पवित्र भूमीतला कायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


holy law_1  H x



काजीसाहेबांच्या मते हा बदनामीचा गुन्हा होता. या गुन्ह्याला शरियतच्या कायद्यानुसार धोंडे मारून जीव घेण्याची शिक्षा आहे का ? असावी बहुधा. कारण शरियत कायद्यात तज्ज्ञ असणार्‍या माणसालाच काझी बनता येते.


पाकिस्तानात कोणता कायदा चालतो
, असं वाटतं? घटनात्मक नागरी कायदा, शरियत कायदा की जंगलचा कायदा? काही दिवसांपूर्वीची गोष्ट. फराझ जावेद नावाचा इसम सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता. फराझ मूळचा-पाकिस्तानी नागरिक. इंजिनिअर बनून अमेरिकेला गेला. तेथील नागरिकत्व घेतलं. सध्या तो अमेरिकन नौदलात इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. सुट्टीवर आलेला फराझ नमाज पढायला गावाच्या मशिदीत गेला. नमाजानंतरच्या भाषणात मौलवीने अमेरिका आणि अमेरिकेला तालिबानविरोधी लढ्यात मदत करणारं पाकिस्तान सरकार यांच्यावर कडाडून टीका केली. मौलवींचे प्रवचन संपल्यावर फराझ मौलवींजवळ जाऊन एवढंच म्हणाला की, “हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रश्न आहे. त्याबाबतीत तुम्ही एवढी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती.” झालं! मौलवीबुवा बिघडले! साहजिकच आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण खेळता खेळता आमच्या दाढीचे केस पिकले नि हा कालचा पोरगा आता मला शहाणपणा शिकवितो? मौलवीबुवांनी आजूबाजूच्या मंडळींना हुकूम सोडला, “या पाखंडी फराझ जावेदला त्वरित ठार करा.”



फराझ जीव वाचविण्यासाठी गावातून तर पळालाच
, पण मिळेल ते पहिलं विमान पकडून पाकिस्तानातूनही पळाला. फराझ वाचला. पण युसूफ अली आणि जाहिद हे त्याच्याइतके भाग्यवान नव्हते. युसूफ अली हा पाकिस्तानी सेनादलातून निवृत्त झालेला ‘मेजर’ दर्जाचा अधिकारी होता. मुसलमान आणि हिंदूंमध्ये धार्मिक बाबतीत कसा फरक आहे पाहा. आपण सद्गुरू, देव किंवा देवी, अवतार किंबहुना साक्षात परमेश्वर आहोत, असं जाहीर करणारे बुवा आणि बाया भारताच्या कानाकोपर्‍यात दरवर्षी निर्माण होत असतात. त्यांच्या या जाहीरनाम्यावर कुणीही, कसलाही आक्षेप घेत नाही. उलट प्रत्येकाला मुबलक भक्त आणि भक्तिणी लाभून सगळ्यांचा पारमार्थिक धंदा झकास चालतो. जी खरोखर आध्यात्मिक मंडळी असतात, ती या धंदेवाईकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून परमेश्वरी योजनेनुसार जे काही काम त्यांच्यावर सोपविले गेलेले असेल, ते निष्ठेने आणि प्रेमाने करीत राहतात. कालक्रमानुसार ’दूध का दूध, पानी का पानी’ आपोआपच होते. काळाच्या ओघात धर्माच्या प्रवाहाला गढळूपणा आलासा भासला, तरी तो गढूळपणा दूर करून मूळचा निर्मळ झरा वर आणणाराही कुणीतरी निघतोच. हेच तर हिंदू धर्माचं सामर्थ्य आहे.



मुसलमानी किंवा ख्रिस्ती धर्मात असं होत नाही
. तेथे येशू हा एकटाच देवपुत्र, बाकी सगळे पापी लोक. मुसलमानांच्या म्हणण्याप्रमाणे महंमद हा शेवटचा पैगंबर म्हणजे प्रेषित, त्याच्यानंतर कुणीही प्रेषित नाही. आता मनुष्यस्वभाव सगळीकडे सारखाच. त्यामुळे तिकडेही स्वत:ला ‘अवतार’ म्हणविणारे, ‘प्रेषित’ म्हणविणारे लोक निघतच असतात. त्यांना त्वरित ‘काफर’ ठरवून बहिष्कृत करण्यात येतं, कैद करण्यात येतं वा ठार मारण्यात येतं. निवृत्त मेजर युसूफ अलीने स्वत:ला ‘प्रेषित’ म्हणवून घ्यायला सुरुवात केली. त्वरित त्याला अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. त्याने तुरुंगातही स्वत:चा प्रचार सुरू केला. एका कट्टर इस्लामप्रेमी सहकैद्याला इस्लामचा हा अवमान सहन झाला नाही. त्याने मेजर युसूफ अलीला सरळ गोळी घालून ठार केलं. अरेरे! बिचारा प्रेषित!! काय म्हणता, त्या सहकैद्याला तुरुंगात बंदूक किंवा पिस्तूल कुठून मिळालं? अहो, हल्ली तुरुंगातच अशा सगळ्या सुखसोयी मुबलक असतात. त्यातून तो पाकिस्तानातला तुरुंग!



जाहिद तर युसूफ अलीपेक्षा कमनशिबी निघाला
. काही संतप्त इसमांनी जाहिदच्या घरात घुसून त्याला खेचत, फरफटत गावाच्या चावडीवर आणले. त्यांच्या जोरजोरात ओरडण्यावरून तेथे बराच म्हणजे सुमारे अडीचशे लोकांचा जमाव जमला. इतक्यात काजीसाहेबही आले. त्या लोकांनी काजीला जाहिदचा गुन्हा सांगितला. काजीसाहेब भयंकर संतापले. त्यांनी शिक्षा फर्मावली, “या इसमाला दगड मारून ठार करा.” जाहिदला धावायला सांगण्यात आलं आणि अडीचशे लोकांनी त्याच्यापाठोपाठ धावत, दगडधोंडे मारून त्याचा जीव घेतला. असा कोणता गुन्हा त्याने केला होता? चोरी, लूट, खून की व्यभिचार? छे, छे! त्याने फारच भयंकर गुन्हा केला होता. पवित्र कुराण ग्रंथात महंमदाचं नाव जेथे जेथे आलं होतं, तेथे तेथे ते खोडून जाहिदने स्वत:चं नाव टाकलं होतं. काजीसाहेबांच्या मते हा बदनामीचा गुन्हा होता. या गुन्ह्याला शरियतच्या कायद्यानुसार धोंडे मारून जीव घेण्याची शिक्षा आहे का? असावी बहुधा. कारण शरियत कायद्यात तज्ज्ञ असणार्‍या माणसालाच काझी बनता येते. काजीसाहेब, दारूच्या धुंदीत गाडी चालवून निरपराध गरिबांना चिरडणार्‍या लोकांना शरियतमध्ये कोणती शिक्षा सांगितलीय हो?


इस्रायली गद्दार
?


आम्हा हिंदूंना फंदफितुरी कशी अगदी अंगवळणी पडलेली आहे
. अलेक्झांडरला पोरसविरुद्ध लढताना अंभीने खुशाल मदत केली. जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध शहाबुद्दीन घोरीला मदत केली. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि इमादशहा हे सुलतान विजयनगरच्या रामराजाचं हिंदू राज्य बुडवायला निघाले, तेव्हा राक्षसतागडीच्या भीषण युद्धात आमचे मराठे सरदार खुशाल सुलतानांच्या बाजूने लढले. १९४७ सालापासून आजपर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये हिंदूच लोक जास्त आहेत. शिवाजी महाराजांविरुद्ध स्वारी करून येणार्‍या मोगली सरदारांच्या सैन्यात मुसलमानांपेक्षा मराठे नि रजपूतच जास्त असायचे. शनिवारवाड्यात इंग्रजांचा युनियन जॅक झेंडा फडकाविणारा आमचाच बाळाजीपंत नातू होता. भारत हे हिंदू राष्ट्र आहे, या संकल्पनेला कडाडून विरोध कोणाचा? मुसलमान किंवा ख्रिश्चनांचा नव्हे, आमच्याच सेक्युलर हिंदूंचा. फितुरी, दगलबाजी आमच्या रक्तात अगदी सहजपणे भिनली आहे. त्यात आम्हाला काहीच वाटत नाही.


कारण समजा
, आमच्या गद्दारीमुळे आमच्या राजाचं राज्य बुडालं, तरी आमचं काही बिघडत नाही. नवा राजा येईल, त्याची मुजरेबाजी करायची आमची तयारी असतेच. समजा, नव्या राजाने धर्म बदलायला लावला, तरी काही बिघडत नाही. स्वधर्म, संस्कृती, अस्मिता वगैरे गोष्टी दुय्यम आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी दोनच-सत्ता आणि संपत्ती! त्या आहेत तर सगळं आहे. पण इस्रायलचं तसं नाही. स्वदेश, स्वधर्म आणि राष्ट्रीय अस्मिता या गोष्टींना ते वेडे लोक सर्वाधिक किंमत देतात. लढाई बिढाई करून नाहक रक्तपात करण्याऐवजी आमच्या पंतप्रधानांनी पाहा कसा, चाळीस हजार चौरस मैलांचा हिमालयीन प्रदेश सरळ चीनला देऊन टाकला. अहो, करायची काय ती बर्फाळ जमीन? गवताचं पातंदेखील उगवत नाही तेथे! पण, इस्रायली वेडपटांनी इंचभर जमीनदेखील अरबांना द्यायला नकार दिला. त्या रेताड वाळवंटासाठी ते रक्ताच्या नद्या वहावतायत.


पण
, आता इस्रायली लोकदेखील हळूहळू शहाणे व्हायला लागलेत, असं दिसतं. वेस्ट बँकेच्या हेब्रॉन, नाब्लुस वगैरे भागांमध्ये गेले कित्येक महिने जी घनचक्कर लढाई सुरू आहे, त्यापैकीच अ‍ॅडोरा या वसाहतीतला प्रसंग इस्रायली लोकांना धक्का देऊन गेला. अ‍ॅडोरा वसाहतीमध्ये गडबड करणार्‍या एका पॅलेस्टाईन गटाला जिवंत पकडण्यात आलं. त्यांच्याकडल्या माहितीवरून छापा घालून पॅलेस्टाईनी अतिरेक्यांचा एक मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला. त्याचं निरीक्षण करणारे इस्रायली अधिकारी चकित झाले, कारण त्यापैकी बहुसंख्य हत्यारं आणि दारुगोळ्यावर चक्क इस्रायली लष्कराच्या विशिष्ट खुणा होत्या. ती शस्त्रं त्यांना मिळाली कुठून? तपासाअंती असं निष्पन्न झालं की, अ‍ॅडोरा वसाहतीतल्या पाच ज्यू इसमांनी इस्रायली लष्कराची ही शस्त्रं चोरून पॅलेस्टान्यांना विकली. हे पाचही जण काही ना काही निमित्ताने लष्कराशी संबंधित आहेत. पाचही जणांना त्वरित अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी काटेकोरपणे सुरू आहे.


जपानमध्ये हिंदू संस्कृती


आर्य नावाच्या उंच
, गौरवर्णीय, परक्या लोकांनी भारतावर स्वारी करून इथल्या मूळ रहिवाशांना दास बनवलं, हा खोटा सिद्धांत ब्रिटिश हस्तक पंडित फ्रेडरिक मॅक्समुल्लरने मांडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तो भारतीयांच्या जाणिवेतच काय, नेणिवेतही प्रयत्नपूर्वक रुजवला. गेली दीड-पावणेदोन शतके दृढमूल झालेल्या त्या असत्याला आता प्रचंड हादरे बसू लागले आहेत. परदेशात तर तो सिद्धांत मोडीतच निघालाय. हिंदुस्थानात मात्र तो अजून जीव धरून आहे. याला कारण आपली गुलामी मनोवृत्ती अंगात भिनलेले विद्वान आणि भाडोत्री संपादक, पत्रकार. श्रीकांत तलगेरी यांच्यासारख्या राष्ट्रीय वृत्तीच्या अभ्यासकांनी तर वरील असत्य सिद्धांताला हादरा देताना आक्रमक सत्य मांडलंय. तलगेरी म्हणतात की, “आर्य नावाचे कुणी लोक बाहेरून भारतात आलेलेच नाहीत; उलट भारतातलेच लोक उत्कर्षाच्या नव्या वाटा शोधण्यासाठी बाहेर गेले. जिथे जिथे गेले तिथल्या स्थानिकांची लूट नि कत्तल न करता, त्यांना त्यांनी आपली संस्कृती दिली. अंगच्या गुणवत्तेने त्यांनी स्वत:ची, स्थानिक लोकांची आणि त्या प्रदेशाचीही भरभराट घडवून आणली.”


डोनाल्ड मॅकेंझी हे विद्वान प्राचीन जपानसंबंधी संशोधन करीत आहेत
. त्यांना असं आढळलं की, जपानवर हिंदू-बौद्ध संस्कृतीची दाट छाया आहे. इंद्राला जपानी भाषेत ’तैशाकू’ असं म्हणतात. याचा शब्दश: अर्थ देवराज शक्र असा होतो. त्याचप्रमाणे गणपती, शेषनाग, वरुण, सरस्वती, शिव या देवतांना अनुक्रमे शोतेन, रुजीन, सुई तेन, बेन तेन आणि दाईकोकू अशी जपानी नावं आहेत. जपानमध्ये कापसाची लागवड एका भारतीय माणसाने सुरू केली, असं समजलं जातं. हा माणूस एका फुटलेल्या गलबतातून वाहून इ. स. ७९९ मध्ये जपानमधल्या ऐची किनार्‍याला लागला होता. जपानच्या होरयूनी या पवित्र नि प्राचीन मंदिरात काही पोथ्या जपून ठेवलेल्या आहेत. त्या अगदी निवडक लोकांनाच वाचता येतात. मॅकेझींना असं आढळलं की, त्या पोथ्या अकराव्या शतकात प्रचलित असलेल्या बंगाली लिपीत लिहिलेल्या आहेत. एकेकाळी संपूर्ण जगाला भारतानेच धर्म आणि संस्कृतीची देणगी दिली होती. भावी काळात भारताला तेच कार्य करायचं आहे; तेच त्याचं दैवदत्त कार्य आहे, असं खुद्द स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद म्हणाले आहेत. सध्याच्या भारताची स्थिती मात्र कस्तुरी मृगासारखी आहे. सुगंधी कस्तुरी त्याच्याच बेंबीत आहे आणि तो मात्र युरोप-अमेरिकेत गवत हुंगत हिंडतोय. भारतीय आया आपापल्या पोरांना कॉन्व्हेंटात कोंबून ‘साहेब’ बनवू पाहातायत आणि भारतीय बाप घरांदारासकट ‘ग्रीनकार्ड’ मिळवण्याच्या खटपटीत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@