गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आणि दहशतवाद हे वेगळे नसल्याचे वेळोवेळी समोर आलेल्या पुराव्यांतून सपशेल सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या संबोधनात पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला. पण, मुद्दा हाच की, दहशतवादाच्या नावाने कंठशोष करणारा अमेरिकेसह संपूर्ण जागतिक समुदाय पाकिस्तानला याचा जाब आता तरी विचारणार का?
हलगाम येथे हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्याचे भ्याड कृत्य पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केल्यानंतर या नृशंस हत्याकांडाचा बदला घेतला जाईल, असे भारताकडून घोषित करण्यात आले होते. हे भ्याड कृत्य करणार्यांना जन्माची अद्दल घडेल, असा धडा शिकविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. या दहशतवाद्यांविरुद्ध भारत काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी दि. 7 मे रोजी रात्री 1 वाजून 5 मिनिटे ते 1 वाजून 30 मिनिटे या अवघ्या 25 मिनिटांच्या कालावधीत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करून टाकले. भारताने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान पुरता बिथरून गेला, हादरून गेला.
या घटनेनंतर पाकिस्तानने भारताच्या विविध विमानतळांवर ड्रोनने हल्ले केले. तसेच, सीमेपलीकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर तोफांचा भडीमार केला. ड्रोनचे एकामागून एक हल्ले केले जात असताना, हे सर्व हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने निष्प्रभ केले. तरीही पाकिस्तानची खुमखुमी थांबत नव्हती. हे हल्ले लक्षात घेऊन, भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी समन्वय साधून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानच्या अनेक धावपट्ट्यांचे, रडार यंत्रणांचे हवाई दलाने प्रचंड नुकसान केले. भारताचे हे हल्ले लक्षात घेऊन पाकिस्तानने भारतीय लष्कराशी संपर्क साधून युद्धविरामाचा प्रस्ताव पुढे केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात शिष्टाई केली. युद्धविराम होऊनही विश्वासघातकी पाकिस्तानकडून हल्ले सुरू होते. पण, नंतर त्यात खंड पडला. परंतु, भारतीय सेना दल, हवाई दल आणि नौदल यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन भारताने पाकिस्तानची जी वाताहात केली, त्याची माहिती दिली. तसेच, भारत कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सुसज्ज असल्याचे स्पष्ट केले. “भारताने प्रथमपासूनच आमची ही लढाई दहशतवाद्यांच्या विरुद्ध आहे, पाकिस्तानविरुद्ध नाही,” असे स्पष्ट करून एकप्रकारे पाकिस्तानची कोंडी केली.
भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी यांचे लागेबांधे असल्याचे भारताने सिद्ध करून दाखविले. भारतीय हवाई हल्ल्यामध्ये जे दहशतवादी मारले गेले, त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी आयोजित प्रार्थना सभेत अनेक लष्करी अधिकारी गणवेशात उपस्थित असल्याचे छायाचित्रच भारताने संपूर्ण जगासमोर सादर केले. दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कर यांचे लागेबांधे असल्याचे त्यावरून दिसून आले. जे दहशतवादी मारले गेले, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यांच्या शवपेट्या पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आल्या होत्या. मुरीदके येथील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तळावर झालेल्या अंत्यसंस्कार कार्यक्रमास पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी अब्दुल रौफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अंत्यसंस्कार कार्यक्रमास लेफ्ट. जनरल फय्याज हुसेन शाह, मेजर जनरल राव इम्रान सरताज, ब्रिगेडियर मोहम्मद फुरक्वन शब्बीर, पंजाबचे पोलीस महासंचालक डॉ. उस्मान अन्वर, पंजाबच्या असेम्ब्लीचे सदस्य मलिक सोहेब अहमद भेर्थ आदी उपस्थित राहिले होते.
दहशतवादी अब्दुल रौफ यास तर अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले आहे. तो ‘लष्कर-ए-तोयबा’चा वरिष्ठ प्रमुख आहे. असे असताना पाकिस्तानचे लष्करी आणि पोलीस अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमास उपस्थित राहतातच कसे? पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि अन्य राजकीय नेत्यांच्यावतीने या दहशतवाद्यांच्या शवपेट्यांवर पुष्पचक्रे वाहण्यात आली! आता आणखी कोणता ठोस पुरावा द्यायला हवा? ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरून गेला आहेच. पण, यानिमित्ताने पाकिस्तान दहशतवाद्यांना राजाश्रय देत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारताने रविवारीच ‘दहशतवादी हल्ला म्हणजे युद्धच’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. भारताने आपली शक्ती काय आहे, हे पाकिस्तानला दाखवून दिले. भारताचे भयंकर हवाई हल्ले पाहून पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर हा रावळपिंडी मुख्यालयातील बंकरमध्ये तीन-चार तास लपून बसला होता, अशी माहिती बाहेर आली आहे. अशी नामुष्कीची वेळ पुन्हा येऊ नये म्हणून पाकिस्तानने वेळीच शहाणे व्हावे, अन्यथा पाकिस्तानचे काही खरे नाही!
पाकिस्तानधार्जिणा करण थापर!
वादग्रस्त पत्रकार करण थापर आणि ‘द वायर’ हे दोन्हीही वादग्रस्त पत्रकारितेबद्दल प्रसिद्ध. स्वतःला अतिशहाणा समजत असलेल्या करण थापर याने गेल्या दि. 28 एप्रिल रोजी पाकिस्तानी पत्रकार आणि ‘फ्रायडे टाइम्स’चा संस्थापक-संपादक आणि पंजाबचा माजी मुख्यमंत्री नजम सेठी याची मुलाखत घेतली होती. पहलगाम हत्याकांडाच्या घटनेनंतर अवघा देश शोकसागरात बुडालेला असताना आणि देशात संतापाची लाट उसळली असताना, या करण थापर याने नजम सेठी याची ‘द वायर’साठी मुलाखत घेतली होती. ही संधी साधून नजम सेठी याने भारताचे सुरक्षा धोरण यासह भारताच्या अन्य धोरणांवर तोंडसुख घेतले. या मुलाखतीच्या निमित्ताने भारताची बदनामी करण्याची संधी नजम सेठी याने सोडली नाही. करण थापर हा पत्रकार असला, तरी तो भारतीय नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत त्याच्या निष्ठा भारताशी असल्या पाहिजेत, अशी कोणाचीही माफक अपेक्षा असणार! पण, करण थापर याने पाकिस्तानी व्यक्तीस मुलाखतीसाठी बोलावून कृतघ्नपणा केला, असे म्हणता येईल.
करण थापर याने या आधीही काश्मीरसंदर्भातील भारताच्या धोरणांवर आपल्या स्तंभातून टीका केली आहे. पाकिस्तानच्या व्यक्तीला मुलाखतीसाठी बोलावून त्यांना भारताविरुद्ध गरळ ओकण्यास मदत करीत आहोत, हे करण थापर याच्या लक्षात येत नाही, असे कसे म्हणणार! या आधीही काश्मीरमधील भारताच्या सुरक्षा उपाययोजना, भारताने केलेले लष्करी हल्ले यांबद्दल करण थापर याने आपल्या लिखाणाद्वारे शंका उपस्थित केल्या आहेत. आपल्या लिखाणाद्वारे आपण शत्रूराष्ट्रास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करीत आहोत, हे अशा अतिशहाण्या पत्रकारांच्या लक्षात कधी येणार? करण थापर आणि ‘द वायर’ची भूमिका लक्षात घेऊन गेल्या दि. 9 मे रोजी ‘द वायर’वर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानला मदत करणार्या करण थापर याच्यावरही कारवाई व्हायला हवी!
सद्यस्थिती 1971 सालापेक्षा वेगळी : थरूर
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर झालेला युद्धविराम यावरून विरोधी पक्षातील आणि प्रामुख्याने काँग्रेसमधील नेते मोदी सरकारवर टीका करीत आहेत. पण, त्यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अशा नेत्यांना नुकतेच फटकारले. 1971 सालच्या युद्धाच्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे. अचानक युद्धविराम केल्याबद्दल काही विरोधी नेत्यांनी सरकारवर टीका केली. 1971 साली झालेले युद्ध ही भारतीय इतिहासातील एक अत्यंत निर्णायक उपलब्धी होती. पण, विद्यमान परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. त्या दोन्हींची तुलना करता कामा नये, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. “भारताला दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता आणि माझ्या मते तो धडा शिकविला गेला आहे,” असे थरूर यांनी म्हटले. भारताने जो युद्धविराम केला, त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यास प्रारंभ केला. सरकारला परिस्थिती योग्यप्रकारे हाताळता आली नाही, अशी टीकाही या नेत्यांनी केली. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी विद्यमान परिस्थितीची तुलना 1971 सालच्या युद्धाशी केली. पण, आता काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीच त्यांना परस्पर उत्तर दिले आहे.