मुंबई, दि.४: प्रतिनिधी एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जून पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५३% महागाई भत्ता देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती समोर बोलत होते.
यावेळी बैठकीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक माजी खासदार आनंदराव अडसूळ,आमदार सदाभाऊ खोत, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन ) संजय सेठी ,एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये परिवहन खाते माझ्याकडे होते. त्यावेळी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साडेसहा हजार रुपये वाढ करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. त्याचा लाभ १ लाख एसटी कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्याचे समाधान निश्चितच आहे. परंतु त्याबरोबरच महिलांना तिकीट दर ५०% सवलत व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास या शासनाने दिलेल्या सवलतीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. त्यामुळे एसटीचे एकूण अर्थकारण बदलून ती नफ्याच्या दिशेने प्रवास करू लागली हा खूप मोठा बदल आपल्या काळात घडून आला. भविष्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एस टी महामंडळ हे निश्चित नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल याबरोबरच प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यास देखील मदत होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
या वेळी बोलताना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना त्यांचे एकत्रीकरण करून त्याचा ५ लाख रुपये पर्यंतचा कॅशलेस लाभ सर्व एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. तसेच धर्मवीर आनंद दिघे आरोग्य योजने अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ९०% वैद्यकीय चाचण्या व खर्चाची प्रतिपुर्ती रक्कम देण्याची योजना सुद्धा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.