भीष्मांना देवाज्ञा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020
Total Views |
Bhishma_1  H x


अखेरीस भीष्मांना देहातून मुक्ती देणारा दिवस उगवला! त्यांच्या दर्शनासाठी फुले, धूप, रत्ने, फळे, रेशीम वस्त्रे इत्यादी शुभ वस्तू घेऊन कृष्ण आणि पांडव परिवार कुरुक्षेत्री आला. त्यांच्या समवेत धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, सात्यकी, विदुर व युयुत्सु पण होते. शरशय्येवरती भीष्म आपली सुटका होण्याच्या प्रतीक्षेत होते.


व्यास, पराशर, नारद व इतर सर्व ऋषिमुनीही भीष्मांच्या दर्शनासाठी उभे होते. युधिष्ठिराने आपल्या पितामहांना नमस्कार केला. तो म्हणाला, “पितामह, मी युधिष्ठिर, पांडव, माझे भाऊ व तुम्हाला प्रिय असलेली जवळची सर्व माणसं तुमच्या भेटीसाठी आलो आहोत. तुम्हाला आदरांजली वाहण्यासाठी सर्व हस्तिनापूर इथे लोटले आहे. धृतराष्ट्र आहेत, श्रीकृष्ण आहे. तुम्ही कृपा करून आपले डोळे उघडा व आमच्याकडे पाहा.” हे ऐकून भीष्मांनी आपले नयन उघडले व आदरांजली वाहायला आलेल्या सर्वांकडे पाहिले. ते म्हणाले, “युधिष्ठिरा, तुम्हा सर्वांना पाहून मला खूप आनंद व संतोष झाला आहे. अखेर सूर्यदेवाचा रथ आता उत्तरेकडे वळला आहे. या तीक्ष्ण शरांच्या शय्येवर जणू काही मी गेली १०० वर्षे पडून आहे असेच मला वाटत आहे. आता या धरतीमातेचा निरोप घेण्याचा क्षण जवळ आला आहे.” भीष्म धृतराष्ट्रांना म्हणाले, “हे वत्स, राजकर्तव्ये कोणती हे मी तुला सांगण्याची आवश्यकता नाही. तुला तर सारेच ठाऊक आहे. तू सूज्ञ व जाणता आहेस. म्हणून तुझ्या पुत्रांसाठी शोक आवरता घे. ते तर तुझे प्राक्तन होते! हा युधिष्ठिर व त्याचे बंधू तुझ्या पुत्रांसमानच आहेत. ते तुला मानतात. तू त्यांच्या बरोबर सुखाने राहा.”


भीष्म कृष्णाकडे वळले आणि म्हणाले,‘’मला फुले द्या. मी श्रीकृष्णाची पूजा करू इच्छितो.” त्यांनी श्रीकृष्णाची पूजा केली व म्हणाले, “कृष्णा, तूच या विश्वाचा स्वामी आहेस. तू परमपुरुष आहेस. या विश्वाची निर्मिती तूच केलीस व तूच शाश्वतात्मा आहेस. तू तुझ्या विश्वरुपाचे मला दर्शन दे आणि या जगाचा निरोप घेण्याची आज्ञा दे. तूच मला या देहातून मुक्ती दे. तुझ्या कृपेने मला चिरशांती मिळू दे.”


भीष्मांनी कृष्णाचे विश्वरूप दर्शन घेतले. कृष्ण त्यांना म्हणाला, “हे देवव्रता, मी तुला स्वगृही जाण्याची परवानगी देतो आहे. तू पुन्हा सर्व वसुंकडे जाऊन राहा. तुला पुन्हा या मर्त्य मानवांच्या जगात जन्म घ्यावा लागणार नाही. हा मृत्युदेव तुझ्या दारी सेवक होऊन तुझ्या आज्ञेची वाट पाहत आहे. तू त्याला आज बोलव.”


भीष्मांचा चेहरा उजळला. त्यांनी मनापासून मृत्यूची आराधना केली. त्यांच्या शरीरातून अद्भुत प्रकाश पसरला व तो गगनी गेला. ढगात शिरून दिसेनासा झाला. स्वर्गीय वाद्यांमधून मंजुळ स्वर आले. सर्व आकाश त्या ध्वनिलहरींनी व्यापले. हजारो स्वर्गीय पुष्पांचा सुगंध आसमंती पसरला व भीष्मांचा आत्मा स्वर्गी निघाला. सर्वांचे हृदय शांतीने भरून गेले.


बाणांसहित भीष्मांचा देह चंदनाच्या चितेवर ठेवून धृतराष्ट्रांनी भीष्मांना अग्नी दिला. सोबत पाचही पांडव, विदुर आणि धृतराष्ट्र उभे होते. दुसर्‍या दिवशी भीष्मांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. त्यांचे विसर्जन गंगा नदीच्या पात्रात करायचे होते. गंगा, जिच्या उदरी या देवव्रताचा जन्म झाला होता, त्याच गंगेच्या प्रवाहात त्यांच्या अस्थी विसर्जित केल्या जात होत्या. गंगेचा प्रवाह वाहायचा थांबला. प्रत्यक्ष गंगा आपल्या तिरी येऊन उभी राहिली. ती रडत होती. शोक करत होती. ती लोकांना म्हणाली, “माझा पुत्र मृत्यू पावला आहे. तो निष्ठावान होता. भगवान भार्गवांनाही त्याने पराभूत केले होते. पण असा हा वीरपुरुष शिखंडीकडून मारला गेला! या जगात त्याला तुल्यबळ कुणीच नव्हते.” श्रीकृष्ण तिच्या जवळ गेला व म्हणाला, “हे जगतजननी, तू शोक करू नकोस. तुझा पुत्र जिथून अवतरला तिथेच तो परत आला आहे. तो अष्टवसुंपैकी एक होता, हे तुला माहिती आहे. पण, शापवाणीमुळे त्याला या पृथ्वीवरती काही वर्षे काढावी लागली. तो सामान्य मर्त्य मानव नव्हताच! तेव्हा तू त्याच्यासाठी शोक करू नको. तुझा पुत्र देव होता व तो परत देवलोकी येत आहे. तो आपल्या शापातून आज मुक्त झाला आहे. यासाठी तू आनंदच मान.”


हे ऐकून गंगा लुप्त झाली व पुन्हा वाहू लागली. तेथील सर्व माणसे दु:ख व आनंद यांचा संमिश्र अनुभव घेत पुन्हा हस्तिनापुरी परतली...!
- सुरेश कुळकर्णी
@@AUTHORINFO_V1@@