जीवात्मा हाच खरा चालक ज्याला आम्ही मृत्यू समजतो, ती घटना म्हणजे जीवात्म्याची जडशरीर त्यागानंतरची महानिर्वाण यात्रा होय. जीवात्म्याच्या उद्देशपूर्तीच्या दृष्टीने नियतीद्वारा हे जडशरीर अनावश्यक वाटल्यामुळे, जीवात्मा नियत जडशरीराचा त्याग करून दिव्य मार्गाला गमन करतो. यालाच आम्ही ‘मृत्यू’ मानतो. मृत्यूला आम्ही एक भयानक आणि सर्वस्व हरण करणारी घटना मानतो. पण खर्या दृष्टीने पाहिल्यास मरण ही प्राकृतिक अवस्था असून जीवित राहणे हीच विकृती होय, असे दिसून येईल. कवी कालिदास रघुवंशात म्हणतात,
मरणं प्रकृतिः शरीरिणां विकृतिर्जिवितमुच्यते बुधैः| - रघुवंशम् ८|८७॥ महाभारतातील द्रोणपर्वात अकंपन राजाचा हरी नामक पुत्र मरण पावला असता, सांत्वन करताना देवर्षी नारद म्हणतात,
नैतात् मृत्यूः दण्डपाणिः नास्ति मृत्यु ज्ञात्वा निश्चयं ब्रह्मसृष्टम्| प्रकृतीची एक आवश्यक घटना म्हणजे मृत्यू. एक साधारण सिद्धांत असा होऊ शकतो की, आपल्या उद्देशपूर्तीकरिता इहजीवनाची यात्रा अनावश्यक वाटली की, जीवात्मा शरीराचा त्याग करून अन्यत्र निघून जातो. यालाच मृत्यू समजून आम्ही भय धरतो. मृत्यूची सूत्रे त्या दिव्य अतींद्रिय जगतातून हलविली जातात, येथून नव्हे. साधारण माणसे मरणामुळे शोकमग्न होतात. त्यामुळे दिव्य साधनांद्वारे प्राप्त होणारे दिव्य ज्ञान त्यांना मिळत नाही. मृत्यूनंतरच्या विशाल ज्ञानाला ते वंचित राहतात, परंतु योगिजन सर्व अवस्थांचे ज्ञान आवश्यक त्या साधनांद्वारे प्राप्त करतात. यामुळे ते भय, शोक, मोहरहित असतात. लिंगदेही चालक आपल्या सोयीकरिता जडशरीराचा त्याग करीत असेल, तर त्यात शोक करण्याचे कारणच काय? उत्तम गतीकरिता मरण असेल, तर मृत्यूचे भय का करायचे? यापेक्षाही उत्तम शरीराच्या प्राप्तीकरिता जर इहशरीराचा त्याग होत असेल, तर याच जडशरीराची इतकी आसक्ती का? एका शरीरानंतर, दुसरे उत्तम शरीर पुनर्जन्माद्वारे प्राप्त होत असते. श्रेष्ठ जीवन तेच की, जे देहरुप कुबडीशिवाय चालू शकेल. उत्क्रांतीची उच्च अवस्था म्हणजे ब्रह्मप्राप्ती होय. म्हणून ज्या ब्रह्मापासून हे सर्व विश्व उत्पन्न झाले, त्या मूळ ब्रह्मात विलीन होणे सर्व संसाराचे ध्येय आहे. देहात असल्याकारणानेच आम्ही देही वा जीवात्मा आहोत. आम्ही शरीर नसून निष्कल ब्रह्म आहोत. प्रतिदिन प्रातःकाळी उठून आपण खालीलप्रमाणे निर्धार करूया.
प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्म तत्त्वम्| सच्चित्सुखं परमहंस गतिं तुरीयम्॥
यत् स्वप्न जागर सुषुप्तिमवैति नित्यम्| तत् ब्रह्म निष्कलमहं नच भूत संघः॥प्रातःकाळी उठून मी स्मरण करतो की, माझ्या हृदयात स्फुरण पावणारे जे सच्चित सुख परम तुरीय गतीला जाणारे आत्मसत्त्व आहे, तेच मी होय. जे सतत जागृती, स्वप्नी, सुषुप्तीतसुद्धा माझ्यासोबतच असते, ते अजर, अमर, पापरहित निष्कल ब्रह्म मी असून, पंचमहाभूतात्मक जडदेह मी नाही.
पुनर्जन्म विज्ञानसाधारण व्यक्तीपासून ते महान वैज्ञानिकांपर्यंत सारेच मानतात की, जन्म एक सत्य घटना म्हणजेच, सत्य अवस्था आहे. वास्तविक पाहता, आपला जन्म कोणीच पाहू शकत नाही. परंतु, दुसर्यांचे जन्म पाहून आपण अनुमान काढतो की, आपलाही जन्म झाला असावा. अशा काही गोष्टी आहेत की, ज्या समाजाद्वारे आपल्यापर्यंत प्रवाहित झाल्या आहेत आणि त्या माणूस बिनबोभाट स्वीकारतोही. मग तो माणूस कितीही नास्तिक अहंकारी वा तर्कदुष्ट असो. प्रत्येकाचे नाव त्याला पसंत असो वा नसो, त्याच नावाने त्याला आपले जीवन चालवावे लागते. तद्वत् मातृभाषा व संस्कारांबद्दल आहे. घरी वा समाजात जी भाषा बोलली जाते, ती कळत वा नकळत प्रत्येकाच्या तोंडी बसते आणि तीच त्याची मातृभाषा म्हणून गौरविली जाते. आईचे गर्भातून संस्कारांची सुरुवात होत असते. लहान बालकावर नकळत त्याच्या मातापित्यांच्या, सभोवतालच्या माणसांच्या संस्कारांचा परिणाम होतो. संस्काराची मूस म्हणजे मन व साधारण बुद्धी असल्यामुळे, प्रत्येकाचे संस्कार, मन व बुद्धीवर परिणाम करणार्या व्यक्तींच्या संस्कारापासूनच तयार झालेली असते, असे विचारांती दिसून येईल. म्हणून स्वतंत्र संस्कार, बुद्धी असलेली माणसे दृष्टोत्पत्तीला येणे कठीणच जाईल. मागील प्राप्त संस्कारांच्या खांद्यावर बसून पुढील संस्कार येत असतात.
प्रथम बीज वा वृक्ष? प्रथम बीज वा वृक्ष असाच वाद जन्म-मृत्यूबद्दल मानता येईल. काही वनस्पतींत स्वतंत्र असे बीज निर्माण होत नसते. असल्या वनस्पतीचे एक अंगच स्वयंपूर्ण बनून, बीजाप्रमाणे आपली वंशवृद्धी करते आणि वंशवृद्धी होते. काही वनस्पतींच्या पानांमधून नवीन वृक्ष बनतात. गुलाबाच्या फांदीतला एक तुकडा तोडून अन्यत्र लावला, तरीही नवीन वृक्ष उत्पत्ती होत असते, हे सर्वांनाच माहीत आहे. नवीन वृक्ष जुन्या वृक्षाच्या एखाद्याच अंशापासून बनत असला, तरी त्यात जुन्या वृक्षातील सर्वच अंग-उपांगाचे गुण असतात. अमीबा नामक एकपेशीय प्राणी ज्यावेळेस ‘एकोऽहम् बहुस्याम’ असे त्याला वाटते, त्यावेळेस स्वतःच्या एकपेशीय अस्तित्वाचे दोन समान भाग करून, तो आणखी एक स्वतंत्र अमीबा तयार करतो. अशा प्रकारे एकाचे दोन, दोनाचे चार अशा गणिताने अल्पावधीत असंख्य अमीबा तयार होतात. त्यांचे जगणे म्हणजेच या विरोधविकासात्मक जगतात जगण्यास ते योग्य आहेत, याची साक्ष होय. विख्यात इंग्रजी वैज्ञानिक डार्विनने म्हटले आहे, जंगली वनस्पती व अमीबा जगण्यास योग्य आहेत.
याप्रकारे जुन्या शरीराद्वारे नवीन शरीरे तयार होतात. जुने शरीर वा जीवन असल्याविना, नवीन शरीर वा जीवन तयार होणे असंभव. जुने आहे म्हणूनच त्यातून नवीन उत्पन्न होऊ शकते अन्यथा नाही, हे एक सत्य आहे. जुन्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या नवीन शरीरात वा बीजात, प्रकृतीच्या मूळ रचनेपासून तत्कालपर्यंत सर्व संस्कार सुप्त रितीने अवतरित केले जातात आणि या दृष्ट नवीन बीजाचे वा शरीराचे स्वतंत्र अस्तित्व नसते. अंड्याबाहेर पडणारे कोंबडीचे पिल्लू लवकरच तुरुतुरु धावत जाऊन, दाण्यासारखी वाटणारी खाद्य वस्तू टिपायला पाहते. गायीच्या पोटातून बाहेर पडलेले वासरू थोड्याच वेळाने, आपल्या आईच्या कासेत दुधासाठी हुंदडे मारत असते. हे त्या पिलाला व वासराला कोणी शिकविले? हे सर्व संस्कार त्यांच्या मातापित्यांच्या बीजांमधून गुणाणुंद्वारे, त्यांना प्राप्त होतात. तत्पूर्वीच्या अनंतकालातील लक्षावधी कोंबड्यांचे गुणधर्म, त्यांच्या मातापित्यांच्या बीजाद्वारे त्या बीजात वा पिल्लात अवतरित होतात.
क्रमशः
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे
९७०२९३७३५७