अवकाळीने झोडपले, कांद्याने रडवले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019   
Total Views |

 


कांदा आपल्या सर्वांच्याच जीवनातील एक मूलभूत जिन्नस. सध्या कांद्याचे दर आसमंताला भिडले आहेत. त्यामागील कारणे, त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम आदी बाबींचा घेतलेला हा सविस्तर आढावा...


नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आज देशातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा ८ ते ९ हजार रु. प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातदेखील कांद्याने शंभरीच्या पार आपले उड्डाण केलेले दिसते. त्यामुळे कांद्याचे वाढते दर सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे ठरत आहेत. पदार्थांची लज्जत वाढविणाऱ्या या कांद्याचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींबरोबरच खानावळ, उपाहारगृह, छोट्या हॉटेलचालकांना या वस्तूंचा वापर काटकसरीने करावा लागत असल्याचे चित्र सध्या गोदाकाठी दिसून येत आहे. दि. १९ सप्टेंबरपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्याची दिसून आली. १९ सप्टेंबरला कांद्याचे दर ५,१०० रु. प्रति क्विंटल होते. तेच दर आता ७,९०० रु. प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याने या दोन महिन्यांच्या कालावधीत उन्हाळ कांद्याच्या दरात सुमारे २,८०० रुपयांची वाढ झाली आहे.

 

कांदा का महागला?

 

परतीच्या पावसामुळे कांदा साठवण केलेल्या चाळीत पाणी शिरल्याने कांदा सडला. त्यातच गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. शेतातला कांदा काढणीला येताच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कांदा काढणी लांबणीवर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातला लाल कांदाही खराब होण्याची भीती आहे. कांदा खराब होण्याच्या भीतीने गेल्या वर्षीच अनेक शेतकऱ्यांनी कांदा विकून टाकला. त्यामुळे आताच्या हंगामात कांद्याची साठवण शिल्लक नसल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने कांदा दर वाढीस लागले आहेत.

 

कांद्यामुळे व्यापारीदेखील अडचणीत

 

कांद्यामुळे व्यापारीदेखील अडचणीत आले आहेत. सध्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचा दर आठ हजार रुपये क्विंटल आहे. कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून सरकारकडून परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे. आयात कांदा वातावरणात टिकला नाही म्हणून त्याला उठाव नाही. त्यातच जानेवारीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांदा व्यापारीदेखील अडचणीत आले आहेत.

 

गृहिणींच्या डोळ्यात पाणी

 

लासलगावसोबतच नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येदेखील कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आवक कमी तर मागणी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, कांद्याच्या भावात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमध्ये गृहिणींच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे. पावसाचा फटका बसल्याने यावर्षी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी साठवून ठेवलेला कांदा भिजून गेला आहे. त्यामुळे बाजारात आता कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. कांद्याचा केवळ २५ टक्के साठा शिल्लक असल्याने शेतकरीही अगदी पुरवून पुरवून कांदा बाजारात पाठवत आहेत. मागणी पूर्ण करता येईल इतका कांदा बाजारात नसल्याने कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

 

जानेवारी अखेरपर्यंत कांदा रडावणार

 

जोरदार पाऊस व त्यानंतर अवकाळीच्या तडाख्याने कांदापिकाचे मोठे नुकसान झाल्याने लाल कांद्याची अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत कांदा महागच राहण्याची चिन्हे आहेत. घाऊक बाजारात कांदादर विक्रमी आठ हजार रुपये क्विंटलवर गेल्याने किरकोळ बाजारात कांदा शंभर रुपयांच्या वर जाण्याची भीती आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये रोज साधारण साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक होते. डिसेंबरमध्ये ती विक्रमी असते. सध्या रोज सरासरी पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. मे महिन्यात शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा आता खराब झाला असून तो संपतही आला आहे. नवा लाल कांदा बाजारात येत आहे. परंतु, परतीच्या पावसाने या नवीन लाल कांद्याची प्रत घसरली आहे. परिणामी, यंदा कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ८ नोव्हेंबरनंतर बी पेरले. रोपांची वाढ होण्यास दीड महिना आणि त्यानंतर तीन महिन्यांनी कांदा बाजारात येईल, असे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.

 

लासलगाव येथील चार बड्या कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी

 

कांदा व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तसेच साठेबाजीच्या संशयावरून लासलगाव येथील चार बड्या कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या पथकाने मागील पंधरवड्यात धाडी टाकल्या होत्या. या कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय आणि कांदा साठवणुकीच्या खळ्यांवर एकाचवेळी पडलेल्या या छापासत्राने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दरम्यान, व्यापाऱ्यांनी या कारवाईच्या निषेधार्थ लिलाव बंदचे अस्त्र उपसले होते. कांदा व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार तसेच कांदा साठवणुकीच्या शक्यतेने लासलगाव येथील चार व्यापाऱ्यांची आयकर विभागामार्फत तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाच्या झालेल्या कारवाईत या अधिकाऱ्यांनी येथील चारही कांदा व्यापाऱ्यांची मागील पाच वर्षांपूर्वीच्या व्यवहाराच्या तपशीलाची कागदपत्रे तसेच कांद्याची असलेली साठवणूक तपासली असल्याची माहिती मिळाली आहे.

 

आयात कांद्याला उठाव नाही

 

"कांद्याने यंदा व्यापाऱ्यांचेही वांदे केले आहेत. सध्या लासलगाव बाजार समितीत कांदा आठ हजार रुपये क्विंटल आहे. कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून सरकारकडून परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे. आयात कांदा वातावरणात टिकला नाही म्हणून त्याला उठाव नाही. जानेवारीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे."

 

- अफजल शेख, कांदा व्यापारी

 

कांदा बाजारातही चढउतार कायम राहणार

 

"सध्या बाजारात चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा विक्रीला येत आहे. हा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने आवक कमी झाली आहे. पावसामुळे यावर्षी नवीन लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे या नवीन कांद्याची प्रतसुद्धा खराब झाली आहे. जोपर्यंत नवीन कांदा पुरेशा प्रमाणात बाजारात येत नाही, तोपर्यंत कांदा बाजारातही चढउतार कायम राहणार आहे."

 

- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

 

तीन महिन्यांनी कांदा बाजारात येईल

 

"मे महिन्यात शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा आता चाळींमध्ये खराब झाला असून तो संपतही आला आहे. नवा लाल कांदा बाजारात येत आहे. परंतु, परतीच्या पावसाने या नवीन लाल कांद्याची प्रत घसरली आहे. परिणामी, यंदा कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी 8 नोव्हेंबरनंतर बी पेरले. रोपांची वाढ होण्यास अजून दीड महिना आणि त्यानंतर तीन महिन्यांनी कांदा बाजारात येईल."

 

- संतोष गोरडे, कांदा उत्पादक शेतकरी

 

पदार्थांचे दर वाढू नये म्हणून कांद्याचा कमी वापर

 

"लासलगाव येथील भेळ भत्ता, खानावळ, उपाहारगृह, हॉटेलचालकांनाही या वाढलेल्या कांद्याच्या दराचा मोठा फटका बसला आहे. पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांमध्ये काटकसर करायची, तर चवीत फरक पडतो. हा फरक ग्राहकांना नाराज करणारा ठरत असल्याने, पदार्थांचे दर वाढू न देता शक्य तिथे वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोशिंबिरीत केवळ काकडी किंवा कांद्याऐवजी कोबीचा वापर केला जात आहे."

 

- रोहित वझरे, हॉटेल व्यावसायिक

@@AUTHORINFO_V1@@