सर्वशक्तिमान ‘एफबीआय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


जॉन एडगार हूव्हरने अतिशय तडफेने आणि पोलादी शिस्तीने या दोन्ही प्रकारच्या मंडळींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्याने ‘एफबीआय’ला अत्यंत कार्यक्षम आणि सर्व शक्तिमान यंत्रणा बनवलं.

 

अतिश्रीमंतीमुळे वेळ कसा घालवावा, असा प्रश्न पडलेल्या एका अमेरिकन महिलेने ‘समाजसेवा’ - चुकलो- ‘सोशल वर्क’ करायचं ठरवलं. बर्‍याच फोनाफोनीनंतर तिला असं सांगण्यात आलं की, सध्या एका संस्थेमार्फत तुरुंगात शिक्षा भोगणार्‍या महिला कैद्यांशी संपर्क ठेवणं, त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न करणं, अशा स्वरूपाचा एक प्रकल्प चालवत आहेत. त्यानुसार हिने एका महिला कैद्याशी पत्र किंवा दूरध्वनी याद्वारे संपर्क ठेवायचा होता. मात्र, सुरुवातीला तिला त्या महिला कैद्याचं नाव सांगण्यात येणार नव्हतं. फक्त ‘बी-८४११५१’ एवढ्या कैदी क्रमांक संदर्भावरून संपर्क साधायचा होता.

 

हिने पत्र लिहिलं- "प्रिय, ‘बी ८४११५१’ मी तुला ‘बी-८’ असं म्हणू शकते का?" किश्श्याचं तात्पर्य - अमेरिकनांना कोणत्याही गोष्टीचं लघुरूप करण्याची ‘शॉर्टफॉर्म’ करण्याची भयंकर हौस असते. त्यानुसार ‘फेड’ म्हणजे ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन.’ अमेरिकेची अत्यंत शक्तिमान अशी अंतर्गत गुप्तचर संस्था. तसे त्या संस्थेला नावाच्या आद्याक्षरांवरून ‘एफबीआय’ असे म्हटले जाते, पण सर्वसामान्य लोकांच्या तोंडात रुळलेलं नाव म्हणजे ‘फेड.’दुसरं महायुद्ध’ या घटनेने संपूर्ण जगावर अतिशय दूरगामी परिणाम घडवले. त्यापैकी एक परिणाम म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इ. पश्चिम युरोपीय महासत्ता खलास झाल्या आणि पूर्व युरोपातील सोव्हिएत रशिया व अटलांटिक समुद्रापार असलेली अमेरिका या दोन नव्या महासत्ता उदयाला आल्या.

 

सन १७७६ मध्ये ‘अमेरिका’ हे नवं राष्ट्र निर्माण झालं. या नव्या राष्ट्राने युरोपबरोबर कटाक्षाने फक्त ‘व्यापारी संबंध’ ठेवले. अमेरिकन नेत्यांना युरोपमधील जुनाट आणि गलिच्छ राजकारणाचा तिटकारा होता. त्यामुळे ते पुढची १००-१२५ वर्षे युरोपीय ‘भानगडबाज राजकरणा’पासून कटाक्षाने अलिप्त राहिले. पुढे १९१४ ते १९१८च्या पहिल्या महायुद्धात अमेरिका ब्रिटन-फ्रान्सच्या बाजूने उतरली खरी; पण ‘तुम्हाला तिकडे युरोपात काय झक मारायची ती मारा. आम्हाला त्यात खेचू नका,’ हा अमेरिकन नेत्यांचा द़ृष्टिकोन फारसा बदलला नाही. अमेरिकन नागरिक तर सरळच प्रश्न विचारायचे की, ‘युरोपात शांती नांदावी म्हणून आम्ही आमची तरुण पोरं तिथल्या रणांगणांवर मरायला का पाठवावीत?’

 

अमेरिकेचा हा ‘अलिप्त बाणा’ दुसर्‍या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळातही सुरू होता. चर्चिलच्या लक्षात आलं की, हिटलरचा झंजावात रोखणं हे एकट्या ब्रिटनला झेपणारं काम नाही. फ्रान्स तर पहिल्या धडाक्यालाच कोसळला होता. तेव्हा चर्चिलने अनेक प्रयत्नांनी रुझवेल्टला पटवला. चर्चिलच्या जिगरबाजपणामुळे ब्रिटिश राष्ट्र ठामपणे युद्धात उभं राहिलं, हे तर खरेच. पण, तेवढे पुरेसे नव्हते. युद्ध जिंकण्यात अमेरिकेच्या सर्व प्रकारच्या मदतीचा फार मोठा वाटा होता. या युद्धाने अमेरिका खडबडून जागी झाली. आपल्या प्रचंड सामर्थ्याचा तिला प्रत्यय आला. आपण महासत्ता बनू शकतो, नव्हे इतिहासाच्या एका वळणाने आपल्याला महासत्ता बनवूनच सोडलं आहे, हे तिच्या लक्षात आलं. मग तिने आपलं ‘अलिप्तपणा’चं धोरण झटकून टाकलं आणि ती ‘सज्ज’ झाली.

 

कशासाठी? ‘लोकशाही’ आणि ‘सामाजिक न्याय’ या नव्या मानवी मूल्यांच्या रक्षणांसाठी? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उदात्त मूल्यांसाठी? शांतता, सुरक्षितता आणि संस्कृती या चिरंतन मूल्यांसाठी? छे! या सगळ्या शाळेबिळेत नाहीतर जाहीरसभेत बोलायच्या गोष्टी झाल्या. ’सगळे सुखी होवोत. सगळे निरामय होवोत. सर्वांचं कल्याण होवो’ अशा धोरणाने शासन राबवायला अमेरिका म्हणजे काही प्राचीन हिंदू सम्राटांची वारसदार नव्हती. तिचं धोरण स्पष्ट होतं. ‘महासत्ता बनणं’ म्हणजे जगावर राज्य करणं, पण अमेरिका फार हुशार होती. आता काळ बदललाय. आता इंग्रज किंवा फे्रंच यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या देशांवर प्रत्यक्ष सत्ता गाजवणे हे अशक्य आहे, हे तिने ओळखले. मग तिने अप्रत्यक्ष सत्ता गाजवण्याचे असंख्य मार्ग शोधून काढले. ‘सत्ता गाजवणं’ म्हणजे तरी काय, तर वेगवेगळ्या प्रकारे त्या देशाचं शोषण करणं. अमेरिका आज संपूर्ण जगाचं शोषण करते आहे. याचा एक साधं गमक आहे. ते असं - आज अमेरिकेची लोकसंख्या एकूण जगाच्या फक्त चार टक्के एवढीच आहे. पण, या चार टक्के लोकांची जीवनशैली एवढी फाजील सुखवस्तू आहे की, ते एकंदर जगाच्या साधनसामग्री-रिसोर्सिसपैकी ४० टक्के साधनसामग्री फस्त करत आहेत. तिची लूट आहे. यालाच ‘चंगळवाद’ असं म्हणतात.

 

दुसर्‍या महायुद्धापूर्वी आणि त्यानंतर सोव्हिएत हुकूमशहा स्टॅलिन याचं एक भव्य स्वप्न होतं. ते म्हणजे, ‘साम्यवादी क्रांतीची निर्यात जगभर सर्वत्र करायची आणि सगळं जग ‘लाल’ करून सोडायचं.’ परंतु, सोव्हिएत रशियाचं लाल तारू आर्थिक खडकावर आपटून फुटलं आणि स्टॅलिनचं स्वप्न बाल्टिक समुद्राच्या तळाला गेलं. अमेरिकेने मात्र कुठल्याही क्रांतीच्या निर्यातीची कल्पना करत न बसता शांतपणे आपला ‘चंगळवाद’ जगभर पसरवला. चंगळवादाच्या आहारी गेलेले देशोदेशींचे लोक स्वतःच्या हाताने आपल्या देशातला पैसा अमेरिकेकडे पाठवतात किंवा स्वतःच अमेरिकेत स्थलांतरीत होतात. आपल्या मायदेशाच्या खर्चाने विकसित झालेली आपली बुद्धिमत्ता ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’ अमेरिकेच्या कामाला लावतात. हे पटकन लक्षात न येणारं, सूक्ष्म असं शोषण आहे. अमेरिका हा आधुनिक स्वर्ग आणि त्यातील सगळी भौतिक सुखं या शोषणावरच तर उभी आहेत.

 

अशा तर्हेने आपल्याला जगावर राज्य करता यावं आणि हे शतकृत्य करण्यातला जो आपला प्रमुख प्रतिस्पर्धी सोव्हिएत रशिया, त्याने आपल्यावर मात करू नये, म्हणून दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकेने असंख्य अत्याधुनिक यंत्रणा उभारल्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, बलवान सैन्य, मजबूत प्रशासन यांच्याच बरोबर प्रभावी गुप्तहेर यंत्रणा. आर्य चाणक्य ‘हेरां’ना ‘राजाचे डोळे’ असं म्हणतो. गुप्तहेरांविना शासन आंधळं असतं. युद्धोत्तर काळात अमेरिकेने दोन गुप्तचर यंत्रणा उभारल्या. पहिली सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी- ‘सीआयए.’ अ‍ॅलन डल्लेस या इसमाने ‘सीआयए’ला कमालीची शक्तिमान बनवली. परकीय राष्ट्रांकडून अमेरिकेला कोणताही धोका पोहोचणार नाही, हे पाहणं त्याचबरोबर सर्व शत्रू आणि मित्र अशा परकीय राष्ट्रांमध्ये हर प्रकारे हेरजाळी पसरवून त्यांची अद्ययावत माहिती आपल्या प्रशासनाला देणं, हे तिचं काम होतं. हे काम तिने इतक्या कौशल्याने आणि नंतर इतक्या निर्घृणपणे केलं की, ‘सीआयए’च्याकारवायांच्या कथा वाचताना खुद्द अमेरिकन नागरिकांनादेखील कौतुक वाटण्याबरोबरच अनेकदा संतापही येऊ लागला.

 

दुसरी यंत्रणा म्हणजे ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ म्हणजे ‘एफबीआय’ किंवा ‘फेड.’ अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, हे पाहणं, अशा संभाव्य धोक्यांचा बंदोबस्त करणं, हे तिचं काम होतं. ‘सीआयए’ला जसा अ‍ॅलन डल्लेस मिळाला, तसा ‘एफबीआय’ला जॉन एडगर हूव्हर मिळाला. हा इसमही अत्यंत कुशल, तरबेज आणि तितकाच पाताळयंत्री व निर्दयी होता. थोडक्यात, अमेरिकन गुप्तहेर खात्याला आवश्यक त्या गुणांनी युक्त होतात्या काळात अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला मुख्य धोका होता तो, समाजवादी-साम्यवादी विचारांच्या आकर्षणाने भारावलेल्या कलावंत, लेखक पत्रकार, राजकारणी यांच्यापासून आणि अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या माफिया टोळ्यांपासून. जॉन एडगार हूव्हरने अतिशय तडफेने आणि पोलादी शिस्तीने या दोन्ही प्रकारच्या मंडळींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्याने ‘एफबीआय’ला अत्यंत कार्यक्षम आणि सर्व शक्तिमान यंत्रणा बनवलं.

 

हूव्हरच्या यशामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेचाही मोठा वाटा आहे. हूव्हरच्या माणसांनी शोधून काढलेल्या समाजवादी-साम्यवादी, त्यांचे ‘सहप्रवासी’ यांना माफिया गुंडांना प्रशासनाने विलंब न लावता गजाआड केलं, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. नाहीतर, गुप्तचर यंत्रणांनी तत्परतेने पुरवलेल्या माहितीवर प्रशासनाने काही कारवाईच करायची नाही किंवा कुणा हितसंबंधी राजकारणी नेत्याने मतपेटीवर लक्ष ठेवून प्रशासनाला कारवाई करू द्यायची नाही, असं घडलं असतं तर हूव्हर काय करू शकणार होता? पण, अमेरिकेला फक्त आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून राजकारण करायचं नव्हतं, तिला आगामी कित्येक वर्षं किंबहुना अनंत काळापर्यंत आपलं ‘महासत्ता’ हे स्थान टिकवून धरायचं होतं. त्यामुळे हूव्हरने बोट दाखवलेल्या व्यक्तींवर ताबडतोब कारवाया झाल्या. झटपट निर्णय घेतले गेले. ‘एफबीआय’चादबदबा सर्वत्र पसरला.

 

अलीकडेच काही वर्षांपूर्वी ‘एफबीआय’च्या गुप्त कागदपत्रांचा खजिना अभ्यासकांसाठी खुला करण्यात आला. अमेरिकन गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय यांचा तो इतिहासच होता. असंख्य ज्ञात गुन्हेगारी प्रकरणांमधील प्रतिबंधक उपाय याबद्दलची माहिती त्यातून जगाला कळली. पण एवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, नुकताच ‘एफबीआय’च्या अतिगुप्त माहितीचा आणखी एक खजिना अभ्यासकांना खुला करून देण्यात आला आहे. हे असं अभिलेखागार आपल्या संस्थेत आहे, हे तिथल्या अनेक जुन्या कर्मचार्‍यांनासुद्धा माहिती नव्हतं. स्वतः हूव्हर आणि ‘फेड’चे काही अतिवरिष्ठ अधिकारी यांनाच फक्त या अभिलेखागारात नेमक्या कोणत्या धारिका(फाईल्स) आहेत, याची माहिती होती.

 

आता त्या धारिका अभ्यासणारे संशोधक ती माहिती वाचताना थक्क होत आहेत. समाजवादी-साम्यवादी विचारांचे लोक, त्यांचे सहप्रवासी, माफिया गुंड यांच्याबरोबर अमेरिकन समाजतल्या सर्वच क्षेत्रांमधल्या महत्त्वाच्या व्यक्तींची इतकी बारीकसारीक माहिती हूव्हरने गोळा करून ठेवलेली आहे की, त्याच्या जागृकतेला दादच दिली पाहिजे. परंतु, तरीही हा खजिना तसा अपूर्णच आहे. कारण, काही ‘अतिअतिगुप्त’ धारिका आपल्या मृत्यूनंतर ताबडतोब नष्ट कराव्यात, असा हूव्हरने आदेश दिला होता. १९७२ साली हूव्हर मेल्यावर तो आदेश तंतोतंत पाळला गेला. गुप्तचर यंत्रणांबद्दल अभ्यासक आथन थिओंहॅरिस म्हणतो, "गुप्तता हा त्यांचा प्राण असतो, तर माहिती हे त्यांचं सामर्थ्य असतं."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@