे अनुभव मोठमोठ्या योग्यांनासुद्धा दुर्लभ आहेत. विशिष्ट अवस्थेनंतर भक्त आणि योगी एकच असतात. योगी स्वकष्टाने उच्च अवस्थांवर आरुढ होत जातो, तर आत्मसमर्पण भगवंताला करून भक्त त्या उच्च अवस्था आपणहून प्राप्त करतो. भक्तिमार्गात परमेश्वराला पूर्ण समर्पण अत्यावश्यक आहे. हे आत्मसमर्पण ज्याला जमेल, तोच खरा भक्त. बरेच भक्तिमार्गी अहंकाराने ग्रस्त झालेले दिसतात. असले अहंकारी भक्त पाखंडी असतात, या अर्थाने भक्तिमार्ग सोपा नाही.(क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357