राणेंचा 'झंझावात'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019   
Total Views |



महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणात जी वादळी व्यक्तिमत्त्वे झाली, त्यात माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांचे नाव अग्रभागी आहे. हे व्यक्तिमत्त्व बेधडक आहे, बिनधास्त आहे, रोखठोक आहे आणि काहीसे वादग्रस्तही आहे. येत्या शुक्रवारी त्यांच्या 'झंझावात'या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून 'झंझावात' हे नाव राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाला तसे अगदी साजेसेच म्हणावे लागेल. नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ शिवसेनेतून झाला. सुरुवातीला मुंबईत शाखाप्रमुख नंतर नगरसेवक, 'बेस्ट' समितीचे सलग तीन वर्षे अध्यक्षपद, त्यानंतर तळकोकणातून आमदारकी, मंत्रिपद, त्यानंतर मुख्यमंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद व आता दिल्लीत खासदारकी अशी आजवरची राणे यांची राजकीय कारकीर्द. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राणे यांनी अपार कष्ट आणि जिद्दीच्या बळावर शून्यातून आपले राजकीय विश्व निर्माण केले. मात्र, राणे त्यांच्या टिपिकल स्वभाववैशिष्ट्याप्रमाणे ते आजही 'अस्वस्थ' आहेत. नारायण राणेंची सध्याची अस्वस्थता आजही भल्याभल्यांची झोप उडवू शकते. त्यांची आणि शिवसेनेची जुगलबंदी आजही अव्याहतपणे सुरू आहे. मात्र, हेच राणे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने आजही व्याकुळ होतात. आपण केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच इथवर पोहोचलो, हे ते वारंवार प्रांजळपणे कबूल करतात. पण ही कबुली देत असतानाच शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाबाबत मात्र कडवी भाषा वापरतात. सहा महिने का असेना, नारायण राणे यांना राज्याचे प्रमुखपद (मुख्यमंत्रिपद) मिळाले होते. त्यावेळी त्यांच्या कार्यक्षमतेची ओळख सर्वांनाच झाली. प्रशासनावर पकड कशी ठेवायची आणि सरकारी बाबूंकडून कामे कशी करून घ्यायची, हे त्यांना पक्के माहीत आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी विधानसभेत जी भाषणे केली, ती सखोल अभ्यासाशिवाय अशक्य होती. राणे यांच्या व्यक्तिमत्त्वात अभ्यास, उत्तम मांडणी, आक्रमकपणा असे सर्व गुण आहेत. सध्या ते राज्यसभेत खासदार असले तरी आजही कोकणातील महत्त्वाच्या विषयावर विधानसभेत चर्चा सुरू झाली की, राणेंची हमखास आठवण आल्याशिवाय राहत नाही.

 

बंडखोर...

 

'बंडखोरी'हा शब्ददेखील उच्चारणे शिवसेनेत ज्यावेळी अशक्य होते, त्यावेळी नारायण राणे यांनी बंडखोरी करून शिवसेनेला अक्षरशः आव्हान दिले. राणेंशी लढताना शिवसेना आपल्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बॅकफूटवर गेली होती. त्यावेळी ते तर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेच, पण त्यांनी त्यांच्या त्यावेळच्या शिलेदारांना पण निवडून आणले. हा शिवसेनेसाठी आजही एक मोठा धक्का मानला जातो. राणे यांनी काँग्रेसमध्ये मोठ्या दिमाखात जरी प्रवेश केला असला तरी काँग्रेसमध्ये ते कधी रूळलेच नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अजिबात'काँग्रेसी'नाही. 'जे पोटात आहे तेच ओठातून मांडणे' या बाळासाहेबांच्या संस्कारात त्यांची राजकीय जडणघडण झाली असल्याने राणेंचा बेधडकपणा काँग्रेसमध्येही तसाच राहिला. त्याचा त्यांना वेळोवेळी फटकाही बसला. एकदा तर पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केल्याने त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. अखेर न राहवून ते काँग्रेसमधूनही बाहेर पडले व त्यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्थापन केला. भाजपमध्ये जायचे म्हणून राणे काँग्रेसमधून बाहेर पडले खरे, पण त्यांचा भाजपप्रवेश काही होऊ शकला नाही. त्यांना त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा लागला. सध्या राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजबूत आहे. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा राजकीय मर्यादा आहेत. फक्त तीन विधानसभा मतदारसंघ व अर्धा लोकसभा मतदारसंघ जिल्ह्यात असल्याने राणेंसारखा राज्यस्तरीय 'स्टार' नेता नाही म्हटले तरी जिल्ह्यापुरताच मर्यादित झाला. सध्या कोकणालाही अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून पूरबाधितांसाठी भरघोस निधी आपल्या जिल्ह्यांकडे वळवत असताना पूर व अस्मानी संकटांचा बळी ठरलेल्या कोकणातील आमदार, खासदार, मंत्री मात्र चिडीचूप दिसतात. अशावेळी 'नारायण राणे' या व्यक्तीची खूप उणीव भासते. कदाचित राणे पुन्हा संसदेतून विधानसभेत येऊही शकतात, तशी राजकीय गणितेही तळकोकणात मांडली जात आहेत. आगामी काळात राणेंना त्यांचा पक्ष कोकण, मुंबईसह राज्याच्या अन्य भागांत वाढवावा लागेल किंवा पक्ष विसर्जित करून मोठ्या पक्षात यावे लागेल. असे झाले तरच राणेंचे महाराष्ट्राच्या राजकारणातील नाव अबाधित राहील.

@@AUTHORINFO_V1@@