लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक ! (भाग-४)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Feb-2020
Total Views |


lommanya tilak_1 &nb



‘टिळक क्रांतिकारक नव्हतेच, त्यांचा या चळवळीशी काय संबंध?’ असं म्हणणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र, इतिहासाच्या खोलात जाऊन डोकावले तर नक्कीच वेगळे चित्र साकारले जाते. तत्कालीन क्रांतिचळवळीच्या म्हणाव्या तशा फारशा नोंदी नसल्याने टिळकांनी पडद्यामागून क्रांतिकारकांना जे सहकार्य केले, त्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. दुर्दैवाने तो इतिहास आज आपल्याकडे म्हणावा तसा चांगल्या अवस्थेत उपलब्ध नाही. आम्ही तो जपू शकलो नाही. त्या काळात ब्रिटिश राजवट असल्याने तो लिहिता आला नाही, ज्यांनी लिहिला त्यांना त्यातील काही गोष्टी लपवूनच तो लिहावा लागला. पण, आज ज्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यावरून टिळकांसारख्या नेत्याने क्रांतिकारकांना ज्या पद्धतीने बळ दिले ते पाहून थक्क व्हायला होते.



टिळकांनी पडद्यामागून क्रांतिकारकांना जे सहकार्य केले
, त्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. दुर्दैवाने तो इतिहास आज आपल्याकडे म्हणावा चांगल्या अवस्थेत उपलब्ध नाही. आम्ही तो जपू शकलो नाही. त्या काळात ब्रिटिश राजवट असल्याने तो लिहिता आला नाही, ज्यांनी लिहिला त्यांना त्यातील काही गोष्टी लपवूनच तो लिहावा लागला. गंगाधरराव देशपांडे तर त्याची कबुली देतात आणि म्हणतात, “ही हकीकत सावधगिरीने आणि सत्यास मुरड घालून लिहावी लागली. ते भय अजूनही संपलेले नव्हते.” इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय सैनिकांना एकत्र घेऊन उठाव घडवून आण्याचे प्रयत्न करावेत, यासाठीही टिळक प्रयत्नशील होते असे दिसते. गंगाधरराव देशपांडे यांनी एका पत्रात लिहिले आहे- “पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीमध्ये वीरेंद्र चटोपाध्याय वगैरे मंडळी होती. आपल्यापैकी भावेही होते. त्यावेळी या मंडळींनी भावेंच्या बरोबर काही हिरे, किती होते हे लक्षात नाही, जर्मनीहून पाठवले होते. ते लोकमान्य टिळकांना देण्यास कळवले होते. भावे यांनी मोठ्या हिकमतीने जर्मनीहून ते पुण्यापर्यंत आणले व लोकमान्यांपर्यंत दिले व त्यांचा उपयोग वाटेल तसा करावा असा जर्मनीत असलेल्या मंडळींचा निरोप सांगितला. लोकमान्यांनी व वासुकांकानी हे हिरे माझ्याकडे नाना मराठे यांच्यामार्फत पाठवले व महायुद्धात इंग्लंडच्या विरुद्ध याचा उपयोग करावा, असा निरोप पाठवला.” बेळगाव येथील ‘मराठा लाईट इन्फेन्टरी’च्या सैनिकांना स्वातंत्र्ययुद्धात ओढून घ्यावे व यासाठी यातून येणार्‍या पैशांचा वापर करावा, अशी टिळकांची इच्छा होती, असेही गंगाधर देशपांडेंच्या एका पत्रावून समजते. म्हणाव्या तशा प्रमाणात याच्या फारशा नोंदी नसल्याने आजही ‘टिळक क्रांतिकारक नव्हतेच, त्यांचा या चळवळीशी काय संबंध?’ असं म्हणणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र, इतिहासाच्या खोलात जाऊन डोकावले तर नक्कीच वेगळे चित्र साकारले जाते आणि टिळकांसारख्या नेत्याने क्रांतिकारकांना ज्या पद्धतीने बळ दिले ते पाहून थक्क व्हायला होते.



तर टिळकही अडकले असते...



खरंतर चापेकर प्रकरणापासूनच टिळकांना क्रांतिकारकांच्या कोणत्यातरी खटल्यात गोवावे असे सरकारच्या मनात होते
. चापेकरांच्या कुटुंबीयांना टिळक आर्थिक मदत करतात, याचेही पुरावे त्यांच्याकडे होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यात त्यांचा या सहभाग आहे, याचे संदर्भ ब्रिटिशांना मिळाले नाहीत. त्यानंतर १९०८च्या खटल्यातही तसा प्रत्यक्ष संबंध सरकारला जोडता आला नाही आणि त्यानंतर जेव्हा ‘अभिनव भारत’च्या सदस्यांचा खटला चालवला गेला, जॅक्सनच्या खुनानंतर त्यात मात्र काही साक्षी जुळून येत असल्याचे दिसत होते. भटांच्या पुस्तकात नोंद सापडते. ते लिहितात, “१९०६ मध्ये टिळकांची व आमची गुप्त बैठक झाली होती. या खटल्यात गणूने ते पोलिसांस सांगितले होते. अनंतराव कान्हेर्‍यांनी ‘केसरी’ व ‘काळ’ वाचून इंग्रजी अधिकार्‍यांविरुद्ध आपले मत झाल्याचे व जॅक्सनचा वध नंतर केल्याचे कबूल केले होते. तेव्हा या खटल्यात जर टिळकांचे नाव गुंतवता आले तर सरकारला हवे होते. गणू वैद्य हा माफीचा साक्षीदार हुकमी पत्ता सरकारजवळ होताच. त्याच्या जबानीत त्यांनी टिळकांचे नाव आणले. हा जबाब जेव्हा पळशीकरांसमोर गेला तेव्हा, टिळकांचे नाव त्यात पाहताच गणूवर ते खेकसले व “गाढवा, त्या महात्म्याचे नाव का घेतोस? शरम वाटत नाही तुला?” असे म्हणून टिळकांचे नाव खोटेच गुंतवले होते, हे त्याच्याकडून कबूल करून घेऊन ते त्याला खोडावयास लावले आणि अशा प्रकारे टिळकांचा संबंध या खटल्यात आला नाही.” (पणशीकर पोलीस ऑफिसर होते.)



गणू जोशी याला सुटकेनंतर सरकारने नोकरी दिली होती
. शिक्षा तीन वर्षांची साधी कैद होती. त्यामुळे त्यानंतर चिरोल खटल्यातसुद्धा गणूने टिळकांच्या विरुद्ध साक्ष द्यावी, अशीही मागणी चिरोलकडून सारखी होत होती. पण, गणू भटांच्या मदतीने टिळकांना येऊन भेटला आणि टिळकांनी त्याला सांगितले, “काळजी करू नकोस. तू माझ्या बाजूने साक्ष दिली तर सरकार तुझी नोकरी घालवेल. त्यापेक्षा तू असे कर, ‘अभिनव भारत’च्या सदस्यांना सबुरीने घ्या, सल्ला मी दिला होता, हे खरे आहे आणि ते तू सांग. यानेही जरी तुझी नोकरी गेली तर मी तुला नोकरी देईन,” असे आश्वासन दिले. गणूने असेच सांगितले आणि सरकारला तोंडघशी पाडले. टिळकांना अडकवण्याचा हाही डाव हुकला.



क्रांतिकारक शपथा घेत आणि पोलिसांनी कितीही त्रास दिला तरीही आपल्या सहकार्यांची नावे सहजासहजी सांगत नसत
. त्यांना आमिषे दाखवली जात, तरीही ते ढळत नसत. कोल्हापूर प्रकरणात अनेकांना अशीच आमिषे दाखवण्यात आली, पण क्रांतिकारकांना या शपथांमुळे दहापेक्षा जास्त लोकांना गोवणे शक्य झाले नाही. काही लोक सापडले नाहीत, काहींनी वेषांतर केले. टिळक मंडालेहून आल्यानंतर त्यांना जेव्हा हे समजले, तेव्हा त्यांनी सुटून आलेल्या तरुणांची पाठ थोपटली, असे नानासाहेब गोखले सांगतात. जाता जाता त्यांनी केलेला उल्लेख महत्त्वाचा आहे. “त्यांच्या (टिळकांच्या) प्रोत्साहनपर आशीर्वादावरच आज हयात असलेली मंडळी समाधानात आहेत व अद्यापही ती टिळकतत्त्वांशी एकनिष्ठ राहिली आहेत.” ( २२४ )



टिळकांची अखेरची सहा वर्षे



मंडालेहून सुटून आल्यानंतर टिळक काहीसे मवाळ झाले
, असे अनेकजण म्हणतात. ब्रिटिश गुप्तचर अहवालात एका अधिकार्‍याने याबद्दल एक फार महत्त्वाची आणि मार्मिक नोंद करून ठेवली आहे. अलीकडच्या तुरुंगवासापूर्वी टिळक बंडाला चिथावणी देताना ज्या शब्दांचा बुरखा पांघरत असत, तो बुरखा, मागचा चेहराच दिसू नये इतका जाड नव्हता. आपण कधीही बळाचा किंवा हिंसेचा वापर करावा असे म्हटलेले नाही, अशी टिळकांनी ग्वाही दिलेली आहे. पण, १९०८ साली त्यांनी केलेल्या भाषणांचे पुस्तक कोणी नुसते काळजीपूर्वक वाचले, तरी बळाचा वापर करण्याचे त्यांचे धोरण आहे याची खात्री पटेल. ‘स्वराज्य मागा आणि ते मिळाले नाही तर बळाचा वापर करून ते मिळवाया शब्दात थोडक्यात त्यांचा दृष्टिकोन सांगता येईल. यासाठी आवश्यक ती प्रत्यक्ष कृती करण्याचे काम ते वाट चुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोडून देतात. या विद्यार्थ्यांनी मग दरोडे घातले, खून केले की, ते कानावर हात ठेवतात आणि आपण बळाचा वापर करण्यास कधीच कोणास सांगितले नाही, असे म्हणतात.



१९१४ नंतर टिळक जास्तीचे सावध झाले
. आले-गेले लोक यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याचे टिळक टाळू लागले. कोण पोलिसांचा माणूस असेल हे ओळखणे अवघड होते. त्यांच्या मागे पोलिसांचा विशेष पहारा असे. गुप्त पोलीस त्यांच्या मागावर असत, हे टिळकांना ठाऊक असावे बहुधा. टिळक परदेशात असलेल्या क्रांतिकारकांशी पत्रव्यवहार टाळू लागले. शक्यतो खात्रीचा माणूस असल्याशिवाय टिळक निरोप पाठवत नसत. खात्रीच्या माणसाकडून टिळक तोंडी निरोप पाठवत. गदार पक्षाची मंडळी अमेरिकेत क्रांतिकार्य करत होती आणि बर्लिनमध्ये असलेले काही भारतीय क्रांतिकारक जर्मन सरकारच्यावतीने आणखी गुप्त योजना आखत होते, याचीही टिळकांना कल्पना होती. टिळकांनी पांडुरंग खानखोजे यांना विष्णुपंत पिंगळे यांच्यामार्फत निरोप टिळकांनी पाठवला होता. गद्दार सैन्य एकत्र करण्यासाठी खानखोजे अमेरिका सोडून जाण्यापूर्वी टिळकांचा आणखी निरोप त्यांना मिळाला होता.



टिळकांनी
होमरूल चळवळसुरू केली आणि सरकारने त्यांच्यावर पुन्हा एकदा राजद्रोहाचा तिसरा खटला भरण्याच्या हालचाली सुरू केल्या. नगरच्या व्याख्यानात टिळक जे बोलले आणि त्यानंतर त्यांची जी जबानी झाली, त्याबद्दल मध्य विभागाच्या महसूल अधिकार्‍यांनी लिहिलेला अभिप्राय महत्त्वाचा आहे. ते लिहितात, “माझा टिळकांच्या बोलण्यावर मुळीच विश्वास नाही. त्यांच्या सध्याच्या हालचाली अत्यंत अनिष्ट आहेत. दौरे आणि व्याख्याने यामुळे आपण सध्याच्या धुमसत्या राजद्रोहास फुंकर घालून तो अधिक भडकवत आहोत, हे टिळकांना माहीत आहे. ‘होमरूलची चळवळ’ धोक्याची आहे. कोणताही निष्ठावंत माणूस सध्याच्या परिस्थितीत अशी चळवळ सुरू करणार नाही.”



क्रांतिकारकांचे अपार प्रेम
!



१९१६ साली टिळक लखनौ स्थानकावर उतरले
, तेव्हा तिकडच्या क्रांतिकारकांपैकी राम प्रसाद बिस्मिल आणि इतर देशभक्तांनी मिळून टिळकांची मिरवणूक काढली होती, असे खुद्द बिस्मिल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. टिळकांवर त्यांचे इतके प्रेम होते की, घोडागाडीचे घोडे सोडून त्या देशभक्त क्रांतिकारकांनी टिळकांची गाडी ओढली होती. ‘देशाचे दुर्दैव’ या लेखाकरिता टिळकांना अटक झाली तेव्हा बाबा सावरकर आणि टिळकांची भेट झाली. डोंगरीच्या तुरुंगात दोघेही होते. तेव्हा टिळकांसोबत त्यांचे बोलणे झाले. बाबा टिळकांना म्हणाले, “बळवंतराव, आपण कारागृहात आलात. आता महाराष्ट्राचे कसे होणार?” टिळक लगेच म्हणाले, “बाबा, महाराष्ट्राची काळजी करू नकोस. महाराष्ट्र जीवंत असेल तर एक माणूस कमी झाल्याने तो काही मरणार नाही आणि तो मेलेलाच असेल तर एका माणसाने काही जीवंत व्हावयाचा नाही. मग चिंता का?” नीतिसेन द्वारकादास हेही असेच झपाटलेले टिळकभक्त क्रांतिकारक. त्यांची वेगळी ओळख म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बायकोचे ते चुलत बंधू! ते सावरकरांच्या विश्वासातले साथीदार! त्यांनी तर आपल्या लंडनमधल्या घराला टिळकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ‘टिळक हाऊस’ हे नाव उघडपणे दिले होते.



हिंदू धर्माची टिळकांनी जी व्याख्या केली त्यात
‘साधनानाम् अनेकता’ हे एक महत्त्वाचे मर्म त्यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हेचं सूत्र वापरायचे, असेच त्यांचे ठरले होते. त्यामुळे एकाच वेळी अनेक साधनांचा वापर टिळक करत असत. जे जे शक्य होईल ज्या ज्या मार्गाने शक्य होईल ते ते त्या त्या मार्गाने टिळक करून पाहत. या सगळ्या क्रांतिकारकांना टिळक वडीलधारे वाटत होते. अनेकदा या क्रांतिकारकांच्या घरांना अन्न, पाणी आणि आर्थिक स्थैर्य पुरवण्याचे काम टिळकांनी अबोलपणे केले. कणखर बापाची भूमिका बजावली. बाप मुलांच्या चुकांवर पांघरूण घालतो. प्रसंगी पोरांच्या उतावळेपणाला आवर घालतो, तसेच टिळकांनी केले. कधीही जाहीरपणे समोर न येता पडद्यामागून त्यांनी हे क्रांतिकार्य केले हे विशेष! त्याच्या ठळक घटनांची नोंद घेण्याचा हा प्रयत्न... अशा आणखी कितीतरी घटना इतिहासालाच ठाऊक असतील, नाही का?

(समाप्त)

-पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@