गुंजन : एक लढवय्यी ‘कारगिल गर्ल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |



अनेक वीरांचे हौतात्म्य आणि शौर्याची किंमत चुकवून भारताने कारगिल युद्ध जिंकले. या युद्धात शेकडो जवानांचे प्राण वाचविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या लढवय्या ‘कारगिल गर्ल’च्या आयुष्याविषयी...

 

स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रांत प्रगती करत असून ती पुरुषांच्या तुलनेत अजिबात मागे राहिलेली नाही. संशोधन, डॉक्टर, अभियंता, अंतराळ अशा कित्येक क्षेत्रांत स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून रणांगणातही तिने आपले धैर्य, शौर्य दाखवून दिले आहे. भारतीय सैन्यदलात पुरुषांप्रमाणेच काही स्त्रियांनीही मोलाची कामगिरी बजावली असून ‘शौर्य पुरस्कारां’वर आपले नाव कोरले आहे. 1999च्या कारगिल युद्धादरम्यान शेकडो जवानांचे प्राण वाचविणाऱ्या लढवय्या ‘कारगिल गर्ल’ महिला ‘फायटर पायलट’ गुंजन सक्सेना यांचेही योगदान अविस्मरणीय आहे. युद्धभूमीवर स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता शेकडो घायाळ भारतीय सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या गुंजन सक्सेना यांचे कार्य प्रत्येकाला अभिमा वाटावा, असेच.

 

गुंजन सक्सेना यांचा जन्म 4 जून, 1972 साली दिल्ली येथे झाला. लहानपणापासूनच त्या शिक्षणात हुशार. शालेय परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गुंजन यांनी मोठेपणी पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. गुंजन यांचे वडील आणि दोन्ही मोठे भाऊ हे भारतीय लष्करात असल्याने लहानपणापासूनच त्यांच्याही सैन्यात जाण्याची इच्छा होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी लढाऊ विमान उड्डाण घेताना पाहिले आणि सैन्यात ‘फायटर पायलट’ होण्याचा मनोमन निर्धार केला. यासाठी त्यांनी आधीपासूनच तयारी करण्यास सुरुवात केली. दैनंदिन शैक्षणिक जबाबदार्‍यांव्यतिरिक्त ‘फायटर पायलट’ बनण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू केली. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 1994 साली भारतीय वायुसेनेने पहिल्यांदा महिलांना वैमानिक होऊन देशसेवेची संधी देण्याचे ठरवले. यासाठी गुंजन यांनी अर्ज केला. सक्सेना या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या 25 प्रशिक्षणार्थी महिला पायलट्सच्या बॅचमध्ये निवडल्या गेल्या. त्याकाळी महिलांना वायुसेनेत प्रवेश देण्याबद्दल अनेकांचा आक्षेप होता. कारण, या ठिकाणी काम करायचे म्हणजे प्रचंड शारीरिक कष्ट आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण, गुंजन सक्सेना यांनी भारतीय वायुसेवेत काम करत हे दाखवून दिले की, स्त्रियासुद्धा ‘फायटर पायलट’ होऊ शकतात. त्यांच्यातसुद्धा ही क्षमता नक्कीच असते. भारतीय वायुसेनेत पहिल्या ‘महिला फायटर’ बनत त्यांनी भारतीय तरुणींपुढे एक नवा आदर्श प्रस्थापित केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

वायुसेनेतफायटर पायलट’ म्हणून निवड झाल्यानंतरही पुढचा काळ आणखीन कठीण जबाबदार्‍यांचा होता. ही जबाबदारी वाटते तेवढी सोपे नसल्याची त्यांनी अनेकवेळा मुलाखतींदरम्यान सांगितले. गुंजन सांगतात की, “या कामात मानसिक त्रासही सहन करावा लागत असे. पुरुषांच्या तुलनेत आम्हीही काही कमी नाही, असे अनेकदा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजाची तशी मानसिकताच नव्हती. त्यामुळे काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी आम्ही फायटर महिला पायलट संधीच्या शोधात होतो. ती संधी आम्हाला कारगिल युद्धाने 1999 साली दिली. या युद्धाच्या रूपाने स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळाली.”

 

1999 साली जेव्हा कारगिल युद्ध सुरू झाले, तेव्हा युद्धभूमीवर घायाळ झालेल्या भारतीय सैनिकांना तातडीने उपचार पोहोचविण्यासाठी लढाऊ विमानांनी सैन्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी दोघा महिला वैमानिकांना मिळाली. ‘फ्लाईट लेफ्टनन्ट’ गुंजन सक्सेना आणि ‘फ्लाईट लेफ्टनन्ट’ श्रीदिव्या राजन यांची यासाठी निवड झाली. ‘फायटर जेट’ विमानांमध्ये दोन वैमानिक असणे गरजेचे असते. त्यामुळे गुंजन यांच्यासोबत श्रीदिव्या राजन यांनीही यावेळी सहभाग घेतला. लढाऊ विमाने चालवण्याचा तसा फारसा अनुभव या दोघींनाही नव्हता. पण, त्यांनी यशस्वीपणे अशा ठिकाणी विमाने आणि हेलिकॉप्टर्स चालवली, जिथे पाकिस्तानी सैन्य सातत्याने हल्ला करत होते. विविध शस्त्रास्त्रे वापरून पाकिस्तानी सैन्य समोर दिसेल त्यांच्यावर हल्ला करत होते. जोरदार युद्ध सुरू होते आणि भारतीय लष्कराला या युद्धासाठी ‘फायटर पायलट’ची आवश्यकता होती. त्यामुळे महिला पायलट्सना पाचारण करण्यात आले आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची जबाबदारी सोपवण्यात आली. यासोबतच ‘सप्लाय ड्रॉप्स’ आणि युद्धाच्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची जागा शोधण्याची जबाबदारीसुद्धा त्यांना देण्यात आली. गुंजन आणि श्रीदिव्या यांचे लहान ’चिता’ हे हेलिकॉप्टर निःशस्त्र होते, तसेच शत्रूंच्या हल्ल्यात ते पूर्णपणे असुरक्षित होते. पण, तरीही या दोन शूर महिलांनी कशाचेही भय न बाळगता, उत्तर काश्मीरच्या धोकादायक पर्वतीय क्षेत्रात हेलिकॉप्टर उडवले. एकदा पाकिस्तानी सैन्याने गुंजन यांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने रॉकेटही सोडले. पण, केवळ दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात हुकले. गुंजन आणि श्रीदिव्या या दोघींना असे अनेक अनुभव आले, जिथे मृत्यू अगदी दारात उभा होता. अखेर भारताचा या युद्धात विजय झाला आणि गुंजन यांना ‘शौर्यवीर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. सध्या त्या नवख्या महिला ‘फायटर पायलट्स’ना भारतीय वायुसेनेत प्रशिक्षण देत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या कारगिल दिनानिमित्ताने या ‘कारगिल गर्ल’च्या शौर्याला सलाम! 

 
- रामचंद्र नाईक
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@