श्राद्धाचा आधार, पुनर्जन्माचा विचार...

    10-Sep-2025
Total Views |

सध्या पितृपंधरवडा सुरू झाला असून, आपल्या मृत पितरांच्या सुखासाठी श्राद्ध करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. यामध्ये पितरांना उत्तम गती मिळावी, ही इच्छा असते. यामध्ये मोक्ष अथवा पुर्नजन्म हा विषय येथे महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे पुनर्जन्म ही संकल्पना नेमकी काय, याचा घेतलेला आढावा...


पितृपूजा श्राद्ध :
पितरांना संतुष्ट करण्यासाठी केला जाणारा एक हिंदू धर्मविधी म्हणजे श्राद्ध. हा शब्द ‘श्रद्धा’ या शब्दापासून आलेला आहे. पितरांच्या हितार्थ, त्यांना उद्देशून योग्य काळी व स्थळी सत्पात्र व्यक्तींना बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, विधीनुसार जे श्रद्धापूर्वक दान देण्यात येते, त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध केल्याने आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी धन, धान्य या गोष्टींची प्राप्ती होत असल्याचा उल्लेख ‘स्मृतिचंद्रिका’ व इतरही काही गंथांत आढळतो. श्राद्धक्रिया प्रथम मनुने सुरू केली, असे ‘ब्रह्मांडपुराणा’त म्हटले आहे. प्राचीन काळी श्राद्धाला ‘पिंडपितृयज्ञ’ हे नाव होते. महापितृयज्ञ किंवा अष्टका हे शब्दही श्राद्ध याअर्थी वापरलेले आहेत, पण अष्टका याचा अर्थ कोणत्याही महिन्यातील वद्य अष्टमी ही तिथी होय. ‘श्राद्ध’ हा शब्द ‘कठोपनिषदा’त प्रथम आढळतो. श्राद्धकल्पना ही पुनर्जन्म व कर्मविपाक इ. सिद्धांतांच्या नंतरची आहे, असे म्हणतात. ‘याज्ज्ञवल्क्यस्मृती’त म्हटले आहे की वसू, रूद्र आणि आदित्य या श्राद्धातल्या देवता आहेत. श्राद्धामुळे त्या संतुष्ट होऊन, माणसांच्या पूर्वजांना संतोष देतात. श्राद्धाची प्रथा इ.स.पू.पासून अनेक शतके चालू आहे. आपले पितर आपले हित किंवा अहित करू शकतात, ही कल्पना प्राचीन काळापासूनची आहे (उदा., ऋग्वेद १०.१५.६). त्यामुळे आपले हित साधण्याच्या हेतूने, प्राचीन मानवाने त्यांना काही पदार्थ विधिपूर्वक अर्पण करावयास आरंभ केला असावा. श्राद्धात वापरावयाचे पदार्थ, तसेच भांडी ठरलेली आहेत. तीळ, तांदूळ, यव, पाणी, मुळे, फळे यांचा श्राद्धात उपयोग करावा, असे ‘आपस्तंब धर्मसूत्रा’त सांगितले आहे.

पुनर्जन्म : एका देहाचा नाश झाल्यानंतर त्यात राहणार्या जीवात्म्याला पूर्वकर्मानुसार त्या कर्माची फळे भोगण्यासाठी योग्य अशा योनीत दुसरा देह प्राप्त होणे, हा त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होय. यास ‘कर्मविपाक’ म्हणजे ‘कर्माचे फळ’ म्हणतात. पूर्वदेह सोडताना त्याच्याभोवती एका सूक्ष्म लिंगदेहाचा कोश असतो, त्या लिंगदेहावर पूर्वकर्मांचे संस्कार असतात. नवा देह धारण करताना, जीवात्मा या लिंगदेहासह त्यात प्रवेश करतो, अशी पुनर्जन्माविषयीची कल्पना आहे.

प्रत्येक जन्मानंतर मरण आणि प्रत्येक मरणानंतर पूर्वकर्मानुसार पुनर्जन्म, ही जन्म-मरण परंपरा म्हणजे संसार होय. तो अनादी आहे, कारण पूर्वकर्माने जन्म मिळण्याची परंपरा कितीही मागे नेली, तर ती मागेमागेच जाते, तिला प्रारंभ नाही. परंतु संसार हा सान्त आहे, कारण कर्म, योग, ज्ञान, भक्ती वा ईश्वरानुग्रह इत्यादिकांमुळे मोक्ष प्राप्त होतो. पुनर्जन्माला कारणीभूत होणारे बंधनकारक कर्म नष्ट होते आणि पुनर्जन्माची परंपराही संपते.

जीवात्मा शरीराहून भिन्न असतो, तो शरीरापेक्षा अधिक काळ टिकणारा असतो. मानवाप्रमाणेच देव, पशुपक्षी, वनस्पती, जड वस्तू इत्यादींनाही जीवात्मे असतात. हे सर्व जीवात्मे एका प्रकारच्या योनीतून, दुसर्या योनीत जाऊ शकतात. कर्मांची फळे भोगावीच लागतात इ. गोष्टी या सिद्धांतात गृहीत धरलेल्या असतात. हा सिद्धांत निरीक्षण, प्रयोग, स्वानुभव इ.द्वारा सिद्ध झालेला नाही, तो श्रद्धेने मानावा लागतो.

मृत्यूनंतर मानवाचे काय होते, या गोष्टींची जिज्ञासा सर्वांनाच असते. या समस्येची (१) सर्वनाश अथवा (२) निवाड्याच्या दिवसानंतर शाश्वत काळपर्यंत स्वर्गात वा नरकात निवास अथवा, (३) पुनर्जन्म ही उत्तरे मिळतात. पहिला पर्याय इहवादी अशा थोड्यांनाच मान्य होतो. कारण, या जन्मातील सर्व प्रयत्न कायमचे नष्ट व्हावेत, हे बहुतेकांच्या मनाला पटत नाही. दुसरा पर्याय ख्रिस्ती, मुसलमान इ. लोक मानतात. परंतु फक्त एका आयुष्यातील वर्तनाचे फळ म्हणून शाश्वत काळपर्यंत स्वर्ग वा नरक मिळणे, यात प्रमाणबद्धता नाही असे म्हणता येते. म्हणूनच भारतीय लोक ’कर्मानुसार पुनर्जन्म’ हा तिसरा पर्याय मानतात.

वैदिकांनी पुनर्जन्माची कल्पना एतद्देशीय अनार्यांकडून घेतली किंवा ती ऑस्ट्रेलॉईड या प्राचीन भारतीय वंशाची देणगी आहे इ. मते, या सिद्धांताच्या भारतातील उत्पत्तीविषयी मांडली जातात. ऋग्वेदात पुनर्जन्माची कल्पना स्पष्टपणे आलेली नाही. बृहदारण्यकादी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता, महाभारत, स्मृती, पुराणे इ. ग्रंथांतून मात्र, पुनर्जन्मांचे विस्तृत विवेचन आहे. या विषयावर अनेक पुराणकथाही आढळतात परंतु, त्याच्यावर स्वतंत्र असे ग्रंथ मात्र फारसे नाहीत. चार्वाक, अजित केशकंबली इ. मोजक्या लोकांचा व संप्रदायांचा अपवाद वगळता, भारतातील बहुतेक सर्वांना पुनर्जन्माची कल्पना मान्य होती व अजूनही आहे. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानलेले नाही, परंतु पुनर्जन्म मात्र मानलेला आहे. मृत्यूच्या वेळी रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार हे मानवी शरीराचे पाच स्कंध नष्ट होतात आणि पूर्वकर्मानुसार नवे पाच स्कंध उत्पन्न होऊन, व्यक्तीचा पुनर्जन्म होतो असे बौद्ध मानतात. तत्त्वज्ञानावर आधारलेला पुनर्जन्माचा सिद्धांत हे प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध, शीख इ. भारतीय धर्मांचेच वैशिष्ट्य असून, भारतीय तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादींमधील तो एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. पुनर्जन्माची सदैव जाणीव ठेवूनच, बहुतांश भारतीय लोक वर्तमान जन्मातील सर्व कर्मे करतात, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यवंताला चांगला जन्म मिळतो आणि पाप्याला पशुपक्षी, वृक्ष इ. क्षूद्र योनींतून जन्मावे लागते, असे स्मृतिपुराणे सांगतात. कर्मविपाकाची तपशीलवार सुसंगत व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न श्रुति-स्मृतिपुराणांत व विशेषतः ‘गरुडपुराणा’त केलेला आढळतो.

थिऑसॉफीचे अनुयायी व काही आधुनिक विङन यांच्या मते एकदा मनुष्यजन्म प्राप्त झाला, की पुन्हा कधीही क्षूद्र योनींतून जावे लागत नाही. राधाकृष्णन् म्हणतात की, पशूच्या रूपाने पुनर्जन्म म्हणजे, पशूच्या गुणांनी युक्त अशा माणसाचा जन्म होय असे मानावे. या जन्मातील पतीच पुढच्या सात जन्मांतही मिळावा, असे हिंदू स्त्रिया इच्छितात. परंतु, रूडॉल्फ स्टायनर यांच्या मते एका जन्मातील जोडीदार हा दुसर्या जन्मात वडील, आई, भाऊ, बहीण इ. बनण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्या मते, पूर्वजन्मातील एखादा गणितज्ञ गणितात मंद व संगीत वगैरेत पारंगत होण्याची शक्यता असते. मनुष्य पूर्वजन्मात ज्या विषयाचा जाणकार असतो, त्या विषयात पुढच्या जन्मात अधिक पारंगत होतो, ही सर्वसामान्य समजूत त्यांना मान्य नाही. वंशसातत्य म्हणजेच आत्म्याचे अमरत्व होय. माणसाचा पुनर्जन्म पुत्रपौत्रादी रूपांनी होतो, अशी एक कल्पना वेदांत व उपनिषदांत आढळते.

भारताखेरीज जगातील इतर अनेक देशांतही पुनर्जन्मावरचा विश्वास कमी-जास्त प्रमाणात आढळतो. पश्चिम आफ्रिकेतील मंदिंगो, यू, एडो आणि इबो या जमातींमध्यहीे असा विश्वास दिसून येतो. नवजात बालकांना मृत पूर्वजांची नावे देण्यामागे हीच कल्पना असते. आफ्रिका व अमेरिका येथील काही आदिवासी लोक पुनर्जन्मावरील विश्वासामुळे मृत मुलांना रस्त्याच्या कडेला, आईजवळ वा वळचणीखाली पुरतात. मध्य ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेमध्ये, मृतांना त्यांच्या जन्मस्थानी पुरण्यामागेही हाच विश्वास असतो. द. आफ्रिका, ओशिअॅनिया इ. ठिकाणी, देवककल्पनेचा उगम पुनर्जन्माच्या सिद्धांताशी जोडला जातो. ईजिप्तचे लोक पुनर्जन्म मानत होते की नाही, याविषयी मतभेद आहेत. हीरॉडोटस या ग्रीक लेखकाच्या मते, ग्रीकांनी पुनर्जन्माची कल्पना ईजिप्तकडून घेतली. पायथॅगोरसचा पुनर्जन्मावर विश्वास होता, मात्र त्याने हे मत भारतीयांकडून घेतले की नाही याविषयी मतभेद आहेत. ऑर्फिअसचे अनुयायी पुनर्जन्म मानत. प्लेटोनेही या विषयाची चर्चा केली आहे. एपिक्यूरियन आणि स्टोइक लोक मात्र, पुनर्जन्म मानत नसत. प्राचीन युरोपियन लोक पुनर्जन्म मानत असण्याची शक्यता आहे. गॉल, थ्रेशिअन आणि सिथियन लोक पुनर्जन्म मानत. रोमन लोकांनी प्रारंभी हे तत्त्व मानले नव्हते, परंतु पायथॅगोरस वगैरेंच्या प्रभावाने हॉरिस, व्हर्जिल, ऑव्हिड इत्यादींनी हे तत्त्व मांडले आहे. ट्यूटॉनिक लोक पुनर्जन्म मानत असल्याची उदाहरणे आढळतात. यहुदी लोकांनी या तत्त्वाला महत्त्व दिले नाही. झोहर या ग्रंथाने पुनर्जन्माची कल्पना यहुदी धर्मात गुंफण्याचा प्रयत्न केला, परंतु कबालाखेरीज इतरांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. जो पुनर्जन्म मानतो, तो खरा पारशी नव्हेच आणि पारशी लोकांवर हिंदूंच्या पुनर्जन्म कल्पनेचा प्रभाव होता, अशी परस्परविरुद्ध मते पारशी लोकांत आढळतात. प्रारंभीच्या काळात ख्रिस्ती लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता. पुनर्जन्म हा आधुनिक काळातील थिऑसॉफीचा एक महत्त्वाचा सिद्धांत होय. पुनर्जन्माचा सिद्धांत मानला नाही, तर जग हे नियमरहित ठरेल असे या सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांना वाटते.

मानवाला पूर्वजन्म असता, तर त्याला त्याचे स्मरण झाले असते. अनुवांशिकतेचे तत्त्व पुनर्जन्म सिद्धांताच्या विरुद्ध आहे. पूर्वीचेच जीव पुनर्जन्म घेत असते, तर मानवी लोकसंख्या इतकी वाढली नसती. वर्तमान जन्म पूर्वकर्मांवर अवलंबून असल्यास, माणसाला या जन्मात कर्मस्वातंत्र्य उरत नाही आणि त्यामुळे या जन्मातील भल्या-बुर्या कर्मांची जबाबदारी त्याच्यावर येत नाही. दुःखी-कष्टी व्यक्ती या पूर्वजन्मातील पापी आहेत अशी समजूत झाल्यामुळे, इतर माणसे त्यांच्याशी निष्ठुरतेने वागतील इ. आक्षेप या सिद्धांतावर घेतले जातात. या आक्षेपांना पुढीलप्रमाणे विविध उत्तरे देण्यात आली आहेत. अज्ञानामुळे पूर्वजन्माचे स्मरण होत नाही. सर्वांना नाही, तर काहीजणांना पूर्वजन्माचे स्मरण असते. योगसामर्थ्याने असे स्मरण प्राप्त होते. सर्वांना पूर्वजन्म आठवत असता, तर घोटाळे झाले असते. म्हणून विस्मृती ही कृपाच ठरते. जीवात्मा पूर्वकर्मांचे नियम पाळून त्यांची फळे भोगण्यास योग्य असे शरीर ज्या आईवडिलांकडून मिळेल, त्यांच्या पोटी जन्माला येतो. परंतु, ते शरीर मात्र अनुवांशिकतेचे नियम पाळते. शिवाय, सगळीच मुले आईवडिलांसारखी नसतात, जी असतात तीही पूर्णपणे तशी नसतात. सगळी भावंडेही समान नसतात इ. गोष्टींतून दिसणारा भेद, अनुवांशिकतेपेक्षा वेगळ्या अशा पुनर्जन्माच्या तत्त्वामुळेच निर्माण होतो. सृष्टीतील काही जीवयोनी नष्ट वा क्षीण होत असून, त्यांतील जीवात्मे मानव बनत असल्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. पूर्वकर्मांमुळे या जन्मातील भोग ठरत असतात. जन्माबरोबर मिळणारे इच्छास्वातंत्र्य पूर्वकर्माचेच फळ आहे. पुनर्जन्माची कल्पना श्राद्धकल्पनेशी विसंगत आहे परंतु, हिंदूंच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळेच श्राद्धाची प्राचीन कल्पना न सोडताच, उत्तरकालात पुनर्जन्माची कल्पना स्वीकारण्यात आली असावी असे पा. वा. काणे मानतात.

स्वतःच्याच पूर्वकर्मानुसार मनुष्यजन्म मिळत असल्यामुळे, माणूस तत्त्वतः स्वतःच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार होऊ शकतो. या सिद्धांताचे हे सत्य स्वरूप ध्यानात न आल्याने, भारतीय या सिद्धांताच्या प्रभावाने निराशावादी व दैववादीच झाली. संकटांवर उपाय शोधण्याऐवजी ती आपल्या पूर्वकर्माची फळे आहेत, असे मानून त्यांना शरण जाण्याची प्रवृत्ती बोकाळली. एकीकडून आपला वर्तमानजन्य पूर्वकर्यांना ठरला असल्यामुळे या जन्मी काही कर्तृत्व करणे आपल्या हाती नाही, या समजुतीने वर्तमानाची उपेक्षा झाली. तर दुसरीकडून भविष्यकाळातील कल्पित जन्माकडेच सगळे लक्ष केंद्रित झाल्यामुळेही वर्तमान जीवनाची उपेक्षाच झाली. सामाजिक विषमतेचे पूर्वकर्मांच्या आधारे समर्थन करणे आणि त्याद्वारे सामाजिक अन्याय व शोषण यांना धर्म व नीती यांचे अधिष्ठान मिळवून देणे, हा तर या सिद्धांताचा भारतीय जीवनावरील फार मोठा दुष्परिणाम होय. परंतु, सदाचरणाची प्रवृत्ती, दुष्कृत्यांचा तिटकारा, त्याग, सहानुभूती, सामाजिक व वैयक्तिक जबाबदारीची जाणीव इ. गोष्टींना या सिद्धांताने प्रोत्साहन मिळाले, हेही तितकेच खरे आहे. या जन्मातील दुःख हे आपल्याच पूर्वकर्मांचे फळ आहे, या जाणिवेमुळे सहनशीलता, संयम व संकटाला शांत चित्ताने सामोरे जाण्याचे सामर्थ्यही या सिद्धांतानेच भारतीयांना दिले हे मान्य करावेच लागेल.