मठ आणि महंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2019
Total Views |



महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत संतांची थोर परंपरा आहे. मराठी माणूस हा मूलतःच भावूक असल्याने तो संतांना ‘अवतारी पुरुष’ मानतो. अशा या अवतारी संताने केलेले कार्य हे त्या त्या परिस्थितीत अलौकिक असते. ते ‘ईश्वरी कार्य’ असे आपण म्हणत असतो. त्यामुळे एका संताची दुसर्‍या संताशी तुलना करणे बरोबर नाही. प्रत्येक संताची कार्यपद्धती ही त्याच्या स्वभावधर्मानुसार असल्याने ती इतरांपेक्षा वेगळी असते. हे जरी खरे असले तरी, एखाद्या संतकार्याचे अलौकिकत्त्व व त्या संताने केलेले प्रेरणादायी कार्य, त्यातील वेगळेपणा स्पष्ट जाणवतो. अशावेळी त्या संताच्या कार्याचा गौरव करताना इतर संतांना उणेपणा येतो, असे समजण्याचे कारण नाही. समर्थ रामदासांच्या बाबतीत त्यांच्या कार्याचा आढावा घेताना हे प्रत्ययाला येते.

 

रामदासांनी तीर्थाटनाच्या निमित्ताने १२ वर्षे पायी देशभ्रमण करून हिंदुस्थानाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती न्याहाळली. या तीर्थाटनात काही नवीन नव्हते. रामदासांच्या अगोदर ज्ञानेश्वर, नामदेव यांनीही तीर्थयात्रा केल्या होत्या. संत नामदेवांनी पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका नेली होती. शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ या पूजनीय ग्रंथात ‘नामदेव की गुरुबानी’ हा नामदेवांच्या कीर्तनातील गुरूविचारांचा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे महाराष्ट्रासाठी गौरवाचे होते. एकनाथांनीही मराठीतून लिहिलेल्या ग्रंथाची महती काशीला नेली. तो काळ असा होता की, त्यावेळी आध्यात्मिक ज्ञान हे फक्त संस्कृत भाषेतच दिले जावे, असे काशीच्या पंडितांचे आदेश होते. आध्यात्मिक ज्ञान प्राकृत किंवा प्रादेशिक भाषेत देण्याला या पंडितांचा विरोध होता. एकनाथांनी भागवत ग्रंथाच्या एकादश स्कंधावर मराठीतून टीकाग्रंथ ‘एकनाथी भागवत’ लिहिला. त्याचे पहिले पाच अध्याय त्यांनी पैठणला लिहिले. पण, नंतरचे २६ अध्याय काशी मुक्कामी लिहून तो ग्रंथ पूर्ण केला. अशा या मराठी भाषेतून लिहिलेल्या आध्यात्मिक ग्रंथाला नाथांनी काशीच्या पंडितांकडून मान्यता मिळवून देण्याचा पराक्रम केला. असं म्हणतात की, काशीच्या पंडितांची खात्री पटल्यावर त्यांनी ‘एकनाथी भागवत’ ग्रंथाची हत्तीवरून काशीत मिरवणूक काढली. काशी या तत्कालीन संस्कृतप्राधान्य असलेल्या नगरीत मराठी भाषेचा बहुमान झाला. पण, तरीही एकनाथांनी उर्वरित आध्यात्मिक कार्य पैठणला राहूनच केले.

 

तुकारामांनी देहूच्या पंचक्रोशीत राहून आपल्या अभंगसृष्टीने, तत्त्वज्ञानाने आभाळाएवढे विशाल व्यक्तिमत्त्व उभे केले. (तुका आकाशाएवढा) तथापि आपल्या संप्रदायाची बळकट संघटना स्थापन करून तिला हिंदुस्थानभर पोहोचवण्याचे कार्य फक्त रामदासांनी केले. हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी व म्लेंच्छांच्या संस्कृतीचे आक्रमण थोपवण्यासाठी संघटितरीत्या कार्य करण्याची कल्पना फक्त रामदासांच्याच मनात आली, हे विसरून चालणार नाही. हिंदुस्थानातील अनेक प्रांतात गावोगावी स्थापन केलेल्या या हिंदूसंस्कृती रक्षक संस्कार केंद्रांचा खटाटोप सांभाळण्याचे महान प्रशासकीय कौशल्य रामदासांसारख्या बुद्धिमान संताजवळ होते. त्यासाठी स्वत: महंत तयार करून त्यांना जागोजागी पाठवण्यासाठी जी शिस्त लागते ती निष्णात रामदासांजवळ होती. रामदासांचे व्यक्तिमत्त्व एवढे प्रभावी होते की, शिष्यांनी त्यांचा शब्द कधी मोडला नाही. रामदासांनी हा प्रचंड उद्योग आरंभला व यशस्वी पार पाडला. कारण, ‘व्याप तितका संताप’ या विचाराऐवजी ‘व्याप तितके वैभव’ असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ‘जितका जास्त व्याप, तितके त्याचे जास्त वैभव’ अशी त्यांची विचारधारणा होती. यापूर्वी कोणत्याही संताने एवढी मठस्थापना केली नव्हती.

 

रामदासांच्या काळात मुसलमानांच्या सुफीसंतांच्या जागोजागी स्थापन केलेल्या मठांनी पद्धतशीरपणे हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर आक्रमण चालवले होते. या मठांतील सुफीसंतांचे मुख्य काम मुसलमान धर्माचा प्रसार करणे व हिंदूंना बाटवून मुसलमान करणे हे होते. या कामासाठी राजकीय बळ त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांना कसलीच चिंता नव्हती. या सुफींचा महागुरू मोइनोद्दीन ख्वाजा चिस्ती याने किती हिंदूंना बाटवून मुसलमान केले, याचा हिशेबच नाही. हे सारे रामदासांनी तीर्थाटन काळातील भ्रमंतीत प्रत्यक्ष पाहिले होते, खात्रीलायक लोकांकडून ऐकले होते. रामदासांसारख्या विलक्षण संताला हे खुपत होते. त्या काळचे हिंदू लोकही पीराला भजू लागले होते. तत्कालीन ब्राह्मणांच्या घरांतून पीरासाठी नैवेद्य नेला जात होता. हिंदूंचे हे झालेले अधःपतन रामदासांच्या मनात काहूर माजवून जात होते. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयातून ते स्वाभाविकपणे व्यक्त होत होते -

 

तीर्थक्षेत्रे मोडिली ।

ब्राह्मणस्थाने भ्रष्ट आली ।

सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

 

अशा परिस्थितीत निराश स्थितीत, दैवावर हवाला ठेवून, हातावर हात ठेवून बसणार्‍यांपैकी रामदास नव्हते. त्यासाठी काहीतरी करायला हवे हे स्वामींनी हिंदुस्थानभर पायी भ्रमंतीतच ठरवले असावे. त्यामुळे एकांतप्रिय, तत्त्वचिंतक, ब्रह्मरसास्वाद घेण्याचा रामदासांचा मूळ स्वभाव असला तरी, तो बाजूला ठेवून त्यांना मठांची, राजकारणाची उठाठेव करावी लागली. लोकांचे हाल पाहावेनात म्हणून रामदासांना लोकप्रपंच करावा लागला. लोकांना निवृत्तीमार्गाकडून वळवून प्रवृत्तीमार्गाकडे कसे आणता येईल, याचा त्यांनी ध्यास घेतला. म्लेंच्छांच्या राजवटीत हिंदू समाजावर अत्याचार होत होते.

 

हिंदू संस्कृतीवर होणारे आक्रमण हिंदूंच्या ध्यानात येत नव्हते. ते रामदासांनी ओळखले. त्यामुळे हिंदूंना संस्कृती अधःपतनातूनवाचवून त्यांना हिंदवी राज्यासाठी तयार करावे, असे स्वामींच्या मनात होते. या कामासाठी हिंदुस्थानभर मठस्थापना करण्याची व तेथे आपल्याला हवे तसे महंत नेमण्याची कल्पना स्वामींच्या मनात उत्पन्न झाली असावी. स्वामींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखादी कल्पना त्यांना सुचली, तर ती केवळ कल्पना न राहता ती प्रत्यक्षात कशी उतरेल, यासाठी ते प्रयत्नशील असत. आपले ध्येय साध्य होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, हे उद्योग व्यवसायातील व्यवस्थापन तंत्र त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते. रामदासस्वामींना आधुनिक व्यवस्थापन तंत्र माहीत होते, असे आपण म्हणू शकत नाही. तथापि, स्वामींची वैचारिक क्षमता व बुद्धिमत्ता पाहता, आधुनिक व्यवस्थापन तंत्र शिकवणार्‍यांना रामदासांच्या वाङ्मयातून काही विचार नक्की मिळतील. विशेषतः संघटित कार्य करण्याची पद्धती, ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशीलता, आळस नाही, विवेकपूर्ण विचारातून परिस्थितीचे अवलोकन, पृथक्करण, ध्येयाचा वेध घेणे इ. गोष्टींबाबत मार्गदर्शन रामदासांच्या वाङ्मयीन अभ्यासातून मिळू शकेल. व्यावसायिक व्यवस्थापन क्षेत्राला हे विचार उपयुक्त ठरतील. या दृष्टीने आज अभ्यासकांचे प्रयत्न चालू आहेत. दासबोधातून आध्यात्मिक गोष्टी शिकण्याबरोबर प्रापंचिक गोष्टीही शिकण्यासारख्या आहेत. ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका ।ही त्यांनी शिष्यांना दिलेली शिकवण सर्वांना माहीत आहे.

 

सुफीसंतांनी चालवलेले हिंदू संस्कृतीवरील आक्रमण रोखून धरावे. तसेच वैचारिक अधःपतनझालेल्या हिंदूंना परत मार्गावर आणावे यासाठी सुफींच्या मठांना तोडीस तोड असे मठ आपण उभारावे, असे स्वामींच्या मनात आले असावे. ‘जशास तसे’ हा मराठी बाण्याचा मार्ग समर्थांनी निवडला असावा. त्या उद्देशाने त्यांनी सर्व हिंदुस्थानभर हिंदूमठांची उभारणी करण्याचे कार्य चालवले. सुफींच्या मठनिर्मितीच्या कार्यास प्रतिक्रिया म्हणून रामदासांनी हिंदूमठांची उभारणी केली असे म्हणता येणार नाही. समर्थ स्वयंप्रज्ञ होते. जनसामान्यांच्या उद्धाराविषयी त्यांच्या मनात तळमळ होती. हिंदू संस्कृतीला र्‍हासापासून वाचवून तिला उभारी देण्याचे संघटित कार्य रामदासांना करायचे होते. तेव्हा सुफीसंतांच्या मठांशी टक्कर तर द्यावी लागणार होती. राजवाडे म्हणतात, “रामदासांनी निर्माण केलेले वाङ्मय मुसलमानी आक्रमणाचे प्रतिक्रियात्मक रूप आहे. यादृष्टीने विचार करता रामदासांची मठस्थापना प्रतिक्रियात्मक असू शकेल. कारण, स्वामींनी मठस्थापनेसाठी निवडलेली ठिकाणे ही खास वैशिष्ट्यपूर्ण व सुफींना शह देणारी होती, हे मठांच्या स्थान निवडीवरून दिसून येते.”

 

स्वामींनी हिंदुस्थानभर ११०० मठ स्थापन केले होते, असे सांगितले जाते. शंकरराव देव म्हणतात, “त्यांच्या जवळील टिपणात मठांची संख्या १०२९ आहे.” म्हणजे ती ११००च्या जवळपास आहे. तथापि काही अभ्यासकांना पुराव्याअभावी ही संख्या अतिशयोक्त वाटते. अशा टीकाकारांना उत्तर देताना श्री. म. माटे त्यांच्या ‘श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान’ या ग्रंथात म्हणतात की, “...स्वामींनी स्थापन केलेल्या मठांची संख्या ११०० असो वा नसो, ११००च्या ऐवजी स्वामींनी ११० मठ जरी स्थापन केले असतील तरी, ते पुष्कळच आहेत.” स्वामींच्या मतप्रसाराचा झपाटा आणि त्यावर नेमलेल्या महंतांची कार्यपद्धती पुढील लेखात पाहू.

 
 - सुरेश जाखडी 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@