युद्धेतिहासाचा पितामह : डेनिस शोवॉल्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


saf_1  H x W: 0


डेनिसला इतिहासातला कोणताही विषय वर्ज्य नव्हता, पण 'युद्धेतिहास' आणि त्यातही 'जर्मनीचा युद्धेतिहास' हा त्याचा खास विषय होता.


"फक्त महाराष्ट्रालाच इतिहास आहे. अन्य प्रांतांना फक्त भूगोल आहे," अशी अभिनिवेशयुक्त गर्जना आचार्य अत्रे 'संयुक्त महाराष्ट्र आंदोलना'च्या काळात जाहीरपणे करीत असत. मराठी माणसाला इतिहासाचं वेड आहे, यात शंकाच नाही. संपूर्ण देशाचा, गेल्या किमान एक हजार वर्षांचा इतिहास सलगपणे लिहून काढणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई हे देशभरातल्या इतिहासलेखनातले एक उत्तुंग शिखर आहेत, ही पावती त्यांना त्यांच्या हयातीतच खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेली आहे. पण, सध्या मात्र इतिहासकारांच्या एका वेगळ्याच जमातीचं पेव फुटलंय. ही जमात म्हणजे 'समाजमाध्यमांवरचे स्वयंघोषित इतिहासकार.' फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून अक्षरश: वाटेल ती माहिती 'इतिहास' म्हणून खपवली जात आहे. विशेष म्हणजे, असले विपर्यस्त उतारे वाचून आणि इतरांना फॉरवर्ड करून लोक स्वत:ला 'विद्वान' समजू लागले आहेत. त्यांना पुरावा, आधार, संदर्भ मागितलेला आवडत नाही. लगेच त्यांचा पापड मोडतो आणि ते शिवीगाळ करण्यावर उतरतात. मोठेपणा हवा असणे, हा मनुष्यस्वभाव आहे. पण, तो मोठेपणा मिळवण्यासाठी काही किमान अभ्यास, चिंतन, अनुभव हवा की नको! जाहीर गर्जना करून अवघा महाराष्ट्र दणाणून सोडणं आचार्य अत्र्यांना शोभत होतं. कारण, त्या गर्जनेमागे काही दशकांची साहित्य, राजकारण, पत्रकरिता अशा क्षेत्रांमधील तपश्चर्या होती. इथे तुम्ही-आम्ही रोजचा पेपरसुद्धा पूर्ण वाचत नाही. कसलाही अनुभव नाही. 'चिंतन' वगैरे तर म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय, इथपासून सांगावं लागेल अशी स्थिती आणि आम्हाला मोठेपणा तर मिरवायचा आहे की, आम्हाला इतिहासातलं सगळं काही माहीत आहे. खरोखर 'दिडकीची नाही पत नि मल म्हणा धनपत' अशी आज आमची स्थिती आहे. हे झालं नुसत्या 'इतिहास' या सामान्य विषयाबाबत. मग त्या इतिहासातला आणखी एक उपविषय जो युद्धेतिहास किंवा मिलिटरी हिस्ट्री! त्याबद्दल तर सगळाच आनंद आहे. रियासतकार सरदेसाईंसारखे लेखक जेव्हा इतिहासलेखन करतात, तेव्हा ते एखाद्या कालखंडाचा, त्यातल्या राजवटींचा, त्यातल्या युद्ध-लढाया आपोआपाच येतात. पण, 'युद्धेतिहास' लिहिणारा लेखक, एखादं युद्ध त्यातले उभय पक्षांचे सेनापती, त्यांची सैन्ये, त्यांचं बलाबल, त्यांचे डावपेच, प्रत्यक्ष लढाई या सगळ्याचा सखोल अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडतो. असे लेखक-अभ्यासक युरोप-अमेरिकेत भरपूर आहेत आणि भारतात अत्यल्प आहेत. सर जदुनाथ सरकार यांनी १९६० साली 'मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिलं. आज या गोष्टीला ६० वर्षे झाली. या कालखंडात कितीतरी नवीन संशोधने झाली. पण, जदुनाथांच्या ग्रंथाला मागे सारेल (चांगल्या अर्थाने) असा नवा ग्रंथ कुणीही लिहिलेला नाही.

 

मराठीमध्ये खरंतर हा विषय सुरू खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच केली, असं म्हणायला हरकत नाही. केवळ क्रांतियुद्ध याच विषयाला वाहिलेला '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा त्यांचा ग्रंथ १९०८ साली कसा लिहिला गेला, कसा प्रकाशनापूर्वीच जप्त झाला नि कसा गुप्तपणे छापून घरोघर वाटला गेला, हाच एक मोठा रोमांचक इतिहास आहे. पुढच्या काळातले सावरकरांचे दोन ग्रंथ 'सहा सोनेरी पाने' आणि 'हिंदुपदपातशाही' हे हिंदूंच्या युद्धांमधील विजयाचा इतिहास सांगतात. काळकर्ते शि. म. परांजपे आणि साहित्यसिंह न. चिं. केळकर यांनी अनुक्रमे 'मराठ्यांच्या लढायांचा इतिहास' आणि 'इंग्रज-मराठे संघर्ष' असे उत्कृष्ट ग्रंथ लिहून वाचकांसमोर आणले. परंतु, नंतर मात्र ही धारा क्षीण झालेली दिसते. आधुनिक युद्धपद्धती, आधुनिक युद्धे यावर लिहिणारे लेखक मराठीत जवळजवळ नाहीतच, असं म्हणावं लागले. नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकरांनी पहिल्या महायुद्धावर अप्रतिम लेखमाला लिहिली. दि. वि. गोखले यांनी 'पहिले महायुद्ध', 'युद्धनेतृत्व' आणि 'माओेचे लष्करी आव्हान' या तीन ग्रंथांद्वारे युद्धशास्त्र आणि युद्धेतिहास यांबद्दलच्या लेखनाचा आधुनिक आदर्श निर्माण केला. वि. स. वाळिंबे, वि. ग. कानिटकर, मिलिंद गाडगीळ आणि ज. द. जोगळेकर यांनी या विषयांवर उत्कृष्ट लेखन केलं. पण, हे सर्व लेखक आता कालवश झाले आहेत. आजच्या घडीला ज्यांना 'युद्धेतिहासकार' म्हणता येईल, असे मराठीतले लेखक म्हणजे मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे आणि ब्रिगे. (निवृत्त) हेमंत महाजन हेच आहेत. डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि दुर्गेश परुळकर हेही आहेत, पण 'युद्धेतिहास' हा त्यांच्या लेखनाच्या अनेक विषयांपैकी एक आहे. आज महाराष्ट्राची लोकसंख्या किमान १२ ते १५ कोटी आहे. छत्रपती शिवरायांच्या 'गनिमी कावा' या युद्धपद्धतीची आम्ही उठता-बसता चर्चा करत असतो, पण 'युद्धेतिहास' या ज्ञानशाखेचा 'अ‍ॅकेडमिक डिसिप्लीन'चा अभ्यास करणार्‍या लेखन करणार्‍या विद्वानांचा प्रचंड तुटवडा आहे. समाजमाध्यमांवर मात्र रोज नवे 'इतिहासाचार्य' आणि 'इतिहासमहर्षी' उदयाला येत असतात.

 

डेनिस शोवॉल्टर हा अत्यंत सामान्य आईबापांचा मुलगा होता. त्याचा बाप फेरीवाला होता नि आई गृहिणी होती. बापाबरोबर फिरत्या विके्रत्याचं काम करताना डेनिस काय शिकला, तर गोड बोलणं, नम्र बोलणं, आपल्या मनाबद्दल समोरच्याच्या मनात अनुकूलता निर्माण करणं आणि अखेर विक्री करणं. १९६९ साली मिनेसोटा विद्यापीठातून 'डॉक्टरेट' मिळवून डेनिस शोवॉल्टर इतिहास अध्यापन क्षेत्रात उतरला. कोलोरॅडो विद्यापीठातले त्याचे इतिहासाचे वर्ग हा लवकरच एक आनंददायक प्रकार बनला. इतिहासाचा तास म्हणजे घनगंभीर, रूक्ष चर्चा असा तोपर्यंतचा परिपाठ होता. पण, डेनिसच्या इतिहासात राजकारण नि लढाया यांबरोबरच तत्कालीन समाज आणि आधुनिक समाज, शेती आणि कारखानदारी, संगीत आणि बेसबॉल किंवा फुटबॉल सामने, तत्कालीन कपड्यांच्या फॅशन आणि आधुनिक फॅशन्स, ग्रीक-रोमन योद्धे, पहिल्या-दुसर्‍या महायुद्धांमधील उभय पक्षांचे सेनापती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, यादवीयुद्ध, अल कायदा, इसिसचे अतिरेकी असे तुलनात्मक संदर्भ इतक्या सहजतेने आणि तरीही सखोलतेने यायचे की पोरं 'आ' वासून ऐकतच राहायची. पुन्हा डेनिसचं निरूपण नुसतंच विद्वत्तेने भरलेलं नसायचं. राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या ताज्या घटना नि संबंधित व्यक्ती यांची चुरचुरीत खिल्ली उडवत तो इतिहास शिकवायचा. त्यामुळे डेनिस इतिहास शिकवतोय नि पोरं खिदळतायत, हे त्याच्या वर्गावरचं नेहमीचं दृश्य बनलं. हळूहळू ही लोकप्रियता इतकी वाढली की, अन्य विषयांचे विद्यार्थी, प्राध्यापक किंवा विभाग प्रमुखसुद्धा त्याच्या वर्गांना निखळ बौद्धिक आनंदासाठी हजेरी लावू लागले.

 

डेनिसला इतिहासातला कोणताही विषय वर्ज्य नव्हता, पण 'युद्धेतिहास' आणि त्यातही 'जर्मनीचा युद्धेतिहास' हा त्याचा खास विषय होता. ब्रिटन, फ्रान्स, इटली, ग्रीस हे युरोपातील प्राचीन देश आहेत. जर्मनी हा तसा नाही. प्रशिया हा देश आणि अनेक जर्मन भाषिक, संस्थानिक, जमीनदार, जहांगिरदार हे एकत्र आले आणि त्यांनी जर्मनी हा एकसंध देश बनवला, तो सन १८७१ साली. त्या अगोदर 'फ्रेडरिक द ग्रेट' हा प्रशियाचा एक महान सम्राट होऊन गेला होता. तो एक अजोड सेनापती होता. अगदी तसाच जनरल रोमेल हा आधुनिक काळात जर्मनीचा एक अजोड सेनापती होऊन गेला. डेनिसने 'फ्रेडरिक द ग्रेट'वर पुस्तक लिहिलं आणि जनरल रोमेलवरही लिहिलं. शिवाय प्रशिया हा प्रदीर्घ लष्करी परंपरा असणारा देश आणि अन्य जर्मन संस्थानांच्या एकत्रीकरणातून 'जर्मनी' हा अजिंक्य सैनिकी शक्तीचा देश कसा निर्माण झाला, यावरही लिहिलं. जनरल हिंडेनबुर्ग हा पहिल्या महायुद्धात जर्मनीचा सरसेनापती होता. पहिल्या महायुद्धातल्या पराभवाने पार खच्ची झालेल्या जर्मन सैनिकी दलांना हिंडेनबुर्गने पुनर्संघटन, पुनर्मांडणी करून कसं पुन्हा बलवान बनवलं, यावरही डेनिसने पुस्तक लिहिलं. डेनिसची ही सगळी पुस्तकं अमेरिकेच्या सगळ्या लष्करी महाविद्यालयांमध्ये आणि अकादमींमध्ये सतत अभ्यासली जात असतात. इतका विद्वान असलेला डेनिस शोवॉल्टर केव्हाही कुणालाही उपलब्ध असे. पी.एचडीच्या हजारो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असणारा हा माणूस स्वतःला 'सर' किंवा 'प्रोफेसर' न म्हणवता नुसतंच 'डेनिस' म्हणवत असे. ३० डिसेंबर, २०१९ या दिवशी डेनिस शोवॉल्टर वयाच्या ७७ व्या वर्षी मरण पावला.

 
 
@@AUTHORINFO_V1@@