भारतातील पहिल्या वन्यजीव 'अंडरपास'मधून ११ वाघांचा संचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020   
Total Views |
tiger_1  H x W:

वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी ‘एनएच-४४’ महामार्गावर अंडरपास

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - 'एनएच-४४' महामार्गावर 'नागपूर ते शिवनी’ दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींसाठी बांधण्यात आलेल्या 'अंडरपास’चा वापर १८ प्रजातींचे वन्यजीव करत असल्याची नोंद वन्यजीव संशोधकांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये ११ वाघांचा समावेश असून गवा, सांबर, चितळसारखे वन्यजीवही या बांधकामाखालून सुरक्षितरित्या ये-जा करत आहेत. कान्हा ते पेंच राष्ट्रीय उद्यानादरम्यानचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेले हे भारतातील पहिलेच ’अंडरपास’ आहेत.
 
 
 
 
 
 
 
’राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडून उभारण्यात आलेला ’एनएच-४४’ महामार्ग महाराष्ट्रामधून पेंचच्या जंगलाला छेदून जातो. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीवेळी वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीच्या दृष्टीने त्यावर काही बांधकाम करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही या मागणीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाला वन्यजीवांच्या दृष्टीने काही बांधकाम उभारण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी प्राधिकरणाने 'भारतीय वन्यजीव संस्थान’मधील (डब्लूआयआय) तज्ज्ञांच्या मदतीने या महामार्गावर काही बांधकाम केले. यामध्ये ५० ते ७५० मीटर आकाराचे नऊ अंडरपास बांधण्यात आले. अंडरपास म्हणजे महामार्ग उन्नत स्वरूपाचा बांधून त्याखालून वन्यजीवांना सुरक्षित हालचाल करण्याची सोय निर्माण करून देणे.
 
 
 

tiger_1  H x W: 
मार्च ते डिसेंबर, २०१९ दरम्यान ’डब्लूआयआय’चे संशोधक या अंडरपासचा वापर करणाऱ्या वन्यजीवांची नोंद करत होते. अंडरपासखाली कॅमेरा ट्रॅप लावून घेतलेल्या या नोंदीमध्ये आम्हाला एकूण ५,४५० छायाचित्रे मिळाली असून त्यामधील ८९ छायाचित्रे वाघांची असल्याची माहिती ’डब्लूआयआय’चे बिलाल हबीब यांनी दिली. या छायाचित्रांची छाननी केली असता ११ वाघ या अंडरपासचा वापर आपल्या हालचालींकरिता करत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. वाघांशिवाय या अंडरपासखालून अधिकवेळा जंगली कुत्रे, रानमांजर, चितळ आणि रानडुक्कर जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
 
 
वाघांपेक्षा छोटे प्राणी महत्त्वाचे
 
वाघांपेक्षाही या अंडरपासचा वापर सांबर, रानकुत्रे, मुंगूस, चितळसारखे छोटे प्राणी करत आहेत का, याची माहिती जाणून घेणे गरजेचे असल्याचे वन्यजीव अभ्यासक आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले. वाघ हा सहजरित्या अशा प्रकारच्या बांधकामाचा वापर आपल्या हालचालींकरिता करतो. याउलट छोटे प्राणी अशा बांधकामांखालून हालचाल करताना घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले. नऊ महिन्यांच्या या निरीक्षणादरम्यान संशोधकांना छोट्या प्राण्यांची ५,३८१ छायाचित्रे मिळाली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@