येथे बदल हवाच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |
DRS_1  H x W: 0
 
 



कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्व सध्याच्या घडीला थंड असले तरी अनेक समीक्षक सध्या या खेळातील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक सामन्यांमध्ये वादाचा विषय ठरलेल्या ‘डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम’च्या (‘डीआरएस’) नियमांत बदल करण्याबाबत ते मागणी करत आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. क्रिकेटविश्वालाही याचा मोठा फटका बसला असून नेहमी व्यस्त असणारे क्रिकेटविश्व सध्याच्या घडीला थंड पडले आहे. अनेक देशांमध्ये सध्या सामने होत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) सध्या नियमांचा पुनर्अभ्यास करण्यासाठी बराच वेळ आहे. मैदानावरील पंचांचे निर्णय चुकीचे ठरत असल्याने क्रिकेटविश्वात ‘तिसरे पंच’ (थर्ड अम्पायर) अस्तित्वात आले. ‘अ‍ॅक्शन रिप्ले’च्या आधारावर ‘तिसरे पंच’ निर्णय घेतात, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. रनआऊट, स्टम्पिंग, कॅच आदींबाबतचे निर्णय मैदानांवरील पंच बहुधा तिसर्‍या पंचाच्या कोर्टात टोलवतात. ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ पाहून याबाबत निर्णय घेणे ‘तिसर्‍या पंचां’ना सोपे जाते. मात्र, ‘एलबीडब्ल्यू’बाबतचा निर्णय मैदानावरील पंचांनाच घ्यावा लागण्याचा नियम आधी होता. अनेकदा हे निर्णय चुकीचे ठरत असल्याने क्रिकेटविश्वात मोठ्या प्रमाणावर वादाचे प्रसंग उद्भवले. त्यानंतर ‘डीआरएस’ ही प्रणाली आणत आयसीसीने खेळाडूंना तिसर्‍या पंचांकडे दाद मागण्याची मुभा दिली. मात्र, मैदानावरील पंचांनी खेळाडूला बाद ठरवले असेल, तर तिसरे पंचही नियमानुसार त्याला बादच ठरवत. त्यामुळे या प्रणालीचा तरी नेमका काय फायदा? असा प्रश्न या खेळाडूंना पडत असे. याबाबत अनेक क्रिकेट समीक्षक मत व्यक्त करत आहेत. ‘डीआरएस’मधूनही प्रश्न सुटत नसतील, तर यात बदल करणे गरजेचे असल्याचे म्हणणे समीक्षकांचे आहे. यासाठी आयसीसीने तज्ज्ञांची विशेष समिती बनविण्याची मागणी जोर धरत आहे. मोकळा वेळ असतानाच ‘आयसीसी’ने या नियमांत बदल करण्याची मागणी केली जात आहे.

 
 

नवल वाटावे तितुके कमीच

 
 

इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धा यंदाच्या वर्षी खेळविण्यात येणार की नाही, असा एकच प्रश्न सध्या तरी क्रिकेट वर्तुळात विचारण्यात येत आहे. ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू करण्यात येणार होती. मात्र, जगभरात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला. २९ मार्चऐवजी १५ एप्रिलपासून ही स्पर्धा खेळविण्याची तयारी बीसीसीआयची आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी संपूर्ण देशभरात २१ दिवस ‘लॉकडाऊन’चा निर्णय जाहीर केला. येत्या १४ एप्रिल रोजी या ‘लॉकडाऊन’ची मुदत संपुष्टात येत आहे. या मुदतीनंतर म्हणजेच १५ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धा सुरू होईल, असा कयास बांधण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून ‘लॉकडाऊन’लाही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आयपीएल स्पर्धा कशी सुरू होणार, हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दर चार वर्षांनी भरविण्यात येणारी ऑलिम्पिक स्पर्धाही पुढील वर्षी भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत हजारो खेळाडू सहभागी होतात. वर्षानुवर्षे या स्पर्धेची ते आतुरतेने वाट पाहत असतात. यासाठी अनेक दिवसांपासून त्यांची तयारी सुरू असते. विविध पात्रता स्पर्धांचे टप्पे ओलांडल्यानंतरच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी या खेळाडूंना मिळते. २०२० रिओ ऑलिम्पिक स्पर्धाही यंदाच्या वर्षी टोकियो येथे होणार होती. मात्र, युरोपातील परिस्थिती पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा आता पुढील वर्षी म्हणजेच २०२१ साली खेळविण्यात येणार आहे. जागतिक दर्जाची स्पर्धा असूनही ही स्पर्धा यंदाच्या वर्षी न खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑलिम्पिकच्या तुलनेत आयपीएल तर एक लीग स्पर्धा आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहता ही स्पर्धाही यंदाच्या वर्षी न खेळविण्याबाबतच सर्वांचे मत आहे. मात्र, स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी वाहिन्यांनी मोजलेले कोट्यवधी रुपये, जाहिरातींची मोठी रक्कम आणि खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस आदी सर्व कारणांमुळे आयपीएलबाबत अद्याप निर्णय होताना दिसत नाही. जागतिक दर्जाची स्पर्धा रद्द होऊ शकते. मात्र, लीग स्पर्धेबाबतचा निर्णय होण्यास इतका वेळ लागतो, याचे नवल वाटावे तितके कमीच!

- रामचंद्र नाईक  

 
@@AUTHORINFO_V1@@