‘वेद’ : सर्वज्ञानाचे आगर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |


 


आज ग्रंथरूपात असलेल्या वेदांच्या चारही संहिता कालौघाने नाहीशा झाल्या किंवा या वेदशास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जरी खुंटली तरी अंतरंगातील ज्ञानात्मक वेदराशी कधीच नष्ट होऊ शकत नाही. कारण, वेद हे परमेश्वराचे अमर काव्य आहे.


यस्मात्पक्वादमृतं सम्बभूव,

यो गायत्र्या अधिपतिर्बभूव।

यस्मिन् वेदा निहिता विश्वरूपा:

तेनौदनेनाति तराणि मृत्युम्॥

(अथर्ववेद-४/३५/६)

 

अन्वयार्थ-

 

(यस्मात्) ज्या (पक्वात्) शिजलेल्या, परिपक्व अशा ओदनरूप शक्तीद्वारे (अमृतम्) शाश्वत सुखपूर्ण जीवनाची, मोक्षाची (सम्बभूव) प्राप्ती होते. (यस्मिन्) ज्यांमध्ये (विश्वरूपा:) सर्व पदार्थांचे, वस्तूंचे, विद्यांचे निरूपण करणारे (वेदा:) चार वेद (निहिता:) सामावलेले आहेत. (य:) जो (गायत्र्या:) गायत्री छंदाचा (अधिपति:) स्वामी, अधिपति (बभूव) झालेला आहे. (तेन) त्या (ओदनेन) भाताद्वारे मी (मृत्युम्) मृत्यूला (अतितराणि) ओलांडून जातो.

 

विवेचन

 

जगातील सर्व सुखांचे मूलभूत कारण एकमेव ‘परब्रह्म’ असून त्याच्यापासूनच सर्व प्रकारच्या विद्यांचा उगम झाला आहे. तोच गायत्री व इतर छंदांचा अधिपती आहे. म्हणूनच त्या भगवंताच्या उपासनेने मानव मृत्यूला दूर सारू शकतो, असा भाव वरील मंत्रात दडला आहे.

 

विशेष म्हणजे, इथे परमेश्वराकरिता ‘ओदन’ म्हणजे ‘भात’ असा शब्द उल्लेखिला आहे. तांदळापासून बनलेला ‘भात’ हा तर सर्वांच्या नित्य परिचयाचाच आहे. विशेष करून स्वयंपाकगृहात जेव्हा भात शिजवला जातो, तेव्हा तिथे दरवळणारा सुगंध हा सर्वांना मनस्वी आल्हादित करतो. तो भक्षण करीत असता, त्याचा आस्वाद अत्यंत आनंददायक असल्याची सर्वांनाच प्रचिती येते. पण, या सांसारिक भोज्य भातापेक्षा सृष्टीनिर्मात्या भाताची मात्र चवच निराळी! ‘ओदन’ हा शब्द क्लेदनार्थक ‘उन्दी’ या धातूपासून तयार झाला आहे. ‘क्लेद्यता’ म्हणजे ‘ओलेपणा’ किंवा ‘आर्द्रता!’ जो आपल्या भक्तजनांच्या हृदयांना आनंदरसाने आर्द्र (ओले) करतो, तो परमेश्वर ‘ओदन’ म्हणून ओळखला जातो. यालाच ‘ब्रह्मौदन’ असेही म्हणतात. यामुळे उपासकांना अमृतानंदाची प्राप्ती होते. पण, हे सहजासहजी मिळत नाही. या भगवंतरूपी ओदनाला आपल्या आत्मसाधनेच्या अग्नीमध्ये शिजवावे लागते. मोठी साधना करावी लागते. त्याशिवाय अमृतत्व मिळणार नाही आणि अमरत्वही लाभणार नाही. या ओदनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, तो गायत्री छंदाचा अधिपती आहे. वैदिक छंदामध्ये गायत्री छंदाला सर्व छंदांचे मुख मानले आहे. कारण, गायत्रीची अक्षरसंख्या वाढल्यामुळेच इतर छंद तयार होतात. ‘या गायन्तं त्रायते सा गायत्री।’ म्हणजेच जी गाणाऱ्यांचे रक्षण करते, ती ‘गायत्री’ होय.

 

या मंत्रांचा महत्त्वाचा आशयघन विषय म्हणजे याचे तिसरे चरण! ‘यस्मिन् वेदा: निहिता विश्वरूपा:।’ अर्थात, या परब्रह्मामध्ये नानाविध विद्या व ज्ञान-विज्ञानरूप चार वेद अंतर्भूत आहेत. आजच्या विवेचनाचा मूलभूत विषयदेखील हाच आहे. एक तर वेद ही परमेश्वरापासून उदयास आलेली अपौरुषेय वाणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती वैश्विक ज्ञानाची अधिष्ठात्री आहे. ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड व विज्ञानकांड या सर्व विषयांचे रहस्य या वेदांमध्ये दडले आहे आणि ते केवळ एकदेशीय नव्हे, तर जागतिक स्वरूपाचे (विश्वरूप) आहे. आज ग्रंथरूपात असलेल्या वेदांच्या चारही संहिता कालौघाने नाहीशा झाल्या किंवा या वेदशास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जरी खुंटली तरी अंतरंगातील ज्ञानात्मक वेदराशी कधीच नष्ट होऊ शकत नाही. कारण, वेद हे परमेश्वराचे अमर काव्य आहे. सर्व ज्ञान ईश्वरात व त्याने निर्मिलेल्या निसर्गातच दडले आहे. त्यासाठीच प्रज्ञावंत विद्वान मंडळी आणि बुद्धिमान ऋषिमुनींना त्या ब्रह्मोदन रूप ईश्वराच्या ज्ञानसाधनेने साक्षात्कार करावा लागतो. मोठी तपश्चर्या करावी लागते. सृष्टीच्या प्रारंभी ज्या अग्नी, वायू, आदित्य, अंगिरा या ऋषींच्या अंत:करणात ईश्वराने वेदज्ञानाचा प्रकाश पेरला. तसेच नंतरच्या ऋषिमुनी व चिंतनशील वैज्ञानिकांनीदेखील त्या विद्यांचा विस्तार केला, म्हणूनच आपल्याला वेदविद्या सुरक्षितपणे मिळाली व पुढे अग्रक्रमित झाली. मध्ययुगातील शास्त्रज्ञांनी पदार्थविद्येचा शोध लावला. त्यापासून अनेक स्थूल व सूक्ष्म वस्तू बनविल्या. परिणामी, आजचा मानव भौतिक सुखाच्या शिखरावर पोहोचला आहे. यावरून स्पष्ट होते की, जगातील सर्व प्रकारच्या विद्या वेदांतूनच प्रकाशित झाल्या आहेत. या वेदज्ञानाच्या प्रकाशाने सारे जग आजपर्यंत प्रकाशित झाले व होत आहे. याद्वारेच मानव आपली व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रगती साधू शकतो आणि आपली शारीरिक, मानसिक, आत्मिक व बौद्धिक उन्नतीदेखील करू शकतो, ते याच वेदज्ञानाच्या आधारे!

 

‘वेद’ म्हणजे केवळ मंत्रसंहिताच नाही, तर विश्वाच्या प्रत्येक वस्तूमध्ये दडलेले सूक्ष्मज्ञान होय. ‘विद् ज्ञाने,’ ‘विद् सत्तायाम्,’ ‘विद् लाभे’ आणि ‘विद् विचरणे’ असे ‘विद्’ धातूचे चार अर्थ होतात. याच विद्यांचे ‘अपरा’ व ‘परा’ असे दोन विभाग केले जातात. ‘अपराविद्या’ म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार संहिता आणि शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष ही वेदांगे! यांनाच ‘सैद्धान्तिक ज्ञान’ म्हणतात; तर ‘पराविद्या’ म्हणजे वेदज्ञानातून सूक्ष्मरूप धारण केलेले ‘उपनिषद’ व ‘दर्शन वाङ्मय’ होय. याचेच दुसरे नाव ‘अध्यात्म विद्या’ होय. यालाच ‘साक्षात्कारी ज्ञान’ असेही म्हणतात. वेदांमधील मंत्रांची रचना बुद्धिपूर्वक केली आहे, त्यात कोणतीही त्रुटी नाही. ‘बुद्धिपूर्वा हि वाक्यकृतिर्वेदे।’ असे वैशेषिक दर्शन म्हणते. मनुस्मृतीत ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’ असेही प्रतिपादन करून सर्व पवित्र कार्यांचे मूळ वेदात असल्याचे नमूद केले आहे. महाभारतातील शान्तिपर्वात महर्षी व्यास म्हणतात-

 

अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा।

आदौ वेदमयी दिव्या यत: सर्वा: प्रवृत्तय:॥

 

अर्थात, सृष्टीच्या प्रारंभी स्वयंभू परमेश्वराने वेदरूपी नित्य अशा दिव्यवाणीचा प्रकाश केला आहे. ज्यामध्ये मानवाच्या सर्व प्रवृत्ती व कृती समाविष्ट आहेत. थोडक्यात, वेद हे अखिल ब्रह्माण्डाच्या ज्ञानाचे केंद्र आहे. आध्यात्मिक, सामाजिक तत्त्वांसह भौतिक ज्ञान दडले आहे. मानवाने कशा प्रकारे जीवन जगावे? याची आचारसंहिता वेदांमध्येच आढळते. अशी ही दिव्यवाणी आम्हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरो हीच कामना...!

 
 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@