नाशिकच्या वन्यजीवांचे रक्षक

    26-Dec-2020   
Total Views | 259

nashik cf anil anjankar _


वन्यजीव संरक्षित क्षेत्रांबरोबरच प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनामध्ये दांडगा अनुभव असलेले नाशिकचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्याविषयी...


मुंबई (अक्षय मांडवकर) - पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीव क्षेत्रांच्या संवर्धनाबरोबरच मुंबई-पुणे-नागपूरमधील प्राणिसंग्रहालय उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे वनविभागातील एक नाव म्हणजे, मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर. 30 वर्षांहून अधिक काळ वनसेवेत असणारे अंजनकर सध्या नाशिकचे वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून कार्यरत आहेत. वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. शांत, संयमी, मृदुभाषी, मनमिळावू आणि सर्वसमावेशक वृत्तीने काम करण्यासाठी ते ओळखले जातात.
 
 

 

अंजनकर यांचा जन्म दि. 24 डिसेंबर, 1961 रोजी अमरावतीमध्ये झाला. लहान वयापासून त्यांना क्रीडा प्रकारांमध्ये रस होता. त्यानिमित्ताने भटकंतीची आवड निर्माण झाली, म्हणूनच नोकरीही निसर्गाच्या जवळीक साधणारी असावी, असा विचार त्यांनी महाविद्यालयीन वयामध्येच केला. 1983 साली त्यांनी नागपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वनविभागात नोकरी करण्याचा निर्णय पक्का झाल्यावर ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 1984 साली दिलेल्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. 1985-86 साली अंजनकर यांनी वनशास्त्रामध्ये पदविका मिळवून वनविभागात रुजू होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण केले.

 
 

प्रशिक्षणाअंती अंजनकर कोल्हापूर वन विभागात उमेदवारीच्या काळाकरिता रुजू झाले. या ठिकाणी दोन वर्षे काम केल्यानंतर 1989 साली त्यांची नियुक्ती बुलढाणा वनविभागात ‘साहाय्यक वनसंरक्षक’पदावर झाली. येथे काम करत असतानाच त्यांना देहरादून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मध्ये (डब्ल्यूआयआय) वन्यजीव व्यवस्थापनामधील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. या ठिकाणाहून शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांची बदली 1990 साली मुंबईतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त झाली. या ठिकाणी त्यांनी चार वर्षे काम केले. यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय उद्यानाचा पहिला व्यवस्थापन आराखडा तयार करून तो मंजूर करून घेतला. तसेच वाढत्या अतिक्रमणांना चाप लावला. 1994 साली त्यांची बदली नागझिरा वन्यजीव अभयारण्यात झाली. येथील अधिवास क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याबरोबरच नवेगाव वनक्षेत्राला या अभयारण्याशी जोडण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला. शिवाय, नागझिरा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची दहा वर्षांकरिता अंमलबजावणी केली. नवेगावला नागझिराशी जोडण्याच्या अंजनकरांच्या प्रस्तावाला पुढल्या काळात मूर्त रूप मिळाले. 

 
2001 साली त्यांची बदली पुणे महानगरपालिकेत झाली. पुण्यातील पेशवे पार्क प्राणिसंग्रहालय कात्रजमध्ये हलविण्यासाठी महानगरपालिकेला तज्ज्ञ वनधिकार्‍याची गरज होती. या कामासाठी वनविभागाकडून अंजनकरांना पाठविण्यात आले. अंजनकरांनी प्रथम ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’च्या नियमांनुसार कात्रज येथे नव्याने उभारण्यात येणार्‍या ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालया’चा मास्टर लेआऊट तयार केला. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. 2003 साली पेशवे पार्क येथील सर्व प्राणी त्यांनी ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालया’मध्ये स्थानांतरित केले. याचदरम्यान त्यांनी लंडनमध्ये जाऊन तीन आठवड्यांचा संकटग्रस्त प्राण्यांच्या व्यवस्थापनाचा कोर्स पूर्ण केला. ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालया’चे कामकाज सुस्थितीत आल्यानंतर 2005 साली त्यांची बदली वनविभागाच्या ‘माहिती आणि प्रसिद्धी अधिकारी’ या पदावर झाली. प्राणिसंग्रहालयातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना नागपूरच्या ‘गोरेवाडा प्राणिसंग्रहालया’त पाठविण्यात आले. याच कामातील अनुभवाच्या बळावर त्यांना 2015 साली मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’च्या (राणीबाग) व्यवस्थापनाकरिता बोलविण्यात आले.
 

 

राणीबागेच्या सद्यःस्थितीतील चांगल्या रूपाचे श्रेय अंजनकरांना जाते. येथील व्यवस्थापनाची सूत्रे हातात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’च्या नियमानुसार नव्या पिंजर्‍यांचा प्रस्ताव तयार केला. राणीबागेत आणि महत्त्वाचे म्हणजे, देशात प्रथमच ‘हम्बोल्ट पेंग्विन’ आणण्याचा प्रस्तावही त्यांनीच तयार केला होता. त्यावेळी अंजनकरांनी राणीबागेसाठी प्रस्तावित केलेल्या चांगल्या कामांना आता मूर्त रूप मिळाले आहे. 2015 साली त्यांना ‘भारतीय वनसेवे’अंतर्गत (आयएफएस) पदोन्नती मिळाली. सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ‘पुष्पपठार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराला ‘युनेस्को’च्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यासाठीचा पाठपुरावा त्यांनी केल्यामुळेच कास पठाराला जागतिक मान्यता मिळाली. तसेच कास पठारावरील वाढत्या पर्यटनामुळे येथील जैवविविधतेला पोहोचणारी हानी रोखण्यासाठी त्यांनी पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घातली. पठाराचे व्यवस्थापन करून केवळ तीन हजार पर्यटकांना प्रवेश देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महाबळेश्वरमधील लोकसमित्यांचे एकत्रीकरण करून त्यांचे नियोजन केले. 


2019 साली अंजनकरांना पुन्हा पदोन्नती मिळाली आणि सध्या ते नाशिकचे ‘वनसंरक्षक’ म्हणून कार्यरत आहेत. नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये नांदुरमधमेश्वर, हरिश्चंद्रगड-कळसुबाई, यावल आणि अनेरडॅम या वन्यजीव अभायरण्यांचा समावेश आहे. नांदुरमधमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्रातील पहिला ‘रामसर’ पाणथळ जागेचा आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांच्या कार्यकाळात मिळाला आहे. यावल वन्यजीव अभयारण्यात मोठ्या प्रमाणात लागणार्‍या वणव्यांना आटोक्यात आणण्यासाठी योजना आखल्यानेच येथील वणव्यांवर नियंत्रण मिळवता आले आहे. वनरक्षक किंवा वनमजुरांमध्ये सहजरीत्या रमणार्‍या अंजनकरांचे सेवानिवृत्तीचे एक वर्ष शिल्लक राहिले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121