काँग्रेसी 'कॉकटेल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019   
Total Views |



काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांची स्थिती फारच गंभीर झाली आहे. असे असतानाही या पक्षांमधील कलगीतुरे काही कमी व्हायला तयार नाहीत. चारच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेसच्या छाननी समितीत स्थान न मिळाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कमालीचे नाराज झाले होते. परंतु, पक्षाने त्यांच्या समावेशाचा स्वतंत्र आदेश काढून त्यांना अखेर या समितीत स्थान दिले आहे. तशीच परिस्थिती काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नाना पटोले यांच्या आगाऊगिरीची असल्याचे सध्या काँग्रेसमध्ये म्हटले जात आहे. ते परस्पर कोणताही निर्णय घेतात, पक्षातील अन्य नेत्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांना किंमत देत नाहीत, असे पटोले यांच्याबाबत बोलले जात आहे. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता थेट 'महापर्दाफाश' यात्रेची घोषणा केली. भाजपच्या 'महाजनादेश'ला उत्तर देण्यासाठी त्यांनी या यात्रेची घोषणा केली. परंतु, आता प्रत्यक्षात 'पर्दाफाश' करता करता काँग्रेसवाल्यांच्या नाकीनऊ येत आहेत. या यात्रेआधी कोणतेही नियोजन किंवा बैठक पटोले यांनी घेतली नव्हती, असे अन्य काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दरबारात पटोलेंची किंमत वाढली. त्याचाच फायदा उठवून पटोले पक्षात एकाधिकारशाही करत असल्याचे काँग्रेसी नेत्यांचे म्हणणे आहे. सत्ताधाऱ्यांशी लढायचे सोडून काँग्रेसवाले अजूनही आपल्याच पारंपरिक क्षुद्र राजकारणात मग्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला तर चक्क होलसेल पक्षांतरांचे ग्रहण लागले आहे. त्यांच्या 'शिवस्वराज्य यात्रे'त त्यांचेच नेते सहभागी होताना दिसत नाहीत. त्याशिवाय पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' असताना खा. सुप्रिया सुळे यांचा स्वतःचा वेगळाच संवाद कार्यक्रम सुरू आहे. नाशिकमध्ये त्यांच्या संवाद कार्यक्रमात तेथील तालेवार नेते छगन भुजबळच सहभागी न झाल्याने त्या भयंकर वैतागल्या. सध्या पक्ष बदलणे मोबाईलमधील सिम कार्ड बदलण्याएवढे सोपे झाले आहे. थोडे कोणी जास्त दिले की तिकडे जातात. पॅकेजिंग बदलले म्हणून आतला माल थोडाच बदलणार आहे का?” असा सवालच सुप्रिया सुळे यांनी सध्या सुरू असलेल्या पक्षांतराला उद्देशून केला. पण बोलण्याच्या गडबडीत आपल्या पक्षातील माल 'खराब' होता, हे त्यांनी स्वतःहून मान्य केले.

 

कोकणचे पाणी...

 

मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी कोकणातील नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी वळवणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोकणात जवळपास तीन हजार मिलीमीटर पाऊस पडत असला तरी एप्रिल, मे महिन्यांमध्ये अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. असे असताना पाणी अन्यत्र वळवण्याच्या शक्यतेमुळे कोकणातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चुळबुळ सुरू झाली आहे. कोयना वीजप्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते. यातून विजेचे उत्पादन तर होतेच, पण पाण्याच्या साठ्याचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी होत असतो. या प्रकल्पाचे जवळपास ३६ टीएमसी एवढे पाणी वीजनिर्मितीनंतर कोकणातील चिपळूणनजीकच्या वाशिष्टी नदीत सोडले जाते. चिपळूण शहराचा आणि तालुक्याचा काही भाग, गुहागर तालुक्याचा काही भाग त्याचबरोबर लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र येथील पाण्याची गरज भागवण्यासाठी कोयनेच्या अवजलाचा उपयोग होतो. तथापि, ही गरज फारच थोडी आहे. या पाण्याचा उपयोग कसा करावा, यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या नेतृत्वाखालील या समितीने कोयना अवजलविषयक अहवाल दिला असून या समितीने कोयना अवजल कोकण विकासासाठी कसे वापरावे, त्यासंदर्भात शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी करायची असेल तर सरकारला पुरेसा निधी द्यावा लागेल. या तज्ज्ञ समितीचा अहवाल येऊन आठ वर्षे झाली तरी कोकणला कोयना अवजलाचा उपयोग करून घेण्यासाठी शासनस्तरावरून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. राज्यांच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणातील अनेक धरणे व छोटे पाटबंधारे प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. तिलारीसारख्या आंतरराज्य प्रकल्पातून वीजनिर्मितीसह पाणीपुरवठ्याचे मुद्दे मार्गी लागले असले तरी कोकणातील एकूण धरणांच्या पाणी साठवण क्षमतेचा पुरेपूर उपयोग केला जात नाही. कोकणातील लोकच पाण्यापासून वंचित असताना येथील पाणी अन्यत्र द्यायला येत्या काळात हरकत घेतली जाऊ शकते. भविष्यात कोकणातील जलवापरासाठी येथील लोकप्रतिनिधींना, पर्यावरणतज्ज्ञांना, सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र यावेच लागेल.

@@AUTHORINFO_V1@@