टिपू सुलतान जसा आहे तसा...

    15-Nov-2018   
Total Views |



शेकडो ब्राह्मणांना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, मुली-महिलांवर बलात्कार करणारा, आपल्या जनानखान्यात ठेवणारा एखादा शासक ‘महान’ असू शकतो? होय, भारतात असे नक्कीच होऊ शकते. स्वातंत्र्याआधी व त्यानंतरही देशात उगवलेल्या डाव्या-पुरोगामी-धर्मनिरपेक्षतावादी इतिहासकारांनी एका क्रुरकर्म्याला आपल्या दाढी कुरवाळू धोरणाचा भाग म्हणून इथल्या जनतेसमोर महान योद्ध्याच्या रुपातच पेश केले. अल्पसंख्य समुदायाच्या ओंजळीने पाणी पिण्यासाठी आसुसलेल्यांना इथल्या हिंदुंवर झालेल्या अत्याचाराचे कुठाराघात कधी दिसलेच नाहीत. पण, सत्य लपवण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते समोर येतेच, तद्वतच ‘दक्षिणेचा औरंगजेब’ म्हटल्या जाणार्‍या टिपू सुलतानचा हा भयानक इतिहास उघड्या डोळ्यांनी वाचलाच पाहिजे, अभ्यासलाच पाहिजे.

 

हिदूंच्या मानबिंदूंवर प्रहार आणि हिंदूंच्या धार्मिक आस्थेला, श्रद्धेला ठेच पोहोचविण्याची कृती करणे आजच्या सेक्युलॅरिझमचे पाईक झालेल्या तथाकथित पुरोगामी विचारवंत, बुद्धिजीवी, साहित्यिक, अभ्यासक, लेखक, इतिहासकारांचा जणू काही हक्कच झाला आहे. भारत, जिथे कधीकाळी सोन्याचा धूर निघत असल्याचे म्हटले जाई, त्याला पहिल्यांदा मुघलांनी, नंतर इंग्रजांनी लुटले. भारताला या लोकांनी केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक आघाडीवरही कंगाल केले. भारताच्या राजकीय स्वातंत्र्यानंतर आपण भौतिक प्रगती तर केली, पण धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावर देशाचे विघटन करणार्‍या लोकांवर आणि त्यांच्या विचारधारेवर अजूनही आपण अंकुश लावू शकलेलो नाही. देशाची शिक्षणपद्धती असो वा इतिहास लेखन, या लोकांच्या विकृतीतून आपण आजही बाहेर पडलेलो नाही. भारतीयांवर क्रूरपणे अत्याचार करणार्‍या आक्रमकांना महिमामंडित करणे तथा या देशातल्या शूरवीरांकडे दुर्लक्ष करण्यातून देशातल्या तरुणाईच्या मनावर प्रभाव पाडण्याचे जे काम काही पक्षपाती आणि पूर्वग्रहदुषित इतिहासकारांनी केले, त्याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. हिंदू समाजाच्या भावनांवर प्रहार करण्याच्या सत्राला पुढे नेण्याचाच एक भाग म्हणून कधी गोहत्येविरोधातील कायद्यालाच स्थगिती दिली जाते, तर कधी भारतीयांचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीलाच हिंदू चे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू शंकराचार्यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली जाते, तर इतिहासातील एका विकृतीला सार्वजनिकरित्या सन्मानित करण्याचे काम केले जाते, ही विकृती म्हणजे टिपू सुलतान. ज्याने केवळ हिंदूचे धर्मांतरण वा मंदिरांवरच हल्ले केले नाही, तर असंख्य हिंदू महिलांचा आणि लहान बालकांचा बळीही घेतला.

 

 
 

स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणविणार्‍या डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी लिहिलेल्या पाठ्यपुस्तकांपासून ते निरनिराळ्या ग्रंथांत टिपू सुलतान कसा धर्मनिरपेक्ष, साम्राज्यवादविरोधी आणि लोककल्याणकारी राजा होता, हेच शिकवले जाते. या मंडळींचा मुख्य प्रतिवाद असा असतो की, टिपू हा असा शासक होता, ज्याने वसाहतवादी ब्रिटिशांशी युद्ध केले, ब्रिटिशांनीही टिपूचे थोरपण मान्य केले, वगैरे वगैरे. याचमुळे सेक्युलर आणि डाव्या इतिहासकारांच्या मते टिपू सुलतान अठराव्या शतकातला स्वातंत्र्ययोद्धा होता, असे ठसवण्याचे काम केले जाते. याचा पुढचा भाग म्हणून आपल्या शासनकाळात टिपूने लोकहिताची कितीतरी कामे केली, अशी खर्डेघाशी या इतिहासकारांनी संधी मिळेल तिथे करून ठेवली. डाव्या इतिहासकारांचा हवाला देतच कर्नाटक सरकारने टिपू सुलतानला ‘महानायक’ घोषित करत टिपूची जयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला. पण, त्याच्या संपूर्ण जीवनाचे निरीक्षण केल्यास तो कुठेही धर्मनिरपेक्ष, लोककल्याणकारी राजा असल्याचे दिसत नाही, तर तो असहिष्णू, धर्मांध, अत्याचारी शासक असल्याचेच ठळकपणे उठून दिसते. टिपू सुलतानाने हिंदू आणि ख्रिस्त्यांसह जे जे बिगरमुस्लीम असतील अशा सर्वांविरुद्ध अत्याचाराचा कळस गाठला, लाखो लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले, हजारो मंदिरे तोडली. विशेष म्हणजे, टिपूने आपल्या हल्ल्यांतून चर्चनादेखील सोडले नाही.


 
 
 

टिपू सुलतान आणि वाद हा काही नवीन विषय नाही. १९९० साली संजय खान यांनी टिपू सुलतानवर एक दूरचित्रवाणी मालिका तयार केली होती. या मालिकेसाठी भगवान गिडवानी यांच्या ‘स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ या कादंबरीचा आधार घेतला होता, ज्यात टिपूला ब्रिटिशांविरोधात लढणार्‍या स्वातंत्र्ययोद्ध्याच्या रूपात आणि धर्मनिरपेक्ष शासकाच्या रूपात चित्रित करण्यात आले. पण, हे धडधडीतपणे ऐतिहासिक तथ्यांच्या विपरीत होते. कारण, या मालिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्याच्या सुनावणीवेळी टिपूची सगळीच खरीखरी कुंडली मांडली गेली. सदर सुनावणीवेळीच, ही मालिका टिपू सुलतानविषयक ऐतिहासिक तथ्य प्रस्तुत करत नाही, असेही सांगितले गेले. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी संजय खान यांना या मालिकेच्या प्रत्येक भागाच्या प्रसारणाआधी, ही मालिका ऐतिहासिक तथ्यांवर आधारित नसून ‘स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ या कादंबरीचे नाट्य रूपांतर आहे, अशी सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. म्हणजेच टिपू सुलतानचे करण्यात आलेले उदात्तीकरण इतिहासाला धरून नाही, तर केवळ एखाद्या कादंबरीकाराने आपल्या कल्पनाशक्तीचा पिसारा फुलवून केलेले रंजनात्मक चित्रण आहे, हे सिद्ध होते. टिपू सुलतानबद्दल निरनिराळे इतिहासकार निरनिराळ्या गोष्टी सांगतात-मांडतात. पण, टिपू सुलतानचा नेमका खरा-सत्य-वास्तव इतिहास काय, हे जाणून घेणे वाचक आणि या देशाचा राष्ट्रनिष्ठ नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य ठरते. योगायोगाने टिपू सुलतानची असली सच्चाई सांगणारे कितीतरी दस्तावेज, कागदपत्रे, पत्रे, टिपणे विविध अभिलेखागारांमध्ये, ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे सत्य जाणून घेण्यात कसलीही अडचण नाही, हे लक्षात घेतलेले बरे. टिपू सुलतानचा जन्म कधी झाला, याबाबतही एकवाक्यता नाही. कोणी १० नोव्हेंबर १७५० ही तारीख सांगतो, तर कोणी २० नोव्हेंबर १७५०. पण, यापैकी १० नोव्हेंबर याच दिवशी टिपू सुलतानने ७०० मेलकोट अय्यंगार ब्राह्मणांना फाशी दिली होती. याचाच दुखवटा म्हणून आजही कित्येक मेलकोट अय्यंगार लोक दिवाळी साजरी करत नाही. एवढेच नव्हे तर फक्त हिंदूच नव्हे, तर ख्रिस्ती समाजदेखील टिपू सुलतानच्या अशाच कृत्यामुळे विरोध करतात. कारण, टिपूने १७८४ साली मंगलोरचे मिलेग्रेस चर्च उद्ध्वस्त केले होते. शिवाय टिपू सुलतानने ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून ६० हजार ख्रिश्चनांनाही बंदी केले होते, ज्यांना म्हैसूरपर्यंत पायी चालवले गेले, ज्यात चार हजारांपेक्षा अधिक ख्रिश्चनांचे बळी गेले. कर्नाटकव्यतिरिक्त केरळ आणि तामिळनाडूदेखील टिपूच्या अत्याचारांना बळी पडल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. म्हैसूर साम्राज्यावर टिपूची राजवट १७८२ ते १७९९ पर्यंत होती आणि याचदरम्यान, ब्रिटिशशासित तामिळनाडूवर टिपूने कित्येकदा हल्ले केले. या हल्ल्यांवेळी टिपू सुलतान शत्रूसैन्यातील पकडलेल्या सैनिकांचे धर्मांतरण करत असे आणि अशा धर्मांतरित सैनिकांना स्वतःच्या सैन्यात सामील करून घेत असे. याव्यतिरिक्त टिपूच्याच हल्ल्यांदरम्यान मोठ्या संख्येने सर्वसामान्य तामिळींनादेखील मुस्लीम धर्मात धर्मांतरित करण्यात आले.

 

 
 

मलबारमधील अत्याचार

टिपूने केरळच्या मलबार क्षेत्रावर केलेल्या अन्याय अत्याचारांच्या घटना तर निर्घृण आणि क्रूर शब्दांनाही लाजवतील अशाच आहेत. मलबारमध्ये टिपूने मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले. याची पुष्टी त्यानेच वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांतून होते, हे उल्लेखनीय. १९ जानेवारी १७९० रोजी बुरदुज जमाउन खान याला लिहिलेल्या पत्रात टिपू लिहितो की, ”तुम्हाला माहिती आहे का, मी नुकताच मलबारवर मोठा विजय मिळवला असून चार लाखांपेक्षा अधिक हिंदूंना मुसलमान धर्मांत धर्मांतरित केले आहे.” एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश अधिकारी असलेल्या विल्यम लोगान यांनी आपल्या ‘मलबार मॅन्युअल’ या पुस्तकात टिपूने कशाप्रकारे आपल्या ३० हजार सैनिकांच्या तुकडीसह कालिकतमध्ये धुमाकूळ घातला, याची साद्यंत हकीकत लिहिली आहे. कालिकतमध्ये प्रवेश करतेवेळी टिपू सुलतान हत्तीवर स्वार झालेला होता आणि त्याच्यामागे त्याची विशाल सेना चालत होती. विरोध करणार्‍या आणि इस्लामची दीक्षा न घेणार्‍या पुरुषांना आणि महिलांना दिवसाढवळ्या फाशी देण्यात आली आणि कहर म्हणजे त्यांच्या मुलांना त्यांच्याच गळ्यात बांधून लटकावले होते.

 
 
 

कुर्गवरील आक्रमण

टिपूने कर्नाटकच्या कुर्ग आणि मंगलोर भागात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची हत्या केली आणि त्यांना मुसलमान धर्मात धर्मांतरित केले. इतिहासाने या घटनांची नोंद करून ठेवलेली आहेच. १७८८ मध्ये टिपूच्या सैन्याने कुर्गवर आक्रमण केले आणि याचदरम्यान शेकडो गावेच्या गावे जाळून, उद्ध्वस्त करून टाकण्यात आली. टिपूच्याच दरबारातील अधिकारी आणि त्याचे चरित्र लिहिलेल्या लेखक मीर हुसैन किरमानीने या हल्ल्यांबाबत विस्ताराने लिहिले आहे. टिपूच्या अत्याचारांची खरी कहाणी सांगणारी ही सर्वच तथ्ये, दस्तावेज आजही उपलब्ध आहेत. मात्र, टिपूचे समर्थक त्याच्या कृत्यांना सामान्य घटना असल्याचे म्हणतात. टिपूच्या समर्थकांचे म्हणणे असते की, ”राजा जेव्हा एकमेकांच्या राज्यावर कब्जा करत असत, तेव्हा ते लुटपाट आणि अत्याचार तर करतच असत, ते टिपूनेही केले, त्यात काय विशेष!!” पण त्यांना हे कळत नाही की, आपण ज्या राजांची उदाहरणे देत आहोत, त्यांची लढाई धार्मिक नव्हे, तर राजकीय होती आणि त्यासाठीच त्यांनी लोकांचे बळी घेतले, तर टिपूची सगळीच कृत्ये केवळ इस्लामच्या श्रेष्ठत्वासाठी आणि प्रभुत्वासाठीच होती. इतिहासाने याचे कितीतरी दाखले जपून ठेवले आहेत की, ज्यातून टिपूने मुद्दाम बिगरमुस्लिमांविरोधात अत्याचार केल्याचे धडधडीतपणे दिसते. टिपूने म्हैसूरच्या गादीवर बसल्यानंतर म्हैसूरला इस्लामी राज्य घोषित केले. मुस्लीम सुलतानांच्या परंपरेनुसार टिपूने एका खुल्या दरबारात घोषणा केली की, ”मी सगळ्या काफरांना मुस्लीम केल्याशिवाय शांत बसणार नाही.” आपली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने तत्काळ तशा आशयाचे फर्मान सगळ्याच हिंदूंविरोधात जारी केले. टिपूने आपल्या राज्यात जवळपास पाच लाख हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान केल्याची नोंद आढळते. सोबतच हजारोंच्या संख्येने कत्तली केल्या. टिपूच्याच शब्दांत सांगायचे तर, ”जर मला संपूर्ण जगाचे जरी राज्य मिळाले तरी मी हिंदू मंदिरांना उद्ध्वस्त करण्यापासून थांबू शकत नाही.” (फ्रीडम स्ट्रगल इन केरल)

कित्येक ठिकाणी तर टिपूच्या एका पत्राचाही उल्लेख आढळतो, जे टिपूने सईद अब्दुल दुलाई आणि आपला एक अधिकारी जमान खान यांच्या नावाने लिहिले होते. टिपू पत्रात लिहितो की, ”पैगंबर मोहम्मद आणि अल्लाहच्या कृपेने कालिकतच्या सगळ्याच हिंदूंना मुसलमान केले आहे. केवळ कोचीन स्टेटच्या सीमावर्ती भागांतल्या काही लोकांचे धर्मांतरण अजूनही करू शकलो नाही. मी लवकरच यातही यशस्वी होईनच.” १९६४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘लाइफ ऑफ टिपू सुलतान’ या पुस्तकाचा इथे उल्लेख करणेही आवश्यक ठरते. यात लिहिले आहे की, “टिपूने मलबार क्षेत्रामध्ये एक लाखांपेक्षा अधिक हिंदू आणि ७० हजारांपेक्षा अधिक ख्रिश्चनांवर मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला.” या पुस्तकानुसार धर्मांतरण हेच टिपूचे खरे जीवनध्येय होते.

सेक्युलर इतिहासकारदेखील ही तथ्ये नाकारत नाहीत. पण, त्यांच्या मते ब्रिटिश इतिहासकारांनी आपल्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणांतर्गत या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजेच या लोकांना फक्त टिपूचे गुणगान करायचे सूचते, कारण त्यांना खरा इतिहास समजूनच घ्यायचा नसतो. टिपूसमर्थक इतिहासकारांच्या बुद्धीचा बिनडोकपणा म्हणजे टिपूच्या दरबारी इतिहासकारांनी, लेखकांनी लिहिलेल्या त्याच्या अत्याचाराच्या, हल्ल्यांच्या गोष्टींबाबत हे इतिहासकार म्हणतात की, ते तर टिपूच्या कारनाम्यांना वाढवून-चढवूनच दाखवणार ना! टिपू सुलतानच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल एक तर्क असाही दिला जातो की, टिपूने कित्येक मंदिरांना दान-दक्षिणा आणि जमिनी दिल्या. पण त्यांना हे कळत नाही की, एका बाजूला जवळपास आठ हजार मंदिरांची तोडफोड करणे कुठे आणि हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या काही मंदिरांना आपल्या स्वार्थासाठी संरक्षण देणे कुठे, दोन्हींची तुलनाच होऊच शकत नाही ना त्याने टिपू ‘धर्मनिरपेक्ष’ ठरू शकतो. ‘दि म्हैसूर गॅझेटिअर’मध्येही टिपूने जवळपास एक हजार मंदिरांना उद्ध्वस्त केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

टिपू सुलतानच्या काळात फक्त ब्रिटिशच नव्हे, तर कितीतरी परकीय शक्ती जसे की, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आदींनीही भारताच्या अनेकानेक भागांवर कब्जा केला होता आणि या शक्ती आपापसात लढत होत्या. टिपूने या शक्तींच्या आपापसातील झगड्यांत फ्रान्सची बाजू घेतली. टिपूने ब्रिटिशांशी लढण्यासाठी फ्रेंचांच्या सहकार्याने अत्याधुनिक सुसंघटित सैन्य उभे केले होते. सुरुवातीला तर फ्रेंचांनी टिपूला साथ दिली, पण युद्धादरम्यान टिपूने केलेला नरसंहार, जबरदस्तीने केलेले धर्मांतरण आणि क्रूर व्यवहार, यातना-वेदना व त्याने केलेल्या गुन्ह्यांना पाहून ते स्तंभित झाले. परिणामी, टिपूच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी फ्रेंचांनी जे लष्करी अधिकारी पाठवले होते, त्यांनी त्याच्या बरोबरीने लढण्यास नकार दिला आणि ते माघारी परतले. शिवाय टिपूने फ्रेंच शासकांशी भागीदारी करून ब्रिटिशांना भारताबाहेर पळवून लावण्याचे आणि नंतर फ्रेंचांच्या मदतीने भारताचे तुकडे करण्याचा कट आखल्याचेही काही पुरावे मिळाले आहेत. असेही उल्लेख आढळतात की, टिपूने त्या काळात अफगाणिस्तानचा शासक जमान शाह याला भारतावर हल्ला करण्याचे निमंत्रण दिले. जमान शाहच्या हल्ल्यामुळे इथे इस्लामला आणखी प्रोत्साहन मिळेल, असा त्यामागे टिपूचा होरा होता. म्हैसूरच्या तिसर्‍या युद्धाच्या आधीपासून सतत १७९२ पर्यंत अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दालीचा पणतू जमान शाहसोबत टिपूने पत्रव्यवहार स्थापित केला.

 

 
 

कबीर कौसर यांनी लिहिलेल्या लिखित ‘हिस्ट्री ऑफ टिपू सुलतान’ (पृ. १४१-१४७) मध्ये या पत्रव्यवहाराचा अनुवाद झाला आहे. या पत्रव्यवहारातील काही अंश इथे दिले आहेत-

. “महामहिम आपल्याला सूचित आहेच की, माझ्या महान अभिलाषेचा उद्देश जिहाद (धर्मयुद्ध) आहे. जिहादचा या भूमीवरील परिणाम म्हणजे अल्लाह, या भूमीत मुहम्मदीय उपनिवेशाच्या चिन्हाची रक्षा करत राहिला आहे. अल्लाह असा आहे, जो नोआच्या आर्कप्रमाणे रक्षा करतो आणि त्याग केलेल्या अविश्वासूंच्या वाढत्या बाहूंना कापत आहे.”

. टिपूकडून जमान शाहला दि. ५ फेब्रुवारी १७८९ ला एक पत्र पाठवले गेले. त्यात लिहिले आहे की, “या परिस्थितीमध्ये पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सूर्याच्या स्वर्गाच्या केंद्रामध्ये असल्याने सर्वांना माहिती आहे, त्या अल्लाह आणि त्याने पाठवलेल्या पैगंबराच्या आदेशाने एकमत होऊन आपल्याला आपल्या धर्मशत्रूंविरोधात धर्मयुद्ध छेडण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. या भागातील पंथाचे अनुयायी शुक्रवारी एका निश्चित केलेल्या ठिकाणी सदैव एकत्र येऊन या शब्दांत प्रार्थना करतात- हे अल्लाह, त्या लोकांनी ज्यांनी पंथाचा मार्ग रोखला आहे, ठार करा. त्यांच्या पापांसाठी त्यांचे शीर धडावेगळे करा. माझा पूर्ण विश्वास आहे की, सर्वशक्तीमान अल्लाह आपल्या प्रियजनांच्या हितांसाठी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करेल आणि पवित्र उद्देशाच्या गुणवत्तेमुळे आपल्या सामूहिक प्रयत्नांना त्या उद्देशासाठी फलीभूत करेल आणि या शब्दांमुळे, तुझे (अल्लाहचे) लष्कर विजयी होईल, तुझ्या प्रवासाने आम्ही विजयी आणि यशस्वी होऊ.” टिपू धर्मांध होता, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्याची तलवार. ज्या तलवारीने टिपूने हिंदूंवर हजारो अत्याचार, हल्ले केले, त्याच तलवारीवर कोरलेले होते की, ”माझ्या मालका, माझी मदत कर की, मी जगातल्या सगळ्या काफरांचा (बिगर मुस्लिमांचा) खात्मा करेन.”

*****

डाव्या-पुरोगामी इतिहासकारांनी टिपू सुलतान किती महान होता, हे सांगण्यासाठी कितीतरी गैरसमज आपल्या लेखनातून पसरविले. टिपू सुलतानच्या राज्यात हिंदूंना सरकारी नोकरीत पुरेपूर संधी दिली जात असे, असा एक प्रचार केला जातो, पण त्यात तथ्य नाही. उलट टिपू सुलतानच्या राज्यात मुसलमानांनाच नोकरीत प्राधान्य दिले जात असे. एवढेच नव्हे, तर अपात्र असूनही मुसलमान असल्यामुळे मोठ्यात मोठ्या पदांवर एखाद्या मुसलमान व्यक्तीलाच बसवले जाई. यामुळे जनतेची दशा अधिकच शोचनीय झाली. टिपू सुलतानच्या मंत्रिमंडळात फक्त पूर्णिया नामक एकमेव हिंदू व्यक्ती होता. त्यामुळे टिपूच्या राज्यात हिंदूंना नोकरीची पुष्कळ संधी दिली जात असे, हा एक अपप्रचार असल्याचेच स्पष्ट होते. टिपू सुलतानच्या राज्यात मुसलमानांवर विशेष मेहेरबानी दाखवल्याची इतरही अनेक उदाहरणे आहे. टिपूच्या राजवटीत मुसलमानांना घरपट्टी आणि मालमत्ता करांवर सूट दिली जात असे. जो हिंदू मुस्लीम धर्म स्वीकारे, त्यालाही अशीच सवलत दिली जाई. टिपूच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी नियुक्त केलेल्या म्हैसूरच्या भू-राजस्व विभागाचे अधिकारी मॅक्लॉयड यांनी याबाबत लिहून ठेवले आहे. ते लिहितात की, “टिपू सुलतानच्या राज्यातील सर्वच अधिकार्‍यांची नावे केवळ मुस्लीम आहेत, जसे की, शेख अली, शेरखान, मोहम्मद सय्यद, मीर हुसैन, सय्यद पीर आदी.”

टिपू सुलतानने कितीतरी मंदिरांना वार्षिक अनुदान दिले होते, असाही भ्रम पसरवला जातो. विल्यम लोगन आणि लेविस राइस या लेखकांनी मात्र यातील तथ्यात्मक माहिती लिहिली आहे. टिपू सुलतानच्या संपूर्ण राज्यात त्याच्या मृत्यूवेळी केवळ दोन मंदिरांमध्ये दैनिक पूजा होत होती. लोगन आणि राइस यांच्यानुसार टिपू सुलतानने दक्षिण भरतातील ८०० मंदिरांचा विध्वंस केला. अनेक लेखकांनी आपल्या लेखांतून टिपू सुलतानकडून तोडण्यात आलेल्या मंदिरांवर मते मांडली आहेत.

दि म्हैसूर गॅझेटिअर’ सांगते की, टिपूने दक्षिण भारतामध्ये ८०० पेक्षा अधिक मंदिरे नष्ट केली होती. के. पी. पद्मनाभ मेनन आणि श्रीधरन मेनन यांनी लिहिलेल्या पुस्तकांत त्या नष्ट-भ्रष्ट केलेल्या मंदिरांचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आढळते-

ऑगस्ट १७८६ मध्ये (चिन्गम महिना, ९५२ मल्याळम ऐरा) टिपूच्या सैन्याने प्रसिद्ध पेरुनम मंदिरातील मूर्तींचा विध्वंस केला आणि त्रिचूर व करवन्नूर नदीदरम्यानच्या सर्वच मंदिरांना नष्ट-भ्रष्ट केले. शिवाय त्रिप्रंगोट, थ्रिचैम्बरम, थिरुमवाया, थिरवन्नूर, कालिकत थाली, हेमम्बिका मंदिर पालघाट येथील जैन मंदिर, माम्मियूर, पम्बाताली, पेम्मायान्दू, थिरवनजीकुलम, त्रिचरू येथील बडक्खुमन्नाथन मंदिर, बेलूर शिवमंदिर आदी प्रसिद्ध मंदिरांनाही टिपूच्या सैन्याने लुटले आणि तिथे तोडफोड केली. टिपूच्या व्यक्तिगत रोजनिशीमध्येही टिपूच्या हिंदूंच्या श्रद्धास्थानांना, मंदिरांना उद्ध्वस्त केल्याचे उल्लेख आढळतात. चिराकूल राजाने टिपूच्या सैन्याकडून होत असलेल्या विनाशापासून स्थानिक मंदिरांना वाचवण्यासाठी टिपू सुलतानला चार लाख रुपयांचे सोने चांदी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. टिपूने मात्र चिराकूल राजाच्या प्रस्तावाला धुडकावून लावत उद्दामपणे उत्तर दिले की, “संपूर्ण जग जरी मला दिले तरी मी हिंदू मंदिरांचा विध्वंस करणे थांबविणार नाही.” टिपू सुलतानची शृंगेरी मठाधीश जगद्गुरू शंकराचार्यांशी घनिष्ठ मैत्री होती, दोघांमध्ये पत्रव्यवहार होत असे, असाही प्रचार केला जातो. डॉ. एम. गंगाधरन याबाबत लिहितात की, “टिपू सुलतानचा भूत-प्रेत आदींवर मोठा विश्वास होता. शृंगेरी मठातील आचार्यांशी टिपूचा यामुळे संबंध आला. टिपूने शृंगेरी मठातील आचार्यांना धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी दान (पैसा-अडका-संपत्ती) पाठवले होते. आपल्या सैन्यावर भूत-पिशाच्चादी वाईट शक्तींचा कुप्रभाव पडू नये, अशी टिपूची त्यामागची भावना होती.” म्हणजेच, शृंगेरी मठाशी टिपूचा वैयक्तिक जिव्हाळ्याचा संबंध नव्हता, तर व्यावहारिक संबंध होता, हे कळते. टिपू सुलतानने कधीही हिंदूंना प्रताडित केले नाही व हिंदूंवर अत्याचार केले नाहीत, असेही म्हटले जाते. पण, टिपू सुलतानची पत्रे आणि तलवारीवर कोरलेले शब्द वाचले की टिपू सुलतानचा खरा चेहरा समोर येतो.

 

 
 

टिपू सुलतानची पत्रे

टिपूने लिहिलेल्या पत्र, संदेश आणि सूचनांचे काही अंश खालीलप्रमाणे आहेत. विख्यात इतिहासतज्ज्ञ, सरदार पाणिक्कर यांनी लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीतून या संदेश, सूचना तथा पत्रांचे मूळ शोधले होते.

· अब्दुल खादरला २२ मार्च १७८८ रोजी लिहिलेले पत्र असे-

१२ हजारांपेक्षा अधिक हिंदूंना इस्लामची दीक्षा देण्यात आली. यात अनेक नंबुद्री होते. आता याचा हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारही करण्यात यावा. स्थानिक हिंदूंना आपल्याकडे आणले जावे आणि त्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करावे. कोणत्याही नंबुद्रीला सोडू नये.”

· कालिकतच्या आपल्या सेनानायकाला १४ डिसेंबर १७८८ रोजी लिहिलेल्या पत्रात टिपू म्हणतो की, “मी तुझ्याकडे मीर हुसैन अलीबरोबर आपल्या दोन अनुयायांना पाठवत आहे. त्याच्यासोबत तू सर्वच हिंदूंना बंदी करून घे आणि ठार मारून टाक.” माझा आदेश आहे की, ”२० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना तुरुंगात ठेवले जावे आणि उरलेल्यांपैकी पाच हजार जणांना झाडावर लटकावून त्यांचा खात्मा केला जावा.”

· बदरुज समाँ खानला लिहिलेले पत्र- (दि. १९ जानेवारी १७९०)

तुला माहिती नाही का की, मी नजीकच्याच काळात मलबारमध्ये एक मोठा विजय मिळवला असून चार लाखांपेक्षा अधिक हिंदूंना मुसलमान केले. माझा आता लवकरात लवकर पानी रमन नायरकडे अग्रेसर होण्याचा निश्चय आहे. कालांतराने तो आणि त्याची प्रजा इस्लाममध्ये धर्मांतरित करता येईल, त्यामुळे मी श्रीरंगपट्टनमला परत जाण्याचा विचार सोडून दिला आहे.” टिपूने हिंदूंना यातना देण्यासाठी मलबारच्या विभिन्न क्षेत्रांत आपल्या सेनानायकांना कितीतरी पत्रे लिहिली होती. जिल्ह्यातल्या प्रत्येक हिंदूचा इस्लाममध्ये आदर (धर्मांतरण) केला पाहिजे, हिंदूंना त्यांच्या लपण्याच्या जागी शोधले पाहिजे, त्यांच्या इस्लाममधील सर्वव्यापी धर्मांतरणासाठी सर्व मार्ग व युक्त्या-सत्य आणि असत्य, कपट आणि बल-सर्वांचाच वापर केला पाहिजे. टिपूने हिंदूंवर केलेले अत्याचार त्याच्या निष्पक्षपणाचे ढोंग उघडे पाडते.

· डॉ. गंगाधरन यांनी ब्रिटिश कमिशनच्या आधारे लिहिले की, “जमोरियन राजाच्या कुटुंबातील सदस्यांना आणि अनेक नायर हिंदूंना टिपूने जबरदस्तीने सुन्नत करून मुसलमान केले आणि गोमांस खाण्यासाठी विवश केले.

· ब्रिटिश कमिशनच्या अहवालानुसार, टिपू सुलतानच्या मलाबारवरील हल्ल्यांवेळी १७८३ ते १७९१ च्या आसपास जवळपास ३० हजार हिंदू नंबुद्री मलबारमधील आपली सर्व संपत्ती-पैसा-अडका आणि घरदार सोडून त्रावणकोर राज्यात येऊन वसले.

· इलान्कुलम कुंजन पिल्लई लिहितात की, “टिपू सुलतानच्या मलबारवरील आक्रमणावेळी कोझीकोडमध्ये सात हजार ब्राह्मणांची घरं होती, ज्यातील दोन हजार घरे टिपूने नष्ट केली आणि टिपूच्या अत्याचारांनी घाबरलेले लोक आपली घरे सोडून जंगलांमध्ये पळून गेले. टिपूने आपल्या अत्याचारांच्या कहरात लहान लहान बालके आणि स्त्रियांनाही उद्ध्वस्त केले. जबरदस्तीने धर्मांतरण केल्याने मोपला मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि हिंदू लोकसंख्या घटली.”

· राजा वर्मा यांनीकेरळमधील संस्कृत साहित्याचा इतिहास’ या पुस्तकात मंदिरांच्या नष्ट करण्याचे, तोडफोडीचे अत्यंत बीभत्स वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले की, “हिंदू देवीदेवतांच्या मूर्तींना तोडून पशुंची मुंडकी छाटून मंदिरांना अपवित्र करण्यात येत असे.” 

· बिदर, उत्तर कर्नाटकाचा शासक अयाज खान होता, जो आधी कामरान नम्बियार होता, त्याला हैदर अलीने इस्लाममध्ये धर्मांतरित केले होते. टिपू सुलतान अयाज खानला सुरुवातीपासून पसंत करत नसे, त्यामुळे त्याने अयाज खानवर हल्ला करण्याचे ठरवले. अयाज खानला याची माहिती मिळाली तेव्हा तो मुंबईला पळून गेला. टिपू बिदरला आला आणि तिथल्या सगळ्याच जनतेला इस्लाम कबूल करण्यासाठी मजबूर केले. ज्यांनी धर्मांतरास नकार दिला, त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले गेले. कुर्गवर टीपू राक्षसासारखा तुटून पडला. तिथे सुमारे १० हजार हिंदूंना इस्लाममध्ये धर्मांतरित केले. कुर्गच्या जवळपास एक हजार हिंदूंना पकडून श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात बंदी केले गेले, ज्यांच्यावर इस्लाम कबूल करण्यासाठी अनन्वित अत्याचार करण्यात आले. नंतर जेव्हा इंग्रजांनी टिपूला मारून टाकले, तेव्हा ते लोक किल्ल्याच्या तुरुंगातून बाहेर आले आणि पुन्हा हिंदू झाले. कुर्ग राजपरिवारातील एका कन्येला टिपूने बळजबरीने मुसलमान केले आणि तिच्याशी निकाहदेखील केला.

 
 

· मुस्लीम इतिहासकार पि. स. सय्यद मोहम्मद ‘केरळ मुस्लीम चरित्रा’मध्ये लिहितात की, “टिपूचे केरळवरील आक्रमण आम्हाला भारतावर आक्रमण करणार्‍या चंगेज खान आणि तैमूरलंगची आठवण करून देते.”

· विल्यम लोगेन ‘मलबार मॅन्युअल’मध्ये टिपूने तोडलेल्या हिंदू मंदिरांचा उल्लेख करतात, ज्यांची संख्या शेकड्यांत आहे.

· टिपू सुलतान देशभक्त असल्याच्या वावड्या नेहमीच उठविल्या जातात. टिपूने आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती दिल्याचेही नेहमीच कंठशोष करून सांगितले जाते. पण मूळ हकीकत अशी की, टिपू सुलतानचा पिता हैदर अली याने सर्वप्रथम म्हैसूरच्या वाडियार राजाला हटवून सत्ता बळकावली होती. त्यामुळे म्हैसूरला टिपू सुलतानचे राज्य म्हणणे चुकीचे ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे, टिपूचे स्वप्न ‘दक्षिणेचा औरंगजेब’ बनण्याचे होते. टिपूला ‘पातशहा’ व्हायचे होते. त्याचे स्वप्न देशवासीयांसाठी एका उन्नत देशाची निर्मिती नव्हे, तर दक्षिण भारताला दारुल इस्लाममध्ये परिवर्तित करण्याचे होते. मलबारसारख्या सुंदर प्रदेशाला टिपूने ज्याप्रकारे उद्ध्वस्त केले, ते वाचून कोणीही निष्पक्ष व्यक्ती म्हणू शकते की, टिपू एक देशभक्त नव्हे तर एक दुर्दांत, धर्मांध, कट्टर अत्याचारीच होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.