मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्र (भाग ७)

    20-Aug-2025
Total Views |


श्लोक क्रमांक १३

कन्याभिः कमनीयकान्तिभिरलङ्गारामलारार्तिका
पात्रे मौक्तिकचित्रपङ्क्तिविलसत्कर्पूरदीपालिभिः|
तत्तत्तालमृदङ्गगीतसहितं नृत्यत्पदाम्भोरुहं
मन्त्राराधनपूर्वकं सुविहितं नीराजनं गृह्यताम्॥


हा श्लोक पंचदशी मंत्राच्या तिसर्या व अंतिम शक्तिकूटातील दुसर्या बीज (क - क) अक्षराने आरंभतो. हा मंत्रातील १३वा बीज मानला जातो. देवीस भव्य भोजन, तांबूल आणि कर्पूरयुक्त विडा अर्पण केल्यानंतर, साधक आता निरांजन अर्थात देवीची आरती ओवाळणे या अंतिम उपासनेला प्रारंभ करतो. निरांजन हा शब्द इतर कोणत्याही भाषेत सहज भाषांतर करता येणारा नाही. याचा सोपा अर्थ, पूजेच्या तबकात दीप प्रज्वलित करून देवीची आरती ओवाळणे असा होतो. आरती म्हणजे उपासनेचा समारोप; आरतीनंतर केवळ काही लघु उपचारच अवशिष्ट राहतात.

या श्लोकात आचार्य आपला भाव अत्यंत अनुपम पद्धतीने व्यक्त करत आहेत. हे आई, अत्यंत सुंदर नवयुवती आपल्या हातातील सुवर्ण पूजेच्या तबकात, अन्य घटकांच्या जोडीला मोत्यांची माळ विविध पद्धतीने सुशोभित करत आहेत. त्या तबकात कापुराच्या स्फटिकांना प्रज्वलित केले आहे. त्या तेजोमय थाळीला मी नम्रतेने तुझ्या समोर आरती गात अर्पण करत आहे. या निरांजन आरतीच्या प्रसंगी तुझ्या सन्मुख नर्तकी ताल धरून नृत्य करत आहेत, गायक सुस्वरात आरती गात आहेत, वादक ढोल-ताशे वाजवत आहेत, वेद जाणणारे ऋषी तुझ्या स्वरूपाचा जयघोष करणार्या वेदमंत्रांचे आवर्तन करत आहेत, या उत्सवाच्या दिव्य वातावरणात हे माते, तू माझी ही प्रकाशसेवा अर्पण करून घे.

जेव्हा जेव्हा निरांजन ओवाळत देवीची आरती केली जाते, त्यावेळी त्या संपूर्ण वातावरणाला अधिक भक्तिरसाने युक्त करण्यासाठी ढोल-ताशांचा गजर, सुमंगल असा शंखनाद, घंटानाद, वेदपठण, पंचवाद्यांचे नाद व या सर्व संगीताच्या तालावर सुंदर सुकन्या करीत असलेले शास्त्रीय नृत्य हे सगळे मिळून एक अद्भुत वातावरण निर्मिती होते. संपूर्ण परिसर विद्युत्स्फूर्तीने भरून जातो. अनेकांना याप्रसंगी ध्यानावस्थेसारखाही अनुभव येतो. त्यांचे सर्व लक्ष त्या तेजस्वी कापुराच्या दिपकावर केंद्रित होते. असे वाटते, जणू त्या क्षणी सगळे विश्व त्या आरतीमध्येच सामावले आहे. पुराणकथेनुसार, देव, देवता, ऋषी, महर्षी हेही याक्षणी अदृश्य रूपाने उपस्थित असतात.

या कृतीचा गाभा हा आहे की, देवी स्वयंज्योतिस्वरूप आहे. तिला दुसर्या कुठल्याही प्रकाशाची गरज नाही.

हेच निरूपण श्री ललिता सहस्रनामातील नाम क्रमांक ८०६ व्यक्त करत आहे.

नाम क्रमांक ८०६ :
परंज्योति

शब्दार्थ : परं म्हणजे सर्वोच्च आणि ज्योती म्हणजे प्रकाश. या नामाचा शब्दशः अर्थ सर्वोच्च प्रकाश असा होतो. हा ब्रह्मतत्त्वाचा उल्लेख आहे. हे ब्रह्माचे प्रकाश रूप आहे. या प्रकाशाचाच अंश धारण करून, सूर्य तेजोमय होतो आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो.

बृहदारण्यकात असा उल्लेख आहे की, समस्त देवी-देवता या ब्रह्मतत्त्वाच्या सर्वोच्च प्रकाशरूपाचे ध्यान करतात, जेणेकरून त्यांना अमरत्व प्राप्त होईल.

कठोपनिषदात दीप आराधना मंत्र आहे. यात या परंज्योतीचाच उल्लेख केला आहे.

(कठोपनिषद २:२:१५)

न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः|
त्वमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति॥

परंज्योती सर्वव्यापि चैतन्यमय असून, संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे. हे ब्रह्माचे प्रकाश रूप आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, तारकामंडळ, विद्युल्लता हे सर्व परं ज्योतीने प्रकाशित होत आहेत. या सर्वांचा स्वतःचा प्रकाश नसून,हे सर्व त्या परंज्योतीच्या प्रकाशाचे अंश रूप धारण करून विश्वाला प्रकाशित करत आहेत.

या परंज्योतीचा अनुभव श्री ललिता देवीचा साधक त्याची आत्मउन्नती झाल्यावर घेतो. त्याला तो सर्वव्यापी कोटी सूर्याच्या समान तेजोमय अशा प्रकाशाच्या साम्राज्यात स्वतःला स्थित बघू शकतो.

आचार्य देवीच्या चरणी लीन होऊन तिला सांगत आहेत की, हे जगन्माते तू स्वयंप्रकाशी आहेस. तूच परिपूर्ण प्रकाश स्वरूप आहेस, परंतु तरीही मी माझ्या अल्पमतीला अनुसरून तुला ही निरांजन रूपी दीपारती अर्पण करत आहे, तिचा स्वीकार कर.

श्लोक क्रमांक १४

लक्ष्मीः मौक्तिकलक्षकल्पितसितच्छत्रं तु धत्ते रसात्
इन्द्राणी च रतिश्च चामरवेर धत्ते स्वयं भारती|
वीणामेणविलोचनाः सुमनस्सां नृत्यन्ति तद्रागवद्भावैः
आङ्गिकसात्विकैः स्फुटरसं मातस्तदाकण्यर्ताम्॥


हा श्लोक पंचदशी मंत्राच्या तिसर्या व अंतिम शक्तिकूटातील तिसर्या बीज (ल ) अक्षराने आरंभतो. हा त्या मंत्रातील १४वा बीज मानला जातो.

प्रथम श्लोकात ज्या राजसिंहासनाची आराधना केली गेली असून, त्या सिंहासनावर आता परमेश्वरी आरूढ आहे. लक्ष्मी तिच्या शिरावर शुभ्र छत्र धरते. छत्र हा भारतीय संस्कृतीत सर्वोच्च सन्मान मानला जातो. लक्ष्मी हा छत्र फक्त कर्तव्य म्हणून धरत नाही; ती परमेश्वरीच्या जवळ असल्यामुळे, तिच्या प्रेमाने, भक्तीभावाने तो छत्र सन्मानाने धरते. म्हणूनच लक्ष्मीला ‘धनलक्ष्मी’ म्हणतात, कारण ती स्वतः देवीजवळ राहून भक्तांना भौतिक संपत्तीचे वरदान देते. देवी ललिता ही राजराजेश्वरी आहे (ललिता सहस्रनाम ६८४). म्हणूनच राजा-महाराजांना दिल्या जाणार्या सर्वोच्च सन्मानांचे प्रतीक येथे तिच्यासाठी दाखवले आहे.

आचार्य म्हणतात, देवी लक्ष्मी आनंदाने शुद्ध, शुभ्र छत्र धरून तुझ्यामागे उभी आहे. त्या छत्रावर असंख्य मोत्यांची जडणघडण आहे. तुझ्या दोन्ही बाजूस इंद्राची पत्नी इंद्राणी व मन्मथ अर्थात कामदेवाची पत्नी रती या चामरांनी तुला सेवित आहेत. तुझ्या सिंहासनासमोर बसून देवी सरस्वती आपल्या वीणेवर गात आहे. तिच्या वीणेच्या तालावर हरिणीप्राय नेत्र असलेल्या, दिव्य अप्सरा नृत्य करीत विविध भावदर्शन दाखवत आहेत. हे सर्व दृश्य, हे सर्व गान याचा तू माते स्वीकार कर.

तिच्या दोन्ही बाजूंनी इंद्राणी व रती-चामराने सेवा करतात. चामर म्हणजे पांढर्या घोड्याच्या केसांनी केलेला शास्त्रीय पंखा. तो हलविणे हा राजांना दाखविला जाणारा सन्मान असतो. इंद्राणी ही इंद्राची पत्नी असल्याने, ती सर्व देवतांचे प्रतिनिधित्व करते. रती ही मन्मथाची पत्नी आहे. मन्मथ हा पराशक्तीचा प्रियभक्त आहे (ललिता सहस्रनाम ३७५ - कामपूजिता, ५८६ - कामसेविता). देवी स्वतः शृंगाररसाने परिपूर्ण आहे (ललिता सहस्रनाम ३७६) आणि कामकेलितरंगिता आहे (नाम ८६३). म्हणूनच रतीची सेवा ही प्रेम आणि भक्तीचा सर्वोच्च आविष्कार मानली जाते.

देवी ललिता त्रिपुरसुंदरी ही सर्वशक्तीस्वरूपिणी आहे. तिच्या चरणांजवळ केवळ सामान्य भक्तच नव्हे, तर स्वयंपूर्ण देवतासुद्धा सेवा करतात.

लक्ष्मी ही भौतिक व आध्यात्मिक संपत्तीची अधिष्ठात्री आहे. ती चामर घेऊन उभी आहे म्हणजे, संपत्तीच स्वतः परमेश्वरीची दासी आहे.

सरस्वती ही ज्ञान व कला यांची अधिष्ठात्री आहे. तीही सेवा करते, म्हणजे ज्ञान व कला यादेखील देवीसमोर दास्यभावाने उभ्या आहेत.

देवी स्वतःच राजराजेश्वरी आहे, सर्वोच्च साम्राज्ञी. राजांना छत्र, चामर, वाद्य, नृत्य अशा सन्मानांनी गौरवलं जातं. पण येथे दृश्य असं आहे की, मानवी राजांना जे सन्मान दिले जातात, त्याहून कितीतरी उंचीचे सन्मान स्वतः लक्ष्मी व सरस्वतीसारख्या देवता ललितेला अर्पण करतात.

देवीच्या समोर बसून, सरस्वती ही वीणा वाजवत आहे. सरस्वतीच्या वीणेच्या गोड सुरात दिव्य अप्सरा नृत्य करतात. त्यांच्या नेत्रांची तुलना हरिणीच्या नेत्रांशी केली आहे. सौंदर्य, निरागसता आणि माधुर्य यांचे प्रतीक. त्या अभिनय दाखवतात, म्हणजे हात, नेत्र, मुखाच्या हावभावांनी भावनांची अभिव्यक्ती करतात. त्यामुळे संपूर्ण दृश्य अधिक मोहक, जिवंत आणि दिव्य बनते.

आचार्य अत्यंत मनोभावे देवीसन्मुख हे उपचार साकार करून शेवटी विनम्रतेने प्रार्थना करतात की, हे माते, तू या सर्वांचा स्वीकार कर. ही सेवा माझ्या भक्तीचा अविष्कार आहे.(क्रमशः)