तिला जगू द्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020   
Total Views |
Mahesh Tilekar Amruta Fad 
ऑनलाईन ट्रोलिंगचा चुकीचा ट्रेंड सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार फेसबुक, ट्विटर, युट्यूब यांसारख्या समाजमाध्यमांवर सुरुच असून यंदा त्याचा फटका बसला तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना. यापूर्वीही फडणवीस दाम्पत्याला म्हणा ट्रोलिंगला या ना त्या कारणाने सामोरे जावे लागत होतेच. पण, यंदा भाऊबीजेच्या निमित्ताने ‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा, तिला जगू द्या’ अशा आशयाचा अमृता फडणवीस यांच्या गीताचा व्हिडिओ टी-सीरिज मराठी युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला. खरंतर अवघ्या काही तासांत या व्हिडिओला दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. व्हिडिओही लाईक केला. पण, ट्रोलिंगच्या नादात मुद्दाम या व्हिडिओवर डिस्लाईकचा पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळ्यांच सगळंच आवडलं पाहिजे, अशी सक्ती नाहीच. अमृता फडणवीसांच्या या व्हिडिओलाही तसा संमिश्र प्रतिसाद मिळाला. इथंवरही ठीक. पण, प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता महेश टिळेकर यांनी मात्र पातळी सोडून आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या गीतावर टीका केली. ते म्हणतात, “गायी-म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील, पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी ‘पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन’ म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ना, आडात नसेल तर पोहर्‍यात येणार कुठून? केवळ या अशा गायिकेला प्रमोट करण्यासाठी, तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी-सीरिजसारखी, नेहमीच बिझनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे? त्यामागे काय लागेबांधे आहेत? हे एक न सुटणारे कोडे आहे.” आता टिळेकरांना तो व्हिडिओ आवडो अथवा न आवडो, पण म्हणून एक चांगला सामाजिक संदेश देणार्‍या व्हिडिओवर या पातळीवर टीका करण्यात काय हसील? दुसरी बाब म्हणजे, अमृता फडणवीस या काही एकदम ‘प्रोफेशनल सिंगर’ नाहीत आणि ना त्या कुठल्याही संगीत स्पर्धेतील स्पर्धक आहेत. पण, त्यांना गायनाची आवड आहे. तेव्हा, त्यांनी एखाद्या सामाजिक संदेशासाठी गायन केले, तर बिघडले कुठे? ऐकायचे तर ऐका, अथवा सोडून द्या. स्वत:मधील कलाकौशल्याचा समाजासाठी उपयोग करायचा नसेल, तर जे किमान तसा प्रयत्न करतात, त्यांना तरी करु द्या!
 

‘ट्रोलिंग’चा चुकीचा ट्रेंड...

 
 
समाजमाध्यमांवर हल्ली ‘ट्रोलिंग’ ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे. पूर्वीसारखे एकमेकांसमोर येऊन राडेबाजी करण्यापेक्षा सध्या एखाद्या नेत्याला मुद्दाम टार्गेट करुन त्याच्यावर समाजमाध्यमांवर शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजीचा यथेच्छ वर्षाव केला जातो. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसही या ट्रोलिंगचे बळी ठरले. महाराष्ट्रात कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या आणि त्याच्या पत्नीवर कधीही जितकी अश्लाघ्य टीका झाली नसेल, तेवढी गलिच्छ शाब्दिक टिप्पणी या दाम्पत्याच्या वाट्याला आली. त्यांच्या जातीवरुनच नव्हे, तर अमृता फडणवीस यांच्या कपड्यांवरुन, मेकअपवरुन आणि त्यांच्या गाण्यावरुन त्या ट्रोलर्सच्या हिटलिस्टवर आल्या. माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी असली तरी अमृता फडणवीस यांचे मुळी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, समाजकार्य आहे, याचाच अनेकांना विसर पडलेला दिसतो. त्यामुळे त्यांनी काहीही पोस्ट केले की, नुसती नाहक टीकेची झोड उठवायची, यातच काही लोक धन्यता मानतात. पण, या टीकाकारांना न जुमानता अमृता फडणवीस यांनी मात्र कधीही माघार घेतली नाही आणि त्या अभिव्यक्त होत राहिल्या. देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री असताना आणि आता विरोधी पक्ष नेतेपदी असतानाही, अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर समाजमाध्यमांवरुन निशाणा साधला. पण, अपेक्षेप्रमाणे तिथेही त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत शेरेबाजी केली गेली आणि आजही केली जाते. त्यात आता महाविकास आघाडीचे राज्य असल्याने अशा ट्रोलर्सवर कारवाई होण्याची शक्यताही उलट धुसरच! त्यामुळे एखाद्याच्या पोस्टवर असहमती दाखवणे, तसे विचार मांडणे, डिस्लाईक करणे हे वेगळे आणि मुद्दाम एखाद्याच्या मागे हात धुवून लागणे आणि अश्लील शेरेबाजी करणे यात फार अंतर आहे. पण, दुर्दैवाने अमृता फडणवीस असो वा अन्य अभिनेत्री, अभिनेते अथवा नेतेमंडळी, ट्रोलिंगची ही टोळधाड कुठे तरी थांबवायलाच हवी. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन खरं तर आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना यासंबंधी कडक ताकीद द्यायला हवी. कारण, अशाप्रकारे ऑनलाईन का होईना, राजकीय-सामाजिक वातावरण गढूळ करण्यांवर जरब ही बसलीच पाहिजे.



@@AUTHORINFO_V1@@