
पंचदशी मंत्रातील द्वितीय क्रमांकाचे ‘ए’ हे बीज ज्ञानशक्तीचे, वाणीशक्तीचे आणि आत्मबोधाचे मूळ बीज आहे. श्रीविद्या उपासनेत हे बीज सरस्वतीसमान तेज आणि मेधा देणारे आहे. ध्यान, जप आणि तांत्रिक अनुष्ठानांमध्ये याचा योग्य प्रकारे उच्चार केल्यास, साधकाला ब्रह्मविद्या आणि आत्मज्ञानात उन्नती प्राप्त होते. ‘ए’ हे बीज ‘अहं ब्रह्मास्मि’ या आत्मज्ञानाच्या भावनेशी संबंधित मानले जाते. ‘ए’ म्हणजे पराब्रह्माचे प्रकट रूप, आत्मा आणि ब्रह्म यांची अद्वैतता. ए = जिथे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय एकरूप होतात, असे एकत्व व्यक्त करते. कुंडलिनी जागृतीमध्ये ‘ए’ हे बीज विशुद्ध चक्राशी संबंधित मानले जाते. हे चक्र वाणी, संवाद, अंतर्ज्ञानाशी निगडित असल्यामुळे, ‘ए’ हे त्या चक्राच्या जागृतीत साहाय्यक ठरते.
एणाङ्कानलभानुमण्डललसच्छ्रीचक्रमध्येसिथतां
बालार्कद्युतिभासुरां करतलैः पशांकुशौ बिभ्रतीम्।
चापं बाणमपि प्रसन्नवदनां कौसुम्भवस्त्रान्वितां
तां त्वां चन्द्रकलावतंसमकुटां चारुस्मितां भावये॥2॥
एण म्हणजे हरीण. हे हरीण चंद्रावर अंकित असल्याने, चंद्राला ‘एणांक’ असे संबोधले जाते. यामुळेच चंद्राची अन्य नामे ‘मृगांक’, ‘हरिणांक’ अशी आहेत. जगन्माते, तुझा निवास असणारे श्रीचक्र हे चंद्रमंडलाप्रमाणे आल्हाददायक, अग्निमंडलाप्रमाणे देदीप्यमान आणि सूर्यमंडलाप्रमाणे तेजस्वी आहे. अशा सुंदर श्रीचक्राच्या मध्यभागी तू विराजमान आहेस.
उगवत्या सूर्याची लाली जशी संपूर्ण आकाशात पसरते आणि सूर्यबिंबदेखील लालबुंद आणि अत्यंत मोहक दिसते, तसे अरुणवर्णी आणि भासूर अर्थात देदीप्यमान मुखकमल असणार्या श्री ललितादेवीला मी वंदन करतो. तू आपल्या चार हातांमध्ये पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण धारण केला आहेस. पाश हा भक्ताच्या भौतिक सुखाच्या लालसेवर बंधन घालतो. अर्थात भौतिक सुख मिळवणे आणि त्याचा उपभोग घेणे हे योग्य आहे, परंतु त्याचा अतिरेक होऊ नये हे बंधन हा पाश घालतो. अंकुश हा भक्ताच्या षड्रिपुंवर (काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा गुण म्हणजे षड्र्िपु) ठेवला जातो आणि षड्रिपु नियंत्रणात राहिल्याने, त्याची आध्यात्मिक आणि आधिभौतिक प्रगती होते. तुझ्या हातात असणारे पाच पुष्प बाण म्हणजे पंच तन्मात्रा आहेत. पंच तन्मात्रा ही पंचमहाभूते आहेत, ज्यांची तूच स्वामिनी आहे. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि अंतरिक्ष. तुझ्या हातातील उसाचे धनुष्य हे मनोवस्थेचे प्रतीक आहे. हा उस पौंड्र या विशिष्ट जातीचा आहे, जो रंगाने पूर्ण लाल असतो आणि तो अत्यंत लवचिक असतो. इतका लवचिक की, त्याचे धनुष्य बनवले जाऊ शकते. ऊस ज्याप्रमाणे आतून अत्यंत मधुर असतो, त्याचप्रमाणे जगन्माते तुझी उपासना करून अत्यंत मधुर चित्ताने मी पंच तन्मात्रांच्या साहाय्याने, सगळ्या भौतिक सुखांचा आस्वाद घेऊन तृप्त होऊ शकतो. या भौतिक आणि आध्यात्मिक सुखांच्या प्राप्तीसाठी हे देवी भवानी, मी तुझ्या या वरदायिनी रुपाला माझ्या चित्तामध्ये स्थिर करत आहे.
तुझे अत्यंत प्रसन्न मुखकमल आणि चेहर्यावरील मंद स्मित आश्वासक आणि मनाला शांती देणारे आहे. तू धारण केलेली वस्त्रे करडईचे फूल किंवा केशराप्रमाणे आरक्तवर्णी आणि तप्त सुवर्णाप्रमाणे तेजस्वी असून, तुझ्या मस्तकावर विराजमान मुकूटातील चंद्रकोर तुझ्या या सौंदर्याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त करून देत आहे. हे जगन्माते, तुझ्या या मंगलमय आणि मनोरम स्वरूपाला मी माझ्या हृदयात साठवून ठेवत आहे.
श्लोक क्रमांक 3
ईशानादिपदं शिवैकफलकं रत्नासनं ते शुबं
पाद्यं कुङ्कुमचन्दनादिभरितैरर्घ्यं सरत्नाक्षतैः।
शुद्धैराचमनियकं तव जलैर्भक्त्या मया कल्पितं
कारुण्यामृतवारिधे तदखिलं संतुष्टये कल्पताम्॥3॥
पंचदशी मंत्रातील तृतीय क्रमांकाचे बीज ईकार हे आहे. ‘ई’ हे बीज म्हणजे पराशक्तीच्या संकल्पाचे बीज, ज्यामुळे सृष्टीची पहिली प्रेरणा निर्माण होते. साधक या बीजाचा जप करून स्वतःच्या मनातील लक्ष्य ठरवतो, त्यावर दृढ निश्चय करतो आणि त्या दिशेने प्रयत्नशील राहतो. श्रीविद्या त्रैशक्त्याधिष्ठित आहे, इच्छा, ज्ञान, क्रिया. त्यात ‘ई’ हे इच्छाशक्तीचे मूळ बीज आहे. सृष्टी, संकल्प, प्रारंभ, सर्जनशीलता आणि कर्मप्रवृत्ती या सर्वांचा उगम इच्छाशक्तीतून होतो. ‘ई’ म्हणजे संकल्पाचे बीज, यातूनच मनोमये जगत् ही कल्पना साकार होते.
ईश्वरी तत्त्वाचे पूजन करताना षोडशोपचार केले जातात. या षोडश उपचारांनी ईश्वरी तत्त्वाला आवाहन करून, त्याची स्थापना करून त्याला नैवेद्य दाखवला जातो आणि ईश्वरी शक्तीला मनोवांच्छित फळाची कामना केली जाते. या श्लोकात षोडश उपचारांपैकी, चार उपचारांचे वर्णन केले आहे. ही मानसपूजा आहे, याचे वारंवार स्मरण करताच या स्तोत्राचे पठण आवश्यक आहे.
हे जगत्जननी, कल्याण हेच मुख्य फळ प्राप्त करून देणारे पद म्हणजे ईशानादिपद, अर्थात शिव, विष्णु किंवा ब्रह्मपद. या पदांनाच मी तुझे आसन म्हणून योजिले आहे. तुझ्या पादप्रक्षालनार्थ मी केशर, चंदन आदि सुगंधी द्रव्यांनी विभूषित आणि रत्नासमान अक्षतांनी युक्त असणारे जल पाद्य म्हणून आणि तुझ्या हस्तप्रक्षालनार्थ अर्घ्य म्हणून मी अर्पण करत आहे. तुझ्या आचमनासाठी मी तुझ्या सन्मुख हे शुद्ध जल अर्पण करत आहे. तू दयेचा सागर आहेस, माझ्या या भक्तिपूर्वक सेवेने तू प्रसन्न हो, हीच तुला आळवणी. (क्रमशः)
सुजीत भोगले
9370043901