कथापुष्प श्रावणातले

    24-Jul-2025
Total Views | 17

श्रावण मास हा उपासना, व्रत, संयम आणि भक्तीचा पर्वकाळ मानला जातो. या महिन्यातील गुरुवार हे दिवस गुरुतत्त्व जागवणारे, आणि पुण्यप्रद मानले गेले आहेत. श्रावण महिन्यात विविध सण साजरे होतात. त्याक़ाळी कथाही वाचल्या जातात. भक्तांचे मन शुद्ध व्हावे, जीवनात धर्मपालनाची गोडी निर्माण व्हावी आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुलभ व्हावा याहेतूने या कथांचे वाचन होते. या कथांमधून धर्माचरण, कर्तव्यबुद्धी, आणि परमेश्वरावरील अढळ श्रद्धा यांचा बोध होतो. श्रावण महिन्यातील चार गुरुवारी काही विशेष सण, श्रावणी सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार यांच्या कथा श्रावणगाथा या सादरात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या कथा वाचनाचे पुण्य सर्वांना मिळावे यासाठी सादर केलेले गाथेतील हे पहिले कथापुष्प...

3. कहाणी दिव्यांच्य आवसेची

ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी हिची फजिती झाली. सासू-दीरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आवसेचे दिवशी, त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं ही घरांतून निघाल्यावर ते सारे बंद पडले. पुढे या आवसेच्या दिवशी, राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावांतले दिवे अदृश्य रूप धारण करून, झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरे जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपआपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीच नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो, माझा थाटमाट जास्त व्हायचा. मला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर याला सर्व दीपकांनी विचारले, असे होण्याचे कारण काय? मग तो सांगू लागला बाबांनो, काय सांगू? मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार करून रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-दीरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. “जिथं असेल तिथं खुशाल असो!” असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय, म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा राजाच्या सुनेला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूूर्ण.

7. कहाणी नागपंचमीची

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सात सुना होत्या. चातुर्मासात श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या. सर्वांत धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे, असं समजून नागोबा मला माहेराहून न्यायला येईल, असं म्हणूं लागली. इतक्यात काय झाले? शेषभगवानास तिची करूणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला? पुढं त्याने मुलीला विचारले; तिनेही हाच माझा मामा असल्याचे सांगितले. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामाने तिला वारुळात नेले. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून, आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका!

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचवू. पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. आमची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशाने तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले, तो नागपंचमीचा दिवस. हिने आपली पुष्कळवेळ भावाची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून, पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली आणि त्यांची पूजा केली. जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहात होती. सरतेशेवटी तिने देवाची प्रार्थना केली, “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील, तिथं खुशाल असोत,” असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून, मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यांत घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हां-आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

8. कहाणी नागपंचमीची (शेतकर्‍याची)

आटपाट नगर होतं, तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचे वारूळ होते. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झाले? वारूळात जी नागांची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला. लौकरच ती मेली. काही वेळाने नागीण आली, आपलं वारूळ पाहूं लागली, तर तिथे वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानं माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकर्‍याचा निर्वंश करावा, असं मनात आणलं. फोफावतच शेतकर्‍याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना, शेतकर्‍याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली.

पुढे तिला असं समजलं की, यांची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली आणि पाहिले की, त्या घरी बाईने पाटावर नाग-नागीण आणि नऊ नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे, नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करत आहे, तर ही नागीण तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे, इतक्यात नागीण उभी राहिली. तिला म्हणू लागली, “बाई बाई, तूं कोण आहेस? तुझे आईबाप कुठं आहेत?” इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले, पाहाते तो प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊ लागली. नागीण म्हणाली, “भिऊ नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे!” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, “ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही.” असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिने ती ऐकली, वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली, सगळ्यांना आनंद झाला.

बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही झालं नाही, तर निदान इतकं तरी पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां-आम्हां होवो. ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

( संदर्भ - संपूर्ण चातुर्मास पुस्तक , श्री गजानन बुक डेपो)
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121