प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019   
Total Views |




. बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचे एक ताजे उदाहरण घडले. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे जादवपूर विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांचे कपडे फाडण्यात आले. ममतादीदी, याला काय म्हणायचे? केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला झाल्याच्या घटनेचा कठोर शब्दांत तुम्ही निषेध केल्याचेही दिसून आले नाही!

 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात अनागोंदी कारभार चालल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचार, दलाली, विरोधकांविरुद्ध गुंडगिरी अशा घटना त्या राज्यात नित्याच्याच झाल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या 'आशीर्वादा'ने हे सर्व घडत असल्याचे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचे नाव शारदा चिटफंड घोटाळ्यासंदर्भात चर्चिले जात असल्याचे जगजाहीर आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांची चौकशी करू नये म्हणून ममता बॅनर्जी यांनी आकाशपाताळ एक केले होते, हे सर्वांना चांगलेच माहीत आहे.

 

आता हेच पोलीस अधिकारी आपली अटक टळावी म्हणून दडून बसल्याचे आणि ती टाळण्यासाठी न्यायालयाच्या पायर्‍या झिजवताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांचे अभय असल्याशिवाय कोणी पोलीस अधिकारी असा दडून बसणे शक्य आहे का? प. बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचे एक ताजे उदाहरण घडले. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे जादवपूर विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांचे कपडे फाडण्यात आले. ममतादीदी, याला काय म्हणायचे? केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला झाल्याच्या घटनेचा कठोर शब्दांत तुम्ही निषेध केल्याचेही दिसून आले नाही!

 

गेल्या आठवड्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे जादवपूर विद्यापीठात गेले होते. या कार्यक्रमास विरोध करणार्‍या डाव्या विद्यार्थी संघटनेने सुप्रियो विद्यापीठात आल्यावर त्यांना घेरले. त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. त्यांचा शर्ट फाडण्यापर्यंत आणि त्यांच्या डोक्याचे केस ओढण्यापर्यंत त्या गुंडगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांची मजल गेली. अभाविपने आयोजित केलेल्या कार्यक्रमास डाव्या संघटनांनी सनदशीर मार्गाने केलेला विरोध समजू शकतो. पण, आपल्याशी सहमत नसलेल्यांवर हल्ला करण्याचा प्रकार लोकशाहीमध्ये न बसणारा आहे.

 

बाबुल सुप्रियो यांना ज्या विद्यार्थ्यांनी घेरले, त्यांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी अखेर विद्यापीठाचे कुलपती असलेल्या राज्यपाल धानखर यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांची सुटका करावी लागली. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो विद्यापीठात येणार म्हटल्यावर विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असती तर असा प्रसंग टाळता आला असता. पण, तसे काही घडले नाही. अभाविपने एका चर्चासत्रासाठी बाबुल सुप्रियो यांना निमंत्रित केले होते. पण, डाव्या विद्यार्थी संघटनेने त्या कार्यक्रमावर 'फॅसिझम'चा शिक्का मारून विरोध करण्याचे आधीच ठरविले असल्याने बाबुल सुप्रियो यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. जादवपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठ आवारात पोलिसांना येऊ देण्यास प्रतिबंध केल्याने परिस्थिती आणखी चिघळत गेली. अखेर राज्यपालांच्या कानावर ही घटना गेल्यानंतर सुप्रियो यांची सुटका करण्यासाठी ते धावले. तिकडे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कानावरही त्यांनी ही घटना घातली. पण, मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी जेवढ्या गंभीरपणे या घटनेकडे पाहावयास पाहिजे होते, तेवढ्या गंभीरपणे पाहिले नसल्याचेच दिसून आले.

 

राज्याच्या मुख्य सचिवांच्या कानावर ही बाब गेली असता, विद्यापीठ कुलगुरूंनी अनुमती दिली तरच आपण विद्यापीठ परिसरात पोलीस पाठवू शकतो, असे उत्तर त्यांनी दिल्याची माहिती बाहेर आली आहे. शेवटी, दुपारी 3 पासून घेरल्या गेलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची रात्री आठच्या सुमारास कुलपतींनी केलेल्या हस्तक्षेपामुळे सुटका झाली! एका केंद्रीय मंत्र्यावर असा प्रसंग आला असताना ममता बॅनर्जी यांनी त्याकडे ज्या प्रकारे दुर्लक्ष केले, ते त्या पदाला शोभणारे नक्कीच नव्हते!

 

बाबुल सुप्रियो यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप प. बंगाल भारतीय जनता पक्षाने केला असल्याचे पाहता या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी गुंडगिरी करून बाबुल सुप्रियो यांच्या कार्यक्रमास केलेल्या विरोधास उत्तर म्हणून बंगालमधील विविध महाविद्यालयांमध्ये अशाच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे अभाविपने घोषित केले आहे. एवढा प्रकार घडूनही तृणमूल काँग्रेस या घटनेचे भांडवल करून भाजपवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड होण्याचा प्रकार घडला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो प्रकार केल्याचा आरोप त्यावेळी ममता बॅनर्जींनी केला होता. त्याचे राजकीय भांडवल करून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आता या घटनेचे निमित्त करून भाजपवर टीका करण्याची संधी ममता बॅनर्जी यांनी सोडली नाही. एवढेच नव्हे तर राज्यपाल या घटनेचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

ममता बॅनर्जी यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा हादरा दिला असला तरी त्यांच्या मनोवृत्तीत काही फरक पडला नसल्याचेच दिसून आले आहे. दुसरीकडे, एवढी गंभीर घटना घडूनही बाबुल सुप्रियो यांनी, त्यांचे केस ओढणार्‍या विद्यार्थ्याविरुद्ध आपण काही तक्रार करणार नाही, त्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन त्या विद्यार्थ्याच्या आजारी आईस दिले आहे. ममता बॅनर्जी, आपण बाबुल सुप्रियो यांच्यापासून काही शिकणार की नाही?

 

लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षावर आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर वाट्टेल तशी टीका करणार्‍या ममता बॅनर्जी आता जरा जमिनीवर आल्याचे मात्र दिसू लागले आहे. मोदी यांचे आपण तोंडही पाहणार नाही, असे म्हणणार्‍या ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्याच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप संपुष्टात येणार आणि विरोधकांचे सरकार येऊन कदाचित पंतप्रधानपदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार, असे मनोरथ बाळगून असलेल्या ममतादीदी यांच्या स्वप्नांचा भाजपने चक्काचूर केला. भाजपला प. बंगाल राज्यात चांगले यश मिळाले. अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करणार्‍या आणि 'जय श्रीराम' सारख्या घोषणांनी तळपायाची आग मस्तकात जात असणार्‍या ममता बॅनर्जी यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.

 

ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीत घडलेल्या शारदा चिट फंडमधील भ्रष्टाचाराची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसमधील बडी धेंडे अडकली आहेत. ममता बॅनर्जी ज्या कोलकात्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तास पाठीशी घालत होत्या, तो पोलीस अधिकारी आपली अटक टाळण्यासाठी न्यायालयाच्या पायर्‍या झिजवत आहे. तसेच त्याला लपूनछपून राहावे लागत आहे. सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थींकडून तृणमूल काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दलाली घेतल्याची प्रकरणे तर गाजतच आहेत. प. बंगालमध्ये कायद्याचे तीनतेरा कसे वाजले आहेत, हे बाबुल सुप्रियो यांच्याबाबतीत जी घटना घडली त्यावरून पुन्हा लक्षात आले आहे. आता तरी ममता बॅनर्जी सुधारतील, अशी अपेक्षा करावी काय?

@@AUTHORINFO_V1@@