व्यवस्थापन क्षेत्रातील प्रेरणादायी नेतृत्व!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2020
Total Views |


managment field _1 &


‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ ही तुकोबा उक्ती या मंडळींना नेमकी लागू होते. मात्र, ज्या व्यक्ती ही आव्हानपर जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतात, त्या यशस्वी वरिष्ठ व्यवस्थापक ठरतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.



कंपनी
-व्यवस्थापन क्षेत्रात व्यवस्थापकाकडे त्याच्या संबंधित कार्यक्षेत्रातील ‘नेता’ म्हणजेच नेतृत्व प्रदान करणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते व तसे होणे स्वाभाविकच असते. या वस्तुनिष्ठ पार्श्वभूमीवर व्यवस्थापनातील व्यवस्थापकांचा आपल्या सहकारी-कर्मचार्‍यांशी सातत्यपूर्ण संपर्क, त्यांच्या कामकाजासह त्यांच्याशी निगडित मुद्दे-समस्यांची माहिती व जाण, त्यावर गरजेनुसार तोडगा काढण्याच्या प्रक्रियेतूनच व्यवस्थापन क्षेत्रातील प्रेरणादायी नेतृत्व निर्माण होत असते, हे जाणून घेणे गरजेचे ठरते. यासंदर्भात लक्षणीय बाब म्हणजे, सर्वसाधारणपणे कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण आपापले काम अधिकाधिक चांगले करण्यासाठी प्रयत्नशील असतात व त्यांना हेच आपले काम अधिक प्रभावशाली पद्धतीने करण्यासाठी गरज असते ती आपले वरिष्ठ वा व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनपर नेतृत्वाची. त्यामुळेच व्यवस्थापन क्षेत्रात व्यवस्थापकांचीदेखील या संदर्भात जबाबदारी मोठी असते.



साधारणत
: कर्मचार्‍यांच्या दृष्टीने सांगायचे म्हणजे, त्यांची आपल्या वरिष्ठांकडून असणारी एक नेहमीची व व्यावहारिक अपेक्षा म्हणजे वरिष्ठ अधिकारी-व्यवस्थापकांनी कठीण वा निर्णायक प्रसंगी एकूणच परिस्थितीचे नेतृत्व करावे, आवश्यकतेनुरूप मार्गदर्शन करावे व त्याचवेळी त्यांच्यासह काम करणार्‍या सहकारी-कर्मचार्‍यांना प्रेरित-प्रोत्साहित करावे, त्यांची हिंमत व आत्मविश्वास कायम ठेवावे. या सार्‍याचा ताळमेळ जी संस्था व तेथील व्यवस्थापक करतात, ते आपल्या कामात निश्चितच यशस्वी ठरतात. व्यक्तिगत स्तरावर सांगायचे झाल्यास समाधानी मन व मानसिकतेसह काम करणार्‍या कर्मचार्‍यांची उत्पादकता नेहमीच सर्वाधिक असते व त्याचा व्यापक फायदा नेहमीच व्यवस्थापन कंपनीला होत असतो. सहकार्‍यांची ही मानसिकता टिकविणे, कायम राखणे हे व्यवस्थापकांसाठी मोठे आव्हान असते. हे काम कठीण असले तरी अशक्य मात्र नसते. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ ही तुकोबा उक्ती या मंडळींना नेमकी लागू होते. मात्र, ज्या व्यक्ती ही आव्हानपर जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतात, त्या यशस्वी वरिष्ठ व्यवस्थापक ठरतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.



काम अथवा व्यवसाय कुठल्याही स्वरूपाचा असो
, व्यवस्थापकांची पहिली व तेवढीच महत्त्वाची कसोटी असते ती कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भातील परस्पर विश्वास. या विश्वासावर आधारित असा संवाद-प्रतिसाद व्यवस्थापकाने साधायला हवा. कारण, सहकार्‍यांवर असणारा विश्वास हा तितकाच प्रामाणिक स्वरूपाचा असणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात कामाच्या संदर्भातील काळ-काम-वेग या त्रैराशिकातील काळ म्हणजेच कामासाठी लागणारा वेळ, ही बाब सर्वोपरी नव्हे, तर तेवढीच महत्त्वाची ठरते. त्यासाठी वरिष्ठांनी आपल्या सहकार्‍यांना काम सोपविताना अथवा त्यांच्यासह काम करताना संबंधित कामासाठी लागणार्‍या संभाव्य अथवा अपेक्षित वेळेची पूर्वकल्पना देणे गरजेचे ठरते. मुख्य म्हणजे, कामाशी निगडित वेळेच्या संदर्भातील हे संभाषण उशिराने न करता वेळेत करून तशी पूर्वसूचना संबंधितांना देणे परस्पर हिताचे ठरते. दुसरे म्हणजे, कामासाठी अपेक्षित वेळ व प्रत्यक्षात लागलेला वेळ याचा समन्वय साधून त्यानुसार उचित कारवाई करणेदेखील गरजेचे असते. असे करण्याने कर्मचार्‍यांच्या उत्पादकतेत सकारात्मक व गुणात्मक स्वरूपाची वाढ होते. सध्याचे युग प्रगत तंत्रज्ञानाचे आहे. वाढते संगणकीकरण व नवनव्या कल्पक व उपयुक्त कार्यपद्धतींचा कामाच्या ठिकाणी प्रयोग करणे त्यामुळे अपरिहार्य ठरते. तंत्रज्ञानाचा हा वाढता प्रभाव व उपयोग लक्षात घेता वरिष्ठांनी आपल्या कर्मचारी-सहकार्‍यांना प्रगत तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचे ज्ञान ठराविक स्तरावरच नव्हे, तर प्रसंगी अद्ययावत स्वरूपात व सर्वप्रथम प्राप्त करणे आवश्यक असते. अधिकारी म्हणून मिळणारे पद वा अधिकार यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी इतरांकडून काम करवून घेणे, ही कार्यपद्धती आता इतिहासजमा झाली असून अधिकार्‍यांच्या अधिकाराला ज्ञान-तंत्रज्ञान-कार्यपद्धतीची अद्ययावत माहिती असणे काळाची गरज ठरली आहे.



कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांचे कामकाज व त्यांच्या कौटुंबिक जबाबदार्‍या व सामाजिक संबंधांचा ताळमेळ घालीत असतानाच
, त्यांना आपल्या जबाबदारीसह कामाला प्रवृत्त करण्याचे महनीय कामदेखील व्यवस्थापन क्षेत्रातील वरिष्ठांना म्हणजेच व्यवस्थापकांना करावे लागते. त्यालाच परस्पर समन्वय, सौहार्दपूर्ण संबंधांची जोड जे व्यवस्थापक देतात, ते आपापल्या क्षेत्रात हमखास यशस्वी होतात. त्यामुळे सामूहिक प्रयत्न स्वरूपात संस्था-संघटनेची उद्दिष्टपूर्ती होत असते, हे विसरून कसे चालेल? कंपनी व्यवस्थापनाला दीर्घकालीन स्वरूपात विचार करून निरपेक्ष व सम्यक स्वरूपात विचारांसह निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे वरिष्ठांनी कुणी एक व्यक्ती वा समूहालाच फायदेशीर वा पूरक भूमिका न घेता, कामाच्या ठिकाणी कामकाज प्रक्रियेवर आधारित तटस्थ, गुणवत्तेवर आधारित व त्याचवेळी संबंधित कर्मचार्‍यांना प्रेरक ठरेल, अशी भूमिका घेणे सर्वांच्याच हिताचे व व्यवसाय संघटनेला पूरक ठरते.



कामाला समर्पण भावनेची जोड नसेल तर कुठलेही काम परिपूर्ण होत नाही
. ही समर्पण भावना कामाचे लहानमोठे असे विश्लेषण न करता, सार्वत्रिक स्वरूपात असणे महत्त्वाचे असते. मुख्य म्हणजे, ‘समर्पण भावना’ ही एखाद्या कार्यक्रम-उपक्रमासारखी न ठेवता त्यात सातत्य राखणेदेखील तेवढेच आवश्यक असते. त्याशिवाय काम करणार्‍यांच्या समूहात समर्पणाला केवळ काही जणांनी मर्यादित वा वैयक्तिक स्वरूपात मर्यादित न ठेवता या समर्पण भावनेला कृतिशील स्वरूपात व सातत्यपूर्ण पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी-व्यवस्थापकांनी यशस्वीपणे पार पाडावी लागते व त्यासाठी अशी व्यक्ती अष्टावधानी असणे आवश्यक असते.



कामकाज अथवा व्यवसायाचे यश हे कामाच्या ठिकाणच्या कार्यसंस्कृती म्हणजेच कामकाजाच्या पद्धतीवर अवलंबून असते
. ही कार्यसंस्कृती कामासाठी वा कामकाजाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक अशा तंत्रज्ञानाएवढीच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वपूर्ण ठरते. तंत्रज्ञान अव्वल असणे महत्त्वाचे असले तरी परिपूर्ण नसते. त्यामुळे जर संस्था, कंपनीतील कार्यपद्धतीला सकारात्मक कामकाज वा कार्यपद्धतीची जोड मिळाली, तर त्यांच्या कामाला दर्जेदार कामकाज अशी मान्यता अवश्य मिळते. यासंदर्भात अन्य वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, कंपनीला आवश्यक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री सहजरित्या खरेदी केली जाऊ शकते. मात्र, कार्यसंस्कृती ही बाब संस्थांतर्गत व स्थानिक गरजांनुसार विकसित करून त्याची अंमलबजावणी करणे अधिक महत्त्वाचे असल्याने हे काम फक्त व्यवस्थापक आपल्या सहकारी-कर्मचार्‍यांचे सहकार्य व सहभागाच्या माध्यमातूनच करू शकतात.



यशासारखे यश नसतेअशा आशयाची इंग्रजी म्हण व्यवस्थापन क्षेत्रात सदोदित लागू ठरते. मात्र, व्यावसायिक यशाला केवळ मर्यादित कालावधीच्या वा आर्थिक संदर्भापुरतेच मर्यादित न ठेवता व्यावसायिक यश हे वस्तू-उत्पादन वा सेवेच्या गुणात्मक यशावर व दीर्घकालीन स्वरूपात अवलंबून असते. अशा प्रकारच्या व्यापक संदर्भात लाभलेले यश हे खर्‍या अर्थाने व्यापक व दीर्घकालीन असे टिकाऊ यश असते. अशा यशावरच कर्मचार्‍यांच्या व्यक्तिगत यशासह संस्थेचे यश अवलंबून असते, ही बाब व्यवस्थापकांनी स्वत: समजून उमजून ती कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचविण्यातच त्यांचे नेतृत्व, व्यवस्थापनाचे यश आणि कर्मचार्‍यांचे भवितव्य अवलंबून असते. सरतेशेवटी, सर्व प्रकारच्या परिस्थितीत विचलित न होता, कर्मचार्‍यांचे मनोधैर्य तसेच आपले मानसिक स्थैर्य कायम राखत आपल्या सहकार्‍यांना गुणात्मक व प्रभावी कामकाज शैलीसह प्रेरित करणे यासाठी वरिष्ठ वा व्यवस्थापकांनी आपल्या सहकारी-कर्मचार्‍यांना नेतृत्व प्रदान करण्याची भूमिका सातत्याने घेणे, ही बाब प्रत्येक व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण व आवश्यक ठरते.



- दत्तात्रय आंबुलकर
@@AUTHORINFO_V1@@