फुकट मेलेले वेडे? छे:! वीर बलिदानी!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vicharvimarsh_1 &nbs



आता निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांच्या अगोचर वागण्या-बोलण्याची अशी अनेक ‘प्रकरणं’ विरोधी पक्ष बाहेर काढत आहेत. अफाट संपत्तीचे धनी असणार्‍या ट्रम्प यांना जगात पैशाखेरीज कशाचेही मोल वाटत नाही आणि अन्य उच्च उदात्त मानवी मूल्यांना ते कस्पटासमान मानतात, हे मतदारांना दाखविण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न आहे.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. ३ नोव्हेंबर, २०२० या दिवशी सार्वत्रिक मतदान होईल. सर्व नागरिक मतदान करतील आणि आपापले प्रतिनिधी निवडून देतील. मग १४ डिसेंबर, २०२० या दिवशी हे नवनिर्वाचित प्रतिनिधी देशाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असावा, हे निश्चित करण्यासाठी मतदान करतील. मग जे कोणी निवडून येतील, ते २० जानेवारी, २०२१ या दिवशी आपापल्या अधिकारपदाची शपथ घेतील. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे असून ७४ वर्षांचे आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी जोसेफ उर्फ जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे असून ७७ वर्षांचे आहेत. सन २०१६ मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी बराक ओबामा यांनी चार-चार वर्षांच्या दोन कार्यकाळांमध्ये (टर्म्स) अध्यक्ष म्हणून पद सांभाळलं होतं. त्या दोन्ही वेळा बायडेन हे उपाध्यक्ष होते. ट्रम्प यांचा २०१६ ते २०२० हा कार्यकाळ वादग्रस्त आहे, हे आपण पाहतच आहोत. अमेरिकेची लोकशाही परंपरा, अमेरिकन राज्यघटनेची महानता यांनी अमेरिकन राज्यकारभारामध्ये असे काही प्रघात निर्माण केले आहेत की, एखादा मुळात आचरट असणारा इसमदेखील त्या पदावर गेल्यावर जबाबदारीने वागू लागतो. याची अलीकडच्या काळातली दोन उदाहरणं म्हणजे जॉर्ज बुश धाकटे आणि बिल क्लिंटन. जॉर्ज बुशना धड इंग्रजी बोलता येत नसे. त्यांच्या टेक्सास राज्यातले लोक त्यांना ‘डब्या’ म्हणायचे. आता टेक्सासच्या स्थानिक भाषेत ‘डब्या’ म्हणजे काय कुणास ठाऊक! पण, तो काही फार सन्माननीय शब्द नक्कीच नसणार.बल क्लिंटन हे आर्कान्सास राज्यातले. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घ्यायची वेळ आली, तरी त्यांना आपलं खरं नावच लक्षात नव्हतं. बिल, टॉम, डिक, एब ही घरगुती नावं झाली. शपथविधी समारंभात ती चालत नाहीत. टॉम म्हणजे टॉमस, डिक म्हणजे रिचर्ड, एब म्हणजे अब्राहम, मग बिल म्हणजे काय? तर विल्यम-विल-बिल असा तो अपभ्रंश आहे, हे अमेरिकन अधिकार्‍यांना शोधून काढावं लागलं.


असो, तर डोनाल्ड ट्रम्प हे फार बोलतात आणि साहजिकच नको तेव्हा, नको तिथे, नको ते बोलतात. आता निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांची अशी नको ती भाषणं अगदी योजनापूर्वक लोकांसमोर आणत आहेत. जगाच्या पाठीवरचा कोणताही देश असो, तिथले नागरिक कदाचित गरीब असतील, अशिक्षित असतील; पण युद्धात मरण पावलेल्या आपल्या देशबांधवांचा त्यांना आत्यंतिक अभिमान असतो. युद्धात बलिदान झालेल्या त्या वीरांबद्दल संपूर्ण समाजाच्याच भावना अत्यंत संवदेनशील असतात. मग युरोप आणि अमेरिका हे तर सर्वाधिक पुढारलेले समाज. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध आणि आता गेल्या दोन दशकांमधली इराक नि अफगाण युद्ध यामधील मृतांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत जिव्हाळा आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, रशिया इत्यादी युरोपीय देशांत आणि अमेरिकेतही युद्धांत मरण पावलेल्या वीरांच्या मोठमोठ्या दफनभूमी आहेत. मोठमोठी स्मारकं आहेत. तिथे त्या-त्या देशांचे सैनिक अखंड पहारा करतात. वर्षातल्या ठरावीक दिवशी देशाचे प्रमुख राजकीय नेते, सर्वोच्च सेनापती, क्वचित परदेशी नेतेसुद्धा त्या युद्धस्मारकांना आवर्जून भेट देतात. अत्यंत गांभीर्याने, आदराने स्मारकावर पुष्पचक्र वाहतात. आज आपण जे काही आहोत, त्यापाठी या वीरांचा त्याग, बलिदान आहे, ही भावना त्यांच्या मनात असते.


पण, डोनाल्ड ट्रम्प यांचं सगळं वागणं मोठं न्यारंच आहे. २०१७ सालची गोष्ट. ट्रम्प प्रशासनाचा कारभार नव्याने सुरू झाला होता. एक दिवस डोनाल्ड ट्रम्प होमलॅण्ड सिक्युरिटी डिपार्टमेंटचे प्रमुख जनरल जॉन केली यांच्यासह आर्लिंग्टन स्मशानभूमीत गेले. वॉशिंग्टन डी.सी. या अमेरिकेच्या राजधानीच्या शहरालगत पोटोमॅक नदी वाहते. तिच्या पलीकडच्या तीरावर आर्लिंग्टन ही अमेरिकन सैन्याची अत्यंत विस्तीर्ण अशी स्मशानभूमी आहे. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळापासून म्हणजे सन १८६४ पासून अनेक वीरांचे मृतदेह इथे दफन केलेले आहेत, त्यांची संख्या चार लाख आहे. ज्यांचे मृतदेह मिळाले नाहीत, त्यांचे अवशेष, अस्थीदेखील इथे जपलेल्या आहेत. खुद्द जनरल जॉन केली यांचा मुलगा लेफ्टनंट रॉबर्ट केली याचा मृतदेहही इथे दफन केलेला आहे. तो अफगाण युद्धात एका सुरुंगावर पाय पडून ठार झाला होता. आता गंमत पाहा हं! ११ सप्टेंबर, २००१च्या भीषण अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकन सरकारने ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ हे नवीन महत्त्वपूर्ण खातं निर्माण केलं. त्याचा प्रमुख हा कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष असतो. जनरल जॉन केली हे स्वत: सेवानिवृत्त जनरल म्हणजे नागरी प्रशासनातले नव्हेत. शिवाय खुद्द त्यांच्या मुलाचं दफन तिथे झालेले. अशा त्या भूमीवर उभं राहून राष्ट्राध्यक्ष, जॉन केलींना विचारते झाले, “यात काय विशेष आहे? का केलं सगळ्यांनी असं? ज्यातून काही मिळत नाही, त्यासाठी असं करणं हा मूर्खपणा आहे.”


‘द अटलांटिक’ नावाच्या मासिकाने हा वृत्तान्त दिला. पण, पुढे घडलं असं की, जनरल केली ट्रम्प यांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ झाले. म्हणजे अध्यक्षांच्या कार्यालयातील सर्वोच्च अधिकारी झाले. राष्ट्राध्यक्षांनी आपल्या हुतात्मा मुलासह सगळ्याच अमेरिकन वीरांच्या बलिदानाला मूर्खपणा ठरवलं, याबद्दल स्वत: केलींची प्रतिक्रिया अज्ञातच राहिली. २०१८ मध्ये आणखी एक अशीच घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सच्या अधिकृत दौर्‍यावर होते, त्यांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणजेच स्वीय सचिव म्हणून जनरल जॉन केलीदेखील त्यांच्याबरोबर होतेच. राजधानी पॅरिसपासून साधारण ९० किमी अंतरावर एक टेकडी आहे. तिच्या माथ्यावरच्या जंगलाला म्हणतात ‘बेलो वूड.’ १९१८ साली, पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या कालखंडात, या बेलो वूडमध्ये फ्रेंच-अमेरिकन विरुद्ध जर्मन यांच्यात तुंबळ लढाई होऊन किमान २,३०० अमेरिकन सैनिक ठार झाले होते. आज त्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या आईस्ने-मार्न या गावात या २,३०० अमेरिकन सैनिकांचे मृतदेह दफन केलेले आहेत. आजही फ्रान्स सरकार या स्थळाला अतिशय सन्मान देतं आणि फ्रान्सला भेट देणारा प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इथे येऊन ‘पुष्पचक्र’ वाहतोच.

ट्रम्प यांच्या फ्रान्स दौर्‍याच्या वेळेस तर या घटनेला १००वर्षं पूर्ण झालेली असल्यामुळे एक वेगळी भावनिक किनार होती. ट्रम्प पॅरिसला आले. त्यांच्या राजकीय भेटी, बैठका, ठरल्या वेळेत आणि चांगल्या वातावरणात पार पडल्या. आता आईस्ने-मार्नकडे निघायचं, तर नेमका पाऊस आणि हलका बर्फ पडू लागला. लगेच ट्रम्प यांनी ती भेट रद्द करून टाकली. जवळचे लोक म्हणतात की, पावसाने आपली केशरचना खराब होईल, या भीतीने ट्रम्प यांनी असा निर्णय घेतला. ट्रम्प त्यावेळी ७२ वर्षांचे होते. वयोमानानुसार डोक्यावरचे केस विरळ झाले आहेत. पण, कोंबड्याच्या डोक्यावर उभा तुरा असतो, तसा आपल्या कपाळावरच्या केसांच्या आडवा तुरा ठेवायचा, अशी ट्रम्पना हौस आहे, बिचारा म्हातारा हौशी नव्हे, गुलहौशी आहे! असो बापडा! तर पंचाईत अशी की, पावसात भिजल्यावर तो तुरा तरंगता न राहता डोक्याला चिकटणार. बरं दफनभूमीत पुष्पचक्र वाहताना आणि मग लष्करी सलामी देताना डोक्यावर छत्री धरायची नसते. तशी शिस्त आहे. म्हणजे भिजणं आलंचं. तेव्हा नकोच ती भानगड. तशा भिजलेल्या आणि केस विस्कटलेल्या अवस्थेतली आपली छबी जगभर जायला नको.

इथपर्यंतही ठीक आहे. पण, न जाण्याचा आपला निर्णय जाहीर करताना ट्रम्प म्हणाले, “कशाला जायचं तिथे? ते सगळे पराभूत लोक आहेत.” बेलो वूडच्या त्या लढाईत जर्मनांना कडवी लढत देऊन आणि इतक्या मोठ्या संख्येने बलिदान देऊनही अखेर फ्रेंच-अमेरिकन सैन्याला माघार घ्यावी लागली होती, त्याला उद्देशून हे उद्गार होते. अरे बाबा! तुम्हाला तुमच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असणार्‍या तिसर्‍या बायकोसमोर (आणि इतरही संभाव्य महिलांसमोर) तुमच्या केसाचा तुरा खाली बसू घ्यायचा नाहीये, तर ठीक आहे. आम्ही समजू शकतो. पण, त्यासाठी त्या वीरांचा अपमान? ज्यांनी देशासाठी, किंबहुना, जर्मनीच्या तावडीतून फ्रान्सला वाचविण्यासाठी, स्वतःच्या मातृभूमीपासून हजारो मैल दूरच्या युरोपातल्या अज्ञात भूमीवर आपले प्राण वेचले? त्यांच्या मरणानंतरही त्यांचा पक्ष लढाईत हरला म्हणून त्यांची ‘हरलेेले लोक’ अशी अवहेलना करायची? बात कुछ हजम नही होती, जानी!
अर्थात, ट्रम्प यांचे स्वीय सचिव जनरल जॉन केली हे स्वतः निवृत्त सेनाधिकारी असल्यामुळे त्यांना या घटनेच्या गंभीरतेची चांगलीच जाणीव होती. युद्धात पतन पावलेल्या वीरांच्या स्मृतिस्थळाला भेट देणं, प्रार्थना करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे एक उच्च मानवी मूल्य आहे, हे त्यांना माहीत होतं.


त्यामुळे ट्रम्प पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्यावर जॉन केली स्वतः आईस्ने-मार्नला गेले आणि पुष्पचक्र अर्पण करून आले. आता निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांच्या अगोचर वागण्या-बोलण्याची अशी अनेक ‘प्रकरणं’ विरोधी पक्ष बाहेर काढत आहेत. अफाट संपत्तीचे धनी असणार्‍या ट्रम्प यांना जगात पैशाखेरीज कशाचेही मोल वाटत नाही आणि अन्य उच्च उदात्त मानवी मूल्यांना ते कस्पटासमान मानतात, हे मतदारांना दाखविण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न आहे. गमतीचा भाग असा आहे की, ट्रम्प यांच्या विरोधात असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे ७७ वर्षांचे उमेदवार जो बायडेन हेदेखील ट्रम्प यांच्याइतकेच वादग्रस्त आहेत. राजकारणात यशस्वी होण्यासाठी, योग्य वेळी नेमकं आणि मोजकं बोलणं, एरवी पूर्ण मौन बाळगणं, हा फार मोठा गुण अत्यावश्यक आहे. जो बायडेन हे बडबडे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. मग, ‘मी असं बोललोच नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा हा विपरीत अर्थ माध्यमांनी मुद्दाम लावला आहे,’ वगैरे प्रतिक्रिया देत बसाव्या लागतात. शिवाय लंपटपणाचा आरोप त्यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्याच महिला कार्यकर्त्यांनीही केलेला आहे. खेरीज त्यांच्या आतापर्यंत दोनदा मेंदूच्या गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन मतदार ‘पहिल्या वरा, तूच बरा’ म्हणून पुन्हा ट्रम्प यांचीच निवड करतील, अशी शक्यता दिसते. अब देखते रहिये, क्या होता हैं आगे आगे!
@@AUTHORINFO_V1@@