सर्वसामान्यांना दिलासा : कांदा होणार स्वस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019
Total Views |

onion_1  H x W:



नवी : गेल्या काही दिवसांपासून सर्व सामान्यांना रडवणारा कांदा आता काहीसा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातून १.१० लाख टन कांदा १० डिसेंबरपासून आयात केला जाणार आहे. सरकारने ५० ते ५२ रुपये प्रतिकिलो दराने हा कांदा मागवला आहे. सध्या बाजारात कांद्याची किंमत ही दीडशे रुपये प्रतिकिलो आहे. कांदा दरवाढीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी केंद्राची गुरुवारी सायंकाळी बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत आयात कांदा भारतात दाखल होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

 

देशभरातील कांदा उत्पादनात घट झाल्याचा परिणाम सध्या बाजारपेठेवर झाला आहे. महाराष्ट्रात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटकाही कांदा उत्पादनावर झाल्याचे पाहायला मिळाले. एकूण बाजारपेठेच्या ३० टक्के कांदा हा महाराष्ट्रातून येतो. परिणाम राज्यातही कांद्याचे दर चढेच आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात कांद्याचे एकूण उत्पन्न हे ८०.४७ लाख टन इतके होते. यंदा ते ६५ लाख टन इतके झाले आहे. एकूण १५.४७ लाख टन इतके कमी उत्पादन झाले आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरावर कांद्याची पहिली फेरी १० डिसेंबर रोजी दाखल होणार आहे, त्यात एकूण १ हजार १६० टन कांदा मागवण्यात आला आहे. २४ डिसेंबरपर्यंत साडेतीन हजार टन कांदा मुंबई उपनगरातील बाजारपेठांसाठी आयात केला जाणार आहे.

 

भारतात एकूण सहा हजार टन कांदा आत्तापर्यंत आयात करण्यात आला आहे. तुर्की, नेदरलॅण्ड येथून कांदा आयात करण्यात आला आहे. तीन हप्त्यांमध्ये सहा हजार टन कांदा आयात करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत एक हजार टन कांदा आयात केला जाईल, आयात कांद्यासाठी व्यापाऱ्यांना ४५ रुपये भाव द्यावा लागत आहे. या आयातीमुळे कांद्याचे भाव घसरतील, अशी आशा आहे. सरकारतर्फे कांद्याच्या साठाबाजारावरही छापेमारी करण्यात येत आहे.

 

मनमाड बाजार समितीत कांद्याला विक्रमी ८ हजार रुपये भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला विक्रमी आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. एवढा विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरीदेखील आनंदित झाले आहेत. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वोच्चभाव समजला जात आहेअवकाळी पाऊस व हवामानात झालेल्या बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. केंद्र सरकारने विदेशातून कांदा आयात करण्याचे ठरविले असून कांदा बाजारात आलाही आहे. पण, बाजार समितीत कांद्याचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे शेतकरी जरी आनंदित झाला असला तरी कांद्याचे भाव सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे असल्याने ग्राहक मात्र हवालदिल झाले आहेत.

 

दरम्यान, मनमाड शहर व परिसरात सध्या पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. मालेगाव, सटाणा या परिसरात हलका पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून वातावरण असेच कायम राहिल्यास कांद्यावर ‘घुबडा रोग’ पडण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून वर्तविली जात आहे. असे झाले तर उत्पादनात घट होईल व शेतकर्यांना भाव वाढूनदेखील पदरात काही पडणार नसल्याचे मत येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@