पुणे तिथे सज्जनशक्तीला काय उणे?

    18-May-2025   
Total Views |
 
Indian People Solidarity with Palestine and Boycott Disinvestment movement were distributing leaflets in support of Palestine and anti-Israel in Pune
 
दि. 8 मे रोजी ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ आणि ‘बीडीएस’ (बॉयकॉट, डिसइन्व्हेस्टमेंट, सँक्शन्स) चळवळीचे कार्यकर्ते पुणे, कर्वेनगर येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनात आणि इस्रायलविरोधी पत्रके वाटून, इस्रायल तसेच ज्यूंच्या निषेधासाठी आवाहनही करत होते. पुणेकरांनी या लोकांना पुणेकरांचे अस्सल तर्कवादी देशनिष्ठ रंग दाखवले. देश, समाज आणि धर्मासंबंधी भारतीयांच्या भावना किती तीव्र आहेत, हे सिद्ध करणारी ही घटना. या घटनेचा मागोवा घेणारा हा लेख...
 
राष्ट्रनिष्ठा, धर्मप्रेम आणि तर्कशुद्ध नीती यांबाबत पुणेकरांचा इतिहास सर्वमान्यच. ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीचे नुकतेच प्रत्यंतर दिसून आले. कर्वेनगरच्या डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेट बाहेर काही चार-पाच टाळकी उभी राहून निदर्शने करीत होती, पत्रके वाटत होती. लोकांना अडवून अडवून सांगत होती, “ज्यू लोक नीच आहेत. त्यांनी पॅलेस्टाईनमधील लोकांच्या हत्या केलेल्या आहेत. ज्यू लोकांना सर्वांनी वाळीत टाकायला पाहिजे. त्यांचा निषेध केला पाहिजे,” असे म्हणत हे लोक पॅलेस्टाईनचे गोडवे गात होते. तसेच, “गाझा पट्टीवर इस्रायलने अतिक्रमण केले, इस्रायलला मदत करणार्‍या सगळ्यांवर बहिष्कार टाकायला हवा,” अशी ही सगळी फलकबाजी सुरु होती.
 
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना धर्मांध दहशतवाद्यांनी भारतातल्या 26 हिंदूंना धर्म विचारून आणि केवळ ते हिंदू आहेत, म्हणून क्रूरपणे मारून टाकले. यामध्ये महाराष्ट्रातल्या सात बांधवांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये पुण्याचे संतोष जगदाळेही होते. जगदाळे कुटुंब दुःखात होते, इतकेच नव्हे तर अवघे पुणे शोकमग्न होते. मात्र, जगदाळे यांच्या घराच्या काही अंतरावरच हे लोक पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ गळे काढत होते. इस्रायलबद्दल गरळ ओकत होते. मात्र, दहशतवादी ‘हमास’च्या क्रौर्याबद्दल हे लोक मूग गिळून गप्प बसले होते. खरं तर अशा लोकांना देशाशी काही देणे-घेणे नाही. आपल्या समाजबांधवांच्या मृत्यूबद्दल किंचित दुःखही नाही. हे लोक पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी व पाकिस्तान यांच्याविरोधात काहीच बोलले नाहीत. तेव्हा हे लोक कोणत्या बिळात लपून बसले होते? भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू असताना हे पॅलेस्टाईनसमर्थक एकाएकी का बाहेर आले? एकूणच हा घटनाक्रम पाहता, त्या परिसरातील पुणेकरांनाही दाट संशय आला. तिथे जमलेल्या सज्जनशक्तीला वाटले की, हे लोक पॅलेस्टाईनच्या आड ‘हमास’चे समर्थन करीत आहेत. याचाच दुरान्वये संबंध पाकिस्तानचे समर्थन करणे असाही आहे. त्यामुळे पत्रक वाटणार्‍या टोळक्यांना जमावाने चांगलेच पैलावर घेतले.
 
असो. काही लोकांच्या मते, या टोळक्यांचे लोकांना इस्रायल, ज्यूंविरोधात फितवण्याचे आणि पॅलेस्टाईनला समर्थन आहे दर्शवित, हलकेच ‘हमास’ला समर्थन मिळवून द्यायचे, असे कटकारस्थान होते. त्यांचे ते कटकारस्थान उघडे पडले. त्यामुळे उपस्थित लोक या टोळक्यांच्या विरोधात गेले. शेवटी या टोळक्याने नेहमीप्रमाणे स्त्रियांना पुढे केले. ही त्यांची जुनीच कार्यपद्धती म्हणा. त्यांचे विचार भोळ्या समाजावर लादण्यासाठी त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आंदोलने-निदर्शने करायची. अर्थात, ही निदर्शने नेमकी मोदी, रा.स्व.संघ आणि हिंदू धर्म, हिंदू समाज यांच्याविरोधात किंवा समाजविघातक बाबींचे समर्थन म्हणून केलेली असतात. त्यामुळे देशनिष्ठ, धर्म आणि समाजनिष्ठ सज्जनशक्ती यांच्या विरोधात जाते.
 
त्यांना विरोध करते. लोक संतापली आणि या असल्या लोकांचा समाचार घेऊ लागली की, मग कुठेतरी टेहळणी करणार्‍या किंवा लपून बसणार्‍या यांच्या महिला साथीदार पुढे येतात. त्यांच्या साथीदारांना घेऊन सज्जनशक्तीपासून दूर पळून जातात. त्यावेळी निदर्शने करणारे त्यांचे पुरुष साथीदार गलितगात्र झाल्याचा अभिनय करतात. त्यावेळी दृश्य दिसते की, ‘गरीब रडवेले झालेल्या पुरुषांना हिंदू दिसणार्‍या जमावाने घेरले आहे. या जमावापासून त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आया-बहिणी प्रयत्न करत आहेत.’ बिचार्‍या! तर या नाटकाचा फोटो समाजमाध्यमांवर आणि वर्तमानपत्रातही छापून आणला जातो. या सगळ्यामध्ये या लोकांनी मानवतावाद, समता, स्वातंत्र्य वगैरे वगैरे नाव घेत, समाजविघातक शक्तींसाठी काम केले किंवा सज्जनसमाजशक्ती विरोधात लोकांना चिथवण्याचे कटकारस्थान केले, हे बाजूला राहते.
 
पण, पुणेकरांचे अभिनंदन! त्यांनी या कटकारस्थानाला उधळून लावले. दि. 8 मे रोजी रस्त्यावर विविध समाजाचे लोक होते. ते एकमेकांना ओळखतही नसतील. नोकरी-धंदा करून घरी येणारे, जाणारे ते भारतीय नागरिक होते. पण, हे टोळके पॅलेस्टाईनसाठी कळवळत असताना पुणेकर जेव्हा एकत्र आले, त्यावेळी ते फक्त हिंदू होते, ते फक्त भारतीय होते. या घटनेचा व्हिडिओ बघताना दिसते की, लोकं येत होती आणि या पॅलेस्टाईन समर्थकाला जमेल त्या मार्गाने विरोध करत होती. कायदा-सुव्यवस्थेचे भान राखत पोलिसांनीही चोख कारवाई केली. त्यानुसार पॅलेस्टाईन समर्थनाच्या आड ज्यूंविरोधात मत व्यक्त करणार्‍या या टोळक्यातील सस्मित राव, कमल शाह, स्वप्नजा लिमकर, ललिता तंगिराला आणि इतर कार्यकर्त्यांवर वारजे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे ‘कलम 196’, ‘299’, ‘302’, ‘189(2)’, ‘190’, ‘126(2)’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे या टोळक्याला जाब विचारला. त्यांना त्यांची ती निदर्शने करण्यास प्रतिबंध केला वगैरे वगैरेसाठी वारजे पोलीस ठाण्यात महेश पावळे, सागर धामे, अमित जाधव व इतर यांच्यावर ‘कलम 71’, ‘189(2)’, ‘190’, ‘191(2)’, ‘115(2)’, ‘351(2)’, ‘352’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्या टोळक्यावर आणि त्यांना विरोध करणार्‍यांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, समाजाला या घटनेबाबत काय वाटते? तर समाजमाध्यमांवरच्या आणि लोकांच्याही प्रत्यक्ष प्रतिक्रिया पाहिल्या तर जाणवते की, लोकांनी या पॅलेस्टाईन समर्थकांना कडवा विरोध केला आहे. तर या पॅलेस्टाईन समर्थकांना विरोध करणार्‍यांना शाबासकी आणि शुभेच्छासह समर्थन दिले आहे. एकंदर काय? देश बदलत आहे. समाज बदलत आहे. ‘माझा देश, माझी मानवतावादी धर्मसंस्कृती’ ही भावना समाजात रुजली आहे. आता भारतीय फसणार नाहीत. पण, या घटनेवरून एकच वाक्य मनात येते, ‘पुणे तिथे सज्जनशक्तीला काय उणे?’
 
इस्रायलला विरोध करणारे ते लोक कोण होते?
 
हे निदर्शन करणारे होते, ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ आणि ‘बीडीएस’ (बॉयकॉट, डिसइन्व्हेस्टमेंट, सँक्शन्स) चळवळीचे कार्यकर्ते. 2005 सालापासून ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ हे ‘बीडीएस’ चळवळ जगभरात चालवत आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आहे, वर्णवर्गभेदाच्या विरोधात आहे, अत्याचाराच्या विरोधात आहे, असे म्हणत इस्रायल आणि इस्रायलच्या मित्रराष्ट्रांविरोधात जगभरात निदर्शने करत असतात. पण, या सगळ्यामध्ये ‘हमास’च्या दहशतवादाबाबत किंवा जागतिक स्तरावरच्या कट्टर धर्मांध मुस्लीम दहशतवादी संघटनांविरोधात ‘बीडीस’ किंवा ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ काहीच बोलत नाहीत. दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला करून ‘हमास’ने शेकडो नागरिकांना बंधक केले. त्यांना गाझामध्येच कैद करून त्यांच्यावर अत्याचार केले. पण, त्याबद्दलही या संघटना गप्पच. अरुंधती रॉय आणि भारताचे ‘चिकन नेक’ कापण्याची इच्छा असलेला शरजील उस्मान आणि त्यांच्यासारखेच विचार-आचार असणारे लोक या ‘बीडीएस’ चळवळीचे भारतातील मुख्य समर्थक आहेत. त्यामुळे या चळवळीची दिशा आणि दशा काय असेल, हे वाचकांना कळलेच असेल.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.