कथापुष्प श्रावणातले

    31-Jul-2025
Total Views |

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार एक नवीन आध्यात्मिक अनुभूती घेऊन येतो. या दिवशी भगवान शंकराची पूजा, व्रत, आणि रुद्राभिषेक हे भक्तांच्या जीवनात विशेष महत्त्वाचे ठरतात. शिवभक्तीच्या या पर्वात सोमवार फक्त शिवपूजनाचा दिवस नसतो, तर तो श्रद्धा, समर्पण आणि आराध्यावरील विश्वास व्यक्त करण्याची एक सुंदर संधी असतो. श्रावण महिन्याच्या निमित्ताने सोमवार आणि शिवपूजनाचे महत्त्व विशद करणारे श्रावणगाथेतील हे दुसरे कथापुष्प...

कहाणी सोमवारची (खुलभर दुधाची)

ऐका परमेश्वरा, सोमवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आले की, आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानाने युक्ती सांगितली. राजानं दवंडी पिटली, “सर्व गावांतल्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन, दर सोमवारी महादेवाच्या देवळीं पूजेला यावं!” सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसे घाबरून गेली. कोणाला काही सूचेनासं झालं. दवंड्ीप्रमाणं घरात कोणीही दूध ठेवलं नाही. वासरांना पाजले नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. गावचे सगळे दूध गाभार्‍यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही.

दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं, मुलाबाळांना खऊ घतलं, लेकीसुनांना न्हाऊ घातलं, गायीवासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचे सार्थक व्हावं, म्हणून थोडं गंध-फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन वेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतले. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली, “जय महादेवा नंदिकेश्वरा! राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभार्‍यात घातलं, पण तुझा गाभारा काही भरला नाही. माझ्या खुलभर दुधानेही तो भरणार नाही. पण मी आपली भावभक्तीनं अर्पण करते!” असे म्हणून, राहिलेले दूध गाभारी अर्पण केले. पूजा घेऊन मागे परतली आणि इकडे चमत्कार झाला! म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरवाने पाहिले, राजाला कळवलं. परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसर्‍या सोमवारी राजानं देवळीं शिपाई बसविले, तरीही शोध लागला नाही. पुढच्याही सोमवारी चमत्कार असाच झाला. पुढे तिसर्‍या सोमवारी राजा स्वत:च बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला, राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली, राजाने तिला अभयवचन दिले. तिने कारण सांगितले, “तुझ्या आज्ञेने काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही! याला युक्ती काय करावी? मुलां-वासरांना दूध पाजावे, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल.” नंतर राजानं म्हातारीला सोडून दिले. गावात दवंडी पिटविली.

चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना, गायीवासरांना दूध ठेवून, उरलेले दूध देवाला वाहिले. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात, तर देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं, लेकीसुना घेऊन ती सुखाने नांदू लागली, तसे तुम्ही-आम्हीही नांदू. ही साठां उभारांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

कहाणी सोमवारची (शिवामुठीची)

आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस मात्र जेवायला उष्टं, नेसायला जाडं-भरडं, राहावयास गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला, श्रावणमासाचा पहिला सोमवार आला. ती रानी गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, ’बाई बाई, कुठं जाता? महादेवाच्या देवळीं जातो, शिवामूठ वाहातो, त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जाते, मुलंबाळं होतात, नावडती माणसे आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते.’ मग त्यांनी हिला विचारलं, ’तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमचेबरोबर येते!’ असे म्हणून त्यांचे बरोबर देवळांत गेली!

नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो वसा वसतां? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध-फूल घ्यावं. दोन बेलाची पानं घ्यावी. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरादेवा, सासू-सासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा!” असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्टं खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावे. हा वसा पाच वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चौथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामुठीकरितां घेत जावे.
पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिले आणि दुसर्‍या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवासही केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं, ते तिनं गायीला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला, नावडतीनं घरातनं सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासू-सासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा!” असं म्हणून, तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासर्‍याने विचारलं, “तुझा देव कुठं आहे?” नावडतीने जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप, वाघ आहेत. तिथं माझा देव आहे.” पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडते, तुझा देव दाखव, म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले, नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल, कोण जाणे. नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले हंड्या, गलासं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करूं लागली, गंध-फूल वाहूं लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासू-सासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा!” असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं, राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं. देवळाकडे आणायला गेला, तर तिथे एक लहान देऊळ आहे, तिथे एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, “हे असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाल दर्शन दिलं.” सुनेमुळे देव भेटला, म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा-आम्हा होवो, ही साठां उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.