मुंबईच्या बंदरावर आढळला 'हा' दुर्मीळ मासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019   
Total Views |



 
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - खोल समुद्रात वास्तव्य करुन क्वचितच समुद्राच्या बाह्य़ प्रवाहात आढळून येणारा दुर्मीळ सनफिश ससून बंदारात आढळून आला आहे. आज सकाळी दोन सनफिश येथील मत्स्य पुरवठ्यादाराकडे आढळले. मच्छीमारांमध्ये दुर्मीळ आणि संरक्षित मत्स्यप्रजातींबाबत प्रबोधन झाल्याने अशा दुर्मीळ प्रजातींची माहिती उजेडात येत आहे.

 
 

महाराष्ट्राच्या सागरी परिसंस्थेत दडलेली गुपिते अधूनमधून उघडकीस येत असतात. राज्यातील सागरी परिसंस्थेत अधिवास करुनही फार क्वचितच दिसणाऱ्या 'सनफिश'चे आज ससून डॉकमध्ये दर्शन घडले. 'मोला' या प्रजातीचे दोन 'सनफिश' मत्स्यपुरवठादाराकडे सापडले आहेत. या 'सनफिश'चे वजन प्रत्येकी ३४ आणि १७ किलो असल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. दुर्मीळ आणि संरक्षित मत्स्यप्रजातींबाबत मच्छीमार आणि मत्स्यपुरवठादारांमध्ये प्रबोधन झाल्याने अशा मत्स्यप्रजाती जाळ्यात सापडल्यास त्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून संरक्षित मत्स्यप्रजातींबाबत मच्छीमारांमध्ये जनजागृती निर्माण करुन त्यासंबंधीच्या माहितीचे संकलन करण्याचे काम नाखवा सागरी संशोधकांसमवेत करत आहेत. मुंबईत 'सनफिश'च्या दर्शनाची ही चौथी वेळ आहे. एप्रिल, २०१७ मध्ये सनफिश प्रजातीमधील ‘स्लेन्डर सनफिश’ प्रजातीचा मासा क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजारात आढळून आला होता. त्याचे वजन अंदाजे तीन किलो आणि लांबी दोन फूट एवढी होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी ससून बंदरात तब्बल चाळीस किलो वजनी आणि तीन फूट लांब 'ओशन सनफिश' (मोला मोला) प्रजातीचा 'सनफिश' सोमवारी बंदरामध्ये याच प्रजातीचा अंदाजे तीन फूट लांबीचा आणि तीस किलो वजनाचा 'सनफिश' आढळला.

 
 

 
( वस्तुसंग्रहालयात जतन केलेला सनफिश) 
 

तर यंदा आॅक्टोबर महिन्यात मोला प्रजातीचा सनफिश नाखवा यांना ससून बंदरावर सापडला होता. त्यांनी हा मासा जतन करण्याच्या उद्देशाने 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'च्या ताब्यात दिला होता. संग्रहालय प्रशासनाने या माशावरची जतन प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच तो प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणार आहे. सनफिश हा हाडांची संरचना असलेल्या मत्स्य प्रजातींमधील सर्वात वजनदार मासा असून त्याची अंडी देण्याची क्षमतादेखील सर्वात अधिक असल्याची माहिती 'वाईल्डलाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया'चे (डब्ल्यूटीआय) सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांनी दिली. समुद्रात सुमारे २०० ते ६०० मीटर खोलीत याचे वास्तव्य असते. जेलीफिश, स्विड, छोटे मासे या प्रकारचे सनफिशचे खाद्य असल्याचे त्यांनी सांगितले.


@@AUTHORINFO_V1@@