मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्र (भाग ७)

    10-Sep-2025
Total Views |

श्लोक क्रमांक १५

ह्रींकारात्रयसंपुटेन मनुनोपास्ये त्रयीमौलिभिः
वायैर्लक्ष्यतनो तव स्तुतिविधौ को वा क्षमेताम्बिके|
सल्लापाः स्तुतयः प्रदक्षिणशतं संचार एवास्तु ते
संवेशो नमसः सहस्रमखिलं त्वत्प्रीतये कल्पताम्॥

हा श्लोक पंचदशी मंत्राच्या शेवटच्या शक्तिकूटमधील १५व्या बीजाने (लं) सुरू होतो. या श्लोकाच्या समाप्तीनंतर पूर्ण पंचदशी मंत्र (१५ बीजांचा) पूर्णत्वाला पोहोचतो.

आचार्य म्हणतात, हे माते! तुझी उपासना तीन ‘ह्रीं’च्या मंत्राने केली जाते. उपनिषदांच्या सूक्ष्म उपदेशातूनच तुझा अनुभव येतो, कारण उपनिषदे म्हणजे वेदांचे शिरोभाग आहेत. तुझी स्तुती कोण करू शकेल? म्हणून जे काही मंगल शब्द उच्चारले जातात, तेच तुझ्या स्तुतीचे स्तोत्र ठरावेत; माझे प्रत्येक पाऊल तुझ्या प्रदक्षिणेसारखे असावे; माझी शयनावस्था हीच सहस्र प्रणिपात ठरावी; हे सर्व तुझ्या कृपेसाठीच असो.

या टप्प्यावर साधकाला खरी जाणीव होते की, देवी बाहेर नाही, तर आत आहे. सुरुवातीला तो देवीला वेगळे मानून, तिच्यासाठी सिंहासन, नैवेद्य, आरती इ. विधी मनात कल्पित असे. ही द्वैताची उपासना आहे. विधीपूजेमुळे पाया मजबूत होतो; पण अखेरीस साधकाने त्यापलीकडे जाऊन अद्वैत अनुभूतीकडे जावे लागते. या श्लोकामध्ये भक्त द्वैतातून अद्वैताकडे प्रवास करतो.

उपनिषदे ब्रह्माचे स्वरूप सांगतात. ब्रह्माचे दोन प्रकार सांगितले जातात, सगुण ब्रह्म - गुणरूप, स्वरूप असलेले आणि निर्गुण ब्रह्म: - निराकार, गुणरहित. सगुण ब्रह्मापासून निर्गुण ब्रह्माकडे जाणे, ही खरी आध्यात्मिक प्रगती मानली जाते. म्हणून उपनिषदे वेदांचा मुकुट मानली जातात.

या जाणीवेने साधकाची वाणी मंगलमय होते. तो जे काही बोलतो, तेच स्तोत्र ठरते. कारण वाणी ही मनःस्थितीचे प्रतिबिंब असते. मन देवीने व्यापले असल्याने त्याची भाषा, त्याचा स्पर्श आणि त्याचे वातावरण सर्व मंगलमय होते. त्याचे चालणे, प्रदक्षिणा, त्याची शयनावस्था साष्टांग प्रणिपात-सर्वच देवीस अर्पण ठरते. साष्टांग नमस्कार म्हणजे शरीराच्या आठ अवयवांनी (कपाळ, दोन हात, छाती, दोन गुडघे, दोन पाय) भूमीला टेकणे. हा नमस्कार अहंकाराचा त्याग व पूर्ण शरणागतीचे प्रतीक आहे. स्त्रियांना या नमस्कारातून सूट आहे.

साधकाला आता हे कळते की, उपनिषदांनी ब्रह्माचे रूपक दिले असले तरी ब्रह्म शब्दांच्या पलीकडे आहे. सूर्यापेक्षाही कितीतरी तेजस्वी आहे, असे म्हटले जाते; पण प्रत्यक्षात तो वर्णनातीत आहे. सगुण ब्रह्माची स्तुती करता येते; पण मुक्ती केवळ निर्गुण ब्रह्माच्या अनुभूतीतच मिळते.

सौंदर्यलहरीच्या २७व्या श्लोकातही याच भावनेचा उल्लेख आहे की, खरी उपासना ही अंतःकरणात आहे, बाह्य विधीत नाही.

श्लोक क्रमांक १६

श्रीमन्त्राक्षरमालया गिरिसुतां यः पूजयेच्चेतसा
सन्ध्यासु प्रतिवासरं सुनियतस्तस्यामलं स्यान्मनः|
चित्ताम्भोरुहमण्टपे गिरिसुता नृत्तं विधत्ते रसाद्वाणी
वक्त्रसरोरुहे जलधिजा गेहे जगन्मङ्गला॥

पंचदशी मंत्र हा श्रीविद्येतील एक अतिगूढ व सामर्थ्यशाली मंत्र मानला जातो. त्याची अक्षरे म्हणजेच बीजे, ती देवीची मूळ शक्ती मानली जातात. शंकराचार्यांनी या बीजांना ‘पुष्प’ मानले आणि त्यांची माळ गुंफून, ती स्तुतीरूपाने देवीला अर्पण केली. त्यामुळेच या स्तोत्राला मंत्रमातृकापुष्पमाला असे नाव मिळाले. येथे ‘मातृका’ म्हणजे संस्कृत वर्णमाला, तर ‘पुष्प’ म्हणजे बीजाक्षर आणि ‘माला’ म्हणजे त्यांची ओळख. हा स्तोत्ररूपी हार देवीच्या चरणी अर्पण केल्यावर, साधकाला अपूर्व अनुभव प्राप्त होतो.

स्तोत्रात सांगितले आहे की, जो साधक प्रातः, मध्यान्ह आणि सायंकाळ अशा तीन संधींना या स्तोत्राचा जप करतो, त्याचे मन निर्मळ व निष्कलंक होते. मनातील वासनांचे, इच्छांचे, द्वेषाचे डाग नाहीसे होतात. प्रातःकाळी देवी गायत्रीरूपेण, मध्यान्ही सावित्रीरूपेण आणि संध्याकाळी सरस्वतीरूपेण पूजली जाते. म्हणून या त्रिकाल साधनेला ‘संध्योपासना’ असे म्हणतात. सूर्याच्या तीन टप्प्यांशी जोडलेले हे वेळापत्रक, साधकाच्या अंतःकरणाला दिवसभर प्रकाशमय ठेवते.

निर्मळ मनातच देवीचा वास होतो. साधक जेव्हा याचा जप नियमित करतो, तेव्हा पराशक्ती त्याच्या मनात नृत्य करते. त्याच्या मुखकमळावर सरस्वतीचे नृत्य घडते. त्याची वाणी सौम्य, मंगलमय व सत्यप्रतिपादक होते. त्याचे बोलणे इतरांच्या अंतःकरणाला स्पर्श करते. त्याचा चेहरा तेजस्वी व प्रसन्न दिसतो. ही तेजस्विताच त्याच्या साधनेचे प्रमाणपत्र असते. साधकाच्या अंतःकरणात उमलणारा आनंद, त्याच्या मुखावर आपोआप झळकतो.
गृहात लक्ष्मीचे नृत्य होते. याचा अर्थ असा की, साधकाला संपन्नतेची देणगी मिळते. पण ही संपन्नता भोगप्रधान नसते; ती साधनेस पोषक ठरावी म्हणून असते. साधक कधीही अभावात राहू नये, त्याला देवीपासून दुरावू नये म्हणून लक्ष्मी त्याच्या जीवनात स्थिरावते.

या स्तोत्रातील पहिल्या १४ श्लोकांत साधकाला विधीपूजेचा क्रम सांगितला आहे. प्रथम आसन, नंतर शस्त्रे, मुकुट, अर्घ्य, पाद्य, आचमनीय, स्नान, वस्त्रे, दागिने, सुगंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे, तांबूल, आरती इत्यादी क्रमाने, देवीला अर्पण केले जाते. हा क्रम म्हणजे प्रत्यक्ष पूजेचा आराखडा आहे. पण १५व्या श्लोकात साधकाला अंतर्मुख होण्याची दिशा दाखवली जाते. १६वा श्लोकामध्ये या साधनेचे सार सांगितले आहे की, या सर्व प्रक्रियेचा अंतिम उद्देश साधकाचे मन निर्मळ करून, त्यात देवीला स्थिर करणे हाच आहे. या साधनेतून साधकाची वाणी व आचरण मंगलमय होते. साधकाचे बोलणे आशीर्वादासारखे ठरते. त्याचा प्रत्येक शब्द इतरांच्या जीवनाला दिशा देतो. ही कुठलीही सिद्धी नव्हे, तर देवीच्या कृपेने घडणारे दिव्य परिणाम आहेत.

या श्लोकाचा शेवट ‘भक्तिदर्शन’ या ग्रंथातील एका वचनाने होतो. ती स्वरूपानेच आनंदमयी आहे, म्हणून ध्यानपूर्वक तिचा शोध घेतला जातो. सतत मनाने तिचा शोध घेणे यालाच भक्ती म्हणतात. हा आधार सांगतो की, खर्या भक्तीचा गाभा हा अखंड अंतर्मुख शोध आहे. बाह्य पूजेला मर्यादा आहेत; पण अंतःकरणातील शोध अखंड चालतो.

मंत्र मातृका पुष्पमाला हा केवळ स्तोत्रसंग्रह नाही; तर तो साधकाला बाह्य पूजेतून अंतर्मुख अनुभूतीकडे नेणारा प्रवास आहे. त्रिकाल जपाने साधकाचे मन निर्मळ होते, पराशक्ती त्यात नृत्य करते, सरस्वती त्याच्या वाणीत वास करते आणि लक्ष्मी त्याच्या जीवनात स्थिरावते. शेवटी साधक स्वतः देवीचेच रूप होतो आणि त्याच्या देहातून देवीची कृपा विश्वावर बरसते.

श्लोक क्रमांक १७

इति गिरिवरपुत्रीपादराजीवभूषा
भुवनममलयन्ती सूक्तिसौरभ्यसारैः|
शिवपदमकरन्दस्यन्दिनीयं निबद्धा
मदयतु कविभृङ्गान्मातृकापुष्पमाला॥

शंकराचार्यांनी रचलेल्या या दिव्य पुष्पमालेत, प्रत्येक अक्षर हे एक एक पुष्प मानले गेले आहे. ही अक्षरांची माळ हिमालयपुत्री देवीच्या कमलपादांवर अर्पण करताना, त्या अक्षरांना तिच्या चरणांतील दिव्य सुवास लाभतो. तिच्या पादकमलांचा सुवास, अक्षरमालेला लाभून जगभर पसरतो. हा सुवास म्हणजेच आनंद, परमानंद, अमृतरस.

देवीच्या चरणांमध्ये अखंड दिव्य गंध आहे. या गंधाचा स्पर्श झाल्यावर अक्षरांची माळ स्वतः सुगंधी होते आणि तिचा सुगंध संपूर्ण विश्वात पसरतो. श्लोकात सांगितले आहे की, या अक्षरमालेतून टपकणारे मधाचे थेंब हे प्रत्यक्ष शिवकृपेचे थेंब आहेत. शिवाशिवाय मोक्ष कोणीही देऊ शकत नाही; परंतु शिवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त तिच्यामार्गेच आहे. ‘ललिता सहस्त्रनाम’मधील शिवज्ञानप्रदायिनी हा नाम याच सत्याला अधोरेखित करतो.

जो साधक या स्तोत्राचा त्रिकाल जप श्रद्धेने करतो, त्याला अखेरीस मुक्ती प्राप्त होते. जेव्हा देवी साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीवर संतुष्ट होते, तेव्हा तीच त्याला शिवाकडे नेते. शिवाशी एकरूप झाल्यावर साधकाचा सूक्ष्म देहसुद्धा नाहीसा होतो. पुनर्जन्माची गरज राहात नाही, तो शिवस्वरूप होतो.

पंचदशी व षोडशाक्षरी मंत्र : हे मंत्र केवळ मोक्षदायी आहेत, ते कुठलेही अलौकिक सामर्थ्य देत नाहीत. त्यांना ‘केवलं मोक्षसाधनम्’ असे म्हटले जाते.

ध्यानमार्ग : जेव्हा साधक सतत मंत्रजप मनात करतो, तेव्हा हळूहळू त्याचे मन ध्यानावस्थेत जाते. त्या अवस्थेत जप आपोआप थांबतो आणि केवळ अनुभूती उरते. हाच खरा समाधीचा क्षण, जिथे आत्मा व परमात्मा एकरूप होतात.

मंत्र मातृका पुष्पमाला स्तवनााच्या अखेरीस शंकराचार्यांनी ही अक्षरमाला देवीच्या पादांवर अर्पण करून, संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना केली आहे. साधकाला प्रारंभी केवळ थोडीशी प्रेरणा हवी असते. ती मिळाली की, पुढचा प्रवास देवी स्वतः मार्गदर्शक बनून घडवते. अखेरीस साधक आनंद, प्रेम व समाधानाच्या अनुभूतीत विलीन होतो. हा अनुभव शब्दांच्या पलीकडे आहे, तो केवळ अनुभवावा लागतो.

सुजीत भोगले
९३७००४३९०१