भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल्वे नेटवर्क आता उच्च गतीसाठी सुसज्ज असल्याने आधुनिक सिग्नलिंग सिस्टम आणि ‘कवच प्रणाली’ यांसारख्या मजबूत सुरक्षा उपायांद्वारे ही प्रगती शक्य झाली आहे. अशातच भारतीय बनावटीच्या ‘वंदे भारत’, ‘अमृत भारत एक्सप्रेस’, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ यांसारख्या रेल्वे डब्यांमुळे रेल्वे प्रवासात कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेचे एक नवीन युग सुरू झाले आहे. त्याविषयी सविस्तर...
‘वंदे भारत’ एक्सप्रेस ज्याला पूर्वी ‘ट्रेन 18’ म्हणून ओळखले जात असे, ती भारतीय रेल्वेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. सध्या 16 भारतीय रेल्वे झोनमध्ये विविध रेल्वेमार्गांवर 68 सक्रिय ‘वंदे भारत’ एक्सप्रेस कार्यरत आहेत, ज्यात दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी पाच नवीन ‘वंदे भारत’ गाड्यांचा समावेश आहे, त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. ही ‘सेमीहाय स्पीड ट्रेन’ तंत्रज्ञानातील एक मोठी झेप आहे. पूर्णपणे भारतनिर्मित भारतात पहिली ‘सेमी हायस्पीड ट्रेन’ म्हणून या ट्रेनला विशेष महत्त्व आहे, ज्याचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. ‘आरडीएसओ’ने डिझाईन केलेली आणि भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (आयसीएफ)द्वारे निर्मित ही ट्रेन केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर रेल्वे वाहतुकीच्या क्षेत्रातील देशाच्या तांत्रिक पराक्रमाचे हे प्रतीक आहे, ज्याचे नाव ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावरून ठेवण्यात आले.
दि. 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यानच्या उद्घाटन सेवेने ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला. हा एक महत्त्वाचा टप्पा होता, जो भारतीय रेल्वे प्रवासात एका नवीन युगाची नांदी दर्शवतो. प्रारंभी भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या स्मरणार्थ ऑगस्ट 2023 सालापर्यंत 75 ‘वंदे भारत’ सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले होते.
‘वंदे भारत’ एक्सप्रेस तिच्या प्रगत वैशिष्ट्यांसह आणि सुविधांसह दोन आरामदायी प्रवासाचे पर्याय देते. ‘चेअर कार’ (सीसी) आणि ‘एक्झिक्युटिव्ह चेअर कार’ (ईसी) 16 डब्यांच्या आवृत्तीमध्ये 14 ‘चेअर’ डबे आणि दोन ‘एक्झिक्युटिव्ह चेअर’ असणारे डबे आहेत. ज्यामुळे एकूण 1 हजार, 128 प्रवाशांची आसन क्षमता आहे. आठ डब्यांच्या ‘मिनी वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये, सात ‘चेअर’ आणि एक ‘एक्झिक्युटिव्ह चेअर’ डबा आहे, ज्यामुळे 530 प्रवाशांची आसन क्षमता आहे. 20 डब्यांच्या आवृत्तीमध्ये 18 ‘चेअर’ आणि दोन ‘एक्झिक्युटिव्ह चेअर’ डबे आहेत, ज्यामुळे एकूण 1 हजार, 440 प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे.
अमृत भारत एक्सप्रेस
दि. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सहरसा येथून मुंबईकडे येणार्या पहिल्या ‘अमृत भारत’ एक्सप्रेस ट्रेनला झेंडा दाखविला. ही ट्रेन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि बिहारमधील सहरसा दरम्यान धावेल. महाराष्ट्रातून धावणारी ही पहिलीच आणि एलटीटी-सहरसा ही दरभंगा-आनंद विहार आणि मालदा टाऊन-एसएमव्हीटी बंगळुरुनंतर देशातील तिसरी ‘अमृत भारत’ एक्सप्रेस असेल. ‘अमृत भारत’ एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना उत्कृष्ट प्रवास अनुभव देण्यासाठी उच्च दर्जाच्या डिझाईन केलेली आसने आणि सामानासाठी रॅक, एलईडी लाईट्स, सीसीटीव्ही, मोबाईल चार्जिंग होल्डर्स, सार्वजनिक माहिती प्रणाली देण्यात आलेली आहे. ट्रेनच्या दोन्ही टोकांना इंजिन बसवले आहेत. ज्यामुळे ट्रेन परतीसाठी लागणारा वेळ कमी होईल. ‘अमृत भारत’ एक्सप्रेसमध्ये स्लीपर आणि जनरल असे 22 कोच आहेत. ‘पुश-पुल’ तंत्रज्ञानावर आधारित, ही ट्रेन सामान्य एक्सप्रेस गाड्यांपेक्षा जास्त वेगाने धावते. ही ट्रेन वातानुकूलित नसली, तरीही त्याची रचना ‘वंदे भारत’ सारखीच आहे. चेन्नईतील ‘इंटिग्रल कोच’ फॅक्टरी’मध्ये 200 गाड्या तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांना आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी संपूर्ण भारतात ‘अमृत भारत’ एक्सप्रेस सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.
नमो भारत रॅपिड रेल
‘नमो भारत रॅपिड रेल’चे अनावरण ही खर्या अर्थाने शहरी वाहतूक सेवेत क्रांती घडविणारी ‘मास ट्रान्झिट सेवा’ आहे. कारण, देशातील मेगा सिटीजमधील वाहनांची वर्दळ कमी होण्यास मदत होईल. ही संकल्पना युरोपमधील ‘क्रॉस कंट्री ट्रेन’वर आधारित आहे, जी मोठ्या शहरांमधील गर्दी कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. ‘नमो भारत रॅपिड रेल’ 110 किमी प्रतितास वेगाने धावते. त्यामुळे दुर्गम भागात काम करणार्या लोकांना त्यांच्या शहरापासून मुख्य शहरांच्या दिशेने दैनंदिन प्रवास करण्याची सुविधा मिळेल. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबादसारखी मोठी शहरे स्थलांतराच्या दबावामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत समस्यांना तोंड देत आहेत. या जलद रेल्वेसेवामुळे अतिरिक्त ताणामुळे पायाभूत सुविधांशी झुंजणार्या मेट्रो शहरांना दिलासा मिळेल.
इंटरसिटी रेल्वे प्रवास वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पूर्वी ‘वंदे मेट्रो’ म्हणून ओळखल्या जाणार्या सेमी-फास्ट ‘नमो भारत रॅपिड रेल’ची पहिली चाचणी मुंबईतही काही दिवसांपूर्वी पार पडली. ही चाचणी 130 किमी प्रतितास वेगाने करण्यात आली आणि 250 किमीपर्यंतच्या मार्गांवर चालणार्या विद्यमान इंटरसिटी रेल्वे गाड्यांची जागा घेईल. ‘मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (चएचण) गाड्यांना अपग्रेड केलेला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेली ही नवीन ट्रेन वाढीव वेग, आराम आणि सुरक्षितता देते. 130 किमी प्रतितास या कमाल वेगासह ही ट्रेन मानक मेमू सेवांपेक्षा वेगवान आहे. परंतु, 180 किमी प्रतितास या वेगाने धावू शकणार्या ‘वंदे भारत’ गाड्यांपेक्षा हळू आहे. प्रवाशांना वातानुकूलित कोच, कुशन असलेल्या जागा, सीसीटीव्ही, टॉक-बॅक सिस्टम, प्रवासी माहिती प्रदर्शने, अग्निशमन शोध प्रणाली आणि अत्याधुनिक शौचालये यांसारख्या आधुनिक सुविधांनी सज्ज आहेत. दि. 21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयनगर आणि पाटणा दरम्यान पहिल्या 16 डब्यांच्या ‘नमो भारत रॅपिड रेल’ सेवेचे उद्घाटन केले. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अहमदाबाद आणि भूज दरम्यान पहिली ‘नमो भारत रॅपिड रेल’ सुरू करण्यात आली होती. अहमदाबाद-भूज ‘नमो भारत रॅपिड रेल’मध्ये फक्त 12 डबे आहेत. अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांसाठीही येणार
नवे अद्ययावत डबे
‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी आरामदायी प्रवास आणि अधिक चांगले वायुविजन अशा वैशिष्ट्यांसह नव्या रचनेतील मुंबई उपनगरी रेल्वेची (मुंबई लोकल) बांधणी करण्यात येणार आहे. दोन लोकलमधील वेळ सध्या 180 सेकंदाचा आहे. त्याला आधी 150 सेकंद करण्यात येईल. त्यानंतर हा वेळ 120 सेकंदावर आणला जाईल. लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तिन्ही मार्गांवर लोकलला ‘कवच प्रणाली’बरोबरच ‘कम्बाईन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी’ यंत्रणा जोडली जाणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी लोकलचे सर्वच डबे तुडुंब गर्दीने भरलेले असतात. अशावेळी अनेकदा डब्याबाहेर पडून अपघात तर होतातच. मात्र, अनेकदा गर्दीत कोंडल्यामुळे भोवळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा घटनाही लोकल प्रवासात घडतात. हे पाहता आता गर्दीतही पुरेसा ऑक्सिजन घेता येईल आणि कमीत कमी व्हायब्रेशन होईल, अशा पद्धतीचे नवे अद्ययावत डबे मुंबई लोकलसेवा पुरविणार्या मार्गाच्या ताफ्यात येणार आहे. मुंबईतील लोकल डबे हे अति गर्दी सामावून घेणारे असावेत. आज अति गर्दी हाताळू शकतील अशा गाड्यांची मुंबईला आवश्यकता आहे. यासाठी अगदी आधुनिक आणि नव्याने डिझाईन केलेल्या गाड्यांचा ताफा लवकरच मुंबई लोकलमध्ये येईल. 238 नव्या डिझाईनच्या ट्रेनची निर्मिती लवकरच सुरू केली जाणार आहे.
गायत्री श्रीगोंदेकर