माणुसकीची ऊब प्रोजेक्ट वॉर्म विशेष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


ेोि_1  H x W: 0


डिसेंबर महिन्यात म्हणे कोणी संता येतो आणि गुपचूप कित्येकांना भेटवस्तू देऊन जातो, पण इस्लामपुरातल्या व्ही. एस. नेर्लेकर कर्णबधिर मुलांच्या शाळेत ७३ चिमुकल्यांना निःस्वार्थ माणुसकी जपणाऱ्या मुंबईतील 'टीम' 'हैप्पीवाली फिलिंग'ने गुपचूप नव्हे तर खुलेआम निखळ माणुसकीची ऊब आणि आनंदरूपी भेटवस्तू देऊन माणुसकीची मिसाल जिवंत ठेवली.


प्रोजेक्ट वॉर्म विशेष नक्की काय भानगड आहे? आणि माणुसकीची ऊब हे काय प्रकरण आहे? असा प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती सांगतो. नोव्हेंबर, डिसेंबर ऐन थंडीचे महिने. गुलाबी थंडी तशी तर सर्वांनाच हवीहवीशी वाटते पण याच बोचऱ्या थंडीचा सर्वाधिक त्रास गरीब बेघर कुटुंबांना होतो, ज्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसते, अशी बरीच कुटुंबे आपला उदरनिर्वाह शहरातील फूटपाथवर, मोठाल्या ब्रिजखाली किंवा मंदिर परिसराजवळ करत असतात, तर अनेक गावाच्या वेशीबाहेर शेतीसाठी मजुरी मिळेल, या आशेने झोपड्या बांधून राहत असतात. अर्थातच महागाई इतकी जास्त वाढल्याने प्रत्येकालाच खेड्याकडे किंवा शहरी भागात स्वतःचं घर घेणं शक्य होत नाही आणि गरिबीमुळे कित्येकांना भाड्याचे पैसे जमतील इतकीही मिळकत होत नाही आणि नशिबी आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन असा उघड्यावर आपला संसार मांडावा लागतो. तर अशा कुटुंबांना 'प्रोजेक्ट वॉर्म विशेस'च्या माध्यमातून मुंबईतील हॅप्पीवाली फिलिंग नावाची टीम थंडीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी चादर वाटप करण्याचं कार्य गेल्या एका वर्षापासून करत आहे. म्हणूनच सुरुवातीला नमूद केले आहे, ही फक्त चादर नसून निःस्वार्थ माणुसकीची जणू ऊबच पसरविण्याचं एक माध्यम आहे. पहिल्याच वर्षी मुंबईतील भायखळापासून ते नवी मुंबईतील पनवेल भागापर्यंत, तसेच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर अशा ठिकठिकाणी गरजूंमध्ये ११०० चादरींचे वाटप करण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या इतक्या साऱ्या चादरी नक्की कुठून आणल्या जातात? आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण प्रत्येक गोष्टीत जास्तीचं नियोजन करून ठेवतो, म्हणजे कोणी पाहुणे घरी मुक्कामी आले तर त्यांना देण्यासाठी जास्तीचे अंथरूण पांघरूण जमा करून ठेवतो. पण मग जमवलेलं हे जास्तीचं साधन किती वेळा उपयोगात येतं? मग असं हे जास्तीचं साधन गरजू लोकांना कामी यावे यासाठी टीम हॅप्पीवाली फिलिंगच्या सदस्यांनी जागोजागी लोकांना चादर दान करण्याचे आवाहन केले आणि त्या आवाहनाला निःस्वार्थ असे अनेक मदतीचे हात जोडले गेले आणि पहिल्याच वर्षात अकराशेचा आकडा गाठणं शक्य झालं.

 

हे झालं उपक्रमाच्या पार्श्वभूमीबद्दल, तर यंदाच्या वर्षी या उपक्रमाचा श्रीगणेशा इस्लामपूर येथील व्ही. एस. नेर्लेकर शाळा आणि वसतिगृहातील चिमुकल्यांना चादर वाटप या माध्यमातून करण्यात आला. इस्लामपूर येथील दत्तनगर टेकडीजवळ मूकबधिर मुलांचे वसतिगृह आहे, तेथील मुलांना पांघरूणाची आणि चादरीची आवश्यकता असल्याची मागणी टीमकडे आली आणि ती लगेचच निखळ माणुसकीची ऊब ही थेट इस्लामपुरात पसरली. चादरीसोबतच तेथील मुलांना श्रवणयंत्रणा ठेवण्यासाठी लॉकरची आवश्यकता होती, त्याचीदेखील पूर्तता करण्यात आली आणि त्यानंतर मुलांसोबत खो खो, क्रिकेट, कबड्डी, कांदाफोड, रश्शीखेच यासारखे खेळ खेळून सर्वांनी बेधुंद आनंद लुटला आणि संपूर्ण दिवसात टीमला त्या मुलांसोबत संवाद साधताना कोणतीही अडचण आली नाही, कारण म्हणतात ना, एकदा मनं जुळली की शब्दांची गरजच भासत नाही, अगदी असंच काहीसं घडलं. या वर्षी प्रोजेक्टचा श्रीगणेशाच जर इतका गोड झाला असेल तर, यावेळी पुढील दोन महिन्यांत 'वॉर्म विशेस' अजून बरीच निःस्वार्थ मदतीची ऊब सर्वत्र पसरणार, यात शंका नाही. तरी ही माहिती वाचत असणाऱ्या कोणालाही आपल्या घरातील जास्तीची चादर दान करावयाची असल्यास तुम्ही या उपक्रमात नक्की सहभागी व्हा. असो, हॅप्पीवाल्या फिलिंगसाठी अनेक प्रसंग येत असतात. त्या दिवशीही स्वप्नीलचा असाच फोन आला, "अरे, आज आमच्या मंडळाचा साईभंडारा होता. भंडारा खूप छान झाला, पण महाप्रसाद थोडा शिल्लक राहिला आहे. मी एक दोन ऑनलाईन संस्थांना संपर्क केला जेवण देण्यासाठी, पण बारा वाजून गेलेत त्यामुळे त्यांची उशिरा सर्व्हिस नाही, तर काहींच्या बाँड्री लिमिटमध्ये आमचा पत्ता बसत नाही." मी त्याला सांगितले, "तू नवी मुंबईला येशील का ते जेवण घेऊन?" स्वप्नील जेवण घेऊन घणसोलीला आलाही.

 

वाचायला थोडं विचित्र वाटेल पण खरं बघायला गेलं तर हल्ली समाजसेवा हा विषय पण ट्रेंडी होत चाललाय, आत्ताचा ट्रेंड असा आहे की, रविवारी आपल्याला सुट्टी असते. मग या दिवशी आपल्या सोयीने आपण आपले वाढदिवस किंवा त्या महिन्यातले खास दिवस गोरगरिबांत जाऊन साजरे करतो. त्यामुळे रविवारी बहुतेककरून वस्त्यांमध्ये अन्नदान होत असतं, पण इतर दिवशी मात्र बऱ्याच जणांना उपाशीपोटी निजावं लागतं. तरी मी लगेच पटापट सात वस्त्यांमध्ये फोन केले, रात्रीचे एक वाजून गेले होते, त्यामुळे दोन फोन अटेंडंट राहिले, तर दोन वस्त्यांमध्ये सर्व जेवले होते आणि जेवण सकाळपर्यंत राहील की नाही, याची मला कल्पना नव्हती. नेमक्या राहिलेल्या तीन फोनवर मला जेवणासाठी होकार मिळाला ( १. महापे ब्रीजखालील वस्ती २. कोपरखैरानी नोड ३. घणसोली खाडी वस्ती) बरोबर दीड वाजता एक क्वालिस, सोबत माणुसकीची जान असणारे सात साईभक्त बिल्डिंगखाली हजर झाले आणि मी आठवा वेडा त्यांना जॉईन झालो. मग आमची हॅप्पीवाली व्हॅन नमूद तीन वस्त्यांमध्ये दाखल झाली, पुढील वीस मिनिटांत साईंचा महाप्रसाद भुकेलेल्यांच्या मुखात जाताना पाहिला आणि आमची मनं तृप्त झाली. मनापासून आभार श्री साई सेवा मंडळ (रजि).भांडुप पश्चिम यांचे, ज्यांनी भंडाऱ्यातल्या महाप्रसाद शब्दाला खराखुरा न्याय दिला, बाकी भांडुपच्या भंडाऱ्याचा महाप्रसाद नवी मुंबईपर्यंत पोहोचला ही तर साईंचीच लीला, आम्ही सर्व निमित्तमात्र! शेवटी इतकंच सांगेन तुम्हीही एकदा तरी तुमच्याकडे असलेलं जास्तीचं कधीतरी एखाद्या गरजूला देऊन त्यातून मिळणारी जगावेगळी हॅप्पीवाली फिलिंग अनुभवून नक्की पाहा.

 

saf_1  H x W: 0 
 

- विजय माने

@@AUTHORINFO_V1@@