कर्नाटक : फोन टॅपिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019   
Total Views |



डळमळीत झालेले कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या मार्गांचा वापर झाला होता की नाही, यामागील सत्य सीबीआय चौकशीतूनच बाहेर येईल. आपली सत्ता टिकविण्यासाठी आपल्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांचे फोन टॅप करण्याचे प्रकार काही देशाला नवीन नाहीत. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यामुळे, एकेकाळचे कुमारस्वामी यांचे समर्थक असलेले ए. एच. विश्वनाथ यांनी, आपल्यासह ३०० नेत्यांचे फोन टॅप होत होते, असा जो आरोप जाहीरपणे केला आहे, त्यात तथ्य नाही, असे कसे म्हणणार?


कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना त्या राज्यावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याबरोबरच, त्यांच्या आधीच्या सरकारच्या कारकिर्दीत जे गैरप्रकार घडले, त्यामध्ये लक्ष घालावे लागले. कर्नाटकमधील मंत्रिमंडळ आज घोषित होण्याची अपेक्षा आहे. आपल्या मंत्रिमंडळाची संख्या ३४ पर्यंत वाढविता येत असली तरी मुख्यमंत्री येडियुरप्पा तूर्त १७ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करणार असल्याच्या बातम्या आहेत. मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर विरोधकांकडून, मंत्रिमंडळ विलंबासंदर्भात ज्या वावड्या उठविल्या जात आहेत, त्यांना साहजिकच पूर्णविराम मिळू शकतो. दुसरीकडे, कर्नाटक राज्यात सध्या एक प्रकरण गाजत आहे. ते प्रकरण आहे फोन टॅपिंगचे! कुमारस्वामी यांच्या कारकिर्दीत सुमारे ३०० नेत्यांचे फोन टॅप केले जात होते, असा जो आरोप जनता दल (संयुक्त) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि बंडखोर नेते ए. एच. विश्वनाथ यांनी कुमारस्वामी सरकारवर केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणी चौकशी व्हावी की नाही, याबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उलटसुलट मतप्रवाह आहेत. त्यातूनच आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा केली आहेकर्नाटक राज्यातील सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे, कुमारस्वामी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर राहिलेले एम. बी. पाटील आदी काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे म्हटले आहे. पण, कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी मात्र, फोन टॅपिंगचा आरोप फेटाळून लावला आहे. राज्याच्या गुप्तचर खात्याची जबाबदारी सांभाळलेल्या सिद्धरामय्या यांना, कोणाचे फोन टॅप केले जात आहेत, याची पूर्ण माहिती होती, असा आरोप ए. एच. विश्वनाथ यांनी केला असला तरी सिद्धरामय्या यांनी त्या आरोपांचे खंडन केले आहे. सिद्धरामय्या या संदर्भात बोलताना म्हणाले की, "फोन टॅपिंग? मला त्याबद्दल काही माहिती नाही. त्यांना त्या प्रकरणाची चौकशी करू द्या आणि जे दोषी ठरतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करू दे. फोन टॅपिंग हा अत्यंत गंभीर विषय आहे," असेही त्यांनी भाष्य केले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी फोन टॅपिंग आरोपांचे जोरदार खंडन केले आहे. आपल्या कारकिर्दीत असे काही घडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी करायलाही हरकत नाही, अगदी त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मदत घ्यायलाही हरकत नाही, असे कुमारस्वामी यांनी उपरोधाने म्हटले आहे.

 

कुमारस्वामी यांनी जरी असे म्हटले असले तरी, सत्तेला चिकटून राहण्यासाठी कुमारस्वामी यांनी असे उद्योग केले असल्याचा थेट आरोप भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला आहे. कुमारस्वामी यांच्या कारकिर्दीत फोन टॅपिंग प्रकरण घडल्याचे लक्षात घेता, ते खरोखरच किती प्रामाणिक आहेत याबद्दल शंका येते. सत्तेला चिकटून राहण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधकांचे, सहभागी काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धरामय्या आणि अन्य असंतुष्ट आमदारांचे फोन टॅप करण्याचे प्रकार केले, असा आरोप जगदीश शेट्टर यांनी केला आहे. या प्रकरणामागे जे कोणी आहेत, अगदी कुमारस्वामी जरी असले तरी कायद्यानुसार त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी शेट्टर यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, येडियुरप्पा यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करताना, "भाजपने सीबीआयचा वापर 'राजकीय सूडबुद्धीने' करू नये," असेही म्हटले आहे. कर्नाटकमधील जनता दल (संयुक्त) आणि काँग्रेसचे सरकार वाचविण्यासाठी त्या दोन्ही पक्षांकडून किती खटपटी लटपटी करण्यात आल्या, हा ताजा इतिहास आहे. कर्नाटकमधील सत्ता भाजपच्या हाती जाऊ नये, म्हणून अनेक प्रकारे मोडते घालण्याचे प्रयत्न त्या दोन्ही पक्षांकडून करण्यात आले. पण, ते सरकार वाचविण्यात काही त्यांना यश आले नाही.

 

कुमारस्वामी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे त्या राज्यातील तारणहार असलेले नेते डी. के. शिवकुमार यांनी मात्र फोन टॅपिंग वगैरे काही झालेच नाही, असे म्हटले असून याबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांचे खंडन केले आहे. पण, शिवकुमार यांना वगळता काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याने हे आरोप फेटाळून लावलेले नाहीत. शिवकुमार म्हणतात, "फोन टॅपिंग घडलेलेच नाही... मीही त्याची चौकशी केली आहे. हे सर्व खोटे आहे. असे प्रकार घडण्यास काही वावच नाही. आमचे काँग्रेस आणि जनता दल (संयुक्त) यांचे संयुक्त सरकार यामध्ये गुंतलेले नाही. काँग्रेसचे अनेक नेते, फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी करीत असताना शिवकुमार मात्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची बाजू घेताना दिसत आहेत. अन्य बंडखोरांसह ए. एच. विश्वनाथ यांनी, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. "काँग्रेस-जनता दल (संयुक्त) युतीच्या सरकारमधून बाहेर पडून राजीनामे दिलेल्या माझ्यासह अनेक नेत्यांचे फोन फोन टॅप होत होते," असे विश्वनाथ यांनी म्हटले आहे. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. "मी जर या प्रकरणात गुंतलो असतो, तर मी गडबडून गेलो असतो. माझ्याकडे बोट दाखविले जावे, असे काहीही माझ्याकडून घडलेले नाही," असे त्यांनी म्हटले आहे.

 

डळमळीत झालेले कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या मार्गांचा वापर झाला होता की नाही, यामागील सत्य सीबीआय चौकशीतूनच बाहेर येईल. आपली सत्ता टिकविण्यासाठी आपल्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांचे फोन टॅप करण्याचे प्रकार काही देशाला नवीन नाहीत. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यामुळे, एकेकाळचे कुमारस्वामी यांचे समर्थक असलेले ए. एच. विश्वनाथ यांनी, आपल्यासह ३०० नेत्यांचे फोन टॅप होत होते, असा जो आरोप जाहीरपणे केला आहे, त्यात तथ्य नाही, असे कसे म्हणणार? त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा जो निर्णय कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे! भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आधीच्या सरकारने जे अप्रिय निर्णय घेतले होते, ते मागे घेऊन विद्यमान भाजप सरकारने एक चांगली सुरुवात केली आहे. टिपू सुलतानाने कर्नाटकमधील हिंदू जनतेवर केलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करून त्याची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसच्या सरकारने जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचे कृत्य केले होते. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी असे कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. आता फोन टॅपिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामध्ये कोणाकोणाचे हात अडकले आहेत ते लवकरच दिसून येईल!

@@AUTHORINFO_V1@@