दोन इस्लामी विचारवंत : झमन स्तानिझाई आणि परवेझ हुदभॉय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
malhar gokhale_1 &nb






इमन स्तानिझाई यांनी नुकतीच एका लेखाद्वारे चिंता व्यक्त केली आहे की, जगभर ‘इस्लामोफोबिया’ वाढत आहे. ‘फोबिया’ म्हणजे भय किंवा तिरस्कार किंवा भयामुळे वाटणारा तिरस्कार. आपला विचार मांडताना प्रा. झमन यांनी पार दुसर्‍या महायुद्ध काळापासूनचा आढावा मांडला आहे.


झमन स्तानिझाई हे मूळचे अफगाणचे. सध्या ते अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. परवेझ हुदभॉय हे पाकिस्तानचे नामवंत भौतिकशास्त्रज्ञ आहेत. अमेरिकेत मॅसेच्युसेट्स विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन तिथे आणि अन्य काही संस्थांमध्ये अध्यापन करून १९८५ मध्ये ते पाकिस्तानात परतले. तेव्हापासून इस्लामाबादच्या कायदे आझम विद्यापीठात अध्यापन करतानाच ते परदेशातल्या अनेक विद्यापीठांमधून ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ म्हणून जात असतात.


इमन स्तानिझाई यांनी नुकतीच एका लेखाद्वारे चिंता व्यक्त केली आहे की, जगभर ‘इस्लामोफोबिया’ वाढत आहे. ‘फोबिया’ म्हणजे भय किंवा तिरस्कार किंवा भयामुळे वाटणारा तिरस्कार. आपला विचार मांडताना प्रा. झमन यांनी पार दुसर्‍या महायुद्ध काळापासूनचा आढावा मांडला आहे. दुसर्‍या महायुद्धातले प्रतिस्पर्धक देश म्हणजे एक बाजूला जर्मनी-इटली-जपान, तर दुसर्‍या बाजूला ब्रिटन-फ्रान्स-रशिया-अमेरिका. जर्मनी हा ‘नाझीवाद’ या तत्त्वज्ञानाच्या आधारावर उभा होता. शिवाय वंशश्रेष्ठत्वाची भयंकर घमेंड त्याला होती. इटली हा ‘फॅसिझम’च्या तत्त्वज्ञानावर उभा होता आणि जपान हा उघडच साम्राज्यवादी होता. दुसरीकडे ब्रिटन आणि फ्रान्स या देशांमध्ये लोकशाही असली तरी त्यांची विशाल साम्राज्ये जगाच्या पाचही खंडांमध्ये पसरलेली होती. त्या-त्या देशांमधल्या नागरिकांवर ब्रिटन-फ्रान्सची लोकशाही सरकारे अनिर्बंध हुकूमशाहीच गाजवत होती, त्यांचं शोषणच करीत होती. दुसर्‍या महायुद्धाने हे सगळं संपवलं. जर्मनी, इटली आणि जपान पराभूत झाल्यामुळे ‘नाझीझम’, ‘फॅसिझम’ आणि ‘इम्पिरियालिझम’ ही त्यांची तत्त्वज्ञानंही संपली. ब्रिटन-फ्रान्स जिंकले, झमन यांचा मुख्य रोख अमेरिकेकडे आहे. स्वत:ला ‘शोषित-वंचितांचा कैवारी’ म्हणवणार्‍या सोव्हिएत रशियाकडे नाही. झमन यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. ब्रिटन-फ्रान्सला साम्राज्य सोडावं लागलं. कारण, त्यांना त्याचा भार झेपेना आणि अमेरिकेचा दबाव होताच. शिवाय अमेरिकेने उद्ध्वस्त युरोपच्या पुनर्रचनेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी ‘मार्शल योजना’ आखून युरोपीय देशांना फारच मोठी मदत केली. खेरीज एकंदरीतच जगभर शांतता, सद्भावना, व्यापारवाढ आणि त्यातून समृद्धी यावी म्हणून ‘युनो’ची स्थापना करून अमेरिकेने अनेक नवस्वतंत्र आशियाई, आफ्रिकी देशांना जागतिक व्यासपीठ दिले. ‘जगभर लोक’, ‘लोकांचं राज्य’, ‘जनता’, ‘जनतेचं हित’ वगैरे शब्दांची चलती सुरू झाली. अनिर्बंध हुकूमशाही, त्यातून होणारे जुलूम, वांशिक तिरस्कार, वांशिक कत्तली, वंशश्रेष्ठत्वाच्या भ्रामक कल्पनांमधून होणाराछळ वगैरे प्रकार आता कायमचे संपले, असं वाटू लागलं. प्रा. झमन या ठिकाणी ‘जेनोसाईड’, ‘पोग्रोम’, ‘मॅसेकर’, ‘हॉलोकॉस्ट’ असे वेगवेगळे शब्द वापरतात. या प्रत्येक शब्दाला वेगळा इतिहास आहे. गेल्या सुमारे दीड हजार वर्षांमध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या संप्रदायांनी एकमेकांच्या किंवा आपल्या-आपल्यातच इतक्या अनन्वित कत्तली केल्या आहेत की, कत्तलीच्या प्रकारावरून हे वेगवेगळेशब्द निर्माण झाले आहेत.


प्रा. झमन यांच्या मनातली मळमळ याच्या पुढच्या भागात व्यक्त होते. ते म्हणतात, “द्वेष, तिरस्कार आणि कत्तली यांचं युग आता संपलं असं वाटत असतानाच, काश्मीर आणि पॅलेस्टाईन यांची नवीन समस्या निर्माण झाली. मध्यपूर्वेतल्या इस्लामी देशांबद्दल जगभर एक भयाची भावना हळूहळू निर्माण झाली. आजतर सगळे बिगरमुस्लीम सगळ्या मुसलमानांकडे तिरस्काराने पाहत आहेत. ‘आपण’ आणि ‘ते’ अशी सरळ विभागणी झाली आहे. इस्रायल, रशिया, चीन हे आपापल्या देशातल्या अल्पसंख्याकांना म्हणजेच मुसलमानांना अतिशय कठोरपणे हाताळत आहेत. सौदी अरेबिया येमेनमधल्या बंडखोरांवर, तर सीरिया आपल्याच देशातल्या बंडखोरांवर बुलडोझर फिरवतोय. म्हणजेच शेवटी सर्वसामान्य मुसलमानच यात भरडला जातोय आणि आता यात अमेरिकेचं ट्रम्प सरकार आणि भारताचं मोदी सरकार यांची भर पडलेय. ही दोन्ही सरकारं अल्पसंख्याकांना प्रतिकूल अशी धोरणं राबवत आहेत,” असं प्रा. झमन म्हणतात.


काय गंमत आहे पाहा! अमेरिकेतला कॅलिफोर्निया या समृद्ध प्रांतात भरपूर डॉलर्स देणारी नोकरी करताना प्रा. झमन अमेरिकन सरकारलाच सुनावत आहेत की, “जगभर ‘इस्लामोफोबिया’ वाढत चाललाय आणि त्यात तुम्हीही सहभागी आहात.” बरं समजा, अशी भावना जगभर निर्माण झाली असेल तर त्यात मुसलमान समुदायाचाही काही वाटा असेलच. त्याबद्दल प्राध्यापक महाशय काहीच बोलत नाहीत. यालाच म्हणतात, विचारवंत! आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्‍याचं पाहायचं वाकून!


ते पॅलेस्टाईन गनीम, त्यांची विमान अपहरणं, तालिबानी, अल कायदा, ओसामा, दि. ११ सप्टेंबर २००१ चा विद्ध्वंस सगळं बाजूला ठेवा. अगदी ताज्या घटना घ्या. सीरियातल्या बशर आसद राजवटीच्या दडपशाहीमुळे असंख्य सीरियन अरब मुसलमान मिळेल त्या मार्गाने जवळच्या युरोपीय देशांमध्ये घुसतायत. सर्वस्व गमावून आश्रयाला आलेल्या या निर्वासितांना युरोपीय देशांनी माणुसकी म्हणून आसरा दिला. जरा निवारा मिळताच हे निर्वासित त्या त्या देशांच्या कायद्याविरुद्ध वागू लागले. मागण्या-बिगण्या करायला लागले. आता हे खपवून घ्यायला युरोपीय देश म्हणजे काही नेहरू युगातला शांतिब्रह्म (पक्षी : बावळट) हिंदू समाज नव्हे. मग ‘इस्लामोफोबिया’ वाढला तर चुकलं कुठे? पण, प्रा. झमन यांच्याकडे यावर उत्तर नाही. विचारवंत मंडळींच्या हातखंडा शैलीनुसार त्यांनी प्रश्न मांडलाय. उत्तर शोधायची जबाबदारी त्यांची नाही. तुम्हाला हवं तर शोधा.


दुसरीकडे परवेझ हुदभॉय हे मात्र बरंच समजूतदारपणे बोलतायत असं दिसतं. “पाकिस्तानच्या आजच्या अधोगतीला कारण म्हणजे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि समाज नेते, सर सय्यद अहमद यांना विसरले आणि डॉ. महंमद इक्बाल यांना डोक्यावर घेऊन बसले,” असं ते बेधडक म्हणतात. सर सय्यद अहमद हे द्विराष्ट्रवाद सिद्धांताचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या अंमलातील भारत देशात हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, हे प्रतिपादन त्यांनी सर्वप्रथम केलं. सन १८१७ ते १८९८ हा त्यांचा कालखंड आहे. पण, मुसलमानांना तर हिंदूंच्या पुढे जायचं असेल तर त्यांनी आधुनिकतेची कास धरायला हवी, असं ते ठामपणे सांगत. त्यांचं स्वतःचं शिक्षण पारंपरिक मदरशामध्ये झालं होतं, पण मुसलमानांनी आपल्या मुलांना आधुनिक पद्धतीच्या शाळेत घालून गणित आणि विज्ञान शिकवायला हवं, असं ते आग्रहाने म्हणतं. बोलघेवड्या विचारवंतांप्रमाणे असं नुसतंच म्हणत न बसता, त्यांनी मुसलमानांना आधुनिक शिक्षण देणार्‍या शाळा स्वतः चालू केल्या. मुसलमान आज जे काही थोडेफार आधुनिक आहेत, त्याचं श्रेय सर सय्यदना आहे. पण, आज पाकिस्तान त्यांना विसरला आहे, याबद्दल प्रा. परवेझ खंत व्यक्त करतात.


याउलट डॉ. महंमद इक्बाल (सन १८७७-१९३८) हा फार मोठा कवी, तत्त्वज्ञ, नामांकित बॅरिस्टर होता. सर सय्यद अहमद यांचा ‘द्विराष्ट्रवाद सिद्धांत’ त्यानेच पुढे रेटला. भारताच्या काँग्रेस आणि मुस्लीम लीगलाही विटून कायमचे लंडनला निघून गेलेल्या बॅरिस्टर जिनांना त्याने आग्रहाने पुन्हा भारतात बोलावून आणले. मुस्लीम लीगमधले अन्य पुढारी नामोहरम होऊन जिना हेच सर्वशक्तिमान बनतील, यासाठी त्याने अथक प्रयत्न केले. त्यातूनच अखेर मुसलमानांना त्यांचा स्वतःचा देश मिळाला. पण, हा नवनिर्मित देश आधुनिक राहील, अशी कोणतीही विचारसंपदा इक्बालने मागे ठेवली नव्हती. शाळा-महाविद्यालये, संशोधन संस्था, आधुनिकता, आधुनिक शिक्षण सर्व प्रकारचा अद्ययावतपणा याचा मागमूसही इक्बालच्या साहित्यात नाही आणि असा इक्बाल जर पाकिस्तानचा राष्ट्रपिता असेल, तर पाकिस्तान मागासचा राहाणार, असं प्रा. परवेझ म्हणतात.



“आमच्याकडे उत्तम क्रिकेटर्स आहेत, महान गायक आहेत, कलावंत आहेत, नट आहेत, साहित्यिक आहेत, पण गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ मात्र नाहीत. ते नाहीत याची कुणाला पर्वा नाही, हे दुःख आहे. कारण, पाकिस्तानच्या निर्मात्यांकडे नवनिर्मित पाकिस्तानी समाज कसा असावा, याची कोणतीही दृष्टीच (व्हिजन) नव्हती,” असं प्रा. परवेज हुदभॉय खुद्द इस्लामाबादमध्ये ठणकावून मांडतायत, हे कौतुकास्पद आहे.


आता या तुलनेत भारत कुठे आहे, हे तुम्हीच विचार करून पाहा आणि मुसलमान समाजाला तर्कनिष्ठ विचारांपेक्षा भावनिक आव्हान का आवडतं, याचाही विचार करा.
@@AUTHORINFO_V1@@