पुनर्जन्मासाठी आवश्यक मानवी शरीर व गुणाणु रचनाआईवडिलांच्या शरीरात असंख्य पेशी असतात. त्यापेशीत एक केंद्रबिंदू असतो. त्या केंद्रात गुणसूत्र नावाचे, काही सूत्राप्रमाणे कण असतात. या गुणसुत्रात ‘जीनस्’ नावाचा एक स्तंभस्वरूप पदार्थ असतो. त्यामध्ये आणखी सूक्ष्म असे गुणाणुही असतात. ते मागील अनंत पिढ्यांच्या गुणानुसार, विशिष्ट रचनेत सदा स्पंदन करीत असतात. या गुणाणुंची रचना मागील अनंत पिढ्यांच्या संस्कारानुसार स्थिर असते. त्यामुळे नवीन उत्पन्न झालेल्या जीवात, त्याच्या मागील अनंत पिढ्यांमधील सर्व संस्कार प्रवाहित होतात. हे गुणाणु एखाद्या सर्पाच्या वेटोळीसारखे स्पंदन करीत असतात. त्या गुणाणुंंच्या रचनेलाच योगशास्त्रात ‘कुंडलिनी’ असे म्हणतात. गत पिढ्यांमधून प्राप्त झालेले सर्व संस्कार, प्रत्येक जीवाच्या जीवनमानात जवळजवळ तसेच असतात. त्यामुळे जन्मतःच कोंबडीचे पिल्लू दाणे टिपते, तर गाईचे वासरू कांस धरते. या गुणाणुंंच्या स्थिर रचनेत अती अल्प प्रमाणात बदल होतो. त्यामुळे सर्वच पिढ्यांच्या वर्तनात एकसारखेपणा दिसून येतो.
अमेरिकास्थित भारतीय वैज्ञानिक डॉ. खोराणांनी असे प्रयोग या गुणाणुंंवर करून, बरेच संशोधन केले आहे. डॉ. खोराणांचे असे प्रयोग चालले आहेत की, या गुणाणुंच्या स्थिर रचनेत सुयोग्य बदल करून, मानवांचे गुणधर्मच बदलायचे. त्यात त्यांना अल्पसे यशही आले आहे. त्यामुळे भविष्यात हव्या त्या गुणाची माणसे तयार करता येतील, असा त्यांना विश्वास आहे. गुणाणुंच्या रचनेत व गुणाणुंंची सापेक्ष स्थिती बदलता आल्यास, कित्येक विद्वान तयार करता येतील असाही वैज्ञानिकांचा दावा आहे. परंतु, अखंड गतिमान संसारात गुणाणुंची गुणरचना तशीच स्थिर का असावी? याचे उत्तर अजूनही विज्ञान देऊ शकत नाही. गुणाणुदशेतील ते ओत त्याच त्या कक्षेत आणि त्याच त्या सापेक्ष कालावधीत का फिरावेत? त्यांना ही गती कशामुळे प्राप्त झाली? वरीलप्रकारे गुणाणुंची सापेक्ष रचना कशी बदलते? याचा इतिहास सांगणेसुद्धा कठीणच जाईल. उत्क्रांतीकरिता गुणाणु रचना बदलणे आवश्यक असते पण, बंदिस्त अशा गुणाणुंची सापेक्ष भ्रमंती कोणत्या क्रमाने आणि कशी बदलते, याचेही चित्र अजून स्पष्ट नाही. विश्वातील मूळ गतीला अन्य गतिशक्तीची दखल झाल्याशिवाय, एकदम बदलत नसते. मग अब्जावधी वर्षांच्या संस्कारांनी नेमस्त झालेल्या गुणाणुंची सापेक्षता कोणत्या कारणाने बदलत असेल? बदलू शकेल काय? होय. उत्तर आहे अध्यात्म! ध्यानधारणा! भक्ती, ज्ञान, कर्म आणि योग मार्ग! या मार्गात केवळ चित्त एकाग्र केल्याने, साधकाची इष्ट अशी उत्क्रांती आपण होऊन घडते आणि त्यामुळे साधकाच्या सर्व पेशीतील गुणाणु इष्ट सापेक्ष गतीला प्राप्त होतात, असा सर्व योग्यांचा अनुभव आहे. यालाच ‘कुंडलिनी जागृती’ असे म्हणतात.
क्रमविकासाचे मूळ कारण संस्कार प्रकृतीत व सृष्टीत आपल्या पूर्वगतीला धरून राहण्याची प्रवृत्ती दिसून येते. अन्य शक्तींद्वारा परिणाम झाल्याखेरीज, सृष्टीतील पूर्व स्थिती बदलत नसल्याचे विज्ञान सांगते. एकेकाळी आपल्या पृथ्वीला गती मिळून, ती आपल्या सूर्याभोवती तेव्हापासून सारखी त्याच दिशेने फिरत आहे. त्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीची योग्य उत्क्रांती होऊ शकली. अन्य जबर शक्तींचा हस्तक्षेप होईपर्यंत, पृथ्वी अशीच सूर्याभोवती फिरत राहणार. तद्वत् सर्व प्राणिमात्रातील प्राप्त गुणाणुगती, अन्य शक्तींचा हस्तक्षेप झाल्याविना बदलणार नाही हे उघड आहे. परंतु, विभिन्न योनींचे विभिन्न गुणसंस्कार पाहिले म्हणजे, प्रत्येक प्राणिमात्रागणिक त्याच्या गुणाणुंच्या गतीवर अवश्य परिणाम होत असला पाहिजे हे उघड आहे. परंतु, हा बदल अती मंदगतीने होतो. हा बदल प्राणिमात्रांवर होत असलेल्या बाह्य संस्कारामुळे व त्या विपरीत परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल, याबद्दलच्या प्रकृतीच्या सतर्क उत्क्रांतीद्वारे होत असतो. म्हणजे सर्व उत्क्रांतीचे मूळ संस्कारात आहे, असे दिसून येईल.
संस्काराचे इतके महत्त्व आहे. सजीव योनीवर संस्कार होतात, तद्वत् निर्जीव पदार्थांचे अस्तित्व वा गुणसुद्धा सततच्या संस्कारांचे फळ असल्याचे दिसते. ओताचे सापेक्ष गतीनुसार प्राण, उदजन, नत्र इत्यादी मूळतत्त्वे उत्पन्न होतात असे आता सिद्ध झाले आहे. त्या ओतात तशाच गतीने राहण्यास भाग पाडण्यास, त्यापूर्वीचे संस्कारच कारणीभूत होतात. डार्विनच्या र्र्(ीीीींर्ळींरश्र ेष ींहश षळीींंशीीं) सिद्धांतानुसार, बाहेरील परिस्थितीला तोंड देण्याकरिता व त्या परिस्थितीवर मात करण्याकरिता, सजीव आपल्या पूर्व संस्कारांमध्ये योग्य बदल करतो. त्यामुळे अमिबापासून मत्स्य, मत्स्यापासून बेडूक, बेडकापासून सस्तन प्राणी व सस्तन प्राण्यापासून आजचा उत्क्रांत मानव बनला आहे. याचे कारण पूर्व संस्कारांची उत्क्रांती होऊन, तो जीव येणार्या नवीन अडचणींना तोंड देण्यासाठी अधिक योग्य उत्क्रांत संस्कार स्वतःवर घडवून आणतो हे होय. यावरून न बदलणारे गुणाणुसुद्धा सततच्या योग्य संस्कारामुळे बदलू शकतात, असेच दिसते.
वरील संस्कारग्रहण वा संस्कारबदल जर जडच करीत असेल, तर जडाला संस्काराची आवश्यकताच काय? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणून प्राप्त संस्कारांना ग्रहण करून, पुन्हा येणार्या नवीन परिस्थितीला तोंड देण्याकरिता त्या प्राणीशरीरात, एखादे संस्कारग्रहणाचे जाणीवपूर्वक केंद्र असणेही आवश्यक आहे. म्हणजेच संस्कार ग्रहण वा बदल ग्रहण करणारे एखाद्या जाणीवेचे केंद्र, प्रत्येक प्राणिमात्रांच्या शरीरात असले पाहिजे. या जाणीवेच्या स्वतंत्र अस्तित्वाला वैदिक परंपरेत ‘जीवात्मा’ असे म्हणतात. हा जीवात्माच जडशरीराकरिता आवश्यक ते गुण संपादन करतो किंवा नवीन बदलाकरिता नवीन गुणसंस्कार धारण करतो, असे मानावे लागते.
नवीन जीवनाच्या मागे सृष्टीरचनेपासून ते त्याच्या जन्मदात्यापर्यंतचे सारे संस्कार उभे असतात. या दृष्टीने नवजीवनाला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. मातेच्या उदरातून बाहेर पडल्याबरोबर आम्ही आमचा जन्म मानतो परंतु, त्या देहाची रचना मातापित्याच्या स्त्रीबीज संयोगातून होत असते. म्हणजे जन्माचा काळ मातृउदरातून बाहेर पडण्याच्या अगोदरचा असतो. आपला जन्म केवळ मातृपितृबीजाच्या संयोगापासून होतो म्हणावे, तर ती बीजे मातृपितृशरीरात संयोगापूर्वीपासूनच अर्ध अर्ध मात्रेत होती. म्हणजे आपले अस्तित्व अर्ध अर्ध मात्रेत स्वतंत्रपणे मातृपितृशरीरात संयोगापूर्वीपासूनच होते. म्हणजे एका अर्थाने, संयोगपूर्व जन्म होण्याच्या अगोदरपासूनच अर्धमात्रेत आपण मातृपितृशरीरात जिवंत होतो. मग आपला जन्म मातृउदराबाहेर पडताना मानायचा की, मातृपितृबीज संयोगापासून मानायचा की, अर्धमात्रेतील जिवंत स्त्रीपुंबीजापासून मानायचा? हा प्रश्न उपस्थित होतो.
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७