सिंधुदुर्ग, “हिंदी सक्तीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणजे जिहाद्यांना अप्रत्यक्ष मदत करण्यासारखाच आहे. हिंदू राष्ट्राला तोडण्याचे हे सूक्ष्म षड्यंत्र असून आंदोलनकर्त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा,” असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २३ जून रोजी केले.
मनसेकडून सोमवारी हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही. आमचा मराठीचा आग्रह ठाम आहे. हिंदी नको असेल, तर संस्कृत घ्या, पण आंदोलन करताना यामागचे मोठे षडयंत्र लक्षात घ्या. तुमच्या मागण्या जर हिंदूंमध्येच भांडण लावणार असतील, तर त्याचा लाभ नेमका कोण घेतेय, हेही बघा”, असे राणे म्हणाले.
सपा आमदार अबू आजमी यांनी वारीविषयी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक शुक्रवारी रस्त्यावर होणाऱ्या नमाजाविषयी आजमी बोलत नाहीत. पण आमच्या वारीवर मात्र त्यांना आक्षेप आहे. आमची वारी वर्षभर चालत नाही, तुमची नमाज दररोज असते. मग त्यावर कोणी का बोलत नाही? आजमींनी अशा वक्तव्यांपासून दूर राहावे. अन्यथा उद्या आम्हीही हज यात्रेविषयी प्रश्न विचारू. वारीवर कुणी बोट ठेवले, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड इशाराही राणेंनी दिला.
राऊतांनी ‘गद्दारी’वर पुस्तक लिहाने
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “गद्दार कोण, यावर आता स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल. ज्यांनी पक्षाला खाईत लोटले, त्यांनी आज दुसऱ्यांवर टीका करणे म्हणजे शुद्ध दुटप्पीपणा आहे. उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या राजकीय अवस्थेसाठी संजय राऊत जबाबदार आहे. राऊत हाच उबाठाचा शकुनी मामा आहे. त्याने आधी स्वतःला आरशात पाहावे आणि मग इतरांवर बोट ठेवावे,” असा टोला राणेंनी लगावला.
हिंदू राष्ट्रासाठीच काम करणे ही ऊर्जा
“मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळाल्याने माझ्यातील उर्जा हिंदू राष्ट्रासाठी वापरता येते आहे, याचे समाधान आहे,” असेही नितेश राणे वाढदिवसादिवशी म्हणाले.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.