बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी; एनडी स्टुडिओ मार्फत साकारणार कलाप्रकल्प!

    29-Jun-2025   
Total Views |
 

maharashtra dadasaheb phalke picture city in belgaum smart city



मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला “दादासाहेब फाळके चित्रनगरी”चा नवा अध्याय आता बेळगावमध्ये सुरू होत आहे. बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये नव्याने साकारत असलेल्या कलाप्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रकल्पाची मूळ संकल्पना प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची होती. त्यांच्या एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून सुमारे साडेतीन एकर जागेत विविध भारतीय राज्यांतील सांस्कृतिक खेडी, हवाई दालन, कलाप्रदर्शन यांसारख्या घटकांचा समावेश असलेला एक अनोखा प्रकल्प उभा राहणार होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही वर्षे रखडले आणि दुर्दैवाने नितीन देसाई यांच्या निधनानंतर ते थांबले. यानंतर महाराष्ट्र शासनाने एन. डी. स्टुडिओचा ताबा घेत, या प्रकल्पाची धुरा पुन्हा आपल्या हाती घेतली. आता हा प्रकल्प गोरेगाव फिल्म सिटीच्या अनुभवसंपन्न व्यवस्थापनाद्वारे पूर्ण केला जाणार आहे.

आजच्या शुभारंभ प्रसंगी चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्त अधिकारी चित्रलेखा खातू, सहायक लेखाधिकारी महेश भांगरे, बेळगाव स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका सयीद अफरीन, तसेच चित्रनगरी व्यवस्थापन संचालिका स्वाती म्हसे पाटील आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांची उपस्थिती लाभली. या प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक आमदार अभय पाटील यांनी विशेष समन्वय साधला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रकल्पाला चालना मिळाली.

भारताच्या विविध प्रांतांतील सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा हा प्रकल्प एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख मिलाफ असलेला हा सांस्कृतिक प्रकल्प, महाराष्ट्राच्या चित्रसृष्टीच्या विस्ताराला आणि पर्यटनाला एक नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.