सुप्रजा भाग-१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



पावडरचे दूध पिण्यास कष्ट लागत नाही. तसेच त्या कृत्रिम दुधामुळे बरेचदा मलबद्धता होणे, पोट फुगणे, पोटदुखी इ. तक्रारी उद्भवतात. कृत्रिम (पावडरचे) दूध करणे सोपे आहे. त्याने बाळ गुटगुटीतही बहुतांशी वेळेस होते. पण, हा फोकसेपणा आहे. आरोग्यदायी असेलच असे नाही.


बाळाचा जन्म झाल्यावर त्याचे प्रथम रडणे अत्यंत गरजेचे आहे. बाळाला सर्वप्रथम स्वच्छ करून त्याची नाळ कापून बांधावे. आईच्या पोटात असताना एका विशिष्ट तापमानाची (शारीरिक तापमान) सवय असते. हवेतील बदल त्या चिमुकल्याला सहन होणार नाही. म्हणून त्याला मऊ, सुती कपड्याने गुंडाळावे. तसेच गर्भाशयात, सातव्या महिन्यांनंतर जेव्हा बाळाचे वजन व उंची वाढते. तेव्हा जागा (गर्भाशयातील) कमी पडते. त्याला हात-पाय खूप पसरता येत नाहीत. जन्मानंतर बांधताना हात-पाय सरळ ठेवूनच बांधावे, दुमडलेले नसावे. तसेच प्रखर प्रकाश, आवाज, वारा, वास (सुगंध, दुर्गंध) यापासून बाळाला लांब ठेवावे. प्रसुतीचे कष्ट हे बाळाला थकवणारे असतात. त्यामुळे स्तन्यपान करून बाळ शांत झोपते. प्रसुतीनंतर बाळाला स्वच्छ पुसून बांधल्यानंतर सर्वात आधी स्तन्यपान करावे. या वेळेस स्तन्याची निर्मिती संपूर्णतः झालेली नसते. पण, प्रक्रिया सुरू झालेली असते. सर्वात आधी येणारे स्तन्य हे पिवळसर असते व थोडे दाट असते. याला 'Colostrum' म्हणतात. या दाट विकासमान स्तन्यामध्ये Antibodies प्रचूर मात्रेत असतात. याच्या पानाने (प्यायल्याने) बाळाला प्रतिकारशक्ती प्राप्त होते. गर्भाशयातील सुरक्षित वातावरणातून बाह्य जगात येणे आणि वाढणे यासाठी उत्तम रोग प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे. त्याचा 'Natural Booster Dose' या 'Colostrum' मधून बाळाला मिळतो.

 

स्तन्यपानाचे अनन्यसाधारण महत्त्व बाळाच्या आरोग्यासाठी आहे. स्तन्य हे प्राकृतत: बाळाला आवश्यक आहे. म्हणजे बाळाच्या शरीरात स्तन्य विनासायास स्वीकारले जाते. त्याची अ‍ॅलर्जी कुणाला होत नाही. बाळासाठी स्तन्य हे पूर्णान्न आहे. स्तन्यातून बाळाच्या वाढीसाठी, भूक भागण्यासाठी, तृप्ती समापनासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती सक्षम नेण्यासाठीचे सर्व घटक बाळाला मिळतात. यामुळे स्तन्यपानाने बाळाची पुष्टी होते. वाढीस मदत होते. मातेच्या आहारातून मातेच्या शरीराचे पोषण होते आणि स्तन्यनिर्मितीही होते. जे जे पोषक घटक माता सेवन करते, त्या सगळ्यांचा साररूपी अंश स्तन्यामार्फत बाळाला मिळतो. याने शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढीस मदत तर होतेच, पण बाळाचा मातेशी एक चांगले नाते पुनःप्रस्थापित होते. एक घट्ट 'बॉण्ड' त्या दोघांमध्ये निर्माण होतो, रुजतो, घट्ट होतो. बाळाला एक प्रकारची Sense of Security Develop होते. स्तन्याची निर्मिती बाळाने 'Suckling Action' सुरू केल्याक्षणी होऊ लागते. ही एक 'रिफ्लेक्स अ‍ॅक्शन' मातेच्या शरीरातून तयार होते. त्यामुळे ताजे स्तन्य मिळाल्याने Contaminationचा प्रश्नच उद्भवत नाही व त्यात भेसळ करता येते व ते शिळे होते. त्याची चव, उष्णतामान सर्व बाळाला लागेल तसेच असते. स्तन्यपानामुळे मातेला थकवा येत नाही. तिची प्रकृती उत्तम राहण्यास स्तन्यपानाचा फायदाच होतो.

 

स्तन्यपान करताना 'Suckling Action' मुळे बाळाला थोडा व्यायाम होतो. त्याने ते थकते आणि शांत झोपते. पावडरचे दूध पिण्यास कष्ट लागत नाही. तसेच त्या कृत्रिम दुधामुळे बरेचदा मलबद्धता होणे, पोट फुगणे, पोटदुखी इ. तक्रारी उद्भवतात. कृत्रिम (पावडरचे) दूध करणे सोपे आहे. त्याने बाळ गुटगुटीतही बहुतांशी वेळेस होते. पण, हा फोकसेपणा आहे. आरोग्यदायी असेलच असे नाही. गाईचे दूध जर सुरू करावे लागले, तर त्यात साखर घालू नये. सुंठ आणि विडंग घालून उकळवून मग ते बाळास द्यावे. नेहमी ताजे दूध तयार करून द्यावे. शिळे नसावे. बाटलीने दूध पाजणे टाळावे. बाटलीच्या सवयीमुळे चोखताना हवा पोटात जाऊन पोट दुखू शकते. तसेच बाटली आणि Suckling Rubber स्वच्छ केले नाही. त्यात साबणाचा अंश जर राहिला तर बाळाला जुलाब होऊ शकतात. बाटल्या या बहुतांशी वेळेस प्लास्टिकच्या असता. प्लास्टिकमध्ये कोमट अथवा गरम पदार्थ घातले तर प्लास्टिकचे काही कण विरघळून त्या पदार्थाबरोबर शरीरात प्रवेश करतात. याला 'प्लास्टिक लिचिंग' म्हणतात. प्लास्टिक हे शरीरासाठी किती हानिकारक आहे, हे विविध चाचण्यांमधून समोर आले आहे. आपल्या बाळाचे आरोग्य उत्तम हवे असल्यास बॉटल फिडिंगची सवय लावू नये. म्हशीचे दूध सहसा टाळावे. कारण, त्यात फॅटचे अंश जास्त असल्याकरणाने ते पचायला जड होते. सर्वांगीण विचार केला तर मातेच्या दुधाला, स्तन्याला कुठलाच पर्याय नाही. जन्मजात बाळाला जर दोन ते तीन तासांनी स्तन्यपान लागते. शौचकर्म झाल्यावर पुन्हा भूक लागते. झोप, दूध पिणे, शौचकर्म करणे हाच तान्हुल्यांचा दिनक्रम असतो. एका वेळेस खूप स्तन्य बाळ पित नाही, पण वारंवार भूक लागते. पहिल्या एक-दीड महिन्यात १८ ते २० तास बाळ झोपते. मग ही वेळ कमी कमी होते. जसे बाळ मोठे होते, त्याला आपल्या आजुबाजूची माणसे, परिसर, आवाज इ. ची सवय होते, ओळख होते. त्यांच्याशी संवाद साधणे, रमणे इ. बाळ करू लागते. मागील लेखात बाळाचे विविध वाढीचे टप्पे आपण बघितले. मांसपेशींना ताकद मिळण्यासाठी रोज अभ्यंग, मॉलिश करणे महत्त्वाचे.

 

लहान बाळांची त्वचा नाजूक असते. त्यावर खूप उष्ण-तीक्ष्ण औषधे, कृत्रिम वासाचे, रंगाचे साबण इ. वापरू नये. सुरुवातीस त्याला खोबरेल तेलाने मालिश करावी. खोबरेल तेल हे सौैम्य तेल आहे. त्याची अ‍ॅलर्जी सहसा कुणाला झालेली आढळून येत नाही. थोड्या दिवसांनी चंदनबलालाभादी तेलासारखे औषधी तेल बळकटी वाढविण्यात उपयोगी असल्याने वापरावे. अंगाला साबण न लावता सौम्य स्वरूपाचे उटण दुधात भिजवून वापरावे. मसूर डाळीचे पीठही वापरल्यास चालते, पण ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे, त्यांच्यात रूक्षता अधिक वाढते. चण्याचे पीठ अधिकच रुक्षता वाढविणारे आहे. काही वेळेस अंगावर पुरळ उठू शकतो. यापेक्षा आयुर्वेदिक उटणं आरोग्यासाठी उत्तम पर्याय होतो. कानात तेल घालणे (याला कर्णपूरण म्हणतात) तसेच नाकात तेल घालणे (याला नासापूरण म्हणतात) आणि टाळूवर तेल घालणे हे नित्य रोज करावे. कान आणि नाक हे Natural Opening आहेत. त्यांच्या स्वच्छतेसाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्यांची कार्यक्षमता उत्तम होण्यासाठी प्रत्येकाने रोज 'कर्णपूरण' आणि 'नासापूरण'/ 'नस्य' आवर्जून करावे. फक्त तेल सोडताना हात स्वच्छ धुतलेले व कोरडे असावेत. तसेच तेलाच्या बाटलीचे टोक स्वच्छ असावे, याची काळजी घ्यावी. शरीराच्या वाढीच्या वेळेस अंगाला तेल लावून उटणं लावून कोमट पाण्याने अंघोळ झाल्यानंतर, धुरी द्यावी. यामुळे अंगात पाणी मुरत नाही आणि सर्दी-पडशाचा त्रास होत नाही. यानंतर दुपट्यात बांधून, टोपरं बांधून बाळ शांत झोपते. टोपरं घालण्यापूर्वी टाळूवर थोडं वेखंड चूर्ण भुरभुरावे. याने टाळूत पाणी राहत नाही. थोडे टाळूवरचे केस वेखंडामुळे विरळ होतात. पण, नंतर पुन्हा वाढ उत्तम होते. लहानपणी सर्दी-खोकला होऊ नये याची खबरदारी ही नित्यक्रमात अशा प्रकारे घेतल्यास बाळ निरोगी राहते आणि आनंदी राहते. बाळाला स्तन्यपान देताना मातेचा आहार कसा असावा, याबद्दल पुढच्या भागात बघूया...

 
क्रमश:
@@AUTHORINFO_V1@@