मृत्यूचे रहस्य (भाग-४९)

    10-Sep-2025
Total Views |

मातृपितृबीजाचे मूळ शोधू गेल्यास ते केवळ आपल्या मातापित्यांच्या शरीरातच नसून, त्यांची उत्पत्ती त्यांच्याही मातापित्यांच्या बीजांच्या संयोगापासून झालेली असते. बीजांचे मूळ पाहू गेल्यास आपल्याला आपल्या मातापित्यांचे मातापिता, त्यांचेही मातापिता असे करीत, मानवाच्या मूळ पुरुषापर्यंत आपल्या जन्माचा शोध करीत जावे लागेल. या जटिल प्रश्नाचे उत्तर आदिमानवसुद्धा देऊ शकणार नाही. कारण विज्ञानाच्या सिद्धांतानुसार, मानव प्राणी वानरापासून उत्पन्न झाला आहे. वानरयोनीची उत्क्रांती त्याचा पूर्वज अमीबापासून झाली. सर्व प्राणीजातीचा मूळपुरुष अमीबा मानावा, तर आजच्या वैज्ञानिक अन्वेषणानुसार या अमीबाची उत्पत्ती जड कर्बअणूपासून झाली. पुन्हा जड कर्बाची निष्पत्ती ओतप्रोतांच्या सापेक्ष संघातापासून  झाली. ओताला या सृष्टीरचनेचे मूळ मानावे, तर ओतसुद्धा एकप्रकारच्या अमूर्त चैतन्यापासून अस्तित्वात आला आहे. अशा तर्हेने आपल्या जन्माचे मूळ शोधू गेल्यास, आपल्याला मूळ चैतन्यापर्यंत जावे लागेल आणि हे मूळ चैतन्य तर आजही आहे, कालही होते आणि उद्याही राहील. त्या मूळ चैतन्याला तर जन्मही नाही किंवा मृत्यूही नाही. मग आपला जन्म केव्हा आहे? केव्हाच नाही! आपल्याला जन्मच नाही, या सिद्धांतावर आपल्याला यावे लागते!

परंतु आपल्याला जन्मच नाही, असले आचरट विधान कोण करेल? मग जन्म आपला, आपल्या शरीराचा की आपल्या जीवात्म्याचा? शरीराला तर जन्म नाही, हे आपण पाहिलेच आहे. आपले आजचे व्यक्त शरीर हे त्या मूलकर्बाची सुधारलेली आवृत्ती होय, हे सुद्धा आपण पाहिले. शरीर तर अन्यान्य अवस्थेत नटत आहे. मग जन्म कोणाचा आणि कसा? तेव्हा जन्माचे मूळ शोधण्यास आपल्याला एका मध्यंतरीच्या घटनेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. देह देहाचा चालक नसून, त्यात अवतरणारा जीवात्मा चालक आहे हे आपण अनेकवार पाहिले आहे. जीवात्मा केव्हातरी शरीरात प्रवेश करणारच. जीवात्मा ज्यावेळी या देहात प्रवेश करेल, त्या संधिकालाला आपला जन्म मानता येईल. हा काळ कोणता? असा हा जन्म आपल्याला एकदाच आहे काय? की असे जन्म आपण अनेकदा घेतले? शास्त्र व अतींद्रिय अनुभव असे सांगतात की, आपण अनेकदा जन्म घेतला आहे आणि मुक्तीपर्यंत जन्म घेत राहू. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,

बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन|
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥५,अ.४॥


आशय असा की, हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत. परंतु ते सर्व तू जाणत नाहीस, मी जाणतो. अनेक जन्म घेण्याकरिता अनेक मृत्यू आलेच. जन्ममृत्यूचे हे अव्याहत चक्र म्हणजे आपले अखंड जीवन आहे, असे म्हणावे लागेल. एकाच जन्मापासून एकाच मृत्यूपर्यंत आपले जीवन नसून, अनेक जन्ममृत्यूंच्या संघाताचे अखंड चक्र म्हणजे आपले जीवन मानावे लागेल. मृत्यूनंतरचा काळ आपल्या स्मरणात राहात नसल्याने, आपले इहजीवन आपण आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच मानतो. पण असे गृहीत धरल्यास रोज आपण जे निद्रावश होतो, त्या निद्राकाळात आपल्याला जगाची जाणीव नसते, म्हणून आपण रोजच मरतो, असे धरून चालू काय? तद्वत् मृत्यूनंतरच्या जीवनाचे विस्मरण होते, म्हणून आपल्याला आपले जीवन एकाच जन्ममृत्यूच्या कालखंडातील व्यक्त जीवन मानता येणारे नाही. मृत्यूनंतरही आपले जीवन आहेच. ते आपल्याला अव्यक्त आहे, एवढेच. पण श्रेष्ठ योग्याला ते व्यक्त असते.

जन्ममृत्यूचे अशा तर्हेने जीवनचक्र अखंड चालू आहे. हे जाणून जो व्यवहार करतो, तो ज्ञानी, तर हे न जाणता एकाच जन्ममृत्यूमधील कालावधीतील अल्प जीवनात आसक्त राहून जो इंद्रियभोगातच रममाण राहतो, असा इंद्रियपरायण माणूस पापी जीवन जगतो. त्याचे असे जीवन व्यर्थ आहे. गीता सांगते,

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः|
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति॥१६,अ.३॥


जीवन अखंड आहे, जीवन विशाल आहे; अनेक जन्ममृत्यूच्या वर्तुळातून जीवनाचे ध्येय साकारायचे असते. या जन्ममृत्यूंच्या वर्तुळातून मुक्त होण्याचा यत्न करणे, म्हणजेच खरे जीवन होय. जड जीवनालाच सर्वस्व मानून, त्यात धुंद राहणार्या अज्ञानी जीवांना पापी म्हटले आहे.

व्यक्त मध्यानी भारत :

जन्माची कल्पना ग्राह्य मानल्यानंतर, मृत्यूची कल्पना ओघानेच आली आणि मृत्यू मानल्यानंतर पुनः जन्म आलाच. यावरून जन्मानंतर मृत्यू व मृत्यूनंतर पुनर्जन्म मानावाच लागतो. त्याशिवाय जन्ममृत्यूचे कोडे सुटूच शकत नाही. मृत्यू आहे म्हणून पुनर्जन्म आहे. मृत्यूनंतरचे जीवन व जन्मापूर्वीचे जीवन यांमधील जीवनाचा कालावधी साधारण माणसाला अव्यक्त असतो. त्यामधील जडजीवनाचा काळ तेवढा व्यक्त असतो. म्हणून गीता सांगते,

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत|
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥२८,अ.२॥


शरीराची अवस्था व्यक्त व मायामय असल्यामुळे, ते परत अव्यक्तात जाणारच. त्यामुळे शरीर अव्यक्तात जाताना, म्हणजेच शरीराला मृत्यू आल्यास शोक करू नये. शरीराचे मूळ व अंत अव्यक्तात आहे. केवळ जडशरीर हेच व्यक्त आहे, मग अव्यक्तातून आलेले व्यक्त स्वरुप पुन्हा अव्यक्तात विलीन झाल्यास शोक का करावा? जन्म जीवात्म्याला असतो शरीराला नाही, हे आपण पाहिलेच आहे. मग आपल्या मूळ स्वरुपात जाताना जीवात्म्याने शोक करणे उचित नव्हे, पण आपण जन्मच का घेतो? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखाद्या बंदुकीत दारुगोळा भरतात, त्यापुढे एखादी गोळी ठेवतात. दारुगोळ्याचा स्फोट केला की, त्यापुढे असलेल्या गोळीला गती मिळून ती बंदुकीच्या बाहेर जाऊन सूं सूं आवाज करीत लक्ष्याचा भेद करते. स्फोट दारुगोळ्याचा होतो, गोळीचा नव्हे! गोळी आहे तशीच राहते. पण, दारुगोळ्याच्या स्फोटामुळे गोळी गतिमान होऊन कार्य करते. तद्वत् शरीराचा स्फोट म्हणजे, मृत्यू झाल्यामुळे त्या मृत्यूस्फोटाने जीवात्मा मरणोत्तर गतीला प्राप्त होऊन, त्या दिव्य प्रदेशातून अवगाहन करीत गोळी जशी खाली येऊन लक्ष्य प्राप्त करते, तद्वत् मृत्यूनंतरचा दिव्य अव्यक्त प्रवास केल्यावर जीवात्मा देहरुपी लक्ष्यात गुंततो, जन्म घेतो. बंदुकीतून निघालेली गोळी तिच्या आवेगानुसार कितीही काळ मध्यंतरी अवकाशात तरंगली, तरी तिच्या आवेगाचे फळ म्हणजे लक्ष्यात तिला जाणे भागच असते. तद्वत् मृत्यूस्फोटाने गतिमान झालेला जीवात्मा मध्यंतरी पितृलोकात कितीही काळ रेंगाळला, तरी त्या जीवात्म्याचे कर्मगतीचे लक्ष्य, जो जन्म, तो त्याला घ्यावाच लागतो. जन्म म्हणजे कर्मगतीचे परिफळ होय.(क्रमशः)

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७