'क्रेन' पक्ष्याचा गुजरात-कझाकिस्तान-गुजरात प्रवास; ९ हजार किमीचे स्थलांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2020   
Total Views |

crane _1  H x W



'भारतीय वन्यजीव संस्थान'चा अभ्यास



मुंबई (अक्षय मांडवकर) - आकाशमार्गाने गुजरात ते कझाकिस्तान स्थलांतर करुन पाच महिन्यांनी पुन्हा त्याच मार्गाने भारतात परतणाऱ्या क्रौंच (काॅमन क्रेन) पक्ष्याच्या स्थलांतराची नोंद शास्त्रज्ञांनी केली आहे. 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) शास्त्रज्ञांनी 'जीपीएस-जीएसएम' टॅगच्या मदतीने या स्थलांतराचा उलगडा केला. महत्त्वाचे म्हणजे या मादी क्रौंच पक्ष्याने गुजरात-कझाकिस्तान-गुजरात या आकाशमार्गाने ९,३०० किमीचे स्थलांतर केले आहे.

 
crane bird_1  H
 
 
 
हिवाळ्यामध्ये भारतात अनेक पक्षी आशिया खंडाच्या उत्तरेकडील भागामधून स्थलांतर करुन येतात. जगात पक्षी स्थलांतराचे एकूण आठ आकाशमार्ग आहेत. हिवाळ्यात 'सेंट्रल एशियन फ्लायवे' या आकाशमार्गावरुन भारतामध्ये पक्षी दाखल होतात. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातही या आकाशमार्गावरुन दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे वस्तीस्थान आहे. मध्य आशियाई प्रदेशातील क्रौंच पक्षी हे आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये मध्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होतात. मार्च महिन्याच्या अखेरीस ते पुन्हा प्रजननाकरिता मध्य आशियाई देशांमध्ये प्रवास करतात. याच प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी 'डब्लूआयआय' विशेष प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पाअंतर्गत मार्च महिन्यात गुजरातमधील नल सरोवर पक्षी अभयारण्यात स्थलांतर केलेल्या मादी क्रौंच पक्ष्याला 'जीपीएस-जीएसएम' टॅग लावण्यात आले होते. या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांमध्ये मादी क्रौंचने गुजरात-कझाकिस्तान-गुजरात आकाशमार्गावर ,३०० किमीचे स्थलांतर केल्याचे समोर आले आहे.

crane _1  H x W
  

१२ मार्च, २०२० रोजी या मादी क्रौंचला 'जीपीएस-जीएसएम' टॅग लावल्यानंतर महिनाभर ती याच परिक्षेत्रात वावरत होती. १० एप्रिल रोजी तिने स्थलांतर सुरू केले आणि केवळ १५ दिवसांमध्ये ४,८०० किमीचे स्थलांतर करुन ती कझाकिस्तान येथील आपल्या प्रजनन स्थळी पोहोचल्याची माहिती 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ डाॅ. सुरेश कुमार यांनी दिली. हे स्थलांतर तिने पाकिस्तान, अफगाणिस्तान, उत्तर इराण, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांमधून केले. साडे पाच महिने कझाकिस्तानमध्ये घालविल्यानंतर २० सप्टेंबर रोजी या मादी पक्ष्याने पुन्हा एकदा आपले हिवाळी स्थलांतर सुरू केले. त्याच मार्गाने ४, ३०० किमी अंतर कापून हा पक्षी १० आॅक्टोबर रोजी गुजरातमध्ये पुन्हा एकदा दाखल झाल्याचे कुमार यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे गुजरातमध्ये ज्याठिकाणी या पक्ष्याला टॅग लावण्यात आले होते, त्याच पाणथळ प्रदेशामध्ये तो स्थलांतर करुन आला. गुजरातमधील वीज वाहिन्यांमुळे खास करुन उन्नत वीज वाहिन्या आणि पवन चक्क्यांमुळे पक्षी स्थलांतरावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासअंतर्गत हा अभ्यास सुरू असल्याची माहिती डब्लूआयआयचे संशोधक डॉ. अंजू बारोथ यांनी दिली. या प्रकल्पाला 'पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'चे अर्थसहाय्य (पीजीसीआयएल) मिळाले आहे.
 
  

'जीपीएस-जीएसएम' यंत्रणा म्हणजे काय?

पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पक्ष्यांवर लावले जाणारे उपकरण त्यांच्या वजनाच्या २ टक्के असणे अपेक्षित आहे. जीपीएसआणि जीएसएमयंत्राचे वजन हे अनुक्रमे ३.५ ग्रॅम आणि १० ग्रॅम असते. त्यामुळे हे उपकरण लावण्यासाठी फ्लेमिंगो किंवा क्रेन सारख्या मोठ्या पक्ष्यांची निवड केली जाते. या दोन्ही उपकरणांमुळे वायरलेस पद्धतीने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यानची माहिती संशोधकांना मिळते. जीपीएसउपकरणामुळे पक्ष्याचा स्थलांतरादरम्यानचा वेग, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक स्थानाची माहिती मिळते, तर अत्याधुनिक जीएसएमउपकरणामुळे वर नमूद केलेल्या तीन गोष्टींबरोबरच स्थलांतरादरम्यानचा कोनीय वेग, वार्याचा दबाव, स्थलीय चुंबकत्व, प्रकाशाची तीव्रता आणि तापमानाची माहिती मिळण्यास मदत होते. सौर उर्जेवर हे उपकरण चालते. नेटवर्क न मिळाल्यास त्या ठिकाणांचे संचयन करुन नेटवर्क आल्यानंतर ती माहिती ही यंत्रे संशोधकांपर्यंत पोहोचवतात.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@