भाषावाद की लिपीवाद ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

raj_1  H x W: 0
 
‘मराठी भाषा’ आणि ‘मराठी अस्मिता’ या दोन वेगवेगळ्या बाबी सध्या एकत्र होताना दिसत आहेत. ‘मर्‍हाटीचे तो गोमटे व्हावे!’ असे छत्रपती शिवरायांनी म्हटले खरे, पण मराठीजनांनी इथली भाषा टिकण्यासाठी काय प्रयत्न केले हेसुद्धा बघावे लागेल. मराठी भाषेचे आंदोलन हे भाषा टिकवण्यासाठी आहे की लिपी टिकवण्यासाठी आहे, याचा विचार करावा लागेल. आपण मङरपर्सीरसशफ हा शब्द जरी देवनागरीमध्ये लिहिला, तरी जोपर्यंत ‘लँग्वेज’चा भाषा असा उल्लेख येत नाही तोपर्यंत हे भाषा टिकवायचे आंदोलन कसे म्हणायचे? भाषेचा विकास हा भाषेच्या वापराने, त्या भाषेतील साहित्यास चालना देण्याने होतो, अल्प अनुदानाने कोलमडलेल्या ग्रंथालयांकडे मराठीजनांची पावले वळावीत व मराठीमध्ये उत्तोमोत्तम साहित्यनिर्मितीस चालना मिळून येथील ग्रंथालये पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न झाले तर समृद्ध परंपरा असलेली मराठी भाषा फक्त लिपीपुरती मर्यादित राहणार ऩाही. नुकतेच ‘अ‍ॅमेझॉन’ने मराठी वापरावे याबाबत मनसेने केलेले आंदोलन कुठेतरी लिपीच्यासाठी केलेले आंदोलन तर नाही ना? हा प्रश्न आहे. आंदोलनाने देवनागरीत आलेले फलक भाषा टिकवायच्या लढ्यामधील छोटी सुरुवात ठरेल. कारण, भाषेच्या विकासासाठी सर्वच ठिकाणी मराठी बोलणे, लिहिणे गरजेचे. लिपीच्या विकास प्रक्रियेत अनेक लिपींनी अनेक भाषा स्वत:मध्ये सामावून घेऊन लिपीचे महत्त्व वाढविले. पण, कोणत्याही लिपीत भाषेचा उपयोग करताना अनेक भाषा एकत्रितपणे वापरात येऊ लागल्या. अशाने विशिष्ट भाषेचा उपयोग कमी होऊन भाषा म्हणजेच लिपी का, असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मराठीसाठी सुरु असलेली आंदोलने ही भाषेचा हट्ट करीत आहेत की लिपीचा, याचा विचार आज मराठी भाषिकांनी करणे गरजेचे आहे. ‘मर्‍हाटीचे गोमटे’ करण्यासाठी इथल्या मराठी भाषेच्या प्रादेशिक विविधतेचे जतन करणे आणि ती जगाच्या पाठीवर घेऊन जाणे हे मराठीजनांचे कर्तव्य आहे. प्राचीन काळापासून भाषा ही त्या-त्या कालावधीत जतन केली गेली म्हणून आज भाषा आणि लिपी टिकून आहे. भाषेच्या विकासासाठी लिपी टिकणे गरजेचे असले तरी मुळात भाषा टिकण्यासाठी सरकार, संघटना आणि त्यासोबतच तमाम मराठी हा अस्मितेचा मुद्दा केलेल्या व्यक्तींनी त्याबाबत पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.

 
 

‘मराठी’ आचरण गरजेचे...

 
 
भाषिक तत्त्वावर निर्माण झालेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात मराठीसाठी आंदोलन करण्याची वेळ यावी, हीच मुळात शोकांतिका आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी मराठीने किती काळ रांगेत उभे राहावे, हा खरा अस्मितेचा प्रश्न आहे. मराठीचे प्राचीनत्व आज पुराव्यानिशी उपलब्ध असताना मराठीला अभिजात भाषेसाठी झगडावे लागत आहे. परंतु, मिळणारे पुरावे आपणास काय सांगतात? आज मराठीचे प्राचीनत्व दाखवण्यासाठी जे पुरावे सादर केले जातात ते आपल्या मागच्या कैक पिढ्यांनी ती भाषा वापरल्यामुळेच. त्या काळी मराठी भाषा जतन केली गेली म्हणूनच आज आपल्यापर्यंत आली. मग आज मराठीसाठी आंदोलनाची नामुष्की इथल्या मराठी भाषिकांवर का यावी? ती वेळ आली याचे कारण, आम्ही मराठी फक्त घरात बोलतो, मराठीचा वापर कमी होत गेला म्हणून आज आंदोलनाची गरज या समृद्ध भाषेला पडली आहे. पण, असे प्रश्न आंदोलनाने नव्हे, तर ‘मराठी’ आचरणाने सुटणार आहेत. मराठी आज चार भिंतीत बोलायची भाषा नसून तिचा वापर समाजमाध्यमे, साहित्य, कला यामधून जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. प्रत्येक शतकात जे समकालीन साहित्य निर्माण झाले. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होत गेली. कोणतीही भाषा टिकवायची असेल तर त्या भाषेच्या प्रदेशात राहणार्‍या समाजाने ती भाषा पुढे घेऊन जाणे क्रमप्राप्त ठरते. आज जी आंदोलने होत आहेत ती भाषेचा विकास व्हावा, भाषा दीर्घकाल टिकावी म्हणून आहेत का? हा विचार करुन येथील मरा़ठी समाजात भाषेची गोडी निर्माण करणे हे समकालीन जाणत्यांचे कर्तव्य आहे. मराठीचा आग्रह मराठीजनांनी करताना मराठीची अस्मिता हा मुद्दा फक्त मतांच्या राजकारणासाठी न करता ती दीर्घकाल टिकेल, यासाठी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात मराठीसाठी आग्रही भूमिका घेताना राजकीय मतमतांतरे वेगळी कशी काय असू शकतात? मराठीसाठी भविष्यात आंदोलनाची गरज पडणार नाही, असे वातावरण निर्माण करणे हे या राज्यात राहणार्‍या आणि मराठी मातृभाषा असणार्‍या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आंदोलनाने तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा भाषेच्या विकासाचा आराखडा मांडून त्याबाबतची जागरुकता नागरिकांमध्ये निर्माण करणे हे येणार्‍या काळातील आपल्यासमोरील आव्हान असणार आहे. मराठी भाषेचा अभिमान ते मराठी भाषेचा मुद्दा हे झालेले अवमूल्यन येणार्‍या पिढ्यांसाठी किती लाभदायक ठरेल की नाही, हे इथल्या भूमिका घेणार्‍यांवरती अवलंबून आहे की, ते आचरण करतात की आंदोलन!
- स्वप्निल करळे
@@AUTHORINFO_V1@@