अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020   
Total Views |
afganistani shikh_1 
 
 


अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारामध्ये नुकतेच चार बंदूकधारी अतिरेकी घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्या भ्याड हल्ल्यात २८ शीख बांधवांचा दुर्देवी आणि हकनाक मृत्यू झाला. मृत पावणार्‍यांमध्ये एक लहान शीख बालकाचाही समावेश आहे. हल्ल्याची बातमी मिळताच काबुली कायदा-सुव्यवस्था रक्षक तिथे पोहोचले. त्यांनी त्या अतिरेक्यांवर हल्ला चढवला. त्यामध्ये एक अतिरेकी मारला गेला, तर तीनजण पळून गेले. शेकडो शीख बांधवांना पोलिसांनी बाहेर काढले. या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ या धर्मांध राक्षसी संघटनेने घेतली आहे. मात्र, अफगाण सरकारला वाटते आहे की, हल्ला ‘हक्कानी नेटवर्क’ या अतिरेकी संघटनेने केला असावा. ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘इसिस’च्या सोबतीने ‘हक्कानी नेटवर्क’ ही अतिरेकी संघटना नेहमीच अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी कारवाया करते. कित्येकांचे म्हणणे आहे की, या अतिरेक्यांना हा हल्ला गुरुद्वारावर नव्हे, तर गुरुद्वारापासून जवळच असलेल्या भारतीय दूतावासावर करायचा होता. मात्र, तिथे कडक सुरक्षाव्यवस्था असल्यामुळे त्यांना तिथे हल्ला करता आला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुद्वारावर हल्ला केला.

काबूलचा गुरुद्वारा हल्ल्यासाठी निवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे, गुरू नानक यांनी मक्का मदिनेला भेट दिल्यानंतर ते काबूलमध्ये आले होते. तिथे काही मुस्लीम विद्वानांना ते भेटले होते. शीख धर्मीयांच्या मते, गुरू नानक अफगाणिस्तानमधील काबूल आणि जलालाबादमध्ये काही दिवस थांबले होते. या दोन शहरांतील गुरुद्वारे शिखांच्या मते पवित्र आहेत. असो. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान्यांचा कहर सुरू झाला, तेव्हा काबूलमध्ये आठ गुरुद्वारा होते. त्यापैकी सात गुरुद्वारा तालिबान्यांनी अक्षरशः तोडले. त्यांच्या क्रूरतेतून वाचलेला हा गुरुद्वारा. या गुरुद्वारावर त्यांची वाकडी नजर असणारच. १९८९साली अफगाणिस्तानात ७०च्यावर प्रमुख आणि मोठे गुरुद्वारा होते. आज मात्र यातील १२ गुरुद्वारांमध्येच शीखधर्मीय पूजापाठ करतात. बाकीचे गुरुद्वारा बंद आहेत किंवा तिथे आता तिथल्या स्थानिक मुस्लिमांचा कब्जा आहे. तालिबान्यांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानातून लाखो हिंदू आणि शीखधर्मीयांनी देशांतर केले. ‘युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सी’च्या मते, अफगाणिस्तानातून भारतात येणार्‍या निर्वासितांमध्ये ९० टक्के शीखधर्मीय आहेत. ‘पोरसेश रिसर्च अ‍ॅण्ड स्टडीज ऑर्गनायझेशन’ने फेब्रुवारी २०१९रोजी ‘सर्वे ऑफ अफगाण हिंदू अ‍ॅण्ड सीख’ हा विषय घेऊन संशोधन केले. त्यामध्ये असा निष्कर्ष काढला आहे की, अफगाणिस्तानच्या शीख आणि हिंदू समुदायाला धार्मिक, आर्थिक आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक समस्या आहेत. त्यांना नागरिक म्हणून दुय्यम दर्जाही नाही.

 

हे असे का असावे? अफगाणिस्तानचा राष्ट्रीय धर्म मुस्लीम आहे. अफगाणिस्तानचीही राज्यघटना आहे. त्यात स्पष्ट लिहिले आहे की, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना कायद्याच्या चौकटीमध्ये राहून धार्मिक स्वातंत्र्य आहे. राज्यघटनेच्या या एका वाक्याने तिथल्या अल्पसंख्याकांचे जगणे मुश्किलच केले आहे. कारण, अफगाणिस्तानामध्ये ईशनिंदेचा कायदा आहे. या कायद्यानुसार तिथल्या अल्पसंख्याक समुदायाला वेठीस धरले जाते. ईशनिंदेच्या गुन्हेगारांना तीन दिवसांत त्यांचे निरपराधित्व सिद्ध करायचे नाहीतर त्यांना मृत्यूदंड. तसेच धर्मांतराचाही कायदा आहे. मुस्लीम व्यक्तीला इतर धर्मात धर्मांतरित केले, तरीही कसलीही सुनवाणी न होता मृत्यूदंडच. यामध्येही एक उल्लेखनीय की, ईशनिंदेची शिक्षा होण्यासाठीही वय ठरवलेले आहे. १८ वर्षांवरील पुरुषास आणि १६ वर्षांवरील स्त्रीने ईशनिंदा केली तर तिला शिक्षा होते. (इथे पुरुषापेक्षा वयाने लहान असलेली स्त्रीही गुन्हेगार)

 
 

आणखी एक, इथे बहाई धर्मविचारांना मानणार्‍यांनाही देहदंड आहे बरं. एकोणिसाव्या शतकात इराणमध्ये ‘एक देव, एक माणूस’ अशी संकल्पना बहाउल्लाह यांनी आणली. बहाउल्लाह यांचे अनुयायी बहाउल्लाह यांना बुद्ध, कृष्ण, ईसा, मुसा, जर्थुस्त्र, मोहम्मद या सर्वांचा अवतार मानतात. इस्लामच्या पैगंबर बहाउल्लाहच्या रूपाने अवतारित होणे हा विचारच धार्मिक, वैचारिक जोखड बांधलेले धर्मांध अतिरेकी करूच शकत नाहीत. त्यामुळे बहाई धर्मश्रद्धा असणार्‍यांनाही अफगाणिस्तानमध्ये देहदंड दिला जातो. अफगाणिस्तानमधील बौद्ध मूर्तींची विटबंना जग आजही विसरले नाही. थोडक्यात, अफगाणिस्तानात अल्पसंख्याकांचे जगणे म्हणजे ‘जियो तो जिये कैसे’ असेच आहे.

9594969638

@@AUTHORINFO_V1@@